आठवणींचा धांडोळा

एका शोधाची शोकांतिका

महेश पठाडे
Tweet : @PathadeMaheshMT

८० च्या दशकातील एका व्हिडीओ गेमने अनेकांना वेड लावले होते. मीही

जॅम फिदा होतो या गेमवर. अर्थात, हा गेम मी फारसा खेळलेलो नाही; पण कुणी खेळत असेल तर तल्लीनतेने पाहायचो. त्या वेळी तर कम्प्युटरही फारसे कुणाला झेपत नव्हते… मात्र, मित्रांसोबत मी हा गेम खूपच चवीने खेळायचो. ‘अॅरो की’ (arrow key)वर या संपूर्ण गेमचं नियंत्रण होतं. आता बरीच वर्षे लोटली. आता तर मोबाइलवरच इतके व्हिडीओ गेम आलेत, की त्यांची मोजदाद नाही.


एकदा सहज कम्प्युटरवर माहिती सर्च करीत असताना एकदा माझा मुलगा मेधावी म्हणाला, की मला एखादा गेम डाऊनलोड करून दे ना पप्पा… त्या वेळी मला एकदम क्लिक झालं, की कधी काळी असा एक गेम होता. आता तो आहे की नाही सर्च करून बघूया. पण नाव लक्षात येईना… पोकेमॉन गेमचं फॅड आल्यानंतर मला वाटलं, की असंच काही तरी नाव होतं.. कदाचित हा गेम पोकॅमॉनच असेल. आता त्याचं स्वरूप बदललं असेल असं वाटलं. गूगलवर सर्च करून पाहिलं… पण पाहिजे तो गेम काही सापडला नाही. हा गेम कोणी बनवला हेही माहीत नव्हतं. त्यामुळे या गेमचा शोध मी जवळपास थांबवला होता… मुलाला म्हणालो, बाळा, जाऊदे.. काही सापडत नाही तो गेम. या घटनेलाही एक-दोन महिने उलटले.


मात्र, या गेमचा शोध आज (30 Jan. 2017) लागला. हा गेम होता ‘पॅक-मॅन’. मी तर आनंदाने उडालोच.. पण हा आनंद काही क्षणात निवळला. एखादा चेंडू खेळायला मिळाल्यावर खूप आनंद होतो… पण तो चेंडू पंक्चर आहे हे कळल्यावर जी अवस्था होते तशीच अवस्था माझी झाली. या आनंदाचीही हवा काढून घेतली ती एका धक्कादायक बातमीने… हा गेम ज्यांनी तयार केला होता ते जपानचे मसाया नाकामुरा यांचे २२ जानेवारी 2017 रोजी ९१ व्या वर्षी निधन झाले. हे वृत्त आज वाचण्यात आले. त्याबरोबरच एक फोटो होता, तो पॅक-मॅन गेमचा (Pac-Man). त्यांच्या आयुष्यातला माइलस्टोन ठरलेला हाच तो गेम ज्याचा मी शोध घेत होतो. मसाया यांनी नाम्को नावाची व्हिडीओ गेम कंपनी उभी केली, जी जपानमध्ये तिसऱ्या क्रमांकाची आहे. त्यांना जपानच्या सरकारने ‘ऑर्डर ऑफ रायझिंग सन’ या पुरस्कारानेही गौरविले आहे. जपानमधील मसाया हे व्यक्तिमत्त्वच इतकं उत्तुंग आहे, की त्यांची माहिती थोडक्यात देणे शक्य नाही. या गेमच्या शोधानंतर मी त्यांची माहिती आधाशासारखी वाचून काढली आणि मसाया हे अजब रसायन उमगले.

नाकामुरा यांनी 1955 मध्ये मनोरंजक उद्योगाला सुरुवात केली. म्हणजे दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर दहा वर्षांनी त्यांनी उद्योगाची मुहूर्तमेढ केली. एक दशकाचा काळ लोटल्याने जपानची अर्थव्यवस्थाही नुकतीच कुठे सावरायला लागली होती. युद्धातल्या कटू आठवणी विसरून जपानी नागरिकांनी पूर्ववत खेळ आणि मनोरंजनाला आपलेसे केले. 


लकड़ी की काठी काठी पे घोड़ा
घोड़े की दुम पे जो मारा हथौड़ा
दौड़ा दौड़ा दौड़ा घोड़ा दुम उठा के दौड़ा

हे गाणं लहानपणी आपण तालासुरात म्हंटलं असेलच. नाकामुरा आणि या गाण्याचा काय संबंध, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. पण लहानपणी हे गाणं म्हणताना तुमच्यासमोर एक लाकडी घोड्याचं चित्र उभं राहिलं असेल. दोन वक्राकार लाकडी दांड्यावर लाकडी घोडा तुम्ही पाहिला असेल.. शरीर मागे- पुढे हललं, की घोड्यावर सैर केल्याची वेगळीच अनुभूती मिळायची. ही घोड्याची जी रचना आहे ती नाकामुरा यांचीच. लहान मुलांच्या खेळणीची सुरुवातच नाकामुरा यांनी अशा लाकडी घोड्यापासून केली. अतिशय सोप्या पद्धतीने केलेली ही खेळणी मूल दहा-बारा वर्षांचं होईपर्यंत हा सोडत नव्हतं… मला वाटतं, जगभरातील चाळिशीतल्या पिढीचं बालपण नाकामुरा यांनी अशा पद्धतीनेही समृद्ध केलं.

