All SportsMount Everest series

अबब! एव्हरेस्टवर शेकडो मृतदेह!!!

अबब! एव्हरेस्टवर शेकडो मृतदेह!!!

माउंट एव्हरेस्ट mount everest | ही नेपाळला लाभलेली निसर्गदत्त देणगी आहे. आपण ना निसर्गात हस्तक्षेप करू शकतो, ना आव्हान देऊ शकतो. मात्र जगभरात मानव निसर्गालाच आव्हान देण्याचं जेव्हा साहस करतो, तेव्हा तेथे मानवताही पायदळी तुडवली जाते हे आपल्या लक्षातही येत नाही.

माउंट एव्हरेस्टवर सध्या चारशेपेक्षा अधिक मृतदेह जागोजागी पडून आहेत. या मृत्यूमागे मानवाच्या अक्षम्य चुका आहेत. जेव्हा मरणासन्न अवस्थेतला गिर्यारोहक पाहूनही त्याच्या मदतीसाठी कोणीही पुढे येत नाही तेव्हा साहस थिटे पडते. उरतो तो जिंकण्याचा आसुरी आनंद. एव्हरेस्ट पर्वतावरील प्रत्येक मृतदेहाची कहाणी वेगळी आहे. ही कहाणी काही तरी सांगतेय… ते ऐकले, की मृत्यूचे हे भयावह वास्तव भयंकर अस्वस्थ करीत राहते. माउंट एव्हरेस्टवर चारशेपेक्षा मृतदेह आहेत, हे ऐकताना फारसं विशेष वाटणार नाही कदाचित. कारण या साहसवीरांच्या मृत्यूमागील करुण वास्तवापासून आपण अनभिज्ञ आहोत.

एक छोटंसं उदाहरण आहे, ज्या वेळी अरुणिमा सिन्हा नावाची एक धीरोदात्त मुलगी एव्हरेस्ट सर करीत असताना ऑक्सिजनशिवाय ती तडफडत होती. तिला गिर्यारोहक पाहतात, पण मदतीसाठी कुणी पुढे येत नाही. कारण प्रत्येकाला एव्हरेस्टचं शिखर खुणावत असतं. ही कुठली ध्येयासक्ती म्हणावी? माश्याच्या डोळ्यावर नजर ठेवलेल्या अर्जुनासारखी की रस्त्यात येईल त्याला लाथाडून पुढे जाणाऱ्या साम्राज्यपिपासू निष्ठूर चंगेज खानासारखी? एक मुलगी तडफडत आहे, पण कुणीही गिर्यारोहक तिची चौकशीही करीत नाही. अचानक कुणी तरी गिर्यारोहक एक ऑक्सिजनची बाटली फेकतो आणि अरुणिमा नावाची मुलगी ऐतिहासिक कामगिरी रचते. मात्र, जर ती ऑक्सिजनची बाटलीच नसती तर…? कदाचित चारशे मृतदेहांपैकी एक तिचाही असता! हे वास्तव भयंकर आहे. स्लीपिंग ब्यूटी Sleeping beauty |, ग्रीन बूट Green boot | ही याच भयंकर वास्तवतेची उदाहरणं आहेत.

एव्हरेस्टला आव्हान देण्याच्या दुराग्रही हट्टापायी चारशेवर जणांनी जीव गमावले आहेत आणि ते तसेच निपचीत पडून आहेत. त्यांच्या परिवारालाही हे मृतदेह पुन्हा कधीच पाहायला मिळालेले नाहीत. काही असेही मृतदेह आहेत, जे डोळ्यांना दिसतात; पण खाली आणता येत नाहीत. हे मृतदेह खाली आणणे अजिबातच शक्य नाही. कारण त्यासाठी लागणारे अदम्य साहस आणि खर्च! कारण मृतदेह जेथे कोसळले आहेत, तेथे जाणेच खडतर आहे. दुसरे म्हणजे एव्हरेस्टवर जाण्यासाठी दोनच मार्ग आहेत, एक मार्ग नेपाळमधून जातो, तर दुसरा तिबेटमधून. तिबेटमधून जाणारा मार्ग म्हणजे उत्तरी मार्ग अधिक सोपा आहे, तर नेपाळमधील सोलखुम्भू भागातून जाणारा परंपरागत दक्षिणी मार्ग खूपच खडतर आणि दुर्गम आहे.

