कोण होते वीक्स?
West Indies Cricket Legend Sir Everton Weekes Dies Aged 95 |
कोण होते वीक्स?
मला पाच ‘डब्लू’ माहिती होते. पत्रकारितेत या पाच ‘डब्लूं’ना (‘का’) विशेष महत्त्व आहे. जर बातमीत हे पाच ‘डब्लू’ (‘Who’, ‘What’, ‘When’, ‘Where’, ‘Why’) नसतील, तर ती बातमी परिपूर्ण मानली जात नाही. अगदी क्रिकेटच्या बातमीतही.
पण छे… कॅरेबियन म्हणायचे, साफ चूक. आम्ही क्रिकेटमध्ये फक्त तीनच ‘डब्लू’ मानतो. जेव्हा तीन ‘डब्लू’ एकत्र येतात तेव्हा खरोखर विंडीजचं क्रिकेट परिपूर्ण होतं. काळ जसजसा पुढे सरकत गेला तसतसं विंडीजला दोन ‘डब्लू’ सोडून गेले. अखेरचा एकच ‘डब्लू’ शिल्लक होता. काळाने तोही हिरावून नेला. हा अखेरचा ‘डब्लू’ म्हणजे सर एवर्टन वीक्स Sir Everton Weekes |. वयाच्या ९५ व्या वर्षी वीक्स यांनी 2 जुलै 2020 रोजी या जगाचा निरोप घेतला.
एकीकडे प्रशांत महासागराची गाज, तर दुसरीकडे ‘करिनेज’चा हलकासा खळखळाट… हा जलनाद ऐकणाऱ्या बारबाडियनांचा कधी कधी हेवा वाटतो. ‘करिनेज’ ही बारबाडोसमधील नदी. तिलाच ‘संविधान’ नदी असंही म्हणतात. अवघी ५७० मीटर लांबीची. मात्र, देशातली सर्वांत लांब नदी!
निसर्गरम्य अशा या देशात सर एव्हर्टन वीक्स यांचा २६ फेब्रुवारी १९२५ रोजी जन्म झाला. त्या वेळी क्रिकेटपेक्षा फुटबॉलचं या देशाला भयंकर वेड. आजही आहे, पण आता क्रिकेट थोडंसं वरचढ ठरत आहे.
एव्हर्टनचे वडीलही असेच फुटबॉलवेडे. ते एव्हर्टन इंग्लिश फुटबॉल संघाचे जबरदस्त चाहते होते. याच संघाच्या नावावरून मुलाचं नाव ‘एव्हर्टन’ असं ठेवलं. एव्हर्टन डीकर्सी वीक्स असं त्याचं पूर्ण नाव. पण एव्हर्टनला डीकर्सी DeCourcy | नावाचा अर्थ काही कळला नाही.
त्याला वाटायचं, की कदाचित आपल्या कुटुंबावर फ्रेंचांचा प्रभाव असावा. फुटबॉलप्रेमाचं प्रतीक म्हणून ‘एव्हर्टन’ हे नाव धारण करणारा हाच मुलगा मात्र क्रिकेटमध्ये आपली छाप सोडून गेला.
वीक्स Sir Everton Weekes | कुटुंब अतिशय हलाखीत जीवन जगत होतं. त्यांचं लाकडी फळ्यांचं घर होतं, जे पावसात सतत गळायचं. याच गरिबीमुळे एव्हर्टनच्या वडिलांनी पैसे कमावण्यासाठी घर सोडलं आणि त्यांनी तेल उत्पादन क्षेत्रातील त्रिनिदादमध्ये काम शोधलं.
त्या वेळी एव्हर्टन अवघ्या आठ वर्षांचा होता. तब्बल अकरा वर्षे चिमुकला एव्हर्टन पितृसुखापासून वंचित राहिला. त्यामुळे त्याचं व त्याच्या बहिणीचं पालनपोषण आई आणि त्याच्या काकूने केलं. आपल्या यशस्वी जीवनाचं श्रेयही एव्हर्टनने आई आणि काकूलाच दिलं आहे.
