• Latest
  • Trending
दारा टोरेस ऑलिम्पिक

दारा टोरेस- चाळिशीनंतरही ऑलिम्पिक गाजविणारी जलतरणपटू

December 26, 2021
सॉफ्ट सिग्नल क्रिकेट

कसोटी क्रिकेट : सॉफ्ट सिग्नल जून 2023 नंतर बाद

May 17, 2023
कोहली गंभीर

कोहली, गंभीर… शब्दाला शब्द शब्दन् शब्द!

May 3, 2023
रजनी नागेश लिमये

समर्पिता- रजनी नागेश लिमये

March 7, 2023
Jeswin Aldrin Long Jump

Jeswin Aldrin ची Long Jump ठरली हनुमान उडी!

March 3, 2023

पुन्हा कुटप्पा प्रशिक्षक

February 24, 2023
Virat Kohli 25 हजार

Virat Kohli च्या वेगवान 25 हजार धावा

February 20, 2023
चेतन शर्मा वादाचं उत्तेजक

Chetan Sharma Sting- भारतीय खेळाडू उत्तेजक घेतात!

March 3, 2023
फुटबॉल 2022 : भारतीय फुटबॉलवरील बंदीने गाजले वर्ष

फुटबॉल 2022 : भारतीय फुटबॉलवरील बंदीने गाजले वर्ष

February 19, 2023

बॅडमिंटन 2022 : सिंधू, श्रीकांतनंतरच्या फळीने जागविला विश्वास

February 11, 2023
ravindra jadeja ball tampering

काय म्हणता? Ravindra Jadeja ने Ball Tampering केलं?

February 10, 2023
विक्रमवीर नोव्हाक जोकोविच

विक्रमवीर नोव्हाक जोकोविच

February 24, 2023
हॉकी वर्ल्ड कप जर्मनी

वर्ल्ड कप हॉकी : जर्मनी 17 वर्षांनी विश्वविजेता

February 5, 2023
Friday, June 9, 2023
kheliyad
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
kheliyad
No Result
View All Result

दारा टोरेस- चाळिशीनंतरही ऑलिम्पिक गाजविणारी जलतरणपटू

कारकिर्दीत तब्बल पाच ऑलिम्पिक खेळणारी दारा टोरेस (Dara Torres) चाळिशीनंतरही खेळतच राहिली. तिने एकाच आयुष्यात ती अनेक भूमिका यशस्वीपणे जगली.

Mahesh Pathade by Mahesh Pathade
December 26, 2021
in All Sports, Inspirational story, swimming, Women Power
0
दारा टोरेस ऑलिम्पिक
Share on FacebookShare on TwitterShare on LinkedinShare on TelegramShare on WhatsappShare on PinterestShare on RedditShare on Email

कारकिर्दीत तब्बल पाच ऑलिम्पिक स्पर्धा खेळणारी दारा टोरेस (Dara Torres) चाळिशीनंतरही खेळतच राहिली. तिने एकाच आयुष्यात ती अनेक भूमिका यशस्वीपणे जगली. ऑलिम्पिकमध्ये 12 पदके मिळवून उत्तम जलतरणपटू म्हणून तिने नाव कमावलचं, पण चाळिशीनंतर ऑलिम्पिक सुपरमॉम म्हणूनही ती प्रसिद्धीच्या झोतात राहिली. थांबा, अजून तिची ओळख संपलेली नाही. क्रीडा पत्रकार, उत्तम फिटनेस सल्लागार, मोटिवेशनल स्पीकर, उत्तम लेखिका, उद्योजक म्हणूनही तिचं कर्तृत्व स्तिमित करणारं आहे. चाळिशीनंतरही स्वतःची ओळख निर्माण करणारा दाराचा हा उत्कंठावर्धक प्रवास…

दारा टोरेस ऑलिम्पिक
1984 ते 2008… दाराचा प्रदीर्घ जलतरण प्रवास 

कॅलिफोर्नियातल्या बेव्हर्ली हिल्सचं (Beverly hills) कमालीचं आकर्षण वाटतं. कारण इथला प्रत्येक व्यक्ती सेलिब्रिटी आहे. मूळचा क्यूबाचा असलेला डेसी अर्नाझ अभिनेता, संगीतकार झाला, म्हणजे सेलिब्रिटी झाला नि तो राहायला कुठे आला, तर बेव्हर्ली हिल्सला. अभिनेत्री लुसिले बॉल, प्रसिद्ध दिग्दर्शक विल्यम वायलर, वर्ल्ड रेसलिंग एंटरटेन्मेटचा (डब्लूडब्लूई) पहिलवान व अभिनेता टेरी जिन बोलिआ (यालाच रिंगमध्ये हल्क होगान म्हणून ओळखले जाते.), जस्टिन बिबर हे कुठले, तर बेव्हर्ली हिल्सचे. प्रियांका चोप्राचा नवरा निकचा बंगलाही याच बेव्हर्ली हिल्समध्ये होता. आता त्याने तो विकला आहे. पण एकूणच काय, तर या बेव्हर्ली हिल्सला जन्मलेली व्यक्ती सेलिब्रिटीच. म्हणजे बघा ना, लौकिक मिळवला तर तुम्ही सेलिब्रिटीच होणार आणि कुणा सेलिब्रिटीच्या पोटी जन्मला तरी सेलिब्रिटीच राहणार. आपल्याकडे नाही का, तैमूर जन्मल्या जन्मल्या सेलिब्रिटी झाला! दारा टोरेस (Dara Torres) नावाची एक मुलगीही याच शहरात जन्मली, पण ती सेलिब्रिटी झाली आपल्या कर्तृत्वाने!