या दोन्ही मार्गांपैकी कोणत्याही एका मार्गाने एव्हरेस्ट मोहीम फत्ते करता येऊ शकते. तिबेटचा मार्ग सोपा असला तरी गिर्यारोहकांना तो पसंत नाही. त्याची दोन कारणे आहेत, ती म्हणजे सुविधा आणि मार्गदर्शनाचा अभाव. नेपाळमधून जाणारा मार्ग अतिशय अवघड आणि खडतर असला तरी तेथे अनेक सुविधा मिळतात. शेर्पांची मदतही सहजपणे उपलब्ध होते. याव्यतिरिक्त आणखी महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे नेपाळ सरकारकडून एव्हरेस्ट मोहिमेसाठी सहजपणे मिळणारी परवानगी. या मार्गाला युरोपीय देश आणि भारतीय गिर्यारोहकांची जास्त पसंती असते. त्यामागे आणखी एक कारण आहे, ते म्हणजे २४ मे १९५३ मध्ये मूळचा नेपाळी शेर्पा असलेला व नंतर भारतीय नागरिकत्व पत्करलेले तेन्झिंग नोर्ग्ये यांनी न्यूझीलंडच्या एडमंड हिलरीसोबत एव्हरेस्टवर चढाई केली ती याच दक्षिण मार्गाने.

२०१९ चा विचार केला तर या वर्षात नेपाळने ३८१ गिर्यारोहकांना परवानगी दिली, तर तिबेटकडून केवळ ६४ जणांना परवानगी दिली. हा फरक पाहिला तर लक्षात येते, की कुठे सहजपणे मंजुरी मिळते ते! हे दोनच मार्ग एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी महत्त्वाचे असल्याने जे मृतदेह इतस्तत: विखुरलेले आहेत, ते नेमकी कुठे कुठे आहेत याचा ठावठिकाणा शोधण्यासाठी शेकडो शेर्पांच्या दोन तुकड्या पाठवाव्या लागतील. त्यासाठी जो खर्च लागेल तो करणार कोण?

40-50 वर्षांपूर्वीपासून मृतदेह पडून


मृतदेहांना खाली आणण्यासाठी हजारो डॉलर खर्च होतात. त्यासाठी कमीत कमी आठ शेर्पांची गरज लागते. मात्र, या संपूर्ण प्रवासात बचाव पथकातील सदस्यांचा जीवही धोक्यात येण्याची शक्यता असते. मृत गिर्यारोहकांना परत आणण्यासाठी अनेक कुटुंबे प्रयत्न करीत नाहीत. कारण त्याला लागणारा खर्च आणि दुसरे म्हणजे त्याला असलेल भावनिक किनार. नातेवाइकांना वाटते, की एव्हरेस्टवर जाण्याचे त्याचे स्वप्न होते. त्यामुळे त्याला एव्हरेस्टच्या कुशीतच राहू द्यावे. ही त्यांच्या नातेवाइकांचीच भावना असल्याने अनेक गिर्यारोहकांचे मृतदेह एव्हरेस्टवर आढळतात. ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमान वाढत आहे. त्यामुळे या वाढत्या तापमानामुळे बर्फ विरघळत आहेत. जसजसे बर्फ विरघळतात तसतसे बर्फाखाली असलेले मृतदेह स्पष्टपणे दिसू लागतात. असे अनेक मृतदेह या एव्हरेस्टवर आता दिसत असून, ते सुमारे ३०-४० वर्षांपूर्वीचे आहेत.

