All Sportschesssports news

अखेर आनंदची घरवापसी


Kheliyad news service


चेन्नई, ३० मे : माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंद viswanathan anand | शनिवारी, ३० एप्रिल २०२० रोजी सायंकाळपर्यंत मायदेशी परतणार आहे. तब्बल तीन महिन्यांनंतर तो मायदेशी परतणार आहे. करोना महामारीमुळे जगातील सर्वच सीमा लॉक करण्यात आल्या होत्या. विमानप्रवासच बंद झाल्याने विश्वनाथन आनंद जर्मनीत अडकून पडला होता. त्याची पत्नी अरुणा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्या म्हणाल्या, होय, आनंदची घरवासपी होतेय. आनंद शनिवारी रात्री फ्रँकफर्टवरून एअर इंडियाच्या विमानाने (ए १/ १२०) परतणार असून दुपारी सव्वाला बंगळुरूला पोहोचेल. पाच वेळचा विश्वविजेता असलेल्या आनंदला कर्नाटकने जारी केलेल्या नियमांनुसार १४ दिवस क्वारंटाइनमध्ये राहावे लागणार आहे.

आनंद आणि अन्य पाच खेळाडूंनी करोना महामारीविरुद्धच्या युद्धातही हिरिरीने सहभाग घेतला होता. पीएम केअर्स फंडासाठी निधी गोळा करण्यासाठी त्यांनी ११ एप्रिल रोजी ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेत आनंदशिवाय भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ग्रँडमास्टर विदित गुजराती, पी. हरिकृष्णा, भास्करन अधिबानसह कोनेरू हम्पी, द्रोणावली हरिका या दोन महिला खेळाडूंनीही सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण चेस डॉट कॉमवर झाले. करोना महामारीमुळे आनंद जर्मनीत अडकल्याने या फावल्या वेळाचा त्याने असा सदुपयोग केला. त्याने ट्विटवर सांगितले, की ‘‘कोविड-19 मदतीसाठी भारतीय बुद्धिबळप्रेमींच्या प्रयत्नाचे मी समर्थन करीत आहे.’’

याशिवाय बुद्धिबळप्रेमींनी वेगवेगळ्या ऑनलाइन स्पर्धांच्या माध्यमातून तीन लाख रुपयांचा निधी गोळा केला होता. प्रशिक्षक आर. बी रमेश यांनी ‘चेस गुरुकुल’च्या माध्यमातून निधी जमा केला. ग्रँडमास्टर पी. हरिकृष्णाने दोन लाख, तर कार्तिकेयन मुरलीने 25 हजार रुपयांचे योगदान दिले.

ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेतून आनंद आणि अन्य खेळाडूंनी साडेचार लाख रुपये गोळा केले होते. या उपक्रमाचे दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केले. मोदींनी ट्वीट करून सांगितले, की ‘‘भारतीय बुद्धिबळपटूंनी केलेला हा उपक्रम अनोखा आहे. विश्वनाथन आनंद, विदित गुजराती, पी. हरिकृष्णा, बी. अधिबान आणि द्रोणावली हरिका यांच्या या उपक्रमाचे कौतुक आहे.’’

आनंद डब्लूडब्लूएफ इंडियाचे पर्यावरण शिक्षादूत

विश्वनाथन आनंद डब्लूडब्लूएफ (वर्ल्ड वाइड फंड) इंडियाचा पर्यावरण शिक्षण कार्यक्रमाचा दूतही बनला आहे. डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडियाने पर्यावरण सरंक्षणाचे ५० वर्षे पूर्ण केली. पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनात आनंदच्या सहभागामुळे आम्ही आनंदित आहोत, असे डब्लूडब्लूएफ इंडियाने म्हंटले आहे. आनंद म्हणाला, ‘‘आपल्या मुलांना उत्तम आणि हिरवेगार वृक्ष मिळाले पाहिजे. आईवडील होण्याच्या नात्याने आपली ती जबाबदारी आहे. मी डब्लूडब्लूएफ इंडियाशी जोडला गेल्याने खूप आनंदित आहे. जास्तीत जास्त मुले व तरुणांना मी निसर्गाची आवश्यकता नक्की सांगेन.’’

‘‘मुलांनी १८ व्या वर्षापर्यंत बुद्धिबळात करिअर करण्याचा निर्णय घेऊ नये. त्यांनी आधी आपलं शिक्षण पूर्ण केलं पाहिजे. बुद्धिबळात व्यावसायिक खेळाडू बनावे लागत नाही. मला चिंता वाटते, जेव्हा १२-१३ वर्षांची मुले बुद्धिबळात करिअर करण्याची इच्छा व्यक्त करतात.’’

विश्वनाथन आनंद

लॉकडाउनमुळे ऑनलाइन सामंजस्य साधणे सोपे झाले आहे, असे आनंद म्हणाला. दोन महिन्यांपासून जर्मनीत अडकल्याने आनंद ऑनलाइनच्या माध्यमातूनच कुटुंबाच्या संपर्कात आहे. एससी बादेन संघाकडून बुंदेसलीगा बुद्धिबळ स्पर्धा खेळण्यासाठी आनंद जर्मनीत आला होता. मात्र, करोना महामारीमुळे जगभरातील विमानप्रवासावर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे तो मायदेशी परतू शकला नाही. फ्रँकफर्टजवळच राहणाऱ्या आनंदने सांगितले, की ‘‘जर्मनीतील स्थिती नियमित आहे. मी छोट्याशा शहरात आहे. एकदोन वेळा मला बाहेर जाता आले. मात्र, सुरक्षित अंतर राखणे आवश्यक आहे.’’

आनंदने व्यक्त केली चिंता

आनंदने २२ एप्रिल रोजी भारतीय क्रीडा प्राधिकरणाला (साई) साईच्या केद्रांमध्ये नवोदित खेळाडूंना बुद्धिबळासाठी संगणक प्रदान करण्याची विनंती केली होती. मात्र, अवघ्या १२ व्या वर्षी बुद्धिबळात करिअर बनविण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या पालकांबाबत त्याने चिंताही व्यक्त केली होती. आनंद जर्मनीत एका विशेष ऑनलाइन सत्रात साईच्या नवनियुक्त सहाय्यक निदेशकांशी बोलत होता. त्या वेळी त्याने ही चिंता व्यक्त केली. आनंद म्हणाला, ‘‘साईकडे प्रशिक्षण आणि सुविधा आहेत. जर या सुविधांमध्ये बुद्धिबळासाठी विशेष संगणकही ठेवला तर नवोदित खेळाडूंना खूप मदत होईल. बहुतांश खेळाडूंकडे ही सुविधा नाही.’’ वयाच्या १८ व्या वर्षी भारताचा पहिला सर्वांत लहान ग्रँडमास्टर झालेल्या आनंदने युवा बुद्धिबळपटू आणि त्यांच्या मातापित्यांनी एकमेकांच्या संपर्कात राहण्याचाही सल्ला दिला. भारतातील अनेक लहान बुद्धिबळपटू आहेत, जसे आर. प्रागनानंधा याने १४ व्या वर्षी ग्रँडमास्टरचा बहुमान मिळवला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!