अर्थात, सेलिब्रिटी झाल्यानंतर तर दाराला सगळे पाण्यात पाहू लागले. म्हणजे वाईट हेतूने नाही, तर कौतुकाने. कारण दारा निष्णात जलतरणपटू, जिने चाळिशीनंतरही ऑलिम्पिकची स्पर्धा गाजवली. कारकिर्दीत तब्बल पाच ऑलिम्पिक स्पर्धा खेळल्या. 2008 मध्ये वयाच्या 41 व्या वर्षी ती अखेरची पाचवी ऑलिम्पिक स्पर्धा खेळली. त्या वेळी तर तिला दीड वर्षांचा मुलगा होता. या संपूर्ण ऑलिम्पिक कारकिर्दीत दारा टोरेस हिने 12 पदके जिंकली, तर तीन वेळा विश्वविक्रम प्रस्थापित केले होते. तिचा हा प्रवास एका दमात सांगणं कठीणच आहे. त्यासाठी दाराचा जीवनपट हळुवारपणे उलगडायला हवा.

दाराचा जन्म बेव्हर्ली हिल्समधला, 15 एप्रिल 1967 चा. तिच्या जन्मानंतर दोनच आठवड्याने लास वेगास येथील अलाद्दिन हॉटेलमध्ये एक शाही विवाह पार पडला. तो म्हणजे उद्योगपती एल्विस प्रिस्ले आणि अमेरिकेची अभिनेत्री व नंतर उद्योजक म्हणून लौकिक मिळविलेली प्रिसिला यांचा. या विवाहाचा कोणताही संबंध दाराच्या जन्माशी नाही. संबंध फक्त अलाद्दिन हॉटेलशी आहे. असे मोठे विवाह ज्या हॉटेलमध्ये होतात ते हॉटेल किती शाही असेल! नंतर हेच हॉटेल दाराच्या जन्मानंतर 13 वर्षांनी तिच्या वडिलांनी भागीदारीत खरेदी केलं. तेथेच दाराच्या जलतरणाचे कौशल्य पुढे आले. म्हणजे दारा ज्या स्विमिंग पूलमध्ये सराव करायची, ते तिच्या कुटुंबाच्या दहा स्नानघरांपैकी एक होतं. दारा गर्भश्रीमंत घरातली मुलगी आहे हे तर स्पष्टच आहे. दाराने काहीही केलं नसतं तरी छानछौकीत जगली असती. पण तिने स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं.

अर्थात, तिच्या नावातच तिचं यश दडलं आहे. स्पॅनिशमध्ये दाराचा अर्थ आहे समर्पण. हिब्रू भाषेत दाराचा अर्थ मोती असाही होतो. पण इथे स्पॅनिश अर्थ समर्पक वाटतो. कारण तिचे वडील मूळचे क्यूबाचे असल्याने क्यूबामध्ये स्पॅनिश बोलली जाते. त्यामुळे तिच्या नावात स्पॅनिश अर्थच दडलेला असेल. मोती हा अर्थही तिला समर्पक आहे. टोरेस कुटुंबातला ती एक मोतीच आहे. कारण आपल्या कर्तृत्वाची चकाकी या मोतीला लाभलेली होती.

