All SportsBoxingInspirational Sport story

गुडबाय दि ग्रेटेस्ट

शतकातील सर्वोत्तम मुष्टियोद्धा म्हणून एकच नाव समोर येतं, ते म्हणजे  महान मुष्टियोद्धा मुहंमद अली यांचं. अमेरिकेच्या अरिझोना राज्यातील फॉनिक्स शहरात शुक्रवारी या महान योद्ध्याने जगाचा निरोप घेतला. मुष्टियुद्धात तीन वेळा विश्वविजेता ठरलेला व दि ग्रेटेस्ट म्हणून लौकिक मिळविणाऱ्या या महान योद्ध्याविषयी…

सॉनी लिस्टनविरुद्धची ती लढत अमेरिकेतील साठच्या दशकातील पिढीला चांगलीच ठावूक असेल. हाच तो लिस्टन ज्याने फ्लॉइड पॅटरसन नावाच्या भयंकर ताकदीच्या अव्वल मुष्टियोद्ध्याला अवध्या २ मिनिटे आणि सहा सेकंदांत पराभूत केले होते. सर्वोत्तम मुष्टियोद्धा म्हणून लिस्टनची ख्याती होती. अशा ऐन भरात असलेल्या लिस्टनविरुद्ध बाविशीतला कॅसिअस मार्सेलस क्ले नावाचा एक योद्धा रिंगणात उतरला. पॅटरसनचा जिथे निभाव लागला नाही, तिथे क्लेचा काय निभाव लागणार? पण इथे क्लेने नवा इतिहास रचला. क्लेचे ठोसे इतके जबरदस्त होते, की सातव्याच फेरीत लिस्टन क्लेला शरण आला, म्हणजे पुढच्या फेऱ्या खेळण्यास नकारच दिला. ही लढत होती विश्व मुष्टियोद्धा स्पर्धेच्या अंतिम फेरीची. क्लेने १९६४ मध्ये जिंकलेला विश्वविजेतेपदाचा हा पहिला किताब. इथेच क्लेने इस्लाम धर्म स्वीकारल्याचं जाहीर केलं आणि आपलं नावही बदललं, ते म्हणजे दि ग्रेटेस्ट मुहंमद अली!

गुडबाय दि ग्रेटेस्ट

विश्व मुष्टियोद्धा स्पर्धेत तीन वेळा विजेता ठरलेला हाच तो मुहंमद अली, ज्यांनी बॉक्सिंगच्या रिंगमध्ये नवनवे अध्याय रचले. कारकिर्दीत ते ६१ लढती लढले. त्यापैकी तब्बल ५६ लढती जिंकले आणि केवळ पाच लढती गमावल्या. ते बॉक्सिंगच्या बाऊटमध्ये जेवढे आक्रमक होते, तितकेच ते बाऊटबाहेरही स्पष्टवक्ते होते.

आक्रमक आणि स्पष्टवक्ता

व्हिएतनामच्या युद्धात अमेरिकी सैन्याचाही सहभाग होता, त्या वेळी अलीने अमेरिकी सैन्यात भरती होण्यास स्पष्टपणे नकार दिला. मला हे युद्ध मान्य नाही. कुराणमध्ये युद्धाची शिकवण नाही. त्यामुळे मी यात सहभागी होणार नाही, असं त्याने स्पष्टपणे सांगितलं. त्यावरून अधिकाऱ्याने त्याला कल्पना दिली, की जर तू नकार दिलास तर तुला १० हजार डॉलर दंड व पाच वर्षांची शिक्षा होईल. तरीही अलीने त्याला जुमानले नाही. अखेर अलीला अटक झाली आणि बॉक्सिंगचा परवाना आणि त्याचे सर्व किताब काढून घेण्यात आले. अखेर अलीने अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टात अपील केले आणि तेथे त्याला न्याय मिळाला. सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरील कारवाई चुकीची ठरवली. अलीच्या भूमिकेचे अनेकांनी स्वागत केले. ही होती १९६७ ची गोष्ट. मात्र, या स्पष्टवक्तेपणाची त्याला किंमतही चुकवावी लागली. तब्बल साडेतीन वर्षे त्याला बॉक्सिंगपासून दूर राहावे लागले. अगदी अलीकडेच अमेरिकेतल्या राष्ट्रपतिपदाच्या रिंगणात असलेले रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांनी मुस्लिमांविरोधात जे वक्तव्य केले होते, त्याचाही दि ग्रेटेस्ट मुहंमद अली यांनी आपल्या शैलीत समाचार घेतला होता. कोणाचीही भीडभाड न बाळगणारा अली बाऊटबाहेरही तितकाच स्पष्ट आणि आक्रमक राहिला.

