ऑर्थॉप्टेरा गणातील लोकस्टिडी (ॲक्रिडिडी) कुलातील टोळ (लोकस्ट) हा आंतरराष्ट्रीय उपद्रवी कीटक मानला जातो. हा कीटक मे 2020 मध्ये पाकिस्तानातून भारतात आला होता. कोरोनाने भारतात दस्तक दिल्यानंतर टोळधाडीनेही हल्ला चढवल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट ठाकले होते. गेल्या 26 वर्षांतील ही सर्वांत मोठी टोळधाड मानली जात आहे. तसाही भारताला घुसखोरीचा सामना नेहमीच करावा लागतो. विशेषतः पाकिस्तानातली घुसखोरी नवी नाही. या घुसखोरीचा फटका पंजाब, राजस्थान, गुजरातला बसलाही आहे. ही घुसखोरी दहशतवाद्यांची नाही, तर याच विनाशक अशा टोळधाडीची आहे. ही टोळधाड म्हणजे काय, यावर टाकलेला प्रकाशझोत…

आंतरराष्ट्रीय उपद्रवी कीटक म्हणून टोळ (लोकस्ट) ओळखला जात आहे. त्याचं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे काही तासांत अनेक एकर शेती फस्त करण्याची या टोळ कीटकाची क्षमता आहे. लाखो टोळ कीटक एकाच वेळी पिकांवर हल्ला करतात, तेव्हा त्यांना रोखणे शेतकऱ्याच्या आवाक्याबाहेर आहे. एकाच वेळी अनेक टोळ कीटकांच्या हल्ल्याला टोळधाड म्हटले जाते. टोळधाड हा शब्दप्रयोग आपण वेगवेगळ्या कारणांनी वापरतो. गुंडांच्या हल्ल्यालाही आपण कधी कधी टोळधाड हा शब्द वापरतो. हा शब्दप्रयोग याच टोळ कीटकांवरून आला आहे. हे असे कीटक असतात ज्यांना इंग्रजीत लोकस्ट | Locust | असं म्हणतात. विदर्भात याला ‘घोड्या’ म्हणतात. या टोळ कीटकाचं तोंड घोड्यासारखं आहे म्हणून ‘घोड्या’. शेतीसाठी ही टोळधाड इतकी घातक असते, की एक टोळधाड काही वेळातच संपूर्ण शेत खाऊन मोकळे होते. मे 2020 मध्ये या टोळधाडीने पाकिस्तानमार्गे भारतात दस्तक दिली होती. पंजाबमधील अनेक गावांमध्ये या टोळधाडीने उच्छाद मांडला आहे. ही इतकी भयंकर टोळधाड होती, की पाकिस्तानने राष्ट्रीय आणीबाणीच जाहीर केली. या टोळधाडीचा सामना आता भारत करीत आहे.
तसं पाहिलं तर हा कीटक काही देशांमध्ये महत्त्वपूर्ण मानला जातो. काही देशांचं तर हे टोळ (लोकस्ट) कीटक सुग्रास भोजनच आहे. काहीही असो, पण हा कीटक शेतकऱ्यांचा सर्वांत मोठा शत्रू आहे. त्याचा प्रकोप झाला तर शेतीची पिके शब्दश: नामशेष होतात. या टोळधाडीचा धोका असा आहे, की भारतात जेव्हा जेव्हा ही टोळधाड आली, तेव्हा तेव्हा देशात दुष्काळ पडला आहे. मे 2020 पर्यंत भारतावर ही टोळधाड 15 वेळा आली आहे. शेतीची पिके काही क्षणांत चट्टामट्टा करणारी ही टोळधाड मात्र जांभूळ आणि निंबाच्या झाडांची पानं अजिबात खात नाही. भारतात या टोळधाडीच्या तीन प्रजाती आढळतात. मायग्रेटरी लोकस्ट Migratory Locust |, पतंगा सक्सिंटा Patanga Succincta |, शिसटोसर्का Schistocerca |. विदेशी टोळधाडीला पंख असतात. जे मार्गात येईल ते साफ करीत जातात. ही टोळधाड इतकी गंभीर असते की एखादा विशिष्ट भूभाग निर्जन करू शकते!
टोळ कीटकांच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानमधील शेतकरी बेजार झाले. राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करून प्रश्न सुटणार नव्हता. त्यामुळे पाकिस्तानने नवी शक्कल लढवली. टोळ कीटक पकडून आणल्यास त्याला सरकार पैसे देईल, असे पाकिस्तानने जाहीर केले. हे टोळ (लोकस्ट) कीटक कोंबडीचे खाद्य आहे. त्यामुळे हे कीटक कोंबडीचं खाद्यान्न होऊ शकेल असं पाकिस्तान सरकारला वाटलं. टोळ कीटक विका नि पैसे कमवा, अशी पाकिस्तानची योजना होती. पुढे या योजनेचं काय झालं माहीत नाही. मात्र, टोळधाडीचा फटका पाकिस्तानला बसायचा तो बसलाच.
