वाइफ कॅरिंग गेम : इथं बायको खांद्यावर घेऊन पळतात
फिनलंडसह काही देशांमध्ये वाइफ कॅरिंग गेम खेळला जातो. म्हणजे बायको खांद्यावर उचलून धावणे. नावातच कमालीची गंमत आहे. ज्या खेळात बायकोचा थेट रोल आहे, तो खेळ जगातला सर्वांत अजब खेळ म्हणावा लागेल.
पत्नी : मी तुला लठ्ठ वाटते का?
पती : बिलकुल नाही.. तू एकदम परफेक्ट आहे..
पत्नी : मला भूक लागली आहे. मला फ्रीजपर्यंत उचलून घेऊन जा ना?
पती : अरे थांब.. मी फ्रीजच उचलून आणतो…
हा हा हा…
एक विनोद म्हणून ठीक आहे. पण तुम्ही आता फ्रीज नाही, तर बायकोच उचलायला हवी. कारण फिनलंडसह काही देशांमध्ये वाइफ कॅरिंग गेम खेळला जातो. म्हणजे बायको खांद्यावर उचलून धावणे. नावातच कमालीची गंमत आहे. ज्या खेळात बायकोचा थेट रोल आहे, तो खेळ जगातला सर्वांत अजब खेळ म्हणावा लागेल. म्हणूनच की काय, या खेळाची गीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या खेळात बायको हा शब्द महत्त्वाचा आहे. आता तुम्ही ठरवायचं, बायको घरची सोबत घ्यायची की दारची. कारण तसे या खेळात बंधन नाही. या अजबगजब खेळाचा शोध कोणी लावला असा प्रश्न पडला असेल. फिनलंडमधील सांकोजार्वी येथे या खेळाचा जन्म झाला. वाइफ कॅरिंग गेम या खेळालाच युकोनकांटो (eukonkanto) किंवा अकानकांटो (akankanto) असं म्हणतात.
वाइफ कॅरिंग गेम या खेळाच्या स्पर्धाही होतात बरं. हा खेळ खेळायचा असेल तर बायकोच्या प्रश्नांना आता बगल देता येणार नाही. म्हणजे मी लठ्ठ आहे का, या बायकोच्या टिपीकल प्रश्नातून तुमची अजिबात सुटका नाही. बायको खांद्यावर उचलायची नि पळत सुटायचं. तुम्ही जिंकला तर बायकोला सर्वाधिक आनंद होईल. खरं तर हेच तुमच्यासाठी मोठं बक्षीस असेल. अर्थात, बक्षीसही मजेदार आहे. बरं, या स्पर्धेत बायको खांद्यावर उचलायची कशी याच्या काही वेगवेगळ्या पद्धती आहेत.
वाइफ कॅरिंग गेम स्पर्धेत अशा आहेत बायको उचलण्याच्या पद्धती
1. पिगीबॅक : हा प्रकार सर्वांना माहिती असेलच. थोडक्यात म्हणजे पाठगुळी घेणे. दोन पाय कमरेभोवती आणि गळ्याभोवती हाताचा विळखा.
2. फायरमन कॅरी : कुस्तीत एखाद्या मल्लाला खांद्यावर उचलून पटकावताना जी मुद्रा तुमच्यासमोर येते तशी. म्हणजे खांद्यावर आडवे उचलून पळणे.
3. इस्टोनियन स्टाइल : वाइफ कॅरिंगमधील ही मला सर्वांत प्रोफेशनल पद्धत वाटते. बायकोचे दोन्ही पाय गळ्याभोवती आणि तोंड खाली. असे बायकोला उलटे घेऊन धावणे.
आता तुम्ही ठरवायचं, तुम्हाला यापैकी कोणता प्रकार पेलतो ते.
या स्पर्धेचा पुरुषांना जास्त फायदा आहे. कारण या खेळाची दरवर्षी जागतिक स्पर्धाही होते. फिनलंडमधील सांकोजार्वी येथे 1992 ही स्पर्धा होते. या स्पर्धेतील विजेत्याला काय मिळते माहीत आहे का? बायकोच्या वजनाइतकी बीअर! आहे की नाही फायदा!