अर्थात, या खेळणीला सातासमुद्रापार नेण्याचं काहीसं श्रेय एका डिपार्टमेंटल स्टोअरला द्यावं लागेल. या डिपार्टमेंटल स्टोअरचं नाव आहे मित्सुकोशी. 1960 च्या सुरुवातीला नाकामुरा यांनी मित्सुकोशीशी सौदा केला. नाकामुरा यांच्यासाठी हे मोठं यश होतं. कारण मित्सुकोशी जपानमधील आघाडीचं डिपार्टमेंटल स्टोअर होतं, ज्याची जगभर विक्रीची साखळी होती. मित्सुकोशीची स्थापना 1673 ची. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल, की हे स्टोअर 1960 मध्ये किती तरी पटीने पुढारलेले होते. आता तर हे स्टोअर ऑनलाइन विक्रीसेवेतही बरेच जुने झालेय. लहान मुलांना रोडच्या प्रतिकृतीवर चालणाऱ्या ऑटोमोबाइलची खेळणी या स्टोअरमध्ये होतीच. आता नाकामुरा यांचा लाकडी घोडाही या स्टोअरमध्ये समाविष्ट झाला. खेळणीच्या विक्रीपश्चात मित्सुकोशीला कमिशन मिळायचे.

मुळात यामुळे नाकामुरा मोठे झाले असे अजिबात नाही. त्यांचं खरं नशीब पालटलं ते व्हिडीओ गेम्समुळे. यातूनच त्यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धीच्या झोतात नेले. नाकमुरा यांना आपल्या क्षमतेवर विश्वास होता. त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनीअरना नोकरी देत कंपनीला एक दिशा दिली. नाकामुरा मॅन्युफॅक्चरिंग असं या कंपनीचं नाव. पुढे या कंपनीचं नाम्को (Namco) असं नामांतर झालं. या कंपनीने गॅलॅक्झियन (Galaxian) नावाचा पहिला गेम विकसित केला. अंतराळातील योद्ध्यांवर बॉम्बहल्ले करून त्यांचे यान नष्ट करण्याचा हा गेम. यानातून होणारे बॉम्बहल्ले चुकवत अधिकाधिक यान उद्ध्वस्त केले की तसे पॉइंट्स तमच्या नावावर जमा होतात. मोबाइलवर या खेळाशी साधर्म्य साधणारे आता अनेक गेम पाहायला मिळतील. हा गेम ऑक्टोबर 1979 मध्ये आला. मिडवे गेम्स या अमेरिकन कंपनीने या गेमचे हक्क विकत घेतले. त्याच्या पुढच्याच वर्षी नाकामुरा यांच्या कंपनीने आणखी एका गेमने जन्म घेतला. पॅक-मॅन (Pac-Man) असे या गेमचे नाव. नाम्कोचा कर्मचारी 25 वर्षीय टोरू इवाटानी याच्याद्वारे हा गेम विकसित करण्यात आला. पिझ्झाच्या आकारावरून त्याने या गेममधील पॅक हे पात्र साकारण्यात आल्याचं म्हंटलं जातं.  पॅक हा शब्द जपानी भाषेत पॅक्कू (pakku) असाही उच्चारला जातो. गोबल किंवा मंच या इंग्रजी शब्दाशी बरोबरी करणारा हा शब्द आहे. भूलभुलय्यातून वाचवत हा पॅक वेगाने पळतो, ज्याचे नियंत्रण खेळणाऱ्याला अॅरो कीने करावे लागते. 

पॅक मॅन या खेळाने एव्हाना जगभरात लोकप्रियता मिळवली होती. 1983 मध्ये नाकामुरा यांनी मुलाखतीत सांगितले, मी विचारही केला नव्हता, की हा गेम इतका मोठा होईल. याच गेमवर आधारित मिसेस पॅक मॅन (Ms. Pac-Man, among others) ही टीव्हीवर मालिकाही येऊन गेली. हा गेम इतका लोकप्रिय झाला, की 36 वर्षांत तो सुमारे 10 बिलियन वेळा खेळला गेला. एक बिलियन म्हणजे 100 कोटी. 10 बिलियनचा हिशेब केला तर डोके चक्रावून जाईल.