टोळ कीटकांविषयी तुम्हाला हे माहीत आहे काय?
कोण खातं या किड्यांना?

काही देशांमध्ये हे किडे एक खाद्यही आहे. आफ्रिका, मध्य पूर्वेतील देश, आशिया खंडातील काही देशांमध्ये टोळ किड्यांचा भोजन म्हणून उपयोग करतात. या किडे खाण्याचेही अनेक प्रकार आहेत. साधारणपणे फ्राय केले जातात, वाफेवर शिजवलेही जातात. बायबलमध्ये असे म्हंटले आहे, की बाप्तिस्मा करणारा योहान जेव्हा जंगलात राहत होता, तेव्हा तो टोळ किडे आणि वन्यमध खात असे. हे किडे मांसाहारी नाही, तर शाकाहारी आहे असेही भासवण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र, अक्राइड्स म्हणजे कीटक हा साधासरळ अर्थ असल्याने ते मांसाहारीच आहे. हिब्रू बायबलने बहुतांश किड्यांना अन्न म्हणून स्वीकारण्यास नकार दिला असला तरी काही टोळ किडे खाणे वर्ज्य आहे. यात लाल, पिवळे, ठिपकेदार राखाडी आणि पांढऱ्या रंगाचे टोळ किडे खाण्यास परवानगी आहे. अरब देशांत विशेषत: सौदी अरेबियात टोळ किडे खाल्ले जातात. सौदी अरेबियातील अल कासिम प्रांतात Al-Qassim Region | २०१४ मध्ये रमजान काळात टोळ किडे खाल्ले जायचे. हे टोळ किडे आरोग्यास उत्तम असल्याचा सौदीतल्या लोकांचा विश्वास आहे. अरब आणि मोरोक्कोत टोळ किडे Locusts | खाल्ले जात असले तरी सीरियात टोळ किड्यांना अन्न मानलेले नाही. अरबाच्या या टोळ किडे खाण्यावरून पर्शियन त्यांना ‘टोळकिडेखाऊ’ Arabe malakh-khor | अशी उपाहासात्मक शिवीही हासडतात. टोळ किड्यांमध्ये इतर पशूंपेक्षा अधिक पोषक घटक Protein | असतात.
या सात कारणांमुळे होतो टोळ कीटकांचा मृत्यू
एका टोळधाडीला सात प्रकारच्या संकटांना सामोरे जाऊ शकते. म्हणजे या टोळधाडीच्या नाशाला सात घटक कारणीभूत असतात. | |
1 | वेगाने उठलेले धुळीचे लोट |
2 | प्रतिकूल हवामान |
3 | जेथे उत्पत्तीला बाधा ठरेल अशा भूखंडात टोळधाडीने प्रवेश केल्यास |
4 | समुद्रात बुडून मृत्यू |
5 | या टोळधाडीच्या मार्गात डोंगराळ भाग आला तर त्यात अडकून पडल्याने |
6 | नैसर्गिक शत्रूंचा हल्ला |
7 | मानवाकडून या टोळधाडीवर होणारी कीटकनाशक फवारणी |
टोळांचे प्रमुख शत्रू
1 | सर्कोफॅजिडी Sarcophagidae | प्रजाती माश्या या टोळांच्या प्रमुख शत्रू आहे. या माश्या टोळ कीटकांच्या शरीरावर उड्डाणअवस्थेतही अळ्या सोडतात. या अळ्या टोळ कीटकांच्या शरीरात घुसून आपली उपजीविका करतात |
2 | हिंगे नावाचे शरीरावर विषारी द्रव असलेले कीटक टोळांची अंडी खातात |
3 | कॅरॅबिडी Carabidae | प्रजातीतील भुंगेऱ्यांचे डिंभक (अळीसारखी अवस्था) व प्रौढ भुंगेरे रात्रीच्या वेळी टोळ खातात |
4 | कृंतक Rodent | प्राणी टोळधाडीचे शत्रू असतात. कृंतक म्हणजे कुरतडणारे. यात ससे, उंदीर, घुशी, खारी, सायाळ, बीव्हर आदी प्राण्यांचा समावेश आहे. |
5 | माळढोकसह अनेक प्रकारचे पक्षी |
6 | साप, सरडे, पालीही या टोळधाडीचे कर्दनकाळ ठरतात. |
7 | बाकी इतर प्राण्यांना जसे होतात, तसे विविध प्रकारचे रोग टोळधाडीच्या नाशास कारणीभूत ठरतात. |
टोळ किड्यांना कसे रोखावे?