वाइफ कॅरिंग गेम खेळाचा इतिहास
या खेळाचा इतिहास गमतीदार आहे. या खेळाचं मूळ फिनलंडमध्ये आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे. या खेळामागे मोठी कहाणी आहे. ही गोष्ट आहे 18 व्या शतकातली. एका जंगलात हेर्क्को रोस्वो-रोकैनेन नावाचा क्रूर दरोडेखोर राहत होता. या दरोडेखोराच्या टोळीने जवळच्या एका गावात उच्छाद मांडला होता. रोस्वोचे दरोडेखोर गावात घुसले, की ते महिलांकडून भोजन हिरावून घ्यायचे आणि नंतर त्या महिलांना पाठीवर घेऊन पळून जायचे. यातूनच वाइफ कॅरिंग गेम या खेळाचा जन्म झाला असावा, असा समज आहे. कदाचित यातूनच पत्नीचोरीचा नवा प्रकार रुजला. मग अविवाहित तरुण शेजारच्या गावात जाऊन इतर पुरुषांच्या पत्नीची चोरी करायचे. या परस्त्रीला पाठीवर लादून घरी आणायचे आणि तिच्याशी लग्न करायचे. यातूनच मग एक सरावसत्र सुरू झाले. रोस्वो या दरोडेखोराने आपल्या टोळीला भक्कम आणि वेगवान बनवण्यासाठी त्यांच्या पाठीवर वजनदार पोती लादण्याचे प्रशिक्षण द्यायचा. त्यामुळे दरोडेखोरांना महिला पाठीवर लादून वेगाने पळायचा सराव होईल, हा त्यामागचा विचार. अर्थात, वाइफ कॅरिंग गेम हा खेळ अनेकांच्या चेष्टेचा विषयही बनला. असं असलं तरी यात सहभागी होणारे खूपच गांभीर्याने खेळतात बरं.
वाइफ कॅरिंग गेम हा खेळ फिनलंडमध्येच प्रसिद्ध नाही, तर भारतातही हा खेळ खेळला जातो. ऑस्ट्रेलिया, अमेरिका, हाँगकाँग, जर्मनी, इंग्लंडसह जगातील इतरही ठिकाणी हा खेळ खेळला जातो. फिनलंडमध्ये 2019 मध्ये 24 वी जागतिक वाइफ कॅरिंग चॅम्पियनशिप स्पर्धा झाली. या स्पर्धेत 13 देशांतील 53 जोड्या सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेला प्रेक्षकांची तोबा गर्दी असते. ते या जोड्यांना चीअर-अप करीत असतात. जगभरात या स्पर्धेचे पाठीराखेही कमी नाहीत. या स्पर्धेत लिथुआनियाची जोडी जिंकली. व्याटॉटस किक्लिआस्कस आणि नेरिंगा किक्लिआस्कस हे ते विजेते दाम्पत्य. त्यांनी ही स्पर्धा सलग दुसऱ्यांदा जिंकली. या दाम्पत्याने 2005 मध्येही स्पर्धेत भाग घेतला होता. या वेळी मात्र या जोडीने 66.7 सेकंदांची वेळ नोंदव ही स्पर्धा जिंकली. या जोडीने सहा वेळच्या विजेत्या जोडीला 0.1 सेकंदाने पराभूत केले. बक्षीस अर्थातच बायकोच्या वजनाइतकी बीअर मिळाली.
कशी आहे ही स्पर्धा?
या स्पर्धेचा मार्गही सोपा नाही. भुसभुशीत मातीचा भूभाग ओलांडल्यानंतर पुढे एक मीटर खोलीचे पाणी लागते. त्यानंतर काही ठराविक उंचीचे हर्डल्स असतात. त्यावरून उडी घेऊन धावायचे असते. हे करतानाही जोडीदाराची काळजी घेतली म्हणजे तुम्ही जिंकलात..
भारतही मागे नाही…
आयुषमान खुराना आणि भूमी पेडणेकरचा ‘दम लगा के हैशा’ हा चित्रपट तुम्ही पाहिला असेलच. 2015 मध्ये या चित्रपटाने या स्पर्धेची ओळख करून दिली होती. एकूणच काय, तर बायको खांद्यावर घेऊन पळण्याच्या या स्पर्धेत भारतही मागे नाही. केरळमधील तिरुवनंतपुरम येथे ही स्पर्धा होते. या स्पर्धेचे नाव आहे ‘भार्यासमेथम’. या मल्याळम नावाचा अर्थ आहे ‘बायकोसोबत’. मटुकिनिया म्हणूनही ही स्पर्धा आशियामध्ये ओळखली जाते. केरळमध्ये दरवर्षी ही स्पर्धा होते.