पॅक मॅनचे गेम मशीन दि स्मिथ्सोनियन आणि न्यू यॉर्कच्या मॉडर्न आर्ट संग्रहालयात अनमोल ठेवा म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. दि स्मिथ्सोनियन हे अमेरिकेच्या वॉशिंग्टनमधील मोठे वस्तुसंग्रहालय मानले जाते. त्याची स्थापना 1846 मधील आहे, तर दुसरे न्यू यॉर्कचे मॉडर्न आर्ट संग्रहालयाला आता 88 वर्षे पूर्ण होतील. अशा दोन सर्वांत प्रतिष्ठेच्या संग्रहालयात जपानी पॅक-मॅन खेळाच्या मशीनचा ठेवा जपला यातूनच या खेळाची लोकप्रियता लक्षात येते. 

नाकामुरा हे काही गेमचे डिझायनर नव्हते. नाकामुरा यांच्या नाम्को कंपनीची प्रतिस्पर्धी निंटेंडो या व्हिडीओ गेम कंपनीचे अध्यक्ष राहिलेले हिरोशी यामाऊची यांनी नाम्कोच्या उत्पादनांचे परीक्षण करताना म्हंटले, की हा गेम खेळूनच पाहिलेला दिसत नाही. यामाऊची हे नाकामुरा यांचे समकालीन होते. मात्र कर्मचाऱ्यांनी सांगितले, की या गेमची माहिती देण्यापूर्वी आम्ही 23 तासांपेक्षा अधिक वेळ हा गेम खेळलो आहे.
अशा प्रकारे लोकांना स्क्रीनची सवय लावणे घातक असल्याचा इशाराही त्यांनी दिला. “मी थोडा चिंतीत आहे, की काही लोक हा गेम खूप खेळतात. पॅक-मॅन गेमच्या लोकप्रियतेची उंची त्यातून जाणवते. मात्र, मर्यादेपेक्षा जास्त खेळणे तरुणांसाठी चांगले नाही,” असेही यामाऊची म्हणाले.

नाम्कोने सातत्याने अनेक व्हिडीओ गेम्स बनवले. मात्र, पॅक-मॅनच्या यशाची सर त्यांना कधी आलीच नाही. कंपनीने नंतर इतर व्यवसायात लक्ष घातले. खाद्यपदार्थांवर आधारित जपानमध्ये अॅम्युझमेंट पार्क्स उभे केले. त्यापैकी बरेच बंद केले किंवा विकले. 

नाम्कोने 1993 मध्ये निक्कात्सु हा जपानी फिल्म स्टुडिओ खरेदी केला. हा स्टुडिओ त्या वेळी समुराईवरील ऐतिहासिक कहाण्या आणि त्यात थोडासा पोर्नोग्राफी मसाला असलेल्या चित्रपटांनी ओळखला जायचा. नाकामुरा यांचाच स्टुडिओ असल्याने ते स्वतः चित्रपट काढायचे यात विशेष काही नव्हते. मात्र, अनेक चित्रपटांत ते स्वतःचा कार्यकारी निर्मातेही असायचे. 2002 मध्ये ते नाम्कोचे अध्यक्ष झाले. त्याच्या तीनच वर्षांनी 2005 मध्ये नाम्को त्यांची प्रतिस्पर्धी कंपनी बंडाईमध्ये विलीन झाली. त्यानंतर बंडाई नाम्को असे कंपनीचे नामकरण झाले. नाकामुरा या नव्या कंपनीचे नामधारी अध्यक्ष होते. त्यानंतर ते सल्लागाराच्या भूमिकेत राहिले. कर भरणाऱ्यांच्या यादीनुसार नाकामुरा त्या वेळी जपानमधील 68 वे श्रीमंत व्यक्ती होते. 

नाकामुरा यांचा जन्म 24 डिसेंबर 1925 रोजी योकोहामा येथे झाला. त्यांनी योकोहामा नॅशनल युनिव्हर्सिटीत शिपबिल्डिंगमध्ये शिक्षण घेतले. बंडाई नाम्को कंपनीने नाकामुरा यांची यापेक्षा अधिक माहिती दिलेली नाही. कंपनीने त्यांचा मृत्यूही गोपनीय राखला. त्यांच्या मृत्यूनंतर आठ दिवसांनी तो जाहीर केला. त्यामागचे कोणतेही स्पष्टीकरण कंपनीने दिलेले नाही. गोपनीयता राखण्याची त्यांच्या कुटुंबाची इच्छा होती काय, या प्रश्नाचेही उत्तर कंपनीने जाहीर केलेले नाही. याबद्दल अद्याप तरी शंकांचे मोहोळ जमा झालेले नाही. सगळंच गूढ आहे….

पण काय शोकांतिका आहे, ज्या गेमचा शोध घेत होतो त्याचा शोध त्या निर्मात्याच्या मृत्यूच्या बातमीने कळावा! माझा गेमचा शोध आता थांबला आहे आणि या गेमच्या निर्मात्यानेही चिरशांती घेतली आहे.
अलविदा मसाया नाकामुरा..!

rhythm00779@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!