तिरंदाजीची मदार दीपिका कुमारीवर

अवघ्या बारा वर्षांची मुलगी. जीव अगदीच तोळामांसाचा. तिच्यापेक्षा तर धनुष्य मोठा. तिला तिरंदाजी शिकण्याची इच्छा होती. आईवडील तिला अर्जुन मुंडा अकादमीत घेऊन आले. अकादमीच्या संचालकांनी तिला आपादमस्तक न्याहाळलं. म्हणाले, “तुझ्यापेक्षा तर धनुष्याचं वजन जास्त आहे! तू राहू दे. नाही होणार तुझ्याकडून.” ती चिमुकली निराश झाली… एकलव्यही असाच निराश झाला होता, जेव्हा द्रोणाचार्यांनी त्याचा अंगठा मागितला होता. तरी एकलव्य खचला नाही. तिच्याकडेही एकलव्याची जिद्द होती. आज याच जिद्दी मुलीच्या खांद्यावर ऑलिम्पिकमध्ये भारतीय तिरंदाजीची मदार आहे. ही मुलगी आहे दीपिका कुमारी. तिरंदाजी स्पर्धेत दीपिका कुमारीची ही तिसरी ऑलिम्पिक-वारी. दीपिका जिंकली तर तिचं नि भारताचं तिरंदाजी या खेळातलं हे पहिलंच ऑलिम्पिक पदक असेल.
जगातली नंबर वन दीपिका ऑलिम्पिक तयारीसाठी मेहनत घेत आहे. मात्र, तिचा हा ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास संघर्षमय आहे. आज ती जगातली नंबर वन तिरंदाज आहे. मात्र, दीपिका तिरंदाजी या खेळाकडे वळली कशी? त्यामागे एक छोटासा प्रसंग आहे. हा प्रसंग आहे 2006 चा. तिची एक मैत्रीण, अर्थात नात्याने बहीण असलेली दीप्ती कुमारी लोहरदगा येथे राहते. दीपिकाला एकदा दीप्तीकडे जाण्याचा योग आला. त्या वेळी दीप्ती तिरंदाजी करीत होती. तिला ते भारीच वाटलं. दीपिकाने ठरवलं, मीही तिरंदाजी शिकणार. त्या वेळी दीपिका होती बारा वर्षांची. तरीही प्रश्न उरतोच- दीपिकाने तिरंदाजीकडे वळण्याचाच निर्णय का घेतला? त्यामागचं खरं कारण म्हणजे पोटाची आग!
दीपिकाचं गाव झारखंडमधील रातू. घरची परिस्थिती जेमतेमच. वडील रिक्षाचालक, तर आई परिचारिका. आईवडिलांची सुरू असलेली ओढाताण दीपिका जवळून पाहत होती. तिरंदाजी हा खेळ पाहिल्यावर तिला वाटलं, यातून आपण घराला आर्थिक मदत करू शकतो. त्या वेळी ऑलिम्पिक कशाशी खातात हे तिला माहीतही नव्हतं. झालं, पोरीच्या डोक्यात तिरंदाजीचं खूळ घुसलं… लोहरदगा येथून ती घरी परतली. आईबापाच्या जिवाला घोर. पोरीच्या हट्टापायी वडील शिवनारायण आणि आई गीता माहतो यांनी तिला अर्जुन मुंडा अकादमीत घेऊन आले. ही अकादमी झारखंडच्या चांडील-गम्हरिया वनक्षेत्रातील खरसावा या छोट्याशा शहरात आहे.
तुझ्यापेक्षा धनुष्याचं वजन अधिक…
अर्जुन मुंडा त्या वेळी झारखंडचे मुख्यमंत्री होते. वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी ते मुख्यमंत्री झाले. देशातील सर्वांत कमी वयाचे मुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. त्यांच्याच नावाने ही अकादमी सुरू करण्यात आली होती. या अकादमीच्या संचालिका होत्या अर्जुन मुंडा यांच्या पत्नी मीरा मुंडा. त्यांनी दीपिकाला पाहिलं… म्हणाल्या, “तुझ्यापेक्षा धनुष्याचं वजन अधिक आहे. तुझ्याकडून नाही होणार.” आईवडिलांनी फारच विनंती केल्यावर दीपिकाची चाचणी घेण्यात आली. व्हायचं तेच झालं. दीपिका चाचणीत अपयशी ठरली. त्या वेळी बी. श्रीनिवास राव आणि हिमांशू मोहंती प्रशिक्षक होते. त्यांनी दीपिकाचा अर्ज रद्द केला. निराश दीपिकाला रिकाम्या हाताने घरी परतावं लागलं. दीपिका मात्र स्वस्थ बसली नाही. ती पुन्हा मीरा मुंडा यांना भेटली. म्हणाली, “तीन महिन्यांनी मी पुन्हा परत येईन.” मीरा मुंडा यांनी दीपिकावर विश्वास ठेवला आणि त्यांनी अकादमीला पत्र लिहून दीपिकाचं नाव नोंदवलं. दीपिका खूपच दुबळी होती. तिरंदाजीसाठी शक्तीबरोबरच सहनशक्तीचीही गरज असते. दीपिका नेमकी याउलट होती… तरीही बी. श्रीनिवास राव व मोहंती यांना एक गोष्ट जाणवली. ती म्हणजे तिची शरीररचना तिरंदाजीसाठी उपयुक्त होती. दीपिकाला अखेर अकादमीत प्रवेश मिळाला… दीपिकाच्या डोळ्यांत दृढ संकल्प होता. तिरंदाजीसाठी मेहनत घेण्याची तिची तयारी होती. सराव करताना तिला जे सांगितलं जायचं, ते ती एकदाच नाही, तर दोन वेळा करायची. मात्र, शरीर दुर्बल असल्याने तिला फार लवकर थकवा जाणवायचा. मात्र, मन कधी थकलं नाही. ती सराव करीत राहिली. दीपिकाची आवड पाहून अकादमीचा स्टाफ तिची चांगली काळजी घ्यायचा.