फोरमनविरुद्धची ती अविस्मरणीय लढत!

मुहंमद अली नावाचं वादळी व्यक्तिमत्त्व अखेर साडेतीन वर्षांच्या बंदीनंतर पुन्हा बॉक्सिंगच्या रिंगमध्ये उतरलं. मात्र, पूर्वीचा तो त्वेष, ती आक्रमकता नव्हती. लढणं हाच एका योद्ध्याचा धर्म असतो. आणि या धर्माला जागण्यासाठीच तो रिंगमध्ये उतरला होता. १९७१ ची ही लढत ‘शतकातील लढत’ म्हणूनच जाहीर झाली. समोर होता जो फ्रेझियर. या लढतीत अली लौकिकाला साजेसा खेळलाच नाही. अखेर त्याला कारकिर्दीतला पहिला पराभव स्वीकारावा लागला. अलीने या पराभवाचं कर्ज फार काळ डोक्यावर ठेवलं नाही. १९७४ मध्ये त्याने फ्रेझियरला पराभूत करीत पराभवाचा वचपा काढला. या लढतीनंतर अली पुन्हा भरात आला आणि ‘रम्बल इन दि जंगल’ नावाची अविस्मरणीय लढत झायरमध्ये (आताचे काँगो) जाहीर झाली. ही लढत होती अलीएवढ्याच ६ फूट ३ इंच उंचीच्या ताडामाडाच्या जॉर्ज फोरमनशी. तोही विश्वविजेताच. फ्रेझियरसारख्या योद्ध्याला त्याने दोन मिनिटांत नॉकआऊट करीत हे विश्वविजेतेपद पटकावले असल्याने या दोन बुरुजांची टक्कर पाहण्यासाठी स्टेडियममधील एकही खुर्ची रिकामी नव्हती. तब्बल ४० लढतींत अजिंक्य राहिलेल्या या योद्ध्याबरोबर आता अली लढणार होता. दोघे जेव्हा आमनेसामने रिंगमध्ये उतरले तेव्हा प्रचंड जल्लोष सुरू होता.

दि ग्रेटेस्ट अलीचे जॅब्स आणि ‘कॉम्बिनेशन’चे हल्ले एकीकडे सुरू होते, तर तेवढ्याच त्वेषाने फोरमनही अलीवर बरसत होता. फोरमनला यापूर्वीच्या अनेक लढतींमध्ये सहा मिनिटांपेक्षा जास्त कधी लढावे लागले नव्हते. अलीसोबत मात्र त्याचा पुरता कस लागला. दोघेही एकमेकांवर तुटून पडले होते. चेहरे रक्ताने काहीसे लालसर झाले होते. सात फेऱ्या उलटल्या आणि आठव्या फेरीत दोघेही इतके दमले होते, की रिंगमध्ये उभं राहतानाही दोरीचा आधार घ्यावा लागायचा. अखेर अलीच्या एका ठोश्याने फोरमन कोसळला. तो उठला तेव्हा अली विजेतेपदाचा मानकरी ठरला होता…! अलीच्या कारकिर्दीतली एक अप्रतिम लढत होती. ज्यांनी पूर्वीचा अली पाहिला असेल त्यांना तोच अली ‘रम्बल इन दि जंगल’मध्ये पाहायला मिळाला. याच लढतीवर रॉकी नावाचा चित्रपट आला. यावरील एका लघुपटाला तर ऑस्करचा पुरस्कार मिळाला. हा ऑस्कर घेताना त्याचा कडवा प्रतिस्पर्धी असलेला जॉर्ज फोरमन सोबत होता. पार्किन्सनग्रस्त अलीला तो आधार देत असताना पाहायला मिळाला.