एव्हरेस्ट सर करण्यासाठी सहज मिळणारी परवानगी घातक


एव्हरेस्टवरील मृत्यूची कारणे वेगवेगळी असली तरी पहिले कारण म्हणजे एव्हरेस्ट मोहिमेसाठी सहजपणे मिळणारी परवानगी. प्रत्येक ग्रुपला सोबत एक शेर्पा गाइड म्हणून बाळगावा लागतो. ही परवानगी कशी मिळते, तर त्यासाठी एकच सर्टिफिकेट द्यावे लागते, ते म्हणजे तंदुरुस्तीचे. तुम्ही तंदुरुस्त आहात, यासाठी डॉक्टरचं सर्टिफिकेट दिलं, की तुम्हाला एव्हरेस्ट मोहिमेसाठी सहज परवानगी मिळू शकते. हे काम करण्यासाठी अनेक एक्सपिडिशन एजन्सीही Expedition Agency | आहेत. त्यांच्यामार्फत तर हे काम घरबसल्या सोपं झालं आहे. त्यातून तुम्हाला एव्हरेस्ट मोहिमेचं भयंकर वास्तव जाणवलं असेल. एकाच वेळी अनेक ग्रुपना परवानगी मिळाल्यानंतर एव्हरेस्टवर जी गर्दी होते, ती अनेक गिर्यारोहकांच्या जिवावर बेतते. त्यामुळेच २०१९ मध्ये एव्हरेस्टवर आठ हजार मीटरपेक्षा अधिक उंचीवर तब्बल अडीचशेपेक्षा अधिक गिर्यारोहकांची रांग लागली आणि हे सगळे गिर्यारोहक एकाच मार्गाने शिखरावर जाण्याचा प्रयत्न करीत होते. याच मार्गावर शेर्पांनी रोप टाकून मार्गही निश्चित केला होता. आता एकाच वेळी अडीचशेवर गिर्यारोहक जमा झाल्यावर तेथे काय स्थिती झाली असेल, याची कल्पनाच शहारे आणणारी आहे. त्या वेळी जी लोकं एव्हरेस्टवर असतील त्यांना हा अनुभव कायमच्या स्मरणात राहिला असेल. त्यामुळे २०१९ मध्ये गिर्यारोहकांच्या मृत्यूला जी कारणं समोर आली, त्यातील एक कारण म्हणजे नेपाळ सरकारकडून सहजपणे मिळणारी परवानगी आहे.

दुःख करावं की आश्चर्य?


१९२४ मधील एक घटना आहे. एव्हरेस्ट मोहिमेला गेलेले ब्रिटनचे जॉर्ज मेलोरी मित्रासह बेपत्ता झाले होते. शोधमोहीम राबवूनही ते आढळले नाहीत. अखेर १९९९ मध्ये त्यांचा मृतदेह सापडला. मात्र, मेलोरी यांचे मित्र अँड्र्यू इर्वाइन यांचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. अँड्र्यू आयर्विनसारखे असे अनेक मृतदेह आहेत ज्यांचा शोध अनेक वर्षांपासून लागलेला नाही. असे चारशेपेक्षा अधिक मृतदेह एव्हरेस्टवर आहेत. काही मृतदेह दिसतात, तर काही मृतदेह बर्फाखाली दबले गेलेले आहेत. आता त्यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाइकांकडे सोपवले तरी त्याचे नातेवाईक काही वेळ संभ्रमात पडतील. दु:ख व्यक्त करण्यापूर्वी ही व्यक्ती आपलीच नातेवाईक आहे का, हा प्रश्न त्यांना आधी पडेल. कारण १९२४ मध्ये बेपत्ता झालेल्या मेलोरी नावाच्या व्यक्तीचा मृतदेह जर तब्बल ७५ वर्षांनी हाती लागत असेल तर त्याचं दु:ख व्यक्त करायचं की आश्चर्य?