दारा टोरेस हिची कौटुंबिक पार्श्वभूमी

दाराचे वडील एडवर्ड टोरेस बांधकाम व्यावसायिक आणि कसिनोचे मालक. ते मूळचे क्यूबाचे. त्यामुळे पैशाला काही कमी नव्हती. आई मारिलू एकेकाळची सौंदर्यसम्राज्ञी. अर्थातच, अमेरिकेची मॉडेल म्हणून मारिलू यांचा लौकिक होता. टोरेस कुटुंबाला दारासह सहा मुले होती. त्यापैकी दारा हे पाचवं अपत्य. त्यात तिला दोन मोठ्या बहिणी होत्या. म्हणजे तीन मुली आणि तीन मुलगे असं हे आठ सदस्यांचं ‘छोटंसं’ टोरेस कुटुंब! दारा सात वर्षांची असताना मोठ्या भावासोबत तिने ‘वायएमसीए’त प्रवेश घेतला. आता हे ‘वायएमसीए’ (YMCA) म्हणजे काय? तर वायएमसीए ही जगभरात पसरलेली एक संघटना आहे, जिचं विस्तृत नाव आहे ‘यंग मेन्स ख्रिस्तियन असोसिएशन.’ (young men christian association) या संघटनेचं संक्षिप्त नाव म्हणजे ‘वायएमसीए.’ पाश्चात्त्यांना हे नावही बरंच मोठं वाटतं, म्हणून संघटनेला ‘वाय’ एवढंच म्हणतात. असो, तर या संघटनेची स्थापना 6 जून 1844 ची. तब्ब्बल पावणेदोनशे वर्षे जुनी अशी ही संघटना 120 देशांत फोफावलेली आहे. या संघटनेचं एकच ध्येय, ते म्हणजे स्वास्थ्यपूर्ण ‘शरीर, मन आणि आत्मा’ विकसित करून ख्रिश्चन सिद्धान्तांना व्यवहारात आणणं. या वायएमसीएमध्ये स्विमिंगचा सरावही घेतला जात होता. जलतरणातलं कौशल्य बहरत असताना दाराने नंतर कल्वर शहरातील स्विमिंग क्लबमध्ये प्रवेश घेतला. अवघ्या 14 वर्षांची असताना दारा खुल्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सहभागी झाली आणि 50 मीटर फ्रीस्टाइलमध्ये तिने ज्युनिअर कॉलेजमधील चॅम्पियन जिल स्टर्कलला (Jill Sterkel) पराभूत केले. ही जिल स्टर्कल दारापेक्षा सहा वर्षांनी मोठी. ती पुढे तीन ऑलिम्पिक स्पर्धाही खेळली आहे. किती मातब्बर खेळाडूला दाराने पदार्पणातच हरवलं आहे, याची तुम्हाला कल्पना आली असेल. इथूनच दाराच्या यशाची दारे खुली झाली.

पाण्याशी गट्टी

दाराने वेस्टलेक शाळेत (Westlake School) प्रवेश घेतला. ही मुलींची शाळा. त्या वेळी ती सातवीत होती. आता या शाळेचे ‘हार्वर्ड-वेस्टलेक स्कूल’ (Harvard-Westlake School) असे नामांतर झाले आहे. या वेस्टलेक शाळेत डार्लेन बिबल यांच्या मार्गदर्शनाखाली तिने जलतरणाचे धडे घेतले. दारा केवळ जलतरणातच नव्हती. ती शाळेच्या बास्केटबॉल, जिम्नॅस्टिक्स आणि व्हॉलीबॉल संघातही होती. अर्थात, सगळे खेळ खेळली; पण तिचा आवडता खेळ जलतरणच राहिला. 1983-84 दरम्यान तिने घर सोडले आणि कॅलिफोर्नियातील मिशन व्हिएजो नडा़डोरस (Mission Viejo Nadadores) क्लबसाठी जलतरण स्पर्धेत उतरली. त्या वेळी दाराचं वय होतं अवघं 16 वर्षे. व्हिएजो नडाडोरस हा काही साधासुधा क्लब नव्हता, तर अमेरिकेतील सर्वोत्तम डायव्हिंग क्लबपैकी एक होता. या क्लबसाठी खेळणे हेच मोठं प्रतिष्ठेचं मानलं जायचं. हा क्लब अस्तित्वात आला 1968 मध्ये. त्या वेळी दारा अवघी एक वर्षाची होती. या क्लबचे खेळाडू 1976 पासून प्रत्येक ऑलिम्पिक स्पर्धेत अमेरिकेचे प्रतिनिधित्व करीत आले आहेत. त्यावरून या क्लबची गुणवत्ता लक्षात येते. या क्लबच्या नावावर सांघिक प्रकारात सर्वाधिक 48 राष्ट्रीय विजेतीपदे मिळविण्याचाही एक विक्रम आहे. एवढेच नाही, तर या क्लबने अमेरिकेसाठी एका वर्षात वेगवेगळ्या प्रकारांत 4 जागतिक विजेतीपदेही मिळवली आहेत. अमेरिकेच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा हा एकमेव क्लब. अशा क्लबमध्ये दाराने प्रशिक्षण घेतलं.

दारा टोरेस हिचे पहिले ऑलिम्पिक सुवर्ण

दाराचे मार्गदर्शक होते मार्क शुबर्ट. हा शुबर्ट अमेरिकेच्या राष्ट्रीय संघाचा प्रशिक्षकही होता. आता तो नडाडोरस क्लबचा प्रमुख प्रशिक्षक आहे. प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये या क्लबचा एक तरी खेळाडू सहभागी असायचाच. दाराही याला अपवाद नव्हती. 1984 च्या लॉस एंजल्स ऑलिम्पिक स्पर्धेत 4 बाय 100 मीटर फ्रीस्टाइल रिलेच्या संघात दारा टोरेस हिची निवड झाली. या स्पर्धेत तिला सांघिक सुवर्णपदक मिळाले. हे तिच्या ऑलिम्पिक कारकिर्दीतले पहिले सुवर्ण. त्या वेळी तिच्या संघात होत्या नॅन्सी हॉगशेड (Nancy Hogshead), जेना जॉन्सन (Jenna Johnson) आणि कॅरी स्टीनसीफर (Carrie Steinseifer). नंतर दाराने मागे वळून पाहिलंच नाही. 

