All SportsHockeysports newsTokyo Olympic 2020

भारतीय महिला हॉकी संघाचा ऑलिम्पिक प्रवास… पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!

लग तीन पराभवांमुळे भारतीय महिला हॉकी संघाकडून फारशा अपेक्षा कुणीच केल्या नसतील. किंबहुना पराभवांनंतर त्यांच्या परतीच्या प्रवासाची तयारीही सुरू झाली असेल. पण म्हणतात ना, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त… अगदी अशाच थाटात भारतीय महिला हॉकी संघाने ज्या पद्धतीने करो या मरोच्या लढती जिंकल्या त्याला तोड नाही. अगदी फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेतली. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने ऑस्ट्रेलियाचा 1-0 असा पराभव करीत उपांत्य फेरी गाठली आणि नवा इतिहास रचला. याचं श्रेय ड्रॅगफ्लिकर गुरजीत कौरला द्यावं लागेल. तिने केलेला एकमेव गोल भारताच्या विजयात मोलाचा ठरला. महत्त्वाचे म्हणजे गोलकीपर सविताच्या नेतृत्वाखालील सुरक्षा फळीनेही ऑस्ट्रेलियाचे मनसुबे उधळून लावल्याने विजय दृष्टिपथात आला.

भारतीय महिला हॉकी संघाच्या इतिहासात टोकियो ऑलिम्पिकमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धची 2 ऑगस्ट 2021 ची उपांत्यपूर्व लढत कायम लक्षात राहील. जगातल्या दोन नंबरच्या ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करणं म्हणजे सोपं नव्हतंच. विशेष म्हणजे सात पेनल्टी कॉर्नर भारतीय महिला हॉकी संघाने परतावून लावत एकमेव गोलचे अप्रतिम रक्षण केले. भारतीय पुरुष हॉकी संघाने तब्बल 49 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरी गाठल्यानंतर सर्वांच्या नजरा भारतीय महिला हॉकी संघावरच खिळल्या होत्या. तसंही भारतीय महिला हॉकी संघाला फारसं कुणी गृहीत धरलं नव्हतंच. जगात नवव्या क्रमांकावर असलेला भारतीय महिला हॉकी संघ विश्वातील दुसऱ्या क्रमांकाच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळतोय हीच मोठी गोष्ट होती. मात्र, भारतीय महिला खेळल्याच नाही तर ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तबही केलं. आता उपांत्य फेरीत भारतीय महिला हॉकी संघासमोर बुधवारी, 4 ऑगस्ट 2021 रोजी अर्जेंटिनाचं आव्हान असेल. हाच तो अर्जेंटिना संघ आहे, ज्याने उपांत्यपूर्व फेरीत जर्मनीला 3-0 असे पराभूत केले आहे.

भारतीय महिला हॉकी संघाची ऑस्ट्रेलियाविरुद्धची लढत उत्कंठावर्धक होती. गुरजीतने 22 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर महत्त्वपूर्ण गोल डागला. बस, हाच एकमेव गोल आहे, जो आपल्याला उपांत्य फेरीपर्यंत घेऊन जाईल, असा निश्चयच भारतीय महिला हॉकी संघाने केला. भारताने आपली सगळी ताकद या एकमेव गोलच्या बचावात खर्च केली. गोलकीपर सविताचं कौतुक करावं तितकं कमी आहे. तिने काय अप्रतिम बचाव केला! अर्थात, इतर सुरक्षा फळीनेही तिला उत्तम साथ दिली. अखेरच्या दोन सत्रात तर भारतीय महिला हॉकी संघाची कसोटी लागली. कारण ऑस्ट्रेलियाने एकापाठोपाठ हल्ले सुरू केले. मात्र, भारतीयांच्या सांघिक कामगिरीने हे सगळे हल्ले यशस्वीपणे परतावून लावले. एकमेव गोलच बचाव करणं तसं जोखमीचंच होतं. त्याचा बचाव कितीसा होऊ शकेल? पण भारतीय महिला हॉकी संघाचा आत्मविश्वास इतका दांडगा होता, की हाच गोल विजयात रूपांतरित केला. हाताचा फोड जपावा इतका तो काळजीपूर्वक जपला.