खेळाचे नियम
हा खेळ खेळायचा म्हणजे त्याला काही नियमही आहेत. अठराव्या शतकापासून सुरू झालेल्या या खेळात आधुनिक युगात काही बदल करण्यात आले आहेत. या स्पर्धेचे नियम आंतरराष्ट्रीय वाइफ कॅरिंग रुल्स कमिटीने तयार केले आहेत. ते नियम असे :
बायको पाठीवर घेऊन धावण्यासाठी 253.5 मीटरचा ट्रॅक असतो. |
या ट्रॅकवर मातीचा आणि एक मीटर खोल पाण्याचा अडथळा असतो. |
खांद्यावर जिला घेऊन धावायचं आहे, ती तुमची बायको किंवा शेजारच्याचीही बायको असली तरी हरकत नाही. पण जी महिला तुम्ही खांद्यावर घेऊन धावणार आहात, तिचे वय 17 वर्षांपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. |
आणखी महत्त्वाची अट म्हणजे, बायकोचं वजन किमान 49 किलो असावे. |
त्यापेक्षा कमी वजन असेल तर मग आणखी वजन तुम्हाला घ्यावं लागेल, जे एकूण 49 किलोपर्यंत होऊ शकेल. |
बायको ओझं म्हणून नाही तर आनंद म्हणून धावायचं हाही एक अलिखित नियम आहे. |
एक गोष्ट लक्षात ठेवावी, ती म्हणजे सुरक्षा. तुम्ही तुमचा विमाही काढून घेऊ शकता. |
जागतिक स्पर्धेत फक्त एकच श्रेणी निश्चित केलेली असते आणि जी सर्वांत कमी वेळेत अंतर पूर्ण करेल त्या विजेत्या जोडीला पारितोषिक दिले जाते. याशिवाय सर्वांत मनोरंजक जोडी, सर्वोत्तम वेशभूषा आणि सर्वांत जास्त वजन घेऊन धावणाऱ्याला विशेष पुरस्कारांनी गौरविले जाते. |
लोकप्रिय स्पर्धा |
ऑस्ट्रेलियन वाइफ कॅरिंग चॅम्पियनशिप, ऑस्ट्रेलिया |
उत्तर अमेरिका वाइफ कॅरिंग चॅम्पियनशिप |
युनायटेड किंगडम वाइफ कॅरिंग रेस, इंग्लंड |
वर्ल्ड वाइफ कॅरिंग चॅम्पियनशिप, फिनलंड |
हे ऐकलंय का? |
सर्वांत कमी वेळेत ही स्पर्धा जिंकण्याचा विक्रम इस्टोनियाच्या मार्गो युसोर्ग-बिर्गिट अलरिच या जोडीच्या नावावर आहे. 2000 मध्ये या जोडीने ही स्पर्धा 55.5 सेकंदांची वेळ नोंदवली होती. 19 वर्षांपासून हा विक्रम आजही अबाधित आहे. त्यामुळे ही जोडी जगातील सर्वांत वेगवान जोडी ठरली आहे. |
मार्गोने ही स्पर्धा 2000, 2001, 2003, 2005, 2006 अशी पाच वेळा जिंकली आहे. या पाच स्पर्धांमध्ये मार्गोने तीन वेळा आपला पार्टनर बदलला. |
ही स्पर्धा सर्वाधिक वेळा जिंकण्याचा विक्रम फिनलंडच्या टायस्टो मिट्टेनन आणि क्रिस्तिना हापमन या जोडीच्या नावावर आहे. या जोडीने ही स्पर्धा 2009, 2010, 2011, 2012, 2013, 2017 अशी सहा वेळा जिंकली आहे. विशेष म्हणजे या जोडीने एकदाही पार्टनर बदललेला नाही. |
स्पर्धेच्या इतिहासात सर्वांत कमी वेळेचा जसा विक्रम आहे, तसा सर्वांत जास्त वेळ नोंदविण्याचाही विक्रम आहे. १९९८ मध्ये इमर अम्बोस- अनेला ओजस्टे या इस्टोनियाच्या जोडीने 69.2 सेकंदांची वेळ नोंदवत विजेतेपद मिळवले होते. मात्र, स्पर्धेच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी वेळ ठरली आहे. |
या स्पर्धेवर आतापर्यंत इस्टोनियाचेच वर्चस्व सर्वाधिक राहिले आहे. या देशाच्या जोड्यांनी आतापर्यंत १० वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. त्या खालोखाल या खेळाचे जन्मदाते फिनलंड या देशातील जोड्यांनी (९ वेळा) ही स्पर्धा जिंकली आहे. त्यानंतर लिथुआनिया (दोन वेळा), रशिया (एकदा) यांचा क्रम लागतो. |
मस्तच. एका आगळ्यावेगळ्या खेळाची सविस्तर माहिती मिळाली.
thank you…