एव्हर्टन काहीसा चंचल होता. त्याला सेंट लिओनार्दस बॉइज स्कूलमध्ये दाखल केलं खरं, पण दांडीबहाद्दर एव्हर्टन शाळा काही शिकू शकला नाही. पुढे मात्र त्याने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केला आणि खेळाकडे लक्ष केंद्रित केलं. एव्हर्टन क्रिकेट खेळायचा, पण तो फुटबॉलही हौसेने खेळायचा.
या खेळात त्याने बारबाडोसचं प्रतिनिधित्वही केलं आहे. किशोरवयात असताना एव्हर्टनने केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर ग्राउंड्समनचा मदतनीस म्हणूनही काम केलं. कधी कधी तर तो त्याच मैदानावर बदली क्षेत्ररक्षक म्हणूनही खेळायचा.
त्याच्या तशाही फारशा अपेक्षा नव्हत्याच. त्याला ती गंमत वाटायची. आनंद एवढाच होता, की त्याला मोफत प्रवेश मिळायचा आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना जवळून पाहण्याची संधी मिळायची. काय कोण जाणे, पण एव्हर्टन क्रिकेटमध्ये रमला.
वयाच्या 13 व्या वर्षी त्याला वेस्टशायर क्रिकेट क्लबकडून Westshire Cricket Club | बारबाडोस क्रिकेट लीगमध्ये BCL | खेळण्याची संधी मिळाली. अर्थात, हा काळ होता पारतंत्र्याचा.
ब्रिटिशांनी काबीज केलेल्या बारबाडोसमध्ये स्थानिकांना स्वतःच्या इच्छा-आकांक्षांना कोणतेही स्थान नव्हते. एव्हर्टनची Sir Everton Weekes | इच्छा होती, की आपण आपल्या स्थानिक पिकविक क्लबकडून खेळावं; पण त्या क्लबने फक्त गोऱ्यांनाच संधी दिली. वर्णद्वेषाचा एव्हर्टनला बसलेला हा पहिला चटका.
एव्हर्टनला शाळेपेक्षा खेळातच अधिक रस. त्याने 1939 मध्ये वयाच्या चौदाव्या वर्षी शाळेला कायमचा रामराम ठोकला आणि आपला सगळा वेळ क्रिकेट आणि फुटबॉल खेळातच घालवू लागला. त्यातही त्याला फुटबॉलपेक्षा क्रिकेटच अधिक जवळचा वाटू लागला.
त्याने क्रिकेटचं कौशल्य लीलया आत्मसात केलं खरं, पण एव्हर्टनच्या हाताला कोणतंही काम नाही. हलाखीच्या परिस्थितीत खेळण्याचा छंद जपणे म्हणजे जुगारात पैसे हरण्यासारखे होते.
१९४३ मध्ये एव्हर्टन सैन्यात भरती झाला. बारबाडोस रेजिमेंटमध्ये Barbados Regiment | त्याने लान्स-कॉर्पोरल Lance-Corporal | पदावर सेवा बजावली. कदाचित सैन्यातच त्याचं आयुष्य संपलं असतं, पण १९४७ नंतर तो सैन्यातून बाहेर पडला. त्याचं कारण म्हणजे क्रिकेट.
बारबाडोस क्रिकेट संघटनेच्या लीग स्पर्धेसाठी त्याची गॅरिसन स्पोर्टस क्लबच्या संघात निवड झाली. ही स्पर्धा खेळण्यासाठी त्याला मुभा मिळाली आणि १९४७ नंतर पुन्हा तो सैन्यात दिसलाच नाही. तो दिसला क्रिकेटच्या मैदानावर. बारबाडोसचा उत्तम क्रिकेटपटू म्हणून एव्हर्टन ओळखला जाऊ लागला.
प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पाऊल
एव्हर्टनने Sir Everton Weekes | प्रथमश्रेणीत पाऊल टाकलं तेव्हा तो सैन्यातच होता. १९४५ मध्ये त्याची बार्बाडोस क्लबमध्ये निवड झाली. आता त्याला त्याची उपयोगिता सिद्ध करावी लागणार होती. तरच त्याला प्रथमश्रेणी स्पर्धा खेळता येणार होती. एव्हर्टनने पहिल्या डावात 88, तर दुसऱ्या डावात 117 धावांची शतकी खेळी साकारली.