ग्लोव्हज कोट्यवधींना!

मुहंमद अली यांच्या कारकिर्दीतल्या सर्वोत्तम लढतींत त्यांनी वापरलेले ग्लोव्हज लिलावात कोट्यवधी रुपयांना विकले गेले. जो फ्रेझियरविरुद्धच्या १९७१ च्या लढतीतील त्यांचे ग्लोव्हज एका व्यक्तीने ३ लाख ८८ हजार ३७५ डॉलरला (दोन कोटी ३६ लाख रुपये) खरेदी केले. जो फ्रेझियरविरुद्धची ती लढत शतकातील लढत म्हणूनच ओळखली गेली होती. यापूर्वी अली यांच्या कारकिर्दीतल्या पहिल्या विश्वविजेतेपदासाठी वापरलेल्या ग्लोव्हजला लिलावात ८ लाख ३६ हजार ५०० डॉलरला (अंदाजे ५ कोची ८ लाख रुपये) विकले गेले होते. अलींच्या लोकप्रियतेचाच हा करिश्मा होता.

वर्णद्वेषाचा सामना

१९६० मध्ये झालेल्या रोम ऑलिम्पिकमध्ये अली यांनी गोल्ड मेडल जिंकले. मात्र, त्या काळात वर्णद्वेष बऱ्यापैकी होता. त्याचा फटका अलींना बसला. एका हॉटेलमध्ये त्यांच्यावर वर्णद्वेषावरून शिवीगाळ झाली. त्यामुळे ते प्रचंड नाराज झाले होते. या उद्वेगातूनच त्यांनी त्यांनी आपले ऑलिम्पिक गोल्ड मेडल ओहियो नदीत फेकले. मात्र, १९९६ मधील अटलांटा ऑलिम्पिकमध्ये त्यांना पुन्हा गोल्ड मेडल देऊन गौरविण्यात आले.

अली मूळचे आयर्लंडचे

मोहम्मद अली यांची पूर्ण हयात अमेरिकेत गेली असली तरी ते मूळचे आयर्लंडचे होते. त्यांचे खापर पणजोबा अॅबे ग्रॅडी १८६० मध्ये आयर्लंडहून अमेरिकेत आले होते आणि केंटकी शहरात आपले बस्तान बसवले. याच शहरात त्यांनी फ्री स्लेव यांच्याशी विवाह केला. त्यांच्या नातींमध्ये एक नात अली यांची आई ओडेसा ली ग्रॅडी होत्या. २००९ मध्ये मोहम्मद अली यांनी आपल्या खापर पणजोबांच्या एन्नीस शहराला (आयर्लंड) भेट दिली होती.