दक्षिण आफ्रिकेत 1988 मध्ये झालेल्या सेऊल ऑलिम्पिक स्पर्धेतही दारा टोरेस हिची पुन्हा अमेरिकेच्या संघात निवड झाली. या वेळी दारा तीन इव्हेंटमध्ये अमेरिकेच्या संघाचं प्रतिनिधित्व करणार होती. पहिला 4 बाय 100 मीटर फ्रीस्टाइल रिलेचा, दुसरा 4 बाय 100 मीटर मिडले रिलेचा, तर तिसरा वैयक्तिक 100 मीटर फ्रीस्टाइल प्रकाराचा. या वेळी तिच्या 4 बाय 100 मीटर फ्रीस्टाइल रिले संघाची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. तिच्या संघाला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. अर्थात, ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक अगदीच काही वाईट नव्हतं. हो, पण हे आपल्याला वाटतं; पण अमेरिकी क्रीडाप्रेमींना तसं वाटलं पाहिजे ना? आपण भारतीय निव्वळ ऑलिम्पिक सहभागाचंही जबरदस्त ‘सेलिब्रेशन’ करीत असतो. अमेरिकेत तसं नव्हतं. खाईन तर तुपाशी… अशा स्टेजला पोहोचलेला तो ऑलिम्पिकचा ‘दादा’ देश होता. या वेळी तिच्या संघात मिट्झी क्रेमर (Mitzi Kremer), लॉरा वॉकर (Laura Walker) आणि मेरी वेटे (Mary Wayte) यांचा समावेश होता. समाधान इतकंच होतं, की हात रिकामे राहिले नाहीत. दाराचा दुसरा इव्हेंट बाकी होता. तो म्हणजे 4 बाय 100 मीटर मिडले रिलेचा. मात्र, यात संघाचे आव्हान संपुष्टात आले. उरल्यासुरल्या 100 मीटर फ्रीस्टाइलच्या वैयक्तिक प्रकारातही दारा फारशी छाप पाडू शकली नाही. ती सातव्या स्थानी राहिली.

दारा टोरेस मायदेशी परतली, तेव्हा ती पुढची ऑलिम्पिक स्पर्धा गाजविण्याच्या ईर्षेनेच. 1992 च्या बार्सिलोना ऑलिम्पिक स्पर्धेसाठी दाराची पुन्हा अमेरिकेच्या 4 बाय 100 मीटर फ्रीस्टाइल रिले संघात निवड झाली. प्रत्येक ऑलिम्पिक स्पर्धेत दारा टोरेस हिच्या संघसहकारी बदलत होत्या. दाराच एकमेव होती, जी सातत्याने संघाचं प्रतिनिधित्व करीत होती. या वेळी दाराच्या संघाने पुन्हा सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. या वेळी तिच्या संघसहकारी होत्या निकोल हैस्लेट (Nicole Haislett), एंजल मार्टिनो (Angel Martino) आणि जेनी थॉम्पसन (Jenny Thompson). ऐन पंचविशीतल्या दारा टोरेस हिचं हे दुसरं ऑलिम्पिक गोल्ड मेडल.

सात वर्षांनंतर पुनरागमन

1992 च्या बार्सिलोना ऑलिम्पिकनंतर दारा जवळजवळ 7 वर्षे स्पर्धात्मक कार्यक्रमांपासून दूर होती. म्हणजे सात वर्षे ती एकही स्पर्धा खेळली नाही. मात्र, ती पाण्यातली अशी मासळी होती, की फार काळ पाण्याशिवाय राहूच शकत नव्हती. 1999 मध्ये पुन्हा तिने जलतरण स्पर्धेत पुनरागमन केलं. वयाची तिशी तिने केव्हाच ओलांडली होती. रिचर्ड क्विक यांच्या मार्गदर्शनाखाली तिने सराव कसून सुरू केला. तिशीनंतरही जिंकण्याची ऊर्मी बाळगणाऱ्या दारा टोरेस हिने आपल्या विजिगीषू वृत्तीच्या जोरावर 2000 च्या सिडनी ऑलिम्पिक स्पर्धेत पुन्हा पाऊल ठेवलं. हे पुनरागमन तिचा आत्मविश्वास बळकट करणारं ठरलं. दारा या वेळी 5 इव्हेंटमध्ये पात्र ठरली होती. हे सगळंच थक्क करणारं आहे. कारण अमेरिकेच्या संघात स्थान मिळवण्यासाठी एकापेक्षा एक अव्वल खेळाडू जीवतोड मेहनत घेत असतात. अमेरिकेतली पात्रता स्पर्धा म्हणजे ‘मिनी ऑलिम्पिक’च म्हणायला हवी. कारण एकापेक्षा सरस खेळाडूंची खाण असलेल्या या देशाच्या संघात स्थान मिळवणे म्हणजे जवळजवळ ऑलिम्पिक मेडल पक्के असल्याचे मानले जाते. तर अशा आव्हानात्मक स्पर्धेतून दारा टोरेस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरली. तेही वयाच्या 33 व्या वर्षी!