एकमेव गोल नोंदवणारी गुरजीत सामन्यानंतर म्हणाली, ‘‘आम्ही खूप आनंदी आहोत. हे यश आमच्या मेहनतीचं आहे. आम्ही 1980 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत पात्रता मिळवली होती. मात्र, या वेळी आम्ही उपांत्य फेरी गाठली आहे. हा आमच्यासाठी गौरवास्पद क्षण आहे.’’

भारतीय महिला हॉकी संघाची 1980 नंतर सर्वोत्तम कामगिरी

भारतीय महिला हॉकी संघाची ऑलिम्पिक स्पर्धेतील 1980 नंतरची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी 1980 च्या मॉस्को ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघ चौथ्या स्थानावर राहिली होती. त्या वेळी इनमिन सहा संघ होते. हे सामने त्या वेळी राउंड रॉबिन पद्धतीने खेळविण्यात आले होते. भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल हिच्यासाठी हा विजय किती महत्त्वाचा होता याची कल्पना नसेल. राणीच्या नेतृत्वाखालील हाच संघ गटातच संघर्ष करीत होता. सलग तीन पराभव स्वीकारणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाची अवस्था काय असेल? मात्र, नंतर भारतीय महिला हॉकी संघाने जोरदार पुनरागमन केले. दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंडला हरवून गटात चौथे स्थान मिळवले. याउलट ऑस्ट्रेलिया आपल्या गटात अव्वल स्थानावर होता.

जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या ऑस्ट्रेलियाने सुरुवातीची काही मिनिटे भारतीय महिला हॉकी संघाच्या सुरक्षा फळीला व्यस्त ठेवलं. खरं तर ऑस्ट्रेलियाने खूप लवकर भारतावर गोल डागला असता. झालं काय, की स्टीफेनी केरशॉने दुसऱ्याच मिनिटाला एंब्रोसिया मालोनीला क्रॉस पास दिला. मालोनीने या पासवर थेट गोलपोस्ट शॉट मारला. ऑस्ट्रेलियाचं दुर्दैवं, हा शॉट पोस्टला धडकला आणि गोल हुकला. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत भारतीय महिला हॉकी संघात अधिक आत्मविश्वास अधिक जाणवला. कारण गमवायचं काहीच नव्हतं. तीन पराभव स्वीकारलेला हा संघ तसाही मायदेशी खूप आधीच पोहोचला असता. म्हणूनच भारतीय महिला हॉकी संघावर दबाव असा नव्हताच. भारताचाही नवव्या मिनिटाला गोल हुकला. लालरेमसियामी आणि वंदना कटारिया ऑस्ट्रेलियाची सुरक्षा फळी भेदली. मात्र, राणी रामपालचा शॉट पोस्टवर धडकला आणि गोल हुकला.

भारताने पहिल्या सत्रात चेंडूवर चांगले नियंत्रण मिळवल्याचे पाहायला मिळाले. हेच सातत्य दुसऱ्या सत्रातही कायम राहिले. ऑस्ट्रेलियाला संधी खूप मिळाल्या. त्यांना 19 व्या मिनटात सामन्यातला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र, भारतीय महिला हॉकी संघाच्या अभेद्य तटबंदीमुळे हा धोका टळला. त्यानंतर ऑस्ट्रेलियन सर्कलमधून मोनिकाने उत्तम प्रयत्नानंतर भारताने पेनल्टी कॉर्नर मिळवला. त्याचं गुरजीतने सोनं केलं. तिने 22 व्या मिनिटाला या पेनल्टी कॉर्नरवर गोल केला आणि भारताला आघाडी मिळवून दिली. तिने गोलपोस्टच्या डाव्या बाजूने मारलेल्या शॉटचं ऑस्ट्रेलियन सुरक्षा फळीकडे कोणतंही उत्तर नव्हतं. ही आघाडी 26 व्या मिनिटाला आणखी वाढवण्याची संधी भारताला मिळाली. सलीमा टेटे हिने मैदानातून चेंडू पुढे घेऊन निघाली खरी, मात्र तिचा नेम चुकला. मध्यांतरापर्यंत भारताकडे 1-0 ची आघाडी कायम होती.