ही आहेत मृत्यूची ११ कारणे…


mount everest death causes | माउंट एव्हरेस्टवर मृत्यू होण्यामागे ११ कारणे आहेत. यात हिमस्खलन, कड्यावरून कोसळणे, पर्वतीय उंचीची भीती, हिमबाधा ही काही महत्त्वाची कारणे आहेत, ज्यामुळे आतापर्यंत ४०० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. जाणून घेऊया कोणत्या कारणामुळे किती जणांना जीव गमवावा लागला आहे?

१. हिमस्खलन


माउंट एव्हरेस्टवर हिमस्खलनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. हिमस्खलन हे एक अनाहूत संकट आहे, ज्याची पूर्वसूचना अचूकपणे मिळतेच असे नाही. २०१५ पर्यंतची आकडेवारी तपासली तर उत्तरी मार्गावरून ७, दक्षिण मार्गावर ३९, तर इतर मार्गावरून ३१ अशा एकूण ७७ जणांचा मृत्यू केवळ हिमस्खलनामुळे झाला आहे. अर्थात, गिर्यारोहकांची बेफिकिरीही तितकीच कारणीभूत आहे.

२. कड्यावरून कोसळणे


माउंट एव्हरेस्टवर पाय घसरून अथवा बेजबाबदारीने केलेल्या चढाईमुळे कोसळण्याच्या घटनाही अनेक घडल्या आहेत. यामुळे २०१५ पर्यंत एकूण ६७ व्यक्तींना जीव गमवावा लागला आहे. उत्तरी मार्गाने १८, दक्षिण मार्गाने २४, तर इतर मार्गाने २५ जणांचा मृत्यू केवळ याच कारणामुळे झाला आहे.

३. पर्वतीय उंचीची भीती acute mountain sickness |


उंचीवर चढाई करताना काही बाबींचे भान गिर्यारोहकाला राखावे लागते. पर्वतीय उंचीची भीती हा त्यापैकीच एक. सर्वोच्च उंचीवर चढाई करताना किंवा झपझप एव्हरेस्टचं शिखर गाठण्याच्या हव्यासामुळे हा आजार उद्भवू शकतो. उंचीवर गेल्यानंतर हवेचा दाब कमी होतो. अशा वेळी त्या वातावरणाशी स्थिर व्हायला वेळ लागतो. हा आजार एव्हरेस्टची चढाई करताना अनेकांना जडला आहे. अशा वेळी फुप्फुसाचा एडिमा किंवा अल्टिट्यूड सेरेब्रल एडिमा घातक ठरू शकतो. एकूण ३२ जणांना आपला जीव केवळ याच आजारामुळे गमवावा लागला आहे.

४. संसर्ग किंवा हिमबाधा Exposure/Frostbite |


हिमबाधा ही एक प्रकारची जखम आहे, जी अतिथंड वातावरणामुळे होऊ शकते. एव्हरेस्टचे तापमान उणे ३० अंशांपर्यंत घसरलेले असताना ही हिमबाधा होण्याची शक्यता अधिक असते. हाताच्या बोटांना हिमबाधा झाल्याने काही गिर्यारोहकांना बोट कापण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो.  कारण संसर्ग झाल्यास जीव गमवावा लागण्याची जास्त शक्यता असते. एकूण 26 मृत्यू केवळ हिमबाधेमुळे झाले आहेत. उत्तरी मार्गावरील 10, दक्षिण मार्गावरील 6, इतर मार्गावरील 10 गिर्यारोहकांना यामुळे जीव गमवावा लागला आहे.

५. आजार illness |


अतिथंड तापमानात तापाने अंग फणफणते. आजारपणामुळे एव्हरेस्टवरील चढाई भयंकर जीवघेणी ठरू शकते. अशा आजारात 20 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

६. थकावट Exhaustion |


थकावट व्यक्तीनिहाय असते. ही शारीरिक आणि मानसिक दोन्हीही असते. अशा वेळी प्रचंड धाप लागते. एव्हरेस्टवर चढाई करताना शारीरिक क्षमतेची कसोटी पणाला लागते. अनेकदा क्षमतेपेक्षा जास्त ऊर्जा खर्च केली तर हीच थकावट जीवघेणी ठरू शकते. थकावटीमुळे आतापर्यंत 20 जणांनी जीव गमावला आहे.