दारा टोरेस हिने गाजवली सिडनी ऑलिम्पिक

1999 ची सिडनी ऑलिम्पिक स्पर्धा दारा टोरेस हिच्यासाठी खास ठरली. 4 बाय 100 मीटर फ्रीस्टाइल रिले प्रकारात दाराच्या संघाने धडाक्यात सुवर्णपदक जिंकले. या वेळी तिच्या संघसहकारी होत्या- अ‍ॅमी व्हॅन डायकेन (Amy Van Dyken), कोर्टनी शिली (Courtney Shealy) आणि जेनी थॉम्पसन (Jenny Thompson). यानंतर दाराच्या अमेरिकी संघाने दुसरे सुवर्णपदक जिंकले ते 4 बाय 100 मीटर मिडले रिले स्पर्धेत. दाराच्या संघात होत्या- बी. जे. बेडफोर्ड (B.J. Bedford), मेगन क्वान (Megan Quann) आणि जेनी थॉम्पसन (Jenny Thompson). सांघिक सुवर्णकामगिरीने दारा कमालीची खूश होती. आता कसोटी होती वैयक्तिक प्रकारात. यात तिला ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत एकदाही पदक जिंकता आलेले नव्हते. मात्र, या वेळी दाराने तीन वैयक्तिक ब्राँझ पदके जिंकली. 50 मीटर फ्रीस्टाइल, 100 मीटर बटरफ्लाय, 100 मीटर फ्रीस्टाइल या तिन्ही इव्हेंटमध्ये ब्राँझ मेडल जिंकले असले तरी त्याला एक प्रकारची सुवर्णझळाळीच असते. दारासाठी तरी ही कामगिरी अनेकार्थाने स्पृहणीय म्हणावी लागेल. ती म्हणजे वयाच्या 33 व्या वर्षी तब्बल पाच पदकांची कमाई! तेही सात वर्षांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर!  दाराने अमेरिकेत आणखी एक इतिहास रचला होता. देशातली ती पहिली सर्वाधिक वयाची जलतरणपटू ठरली होती. अमेरिकी संघातलीही ती सर्वाधिक वयाची जलतरणपटू ठरली.

दाराच्या कर्तृत्वाचा दरारा

जलतरण हा खेळ असा आहे, की जेथे क्षमतेची कसोटी लागते. वयोपरत्वे या खेळातली ऊर्जा हळूहळू क्षीण होत जाते. कारण या खेळात दमछाक मंजूर नसते. दाराने आता चाळिशीचा टप्पा गाठला होता. राजकारणाच्या भाषेत चाळिशी-पंचेचाळिशी ओलांडलेलाही युवाच असतो; पण खेळाच्या भाषेत पस्तिशीनंतरची व्यक्ती प्रौढ मानली जाते, यालाच मास्टर्स गटही म्हंटला जातो. कारण या वयात तुम्हाला विशीतली तरुणाई जिंकूच देत नाही. महिलांसाठी तर किती तरी आव्हाने असतात. दाराने 1 ऑगस्ट 2007 रोजी वयाची चाळिशी गाठली होती. तिला 16 महिन्यांची म्हणजे दीड वर्षाची मुलगी होती. चूल आणि मूल ही अमेरिकेची संस्कृती नसली तरी किटी पार्ट्यांमध्ये रममाण होणारी संस्कृती नक्कीच होती. त्या पलीकडे उच्चभ्रू अमेरिकी महिला दुसरे करणार तरी काय? त्यात दारा बेव्हर्ली हिल्सची सेलिब्रिटी! अशी सेलिब्रिटी, जिची आई एकेकाळची नावाजलेली मॉडेल! पण छे! दाराने ही ओळख केव्हाच झुगारली. कारण आता अनेकांना मारिलू माहीत असेल की नाही माहीत नाही. माहीत असली तरी एका विशिष्ट क्षेत्रातली मंडळीच तिला ओळखू शकतील, पण दारा संपूर्ण जगाला माहीत आहे. किंबहुना मारिलूची ओळख सांगायची झाली तर ‘दाराची आई’ अशीच करून द्यावी लागेल. हा दाराच्या कर्तृत्वाचा दरारा म्हणावा लागेल. तर अशी ही दारा, जिला साचेबद्ध चौकटच मुळी मान्य नव्हती. त्यात ती अशा उदारमतवादी शहरातली रहिवासी, जेथे समलिंगी विवाहाला खुलेआम मान्यता.

