खो-खो महासंघाच्या अध्यक्षपदी पुन्हा सुधांशू मित्तल
भारतीय खो-खो महासंघाच्या (KKFI- Kho Kho Faderation of India) अध्यक्षपदी पुन्हा सुधांशू मित्तल (Sudhanshu Mittal) यांची सोमवारी, 5 जुलै 2021 रोजी निवड करण्यात आली. महासचिवपदी महेंद्रसिंह त्यागी यांची निवड झाली. खजिनदारपदी सुरेंद्रकुमार भुटियानी यांची निवड झाली. ही निवड 2021 ते 2025 अशी चार वर्षांसाठी असेल.
केकेएफआयच्या (KKFI) वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) महासंघाची कार्यकारिणी निवडण्यात आली. उत्तराखंड उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती राजेश टंडन यांच्या निरीक्षणाखाली महासंघाची निवडणूक झाली. भारतीय ऑलिम्पिक संघाचे (IOA) उपाध्यक्ष अनिल खन्ना या वेळी उपस्थित होते. भारतीय खो-खो महासंघाचे नवनियुक्त अध्यक्ष सुधांशू मित्तल आयओएचेही (IOA) उपाध्यक्ष आहेत. त्यांनी खो-खोला आशियाई आणि ऑलिम्पिकमध्ये खेळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याबाबत सांगितले. सुधांशू मित्तल (Sudhanshu Mittal) यांनी सांगितले, ‘‘खो-खोला (kho kho) आशियाई खेळांबरोबरच ऑलिम्पिकमध्येही समाविष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्या उद्देशाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्रशिक्षण शिबिरे, स्पर्धा, सेमिनारचे आयोजन केले जात आहे.’’