सात पेनल्टी कॉर्नरनंतरही ऑस्ट्रेलिया अपयशी

आता ऑस्ट्रेलिया स्वस्थ बसणार नव्हता. गोल करण्यासाठी तो कमालीचा आसुसलेला होता. तिसऱ्या सत्रात सुरुवातीपासूनच स्टीवर्ट ग्रेसने केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांना एक संधीही मिळाली. मात्र, दि ग्रेट वॉल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय गोलकीपर सविताने मारिया विलियम्सचा शॉट रोखला. ऑस्ट्रेलियाने यानंतर आणखी दोन पेनल्टी कॉर्नर मिळवले. इथेही सविताच्या नेतृत्वाखालील भारतीय सुरक्षाफळीने अद्भुत, अदम्य साहस दाखवत कांगारूंचे हल्ले परतावून लावले. या सत्रात भारताच्या मधली फळी आणि सुरक्षा फळीची कामगिरी उल्लेखनीय ठरली. सुशील चानू, दीप ग्रेस एक्का, सलीमा टेटे, मोनिका या सर्वांचा खेळ अप्रतिमच म्हणावा लागेल. ऑस्ट्रेलियाला जशा संधी मिळाल्या तशा भारताच्याही वाट्याला आल्या. या सत्रात भारताला गोल करण्याची आणखी एक संधी 44 व्या मिनिटाला मिळाली. शर्मिला देवीने उजव्या बाजूने चेंडू राणीकडे टोलवला. मात्र, या वेळीही राणी नेमका शॉट मारण्यात चुकली. भारतीय सुरक्षा फळीने चौथ्या सत्रातही सुरेख खेळ केला. ऑस्ट्रेलियाला 50 व्या मिनिटाला गोल करण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली. मात्र, या वेळी त्यांच्या मार्गात निक्की प्रधान आली. ऑस्ट्रेलियाला यानंतर सलग दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले, मात्र सवितारूपी भिंत भेदणे त्यांना शक्य झालं नाही. नियती ऑस्ट्रेलियाला अनेक संधी देत होती. ऑस्ट्रेलियाला या संधीचं सोनं करता आलं नाही. अगदी सामना संपायला दोन मिनिटे उरली असताना आणखी एक पेनल्टी कॉर्नर ऑस्ट्रेलियाला मिळाला. गंमत पाहा, नियती ऑस्ट्रेलियाला भरभरून देत होती. मात्र, साथ भारतालाच देत होती. भारतावर आलेलं संकट पुन्हा सविताने परतावून लावलं. सामना समाप्तीची अखेरची शिट्टी वाजली आणि भारतीय महिला हॉकी संघ हर्षोल्हासाने एकमेकींना आलिंगन देऊ लागल्या. भारतीय प्रशिक्षक सोर्ड मरिन आनंदाने उड्याच मारू लागले. त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू घळाघळा वाहत होते.

एका चित्रपटाने जागवला आत्मविश्वास

सलग तीन पराभवांनी भारतीय महिला हॉकी संघाचा ऑलिम्पिक स्पर्धेतील जवळजवळ संपुष्टातच आला होता. त्यांचं मनोबल तुटलं होतं. मात्र, या खेळाडूंना असं खचताना प्रशिक्षक सोर्ड मरिन यांना पाहायचं नव्हतं. त्यांच्याच नव्याने आत्मविश्वास भरण्यासाठी त्यांनी एक प्रेरणादायी चित्रपट दाखवला. या चित्रपटामुळे खेळाडूंमध्ये चैतन्य आले. भारतीय महिला हॉकी संघाचा नंतरचा संपूर्ण ऑलिम्पिक प्रवास तुम्ही पाहिलाच आहे. पहिल्यांदा भारताने उपांत्य फेरी गाठत इतिहास रचला. भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक सोर्ड मरिन यांनीच हा खुलासा केला. सलग तीन पराभवांनंतर भारतीय महिला हॉकी संघाने शानदार पुनरागमन करीत आयर्लंडविरुद्धच्या करो या मरो लढतीत विजय मिळवला. या विजयापूर्वी भारतीय महिला हॉकी संघाने एक चित्रपट दाखवला होता. याच चित्रपटातून त्यांना प्रेरणा मिळाल्याचं मरिन सांगतात. मात्र, हा चित्रपट कोणता, याचा खुलासा त्यांनी केला नाही. 