दारा स्पर्धेत उतरली आणि तिने इंडियानापोलिस येथील 100 मीटर फ्रीस्टाइल राष्ट्रीय स्पर्धा लीलया जिंकली. 50 मीटर फ्रीस्टाइलमध्ये तर तिने कमालच केली. या प्रकारात तिने 24.53 सेकंदांची नोंद करीत नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. हा विक्रम प्रस्थापित करताना तिने 2000 मधील सिडनी ऑलिम्पिकमध्ये 24.63 सेकंदांचा स्वतःचाच विक्रम मोडीत काढला. भारतात पुरुषांच्या गटात 22.43 सेकंदांचा राष्ट्रीय विक्रम महाराष्ट्राच्या वीरधवल खाडे याच्या नावावर आहे. अमेरिकेच्या महिलांचा राष्ट्रीय विक्रम आणि भारतीय पुरुषांच्या राष्ट्रीय विक्रमात अवघ्या 2.1 सेकंदाचा फरक. भारतीय महिलांशीच तुलना करायची झाली तर भारताच्या शिखा टंडनच्या नावावर सध्या 26.37 सेकंदांचा राष्ट्रीय विक्रम आहे. अमेरिकेच्या दाराचा विक्रम यापेक्षा किती तरी सरस मानायला हवा. इथे तुलना करताना भारताचा कमीपणा म्हणून नाही, तर अमेरिकेत जलतरणाचा दर्जा किती तरी पटींनी उजवा आहे, हे इथं लक्षात घ्यायला हवा. हा दर्जा भारतातही यावा एवढीच अपेक्षा.

असो.. एकूणच काय, तर दारानेच दाराला हरवलं! 50 मीटर फ्रीस्टाइलमध्ये दाराने स्वतःचेच विक्रम एकदा-दोनदा नव्हे, तर दहा वेळा मोडीत काढले. आताही तिने तेच केले, तेही चाळिशीत. निसर्गनियमाप्रमाणे वयोपरत्वे प्रौढत्व, वार्धक्य कुणाला चुकले नाही; पण दारा याला अपवाद होती. मला तर वाटतं, तिला हेच माहीत नाही की असं काही आयुष्यात प्रौढत्व, वार्धक्य असतं! कारण ती ज्या वयात लीलया यश मिळवत होती, ते एखाद्या विशीतल्या मुलीला महत्प्रयासानंतरही मिळेलच याची शाश्वती देता येणार नाही. काय असेल ते असो: पण दारा चाळिशीतही विक्रमांच्या राशी रचत होती.

प्रवाहाविरुद्ध पोहण्याचा ध्यास

दाराने चाळिशी ओलांडून 41 व्या वर्षात पदार्पण केलं. इथं कदाचित ती जलतरणातून निवृत्त होईल असं अनेकांना वाटलं असेल: पण तसं काही झालं नाही. ती पुन्हा स्विमिंग पूलवर परतली. दाराने 2008 च्या ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता फेरी जिंकत आणखी नवा इतिहास रचला. 2008 ची बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणारी सर्वांत अधिक वयाची ती अमेरिकेतली एकमेव जलतरणपटू ठरली. याशिवाय कारकिर्दीतली तिची ही पाचवी ऑलिम्पिक स्पर्धा होती. म्हणजेच सर्वाधिक पाच वेळा ऑलिम्पिक खेळणारी अमेरिकेच्या इतिहासातली ती पहिलीच महिला जलतरणपटू होती.

दाराला पुन्हा ऑलिम्पिकचे दरवाजे खुणावू लागले. ती वयाच्या 42 व्या वर्षी पुन्हा स्विमिंग पूलमध्ये उतरली. 2009 मध्ये ती राष्ट्रीय स्पर्धेत उतरली आणि 50 मीटर फ्रीस्टाइल प्रकारात तिने 24.42 सेकंदांची वेळ नोंदवत पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले. तिने नोंदवलेली ही वेळ जगातील सर्वोत्तम चौथ्या क्रमांकाची होती. फ्रीस्टाइलपाठोपाठ बटरफ्लाय प्रकारातही तिने आपले आव्हान कायम राखले. दारा आता जागतिक जलतरण स्पर्धेसाठी पात्र ठरली होती. या वेळी ही स्पर्धा तिच्यासाठी आव्हानात्मक होती. कारण 1986 नंतर तब्बल 23 वर्षांनी ती जागतिक स्पर्धेत उतरली होती. या वेळी तिचा वेग काहीसा मंदावला होता. 50 मीटर फ्रीस्टाइलमध्ये ती आठव्या क्रमांकावर राहिली, तर 50 मीटर बटरफ्लाय प्रकारात तिला पात्रताफेरी गाठता आली नाही.