महिनाभरात दीपिका शिकली तिरंदाजी
अकादमीतील इतर मुलींसारखीच दीपिकाही प्रशिक्षक हिमांशू मोहंती यांच्या घरी राहत होती. अकादमीतल्या मुलांची निवासव्यवस्था मुंडा यांच्या घरी होती. अकादमीने दीपिकाची काळजी घेतली. दीपिकाला भात अजिबात आवडत नव्हता. म्हणून तिच्यासाठी चपात्या केल्या जात होत्या. दुपारी ती पेरूच्या झाडावर चढायची आणि सायंकाळी हिमांशू मोहंती यांच्या वडिलांसोबत टीव्ही पाहायची. काही दिवसांतच ती मोहंती परिवाराचाच एक भाग झाली. आता दीपिकाला अकादमीत महिना झाला. महिनाभरात दीपिकाने सर्वांनाच थक्क केले. ज्या मुलीपेक्षा धनुष्य मोठा होता, तीच मुलगी अकादमीतल्या तिच्याच वयाच्या मुलांना पराभूत करू लागली. दीपिकाने तिरंदाजीतलं कौशल्य झटपट आत्मसात केलं होतं. आता तिला पहिली परीक्षा द्यायची होती. पेपर तसा अवघडच. म्हणजे 2007 ची जबलपूरमधील सबज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धा. पदार्पणातल्या पहिल्याच स्पर्धेत दीपिकाचे हात रिकामेच राहिले. परीक्षा संपणार नव्हत्या, तर एकामागोमाग सुरू झाल्या होत्या. दीपिकाने दुसऱ्या परीक्षेची तयारी सुरू केली. हाही पेपर राष्ट्रीय स्तरावरचाच. विजयवाडा येथील राष्ट्रीय स्पर्धेत दीपिका कुमारीने सुवर्णपदकाचा वेध घेतला. दीपिकाला मिळालेलं हे पहिलं राष्ट्रीय स्तरावरचं यश. यानंतर दीपिकाने मागे वळून पाहिलंच नाही. दीपिकासमोर पुढचा टप्पा होता जमशेदपूरचं टीएए.
दीपिका 11 वर्षे होती जमशेदपूरच्या अकादमीत
दीपिका कुमारीने तिरंदाजीतली चुणूक तर दाखवली होती. आता तिला आणखी प्रगतशील प्रशिक्षणाची गरज होती. त्याचं उत्तर जमदशेदपूरचं टीएए हेच होतं. दीपिका या अकादमीत दाखल झाली. प्रशिक्षक धर्मेंद्र तिवारी आणि पौर्णिमा महतो यांच्या मार्गदर्शनाखाली तिची नवी इनिंग सुरू झाली. या टीएएमध्ये दीपिका 11 वर्षे राहिली. खरं तर टीएए हे तिचं दुसरं घरच होतं. टीएएच्या होस्टेल वॉर्डन कुंतला पॉल यांनी दीपिकाला तिची खोली दाखवली. दीपिका इथंही रमली. अगदी स्वयंपाकात मदत करायची. पॉल यांच्याशी तिची गट्टी जमली. त्यांचे केसं विंचरायची. दिवाळीत रांगोळ्या तर अशा अप्रतिम रेखायची की सगळे चकित व्हायचे. दीपिकाने सगळ्यांची मनं जिंकली.
आता दीपिका भारतीय तिरंदाजी खेळाचं प्रतिनिधित्व टोकियो ऑलिम्पिकमध्ये करीत आहे. दीपिका कुमारीने महिनाभरापूर्वीच जागतिक तिरंदाजी स्पर्धेचं विक्रमासह विजेतेपद मिळवलं आहे. एका जगज्जेतीकडून भारतीयांना पदकाची आशा असणे साहजिकच आहे. जगज्जेती असली तरी दीपिकाला हा पेपर सोपा नाही. थोडेसे फ्लॅशबॅकमध्ये जाऊया… गेल्या ऑलिम्पिकच्या महिनाभरापूर्वीही तिने अशीच अचाट कामगिरी केली होती. तिने जागतिक तिरंदाजी स्पर्धेत आपल्या आधीच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. मात्र, दीपिका कुमारीला तेव्हा ऑलिम्पिक पदक जिंकता आलं नाही. तिरंदाजी या खेळात भारताला अद्याप ऑलिम्पिक पदक मिळवता आलेलं नाही. हा पदकांचा दुष्काळ दीपिकाच दूर करू शकेल. ही ऑलिम्पिक दीपिकाला जिंकावीच लागेल. अर्थात, हे सगळं टोकियोतल्या परिस्थितीवर अवलंबून असेल. पदक जिंकण्यासाठी दीपिकाचे प्रयत्न जीवतोड असतीलच… मात्र, हे प्रयत्न यशात परावर्तित होतात की नाही हे पाहणं अधिक औत्सुक्याचं आहे. तिरंदाज जेव्हा लक्ष्यभेद करण्यासाठी बाण प्रत्यंचावर चढवतो, तेव्हा तो श्वास रोखून धरतो. भारतीयांनीही तिच्याकडे आणि दीपिकाने लक्ष्याकडे आतापासूनच श्वास रोखून धरला आहे.
Follow us
[jnews_block_9 first_title=”हेही वाचा…” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”69″]