बायो बबल म्हणजे काय?
what is bio bubble? | करोना संकटकाळात आयपीएल भरविण्याचे आव्हान मोठे असले, तरी बायो बबलमुळे ही लीग निर्धोकपणे होऊ शकेल. याची सुरुवात इंग्लंड- वेस्ट इंडीज कसोटी मालिकेपासून सुरू झाली.
आता आयपीएलही याच बायो बबलच्या नियमांत होणार आहे. what is bio bubble? | हे बायो बबल म्हणजे आहे तरी काय, असा प्रश्न पडला असेल. तर जाणून घेऊ, हे बायो बबल.
करोना महामारीत स्पर्धा कशा घ्याव्यात हा प्रश्न संपूर्ण क्रीडाविश्वाला पडला आहे. करोनापासून लांब राहणे हाच एकमेव पर्याय सध्या तरी संपूर्ण विश्वासमोर आहे.
त्याच्या अनुषंगानेच चित्रपटगृहे बंद ठेवणे, शाळा बंद ठेवणे, रॅली न काढणे. थोडक्यात म्हणजे जेथे गर्दी होईल ती सर्व क्षेत्रे लॉक करणे एवढाच पर्याय होता. त्यामुळे क्रीडा स्पर्धा बंद करण्यात आल्या. इतर क्षेत्रात ऑलनाइनचं माध्यम खुले होते, पण क्रीडा स्पर्धांना तशी कोणतीही सोय नाही.
बुद्धिबळाचा एकमेव अपवाद सोडला, तर सर्वच खेळ ठप्प पडले. अगदी पीपीई किटचाही पर्याय खेळांना निवडता येत नाही. त्यामुळेच बायो बबलचा एक पर्याय क्रीडा स्पर्धांची द्वारे किलकिली करण्यास सहाय्यभूत ठरली आहे.
what is bio bubble? | बायो बबल म्हणजे काय?
बायो बबल म्हणजे जैव सुरक्षित वातावरण. सध्या करोना महामारीमुळे सर्वच व्यवस्था ठप्प पडली आहे. क्रीडाविश्वालाही मुक्त वातावरणात वावरता येत नाही. त्यामुळे अनेक स्पर्धांचा कार्यक्रम कोलमडला आहे. त्यामुळे या महामारीला सामोरे जाण्यासाठी काही उपाययोजना अमलात आणाव्या लागल्या.
त्यातलाच एक भाग म्हणजे ‘बायो बबल’. त्यात धर्तीवर ट्रॅव्हल बबल अशीही एक पद्धत प्रवासासाठी अमलात आणली जात आहे. त्यामुळे सुरक्षित वातावरणात क्रिकेटसह अनेक सराव, स्पर्धा निर्धोकपणे खेळता येऊ शकतात.
अर्थात ‘बबल’चा अर्थ सर्वसाधारणपणे नकारात्मकच अधिक आहे. बबल म्हणजे बुडबुडा. एखादा फुगा फुगवून मोठा झाला म्हणजे तो शक्तिमान होत नाही. भ्रमाचा फुगा (भोपळा) फुटला, असा एक नकारात्मक वाक्प्रचार आहे.
मात्र, सध्याच्या करोना संकटकाळात ‘बबल’चा अर्थ सकारात्मक आहे. बायो बबलची सुरुवात वेस्ट इंडीज आणि इंग्लंडदरम्यान झालेल्या कसोटी मालिकेपासून झाली. या मालिकेत बबलची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. जैव सुरक्षेच्या सूत्रानुसार ही बायो बबल पद्धत अमलात आणण्यात आली.
ही बायो बबल कशी काम करते, असा प्रश्न पडला असेल. या व्यवस्थेत खेळाडूंच्या आरोग्याचा अहवाल रोज सादर करावा लागतो. बायो बबलमध्ये इंग्लंड क्रिकेट बोर्डाने जैव सुरक्षित वातावरण तयार केले होते. म्हणजे खेळाडूंपासून त्यांच्याशी संबंधित कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनाच वेगळे करण्यात आले होते.
माध्यम प्रतिनिधींशीही खूपच मर्यादित संपर्क ठेवण्यात आला. या दरम्यान खेळाडू, स्टाफ आणि हॉटेल कर्मचाऱ्यांना केवळ शारीरिक अंतरच राखण्यास सांगितले नाही, तर रोज करोनासंबंधित नियमित तपासणीही करावी लागत होती.
केवळ इंग्लंड आणि वेस्ट इंडीजच्या खेळाडूंसाठी आणि काही निवडक लोकांसाठीच ही बायो बबल प्रणाली तयार करण्यात आली होती. म्हणजे हे खेळाडू टीव्ही कॅमेऱ्याद्वारे संपूर्ण जगाला तर दिसत होते, पण बाहेरची कोणतीही व्यक्ती या बायो बबलमध्ये जाऊन त्यांना भेटू शकत नव्हती. या खेळाडूंचे कुटुंबही त्यांना भेटू शकत नाही, अशी ही बायो बबलची व्यवस्था असते.
स्टेडियम, हॉटेल ग्रीन झोनमध्ये रूपांतरित
खेळाडू, संघ व्यवस्थापक, हॉटेल कर्मचारी आदी सर्व जेथे राहतात तेथपासून स्टेडियमपर्यंत कोणतीच व्यक्ती त्यांच्या संपर्कात येऊ शकत नाही. एवढेच नाही, जी व्यक्ती बायो बबलच्या नियमांचं उल्लंघन करेल, तिच्यावर कारवाई केली जाऊ शकते.
जोफ्रा आर्चरला अशाच कारवाईला सामोरे जावे लागले होते. इंग्लंड आणि वेस्ट इंडीजदरम्यानच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर थोड्या वेळासाठी घरी गेला होता. त्यामुळे त्याच्यावर दंडात्मक कारवाई झालीच, शिवाय एका सामन्याची बंदीही घातली.
या बायो बबलचा एक नियम असाही आहे, की जेथे कुठे संघ सामना खेळेल आणि ज्या हॉटेलमध्ये तो राहत असेल, त्याच्यापासून १५०० ते २००० वर्ग मीटरच्या परिघात त्यांना वेगळे केले जाते. त्याचबरोबर स्टेडियम, तसेच हॉटेलमध्ये एक ग्रीन झोन किंवा अंतर्गत परिघ तयार केला जातो. या परिघाच्या आत संघातील सदस्यांना एकमेकांना भेटण्याची मुभा असते.
बायो बबलसारखेच ट्रॅव्हल बबल
बायो बबलसारखेच ट्रॅव्हल बबल तयार करण्यात आले आहे. बायो बबलमुळे क्रिकेट तर सुरू झाले. हळूहळू अशाच काही उपाययोजना अमलात आणून हे विश्व पूर्व पदावर आणता येईल.
केवळ खेळाचाच नाही, तर करोनामुळे प्रवासबंदी करण्यात आली. त्यामुळे जगभरातला प्रवासच खुंटला. रेल्वे आणि बस थांबल्याने सामान्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आता बायो बबल किंवा ट्रॅव्हल बबलसारखी प्रणाली अमलात आणावी लागेल.
आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांसाठी ट्रॅव्हल बबल उपयोगी ठरू शकते. मात्र, त्यासाठी क्रिकेटच्या धर्तीवर बायो बबलसारखे नियम लादता येणार नाहीत. मात्र, कठोर निर्बंध लादले जात आहेत. यातला एक नियम असा आहे, की कोणतीही एक व्यक्ती मनाप्रमाणे तिकिटे खरेदी करू शकत नाही. करोना चाचणीसह अनेक बाबींचा यात समावेश आहे.
4 Comments