दारा टोरेस ऑलिम्पिक
2012 मध्ये विक्रमी सहावे ऑलिम्पिक स्पर्धा खेळण्याचे स्वप्न भंगले.

निवृत्तीचे संकेत

प्रदीर्घ काळ स्पर्धा खेळल्यानंतर गुडघेदुखीने डोके वर काढले. याच काळात तिच्या गुडघ्यावर शस्त्रक्रियाही झाली. हे स्पर्धेतून विश्रांती घेण्याचे संकेत होते. मात्र, दाराने हे संकेत झुगारले. शस्त्रक्रियेनंतरही तिने 2012 च्या ऑलिम्पिकची तयारी सुरू केली. अर्थात, ऑलिम्पिक स्पर्धा खेळायची म्हणजे पात्रताफेरी सिद्ध करावी लागणार होती. त्यासाठी 2012 च्या राष्ट्रीय स्पर्धेत तिने सहभाग नोंदवला. दर वर्षी नव्या दमाच्या खेळाडूंचे आव्हान लीलया पेलणाऱ्या दाराला या वेळी खूपच चुरशीच्या लढतींना सामोरे जावे लागले. 50 मीटर फ्रीस्टाइल प्रकारात ती चौथ्या स्थानी राहिली. ऑलिम्पिक पात्रता गाठण्यासाठी पहिल्या दोन खेळाडूंना स्थान मिळते. दारा चौथ्या क्रमांकावर फेकली गेल्याने तिची संधी हुकली होती. या स्पर्धेतील विजेती ठरलेली जेसिका हार्डी (Jessica Hardy) हिने दारावर अवघ्या 32 सेकंदांनी बाजी मारली, तर दुसऱ्या क्रमांकाची कारा लिन जोयस (Kara Lynn Joyce) हिच्यापेक्षा दाराला फक्त नऊ सेकंद जास्त लागले. आता दाराने काळाची पावले ओळखली होती. हीच वेळ आहे स्पर्धात्मक कार्यक्रमांतून विश्रांतीची, हे तिला जाणवलं. ऑलिम्पिकमध्ये विक्रमी 12 पदके जिंकणाऱ्या दाराने निवृत्तीची घोषणा केली. 1984 ते 2008 असा तब्बल दोन तपांच्या जलतरण प्रवासातून दाराने अखेर विश्रांती घेतली. या तिच्या एकूण प्रवासात पाच ऑलिम्पिक स्पर्धांचा (1984, 1988, 1992, 2000, 2008) समावेश होता.

वैवाहिक आयुष्य अयशस्वी

दाराने जलतरण खेळात स्थिरत्व मिळवलं खरं, पण वैवाहिक आयुष्यात ती अयशस्वी ठरली. वयाच्या पंचविशीतच म्हणजे 1992 मध्ये एका क्रीडा वाहिनीचा स्पोर्टस प्रोड्युसर जेफ गोवेन (Jeff Gowen) याच्याशी विवाहबद्ध झाली. हा विवाह फार काळ टिकला नाही. गोवेनशी तिने घटस्फोट घेतला आणि 2000 मध्ये तिने पूर्णपणे ज्यू धर्माचा अंगीकार केला. तशीही ती आधी अर्धी ज्यू होतीच. म्हणजे तिचे वडील ज्यू, तर आई ख्रिश्चन होती. ज्यू धर्म स्वीकारण्याचे कारण म्हणजे तिने इस्राएलच्या डॉ. इत्झाक शाशा या शल्यविशारदाशी लग्न केले. हा विवाहही टिकला नाही. या दोघांचाही घटस्फोट झाला. त्यानंतर दाराच्या आयुष्यात डेव्हिड हॉफमन आला. या दोघांना 2006 मध्ये टिसा ग्रेस नावाची गोड मुलगी झाली. टिसा ग्रेस गर्भात असतानाही दारा स्विमिंगपासून अंतर राखू शकली नाही. गर्भावस्थेची नऊ महिने ती स्विमिंग करीत होती. तिच्या आयुष्यात आता दोनच गोष्टींवर प्रेम होते, ते म्हणजे मुलगी टिसा ग्रेस आणि स्विमिंग.

अनेक खेळाडू खेळतात नि नंतर काही वर्षांनी त्यांचं नाव धूसर होत जातं. दाराच्या आधी आणि दारासोबत खेळलेल्या अशा किती महिला जलतरणपटू तुमच्या लक्षात असतील, कदाचित एका हाताच्या बोटाएवढ्याही नसतील. पण दारा लक्षात राहते, ते तिच्या अफाट पराक्रमाने, विजिगीषू वृत्तीमुळे. तिचं एक वाक्य आहे, तुम्ही स्वप्न कोणत्याही वयात सत्यात उतरवू शकतात. दाराने ते सिद्ध करून दाखवलं. दाराने आता पन्नाशी ओलांडली आहे. 2019 या वर्षात तिने 52 वर्षे पूर्ण केली. या तिच्या वयातल्या महिला तर केव्हाच आजीबाई झाल्या. पण दाराला आजही पाहिलं, तर पन्नाशी ओलांडल्याची कोणतीही खूण तिच्या चेहऱ्यावरून जाणवत नाही. स्पर्धात्मक कार्यक्रमांतून तिने निवृत्ती स्वीकारली असली तरी पाण्यापासून ती अजूनही लांब राहू शकलेली नाही.

