All SportsInspirational Sport storysports newsTokyo Olympic 2020

गावाचं नशीब बदलायला निघालाय रवी दहिया

क्षय कुमारचा एक चित्रपट आहे- ‘जोकर’. या चित्रपटात ‘पगलापूर’ नावाचं असं एक गाव असतं, जेथे पाणी, वीज काहीही नसतं. भारतातलं एक दुर्लक्षित गाव. अक्षय कुमार या गावाचा कायापालट करण्यासाठी एक युक्ती शोधतो, ज्यामुळे जगाचं लक्ष या गावाकडं वेधलं जाईल आणि गावात सोयी-सुविधा येतील. गावात एलियन्स आल्याची आवई उठवतो आणि संपूर्ण जगाचं लक्ष गावाकडं वेधतोही… भारतात असंच एक गाव आहे- नाहरी! या गावाचीही अवस्था पगलापूरसारखीच. ना पाणी, ना वीज. या गावालाही असंच काही तरी ‘मिरॅकल’ हवंय, ज्यामुळे जगाचं लक्ष गावाकडं जाईल. त्यामुळे गावात किमान सुविधा तरी येतील. गावाने असंच एक ‘मिरॅकल’ शोधलंय. ते म्हणजे पहिलवान रवी दहिया!

नाहरी हे हरयाणातल्या सोनिपत जिल्ह्यातील गाव. साधारण पंधरा हजार लोकवस्तीचं हे गाव. या गावचा पहिलवान रवी दहिया ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. गावाचं नशीब बदलायचं असेल रवी दहियाने मेडल जिंकणं नाहरीकरांसाठी खूप महत्त्वाचं आहे.

रवी दहिया याच्या ऑलिम्पिक पदकासाठी नाहरीकरांनी देव पाण्यात ठेवले आहेत. कारण नाहरी असं गाव आहे, जिथं पिण्याच्या पाण्याची सोय खालावलेली.. हे असं गाव आहे, जिथं वीज दोन तासांसाठी पाहुणी येते. गावात साधी सांडपाण्याचीही व्यवस्था नाही. गावात सोयीच्या नावाखाली एकच गोष्ट आहे, ते म्हणजे पशुरुग्णालय.

रवी दहियाचं एक ऑलिम्पिक पदक गावाचा कायापालट करू शकतं. बस.. याच एका भावनेने ग्रामस्थांचं लक्ष टोकियो ऑलिम्पिककडे लागलं आहे.

रवी दहिया शेतकऱ्याचा मुलगा. शांत नि लाजाळू असलेला हा रवी दहिया गावातला तिसरा ऑलिम्पियन आहे. यापूर्वी या गावातून महावीरसिंग (1980 मध्ये मॉस्को ऑलिम्पिक आणि 1984 मध्ये लॉस एंजिल्स ऑलिम्पिक) यांनी दोन वेळा ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीचं प्रतिनिधित्व केलं आहे. याच गावातला पहिलवान अमित दहिया हादेखील 2012 मध्ये लंडन ऑलिम्पिक खेळला आहे.

आता तिसरा 24 वर्षीय रवी दहिया आहे, जो नाहरीचं नशीब बदलायला टोकियोला निघाला आहे.

महावीरसिंग यांनी दोन वेळा भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवीलाल चौधरी यांनी खूश होऊन विचारलं, “सांग, तुझी काय इच्छा आहे?” महावीरसिंग म्हणाले, “गावात एक पशुरुग्णालय सुरू करा..” मुख्यमंत्र्यांनी लगेच त्याची अंमलबजावणी केली आणि गावात पहिलं पशुचिकित्सालय झालं…

महावीरसिंग यांच्यानंतर ग्रामस्थांना विकासाचा मार्ग रवी दहिया याच्या रूपाने दिसला आहे. ग्रामस्थांची अशी भावना आहे, की जर रवीने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवलं, तर नाहरी अक्षय कुमारच्या पगलापूरसारखंच चर्चेत येईल. सरकार गावात काही तरी विकासाच्या योजना येतील.