भारताने उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियासारख्या मातब्बर संघाला 1-0 अशी धूळ चारली. या विजयानंतर मरिन म्हणाले, ‘‘जर तुम्ही पराभूत होत असतात, तेव्हा स्वतःवर विश्वास करणे सोडत नाहीत. हेच मी मुलींना सांगितलं. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तो क्षण जगायचा असतो. मी त्यांना एक चित्रपट दाखवला आणि हा चित्रपट वर्तमानातला क्षण जगण्याशी संबंधित होता. मला वाटतं, यामुळे उभारी घेण्यास मदत मिळाली. आयर्लंडविरुद्ध आम्ही या चित्रपटाची आठवण करीत राहिलो.’’

मरिन यांनी या चित्रपटाचं नाव सांगण्यास नकार दिला. ते म्हणाले, ‘‘मी या चित्रपटाचा उल्लेक माझ्या एका पुस्तकात केला आहे. हे पुस्तक मी लॉकडाउनदरम्यान भारतात मला आलेल्या अनुभवांवर लिहिलं आहे.’’ मरिन म्हणाले, मी फक्त मुलींना सर्वोच्च लक्ष्याचा विचार करण्याचाबाबत सांगितलं. मरिन म्हणाले, ‘‘भारतात तुम्हाला सर्वोच्च लक्ष्य ठेवणे आवश्यक आहे. हेच मी मुलींना सांगितलं. जर तुम्ही सर्वोच्च लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवतात, आकाशाला गवसणी घालण्याचं लक्ष्य ठेवतात, तेव्हा तुम्ही सर्वांत उंच शिखरावर जाऊन पोहोचतात. जर तुम्ही टेकडीचं लक्ष्य समोर ठेवाल तर मैदानावर पडाल.’’

मरिन म्हणाले, ‘‘आम्ही आकाशाला गवसणी घालण्याचं लक्ष्य समोर ठेवलं. मी त्यांना म्हणालो, यानंतर जे काही होईल ते अजिबात महत्त्वाचं नाही. पण लक्ष्य सर्वोच्च ठेवणं आवश्यक आहे.’’ भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपालनेही संघाचं नशीब बदलण्याचं श्रेय चित्रपटाला दिलं. ती म्हणाली, ‘‘मला वाटतं, या चित्रपटाने खरोखर आम्हाला मदत केली. या चित्रपटाने आम्हाला वर्तमान क्षण जगण्यास प्रेरित केलं. जे तुमच्या समोर आहे, त्याचा विचार करा. जे घडून गेलं त्याचा विचार न करण्यास या चित्रपटाने शिकवलं. आज प्रशिक्षकांनी सांगितलं, की फक्त 60 मिनिटांवर लक्ष केंद्रित करा. केवळ या 60 मिनिटांची भूमिका चोख बजावा.’’ प्रशिक्षक मरिन म्हणाले, ‘‘आम्ही विचार करीत होतो, की भारतीय महिला हॉकी संघाचं सर्वांत मोठं लक्ष्य काय आहे? पदक जिंकणं हे तर मुळीच नाही. हे लक्ष्य भारतातील महिलांना प्रेरित करण्याचं आणि नवोदितांना प्रेरित करण्याशी संबंधित आहे. तुम्ही असा वारसा तयार करण्यास इच्छुक आहात. हाच तो वारसा आहे, जो मुली तयार करण्याची इच्छा बाळगत आहेत.’’

भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणीने याचं श्रेय पाच वर्षे कसून घेतलेल्या मेहनतीलाही दिलं आहे. भारतीय महिला हॉकी संघ 2016 च्या रियो ऑलिम्पिक स्पर्धेत तळातल्या स्थानावर राहिला होता. राणी म्हणाली, ‘‘रियो आमच्यासाठी खूप चांगला अनुभव निश्चितच नव्हता. आम्ही रियोचा विचार करीत नाही. कारण त्याने आम्हाला काही उदास क्षण दिले होते. मात्र, त्यानंतर पाच वर्षे आम्ही कसून मेहनत घेतली. अर्थातच, प्रशिक्षकांनी या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.’’

[jnews_block_9 first_title=”हेही वाचा…” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”95″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!