दारा टोरेसने एकाच जन्मात अनेक जन्मांच्या भूमिका पार पाडल्या. उत्तम जलतरणपटू असलेल्या दाराने निवृत्तीनंतर फॉक्स न्यूज चॅनेल, ओएलएन, टीएनटी, ईएसपीएन आणि एनबीसी वाहिन्यांची रिपोर्टर म्हणूनही काम पाहिले. ती एका गोल्फ शोची सूत्रसंचालकही होती. तिने काही काळ मॉडेल म्हणूनही काही मासिकांवर झळकली आहे. 2005 मध्ये तिला इंटरनॅशनल जेविश स्पोर्टस हॉल ऑफ फेम या पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. ती अनेक मोठमोठ्या कंपन्यांची प्रवक्ताही राहिली आहे. नंतर तिने उद्योगात स्वतःचे वेगळे स्थान मिळवले. कॅनिब्रँड्स, सीबीडी कंपनीसारख्या उद्योगांतही तिने गुंतवणूक केली. ती म्हणते, मला चांगले आठवतेय, की माझे वडील स्वतः उद्योजक होते. त्यामुळे मला विश्वास आहे, की माझी उद्योगविश्वातले पाऊल विशेष आश्चर्य नाही. मला स्पर्धा करायला आवडते कारण मला जिंकण्याचे वेड लागले आहे. त्यामुळेच मला उद्योगात काही तरी उत्तम करण्याची ऊर्मी स्वस्थ बसू देत नाही.

समृद्ध अनुभव गाठीशी असलेल्या दाराचा प्रवासच थक्क करणारा आहे. दारा आता 52 वर्षांची आहे. अजूनही तेवढ्याच त्वेषाने ती कार्यरत आहे. सुपरमॉम, उत्तम फिटनेस सल्लागार, मोटिवेशनल स्पीकर, उत्तम लेखिका, उद्योजक या सगळ्या भूमिका ती एकाच आयुष्यात जगली. देवाने तिला असं तर नाही ना सांगितलंय, की बाई, हा तुझा शेवटचा जन्म आहे. काय जगायचं ते तू याच जन्मात जगून घे…

अबब! मायकेल फेल्प्स याच्या नावावर इतके विक्रम!

Follow us on our official facebook page– kheliyad

Read more at:

कसे बनले महान फुटबॉलपटू पेले?
All Sports

कसे बनले महान फुटबॉलपटू पेले?

January 16, 2023
लता मंगेशकर क्रिकेटच्या तारणहार
All Sports

बीसीसीआयकडे पैसे नव्हते, तेव्हा लता मंगेशकर ठरल्या क्रिकेटच्या तारणहार

February 18, 2023
क्रिस एवर्ट टेनिस
All Sports

महान Tennis खेळाडू Chris Evert यांना अंडाशयाचा कर्करोग

February 19, 2023
कोरोनाविरुद्धच्या लढाईत खेळाडू मदत
All Sports

कोरोनाविरुद्धच्या लढाईत खेळाडूंची पीएम केअर्स फंड योजनेत मदत

December 9, 2021
मिल्खा सिंग फ्लाइंग सिख
All Sports

धावपटू मिल्खा सिंग-‘फ्लाइंग सिख’ उडाला आकाशी!

February 21, 2023
The story of Billie Jean King
All Sports

बिली जीन किंग : महिलांच्या अस्तित्वासाठी लढणारी टेनिसपटू

April 3, 2021
Tags: ऑलिम्पिक जलतरणजलतरणदारा टोरेस
Mahesh Pathade

Mahesh Pathade

Next Post
शेखर गायकवाड देवराई जंगल

शेखर गायकवाड- नाशिकमध्ये देवराई जंगल निर्माण करणारा अवलिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CONTENT

  • All Sports
  • Women Sports
  • Cricket
  • Tennis
  • Environment
  • Jagjit Singh Gazal
  • Online Chess

INFORMATION

  • Sports History
  • About Us
  • Sports Quiz
  • Inspirational Sports Story

    SOCIAL MEDIA

    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Home
    • About US
    • Gallery
    • Contact

    © 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

    No Result
    View All Result
    • Home
    • Cricket
    • All Sports
    • Inspirational story
    • Online Chess Puzzle
    • Raanwata
    • Video
    • sports quiz

    © 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

    error: Content is protected !!