७. हिमवर्षाव Icefall Collapse |


हिमवर्षाव ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. हवामानाच्या अंदाजानुसार गिर्यारोहक चढाईचे नियोजन आखतात. एव्हरेस्टवरील तापमान पाहता तेथे होणारा हिमवर्षाव जीवघेणा ठरू शकतो. अशा वेळी एव्हरेस्ट शिखराकडे जाणारा मार्ग बर्फाखाली जातो. बर्फाचा थर साचल्याने हिमबाधा होण्याचीही भीती असते. या हिमवर्षावामुळे आतापर्यंत 15 जणांनी जीव गमावला आहे.

८. हिमदरार Crevasse  |


हिमदरार म्हणजे बर्फाचे महाकाय दोन तुकडे विलग होतात तेव्हा अशा ठिकाणी कोसळणे म्हणजे थेट मृत्यूच्या कुशीत विसावणेच. आठ वेळा एव्हरेस्ट सर करणारा पेम्बा सेरपासारखा कसलेला गिर्यारोहकही अशाच एका हिमदरारमध्ये कोसळल्याने बेपत्ता झाला आहे. कांगडी डोंगरावर 7,672 उंचीवर चढाई केल्यानंतर खाली परतताना तो हिमदरारमध्ये कोसळला होता. एव्हरेस्टवर आतापर्यंत दहा जणांनी यामुळे प्राण गमावले आहेत.

९. बेपत्ता होणे Disappearance |


एव्हरेस्टच्या कुशीत अशी काही ठिकाणे आहेत, जेथे गिर्यारोहकांचे मृतदेह कोणालाही आढळलेले नाहीत. काही गिर्यारोहकांचे बेपत्ता होणे अनाकलनीय आहे, ज्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. आतापर्यंत ९ गिर्यारोहक एव्हरेस्टवरून बेपत्ता झाले आहेत, ज्यांचे मृतदेह कुणालाही सापडलेले नाहीत.

१०. इतर कारणे


एव्हरेस्टवरील प्रमुख कारणांपैकी काही कारणे अशीही आहेत, ज्यामुळे गिर्यारोहकांना प्राण गमवावे लागले आहेत. बेफिकिरी, अतिआत्मविश्वास, अनुभव नसणे, माहितीचा अभाव अशा काही कारणांमुळे सात गिर्यारोहकांना आतापर्यंत प्राण गमवावे लागले आहेत.

११. दरड कोसळणे Falling Rock/Ice |


दरड कोसळल्याने किंवा बर्फाचा कडा कोसळून त्या खाली दबल्याने गिर्यारोहकांना प्राण गमवावा लागला आहे. अर्थात, या कारणामुळे जीव गमावण्याच्या घटना फारच कमी घडलेल्या आहेत. आतापर्यंत केवळ तिघांना आपला जीव गमवावा लागला आहे.

[jnews_block_8 first_title=”Read more at : ” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”76″]

Related Articles

8 Comments

  1. महेश शेठ एवरेस्ट वर जाऊन आल्याचा अनुभव येतो. तुझी लेखनशैली ओघवती असून वाचनात मजा येते. वास्तव किती विदारक आहे पण त्याकडे दुर्लक्ष करणे ही आपली खासियत आहे अहो सामान्य आयुष्यात सुद्धा आपण कोणाला मदत करण्यापेक्षा त्याकडे दुर्लक्ष करण्यात धन्यता मानतो. तर वर चढ़ाई करताना ज्याचा अर्थच मुळी चढ़ाई आहे तिथे कसली आली माणुसकी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!