टोळ किड्यांचे आक्रमण रोखणे सुरुवातीच्या काळात कठीण मानले जात होते. या किड्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी विमानातून बेंझीन हेक्साक्लोराइड benzene hexachloride | सारखी विषारी औषधे फवारावी लागतात. या टोळ किड्यांची अंडी नष्ट करण्याचाही उपाय योजला जातो. पाणी आणि रॉकेल फवारूनही हे टोळ किडे नष्ट करण्याचा उपाय आहे. मात्र, हे सर्व उपाय वेळखाऊ आहेत. मेलाथियॉन Malathion | कीटकनाशकापासूनही या टोळधाडीला रोखण्याचा प्रयत्न केला जातो. २०११ मध्ये राजस्थानमध्ये झालेल्या टोळधाडीच्या हल्ल्यात हजारो हेक्टर पिके नष्ट झाली होती. चार जिल्ह्यांत या टोळधाडीने उच्छाद मांडला होता. त्या वेळी १ लाख ३८ हजार ५८५ हेक्टर जमिनीवर तब्बल ९६ हजार ७४८ कीटकनाशकांचा वापर करावा लागला होता.
टोळधाडीची घुसखोरी पाकिस्तानातून
आतापर्यंतच्या इतिहासात टोळधाडीची घुसखोरी पाकिस्तानमार्गेच झालेली आहे. पाकिस्तानातून पंजाब, तसेच गुजरातमार्गे राजस्थानात या टोळ किड्यांचे हल्ले झाले आहेत. राजस्थानात १९९३, १९९८ मध्ये टोळ कीटकांनी पाकिस्तानी सीमेवरून शिरकाव केला होता. त्या वेळी या टोळ कीटकांना नियंत्रणात आणण्यासाठी राजस्थान सरकारच्या नाकीनऊ आले होते.
टोळ कीटक (लोकस्ट) उपद्रवीच आहेत का?
टोळधाडींचे नियंत्रण करण्याची जबाबदारी सरकारची असते. मात्र, सरकार जेव्हा या टोळधाडीचे नियंत्रण करते, तेव्हा शेतकऱ्यांनी त्यांना सहाय्य करणे आवश्यक आहे. अर्थात टोळ अगदीच उपद्रवी कीटक नाहीत. ते ठराविक पातळीवर उपयोगीही ठरतात. जर तुम्ही मासे पकडण्यासाठी गळ लावून बसत असाल तर त्या गळाला टोळ कीटक लावा. बघा कसा मासा पटकन गळाला लागतो ते! हे टोळ कीटक कोंबड्यांचंही आवडतं खाद्य आहे. मेक्सिको, जपान व फिलिपीन्स, सौदी अरेबियात हे टोळ कीटक खाद्यान्न म्हणून वापरतात. राजस्थानच्या वाळवंटी भागात या टोळधाडीवर ताव मारला जातो. म्हणजे टोळधाड झाल्यास पोतीच्या पोती हे टोळ कीटक भरून घरी आणतात. अशा लोकांचा तब्बल तीन महिन्यांचा भोजनाचा प्रश्न सुटतो.
माळढोकच टोळकिड्यांना थोपवू शकेल?
अन्नसाखळीत माळढोक Great Indian Bustard | हा पक्षी सर्वांत महत्त्वाचा मानला जातो. मात्र, महाराष्ट्रात हा पक्षी हद्दपारच झालेला आहे. अन्य प्रदेशांतही या पक्ष्याची संख्या कमालीची घटत आहे. हा पक्ष्याचं भोजन टोळ किडे आहेत. कोट्यवधी किड्यांचा थवा या पक्ष्यांसाठी सुग्रास भोजनच ठरतो. मात्र, मानवाने या पक्ष्याचे संरक्षण न केल्याने हा पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. माळढोकच राहिला नसल्याने या टोळकिड्यांना आता मोकळे रान झाले आहे. विशेषत: महाराष्ट्रात तर माळढोक नावालाही शिल्लक राहिलेला नाही. 2017 टोळधाडीमुळे बोलिविया सरकारला राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करावी लागली होती. ब्रिटनच्या खाद्य, तसेच पर्यावरण संस्थेने केलेल्या संशोधनात, टोळ किड्यांचा वेग, क्षमता अन्य प्राण्यांपेक्षा अधिक आहे. हे टोळ किडे वजनाच्या आधारावर आपल्यापेक्षा जास्त वजनाच्या प्राण्यांच्या तुलनेत आठ पट जास्त हिरवा चारा खाऊ शकतात. त्यामुळे ही टोळधाड रोखण्यासाठी पर्यावरण जपणे गरजेचे आहे. पक्ष्यांची संख्या प्रचंड घटत असल्याने टोळधाडीसारख्या अनेक कीटकांची टांगती तलवार कोणत्याही एका देशावर नाही, तर संपूर्ण विश्वावर आहे. जर एक टोळधाड अनेक हेक्टर जमीन उद्ध्वस्त करू शकत असेल, तर विचार करा, भविष्यात पर्यावरण जपले नाही, तर काय स्थिती होईल?
Facebook Page : kheliyad
Very true things mentioned here. All facts came to know from your given info. Superb blog terrible situations and their remeady measures also explained neatly.
One more thing also I came to know from your blog that is Food chain is very important and to conserve nature is our responsibility.