पार्किन्सनविरुद्धची अखेरची लढाई

दि ग्रेटेस्ट मोहंमद अली यांना नागरिक अधिकार कार्यकर्ताही म्हंटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. तब्बल तीन दशकं बॉक्सिंगवर त्यांनी अधिराज्य गाजवलं होतं. त्यामुळे या तीन दशकांत त्यांनी अनेक ठोसे दिले, तसे हजारो ठोसे खावेही लागले. पार्किन्सन आजारामागचे हेच कारण होते. या आजाराविरुद्ध ते काही वर्षांपासून लढत होते. त्यामुळे त्यांचा अनेकांशी संवादच खुंटला होता. त्यांच्याशी संवाद साधायचा, तर कुटुंबातील व्यक्तींच्या किंवा प्रवक्त्याच्या माध्यमातूनच तो होऊ शकत होता. १९९६ च्या अटलांटा ऑलिम्पिकमध्ये त्यांनी सर्वांनाच अचंबित केले होते. कोणतीही पूर्वसूचना न देता ते ऑलिम्पिक स्पर्धेला आले होते. त्या वेळी पार्किन्सनने बऱ्यापैकी डोके वर काढले होते. त्यामुळे त्यांचे हात थरथरत होते. तरीही अली यांनी आपल्या थरथरत्या हातांनी ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित केली होती. त्यानंतर २०१२ च्या लंडन ऑलिम्पिक मध्येही ते व्हीलचेअरवरच आले होते. पार्किन्सनविरुद्धची ही लढाई अखेरची ठरली. अखेर शनिवारी, ४ जून २०१६ रोजी त्यांनी चिरकाल निद्रा घेतली. काळ पुढे पुढे सरकत असतो. मात्र, काळ गाजविणारे कधी नजरेआड होत नसतात. मुहंमद अली या महान योद्ध्याने अनेक काळ गाजवले. अशा या लढवय्या योद्ध्याचा एक अध्याय संपला आहे, तर त्यांची मुलगी लैला अली आता महिला मुष्टियुद्धाचा नवा अध्याय रचत आहे.. अशा या महान वीराला अखेरचा दंडवत.

गुडबाय-दि-ग्रेटेस्ट

दि ग्रेटेस्ट मोहम्मद अली यांच्याविषयी थोडक्यात…

  • अली यांचा जन्म १७ जानेवारी १९४२ मध्ये झाला.

  • मोहम्मद अली यांचे मूळ नाव कॅशिअस मार्सेलस क्ले ज्युनिअर असे होते.

  • १९६४ मध्ये त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारत मोहम्मद अली असे नाव धारण केले.

  • अली यांनी वयाच्या बाराव्या वर्षी बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी १९६४ मध्ये सोनी लिस्टनला पराभूत करीत वर्ल्ड हेविवेट चॅम्पियनशिप जिंकली.

  • पत्रकार परिषद आणि मुलाखतींसाठी अली यांचा कोणत्याही मॅनेजरवर विश्वास नव्हता. त्यामुळे असे इव्हेंट ते स्वतःच हाताळायचे. ही प्रेरणा त्यांनी प्रसिद्ध पहिलवान जॉर्ज वॅग्नर यांच्याकडून मिळाली

  • अली यांना ‘द ग्रेटेस्ट’बरोबरच ‘द पीपल्स चॅम्पियन’, ‘द लुइसविले लिप’ या उपाध्यांनीही ओळखले जायचे.

  • बॉक्सिंग रिंगमध्ये त्यांचे फूटवर्क आणि पंच अफलातून होते. ते तीन वेळा हेवीवेट चॅम्पियन (१९६४, १९७४, १९७८) राहिले.

  • ६ फूट ३ इंच उंचीचे व मजबूत शरीरयष्टीचे अली यांनी कारकिर्दीत ६१ लढती लढल्या. त्यापैकी ५६ लढती जिंकल्या. त्यापैकी ३७ लढती नॉकआऊट होत्या. कारकिर्दीत त्यांना केवळ ५ पराभवांचा सामना करावा लागला.

  • १९८१ मध्ये त्यांनी बॉक्सिंगमधून निवृत्ती घेतली.

  • त्यांनी चार लग्न केले होते. त्यांना नऊ मुले आहेत. त्यापैकी सात मुली व दोन मुलगे आहेत. यात त्यांची मुलगी लैला अली हिनेच वडिलांचा बॉक्सिंगचा वारसा जपला.

  • अमेरिकेच्या फीनिक्स शहरात मोहम्मद अली यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. त्यांचा अंत्यविधी त्यांची मायभूमी लुईसविले येथे करण्यात आला.
[jnews_block_37 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”66,60″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!