All SportsCricket

राहुल द्रविड डावखुरा फलंदाज? तुमच्या आयसीसीचा घो !

आयसीसीच्या अधिकृत वेबसाइटवर राहुल द्रविडची बायोग्राफी दिली होती. त्यात राहुल द्रविड डावखुरा फलंदाज अशी घोडचूक केली होती. ही वेबसाइट न्याहाळताना धक्काच बसला. संदर्भ म्हणून जी अधिकृत वेबसाइट आपण पाहतो, त्या वेबसाइटवर एवढी मोठी चूक कशी काय असू शकते, यावर विश्वासच बसेना. ही चूक 2019 मध्ये लक्षात आली. यापूर्वीही ती अनेक दिवस असावी. याबाबत ट्विटरवर आयसीसीला ही चूक निदर्शनास आणून दिली. तोपर्यंत आयसीसीही गाफील होती. चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी ती सुधारली. आयसीसीच्या वेबसाइटवर अचूकता पाळली जाते, मात्र खेळाडूंच्या माहितीत काही वेळा चूकही होऊ शकते. मात्र, आयसीसीच्या वेबसाइटवर ही गंभीर चूक कुणाच्याही लक्षात येऊ नये याचेच आश्चर्य वाटले.

 

राहुल द्रविड डावखुरा फलंदाज
भारताची पोलादी भिंत म्हणून ओळखला जाणारा राहुल द्रविड डावखुरा फलंदाज आहे हे आम्हाला माहिती कसं नाही..?. या अज्ञानाबद्दल आम्ही ओशाळलो हे जाहीरपणे मान्य करतो. त्याचे चेंडू सीमापार जात होते तेवढेच आम्ही पाहत होतो. तो क्रीझवर उभा असायचा तेव्हा आम्हाला तो उजव्या हाताने खेळतानाच भासत होता. जेव्हा आयसीसीच्या वेबसाइटवर हॉल ऑफ फेमच्या यादीत राहुलचं नाव डावखुरा फलंदाज म्हणून झळकलं, तेव्हा आम्हाला कळलं, राहुल द्रविड डावखुरा आहे. कदाचित आमचा टीव्हीच ‘मिरर इमेज’चा असेल. आम्ही आता टीव्ही कंपनीवर दावाच ठोकतो. टीव्हीवर सर्व चित्रेच उलटी दिसतात हे आम्ही ग्राहक न्यायालयात सबळ पुराव्यासह सिद्ध करणार. सोबत आयसीसीच्या वेबसाइटवरील राहुल द्रविडची डावखुरा फलंदाज असल्याची माहितीही जोडणार आहे.

क्रिकेटची सुप्रीम पॉवर संघटना इतकी ठामपणे सांगत असेल तर बीसीसीआयला विचारण्याची आम्ही तसदी अजिबात घेणार नाही. दस्तूरखुद्द राहुललाही आम्ही विचारणार नाही, की तू खरंच डावखुरा आहे का?

धन्य हो आयसीसी

आम्हा अज्ञानमुलक क्रिकेटवेड्यांच्या डोक्यात ज्ञानाचा प्रकाश टाकल्याबद्दल… 

अरे हे काय आता नवे?
राहुल डावखुरा नाही?
तुमच्या आयसीसीचा घो तुमच्या तर !!! इकडे आम्ही टीव्ही कंपनीवर दावा ठोकायला निघालो होतो. आणि आता तुम्हीच राहुल उजव्या हाताचा फलंदाज असल्याचं म्हणताय? कमाल आहे बुवा तुमची.
खेळाडूंच्या फलंदाजीची ऐशीतैसी करणारी आयसीसी ऐसीकैसी हो?
बरं मग तुमचा टीव्ही ‘मिरर इमेज’चा आहे का? मग तसं असेल तर जे आम्ही करणार होतो ते तुम्ही करा. जा की कोर्टात दावा ठोकायला.
मग आता आम्ही हे कन्फर्म समजायचे का?
नाही म्हणजे कसे आहे, की आम्ही खेळाडूंचे संदर्भ तुमच्या वेबसाइटवरूनच पडताळून पाहतो.
कारण आम्ही अज्ञानमुलक क्रिकेटवेडे, हे तर आम्ही जाहीरपणे कबूल केले आहेच. त्यामुळे राहुल डावा नसून उजव्या हाताचा खेळाडू आहे, हे आता डोक्यात फिट्ट बसवायचे प्रयत्न सुरू केले आहेत.
जराशी चूक झाली तर आमची अवस्था त्या अशिक्षित म्हाताऱ्या आजीसारखी होईल बरं…
आता ही म्हातारी आजी कोण?
तर ही म्हातारी आजी एकदा गुडघ्याने बेजार होती.
गेली डॉक्टरकडे.
डॉक्टर म्हणाला, काय होतंय?
बाबा रे गुडघा भुंगा मारतंय!
मग डॉक्टरने तपासलं आणि दोन औषधे दिली. एक गुडघ्याला लावायचं आणि दुसरं पोटात घ्यायचं.
आजीबाई ठार अशिक्षित! तिला काय समजंना की कोणतं गुडघ्याला लावायचं आणि कोणतं पोटात घ्यायचं
मग डॉक्टरने तिला सोपा उपाय सांगितला.
आजीबाई, हे औषध उजव्या हातात घ्या. हे पोटात घ्यायचं.
आणि हे डाव्या हातात घ्या, हे औषध गुडघ्याला लावायचं.
घरी जाईपर्यंत एक करा, उजवा हात वर करायचा नि म्हणायचं, पोटात घ्यायचं, नंतर डावा हात वर करायचा, म्हणायचं गुडघ्याला लावायचं.
आजीबाईने तसं केलं; पण घरी जाईपर्यंत आजीबाई विसरल्या नि इथंच घोळ झाला. बोलताना त्या क्रम चुकल्या नि व्हायचं तेच झालं. आजीबाईने गुडघ्याला लावायचं औषध पोटात घेतलं नि पोटात घ्यायचं औषध गुडघ्याला लावलं!!
तर असं होईल ना आमचं…!
आम्ही लक्षात ठेवतो राहुल उजव्या हाताचा. तो डाव्या हाताचा नाही.
राहुल डावखुरा, उजवा नाही…
राहुल डावखुरा, उजवा नाही…
क्रम बरोबर आहे ना आईशीशी वाल्यांनो…
चुकलं तर पाहा बरं…
अरारारारा… काही तरी चुकलंय…
तुमच्या आयसीसीचा घो तुमच्या…
आम्ही आता आमच्या डोळ्यांवरच विश्वास ठेवणार.
तुमच्यावर अजिबात नाही.
अगदी राहुलबाबावर पण नाही!

 

सत्तर वर्षांत वीक्स यांच्या विक्रमाजवळ फक्त द्रविडच पोहोचला

Follow on Twitter @kheliyad

[jnews_block_37 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”65″]

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!