नाहरीचे सरपंच सुनील कुमार दहिया म्हणाले, ‘‘या गावाने देशाला तीन ऑलिम्पियन दिले आहेत. या मातीतच काही तरी विशेष आहे. आम्हाला विश्वास आहे, की रवी पदक जिंकले. त्या यशामुळे गावाचा विकासही होईल.’’ सरपंच दहिया म्हणाले, ‘‘इथं एकही चांगलं रुग्णालय नाही. आम्हाला सोनिपत किंवा नरेला येथे जावं लागतं. इथं स्टेडियमही नाही. आम्ही लहानसं स्टेडियम उभारलं; पण तेथे मॅट, अकादमी किंवा प्रशिक्षक नाही. जर या सुविधा झाल्या तर गावातल्या मुलांचं जीवनमान उंचावेल.’’

तर असं आहे. नाहरीकरांना रवीचं पदक किती महत्त्वाचं आहे हे कळलंच असेल. म्हणूनच गावातल्या लोकांची विकासाची आशा रवी दहियावरच आहे. खरं तर रवी दहिया याच्या यशामागे त्याचे वडील राकेश कुमार दहिया यांच्या त्यागात आहे. वडील राकेश दहिया अनेक वर्षांपासून पट्ट्यावर घेतलेली जमीन कसत आहेत. त्यांनी हा संघर्ष रवीच्या शिक्षणात कधीच अडथळा ठरू दिला नाही. रवी छत्रसाल स्टेडियममध्ये सराव करायचा. हे स्टेडियम गावापासून 60 किलोमीटरवर. मुलासाठी वडील हे साठ किलोमीटरचं अंतर पार करून रोज दूध आणि तूप घेऊन यायचे. पोराला चांगला खुराक मिळावा एवढीच या बापाची तळमळ.

बापाची ही तळमळ हृदयाला घरे पाडतात. ते पहाटे 3.30 वाजता उठायचे. घरापासून पाच किलोमीटरवरील रेल्वे स्टेशनवर पायी जायचे. रेल्वेत बसून आजादपूरला उतरायचे. तेथून पुन्हा दोन किलोमीटर पायी छत्रसाल स्टेडियम गाठायचे. परतीचा प्रवास असाच. घरी परतल्यानंतरही विश्रांती नाही. तेथून ते शेतात राबायचे. यात खंड पडला तो करोना महामारीमुळेच. लॉकडाउनमुळे त्यांच्या 12 वर्षांच्या या तपश्चर्येत खंड पडला.

राकेश दहिया म्हणाले, ‘‘त्याची आई तूप बनवायची आणि मी ते एका कटोरीत घेऊन जायचो. एकदा रवीकडून नकळतपणे सगळं तूप मैदानावर सांडलं. मी म्हणालो, खूप कष्टाने आम्ही तुझ्यासाठी हा आहार मिळवतो. तू असा बेफिकीरपणा करू नकोस. तू ते तूप वाया जाऊ देऊ नको. हे सांडलेलं तूप तुला खायला हवं.’’

रवी सहा वर्षांचा होता, तेव्हापासून त्याला कुस्तीकडे वळवलं. राकेश दहिया म्हणाले, ‘‘त्याचं सुरुवातीपासून एकच स्वप्न होतं, ते म्हणजे ऑलिम्पिक पदक जिंकणं. त्याच्याशिवाय दुसरा विचार त्याने कधी केला नाही.’’

रवीच्या ऑलिम्पिक पदकासाठी एकीकडे बापाचा संघर्ष आहे, तर दुसरीकडे गावाची आशा. आता या अपेक्षांना रवी दहिया कसा सामोरा जातो हे टोकियोतच कळेल. मात्र, त्याच्या पदकासाठी नाहरीकर आतापासूनच डोळे लावून बसले आहेत..

Follow us

ऑलिम्पिक रवी दहिया ऑलिम्पिक रवी दहिया ऑलिम्पिक रवी दहिया ऑलिम्पिक रवी दहिया ऑलिम्पिक रवी दहिया ऑलिम्पिक रवी दहिया

[jnews_block_9 first_title=”हेही वाचा…” include_category=”95″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!