प्रथमश्रेणी स्पर्धेसाठी त्याची निवड झाली. आता ही स्पर्धा होती त्रिनिदाद-टोबॅगोमध्ये. एव्हर्टनने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तो दिवस होता 24 फेब्रुवारी 1945 चा. त्या वेळी एव्हर्टनचं वय होतं 19 वर्षे 364 दिवस.
म्हणजे विशीतल्या एव्हर्टनचा Sir Everton Weekes | हा पहिलाच त्रिनिदाद दौरा. दुर्दैवाने एव्हर्टनचं पदार्पण दणक्यात झालं नाही. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेला एव्हर्टन पहिल्या डावात भोपळाही फोडू शकला नाही, तर दुसऱ्या डावात केवळ ८ धावा काढू शकला. अखेर बारबाडोस संघाला दणदणीत पराभवाला सामोरं जावं लागलं.
मात्र, एव्हर्टनने पदार्पणातल्या सामन्याचा वचपा दुसऱ्या सामन्यात काढला. त्याने सलामीला येत त्रिनिदादविरुद्ध 53 धावांची अर्धशतकी खेळी साकारली. याच सामन्यात त्याने पहिल्यांदा गोलंदाजी केली. एकूण चार षटके गोलंदाजी करणाऱ्या एव्हर्टनने 15 धावा दिल्या. मात्र, एकही गडी टिपता आला नाही.
डब्लू-त्रयींतला अखेरचा शिलेदार
एव्हर्टन वीक्स Sir Everton Weekes | यांना कॅरेबियन क्षेत्रात ‘खेळांचा जनक’ म्हणूनही ओळखले जाते. वीक्स, वाल्कॉट आणि वॉरेल हे तिघेही समकालीन आणि एकाच देशातले. तिघांचा जन्म बारबाडोसमध्ये ऑगस्ट १९२४ ते १९२६ दरम्यान १८ महिन्यांच्या आत झाला होता.
गंमत म्हणजे या तिघांनीही 1948 या वर्षात तीन आठवड्यांत कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या तिघांनी क्रिकेटला परमोच्च शिखरावर नेलं. या डब्लू-त्रयींमध्ये वॉरेल यांनी 1967 मध्ये, तर वालकॉट यांनी 2006 मध्ये या जगाचा निरोप घेतला. ब्रिजटाउनचं राष्ट्रीय स्टेडियम याच डब्लू-त्रयींच्या नावाने ओळखलं जातं- ‘थ्री डब्लूज ओव्हल’.
विश्वविक्रमी शतके
एव्हर्टन वीक्स Sir Everton Weekes | यांनी आपल्या कारकिर्दीत 48 कसोटी सामने खेळले. त्यांनी 58.61 च्या सरासरीने 4,455 धावा केल्या आहेत. यात दमदार 15 शतकांचा समावेश आहे.
वीक्स यांनी सलग पाच सामन्यांत पाच शतके झळकावण्याचा विक्रम केला आहे. हा विक्रम 1948 पासून आतापर्यंत कोणालाही मोडता आलेला नाही. त्यांनी इंग्लंडविरुद्ध जमैकामध्ये कसोटी मालिकेतील अखेरच्या सामन्यात 141 धावांची शतकी खेळी साकारली होती. त्यानंतर पुढच्याच भारत दौऱ्यात त्यांनी 128, 194, 162 आणि 101 अशी लागोपाठ चार शतके झळकावली.
त्यांनी सलग सहावे शतकही झळकावले असते. दुर्दैवाने चेन्नईत झालेल्या सामन्यात ते 90 धावांवर बाद झाले. भारतीय गोलंदाजीचा वीक्स यांनी नेहमीच खरपूस समाचार घेतला होता.
भारताविरुद्धची त्यांच्या फलंदाजीची आकडेवारी पाहिली, की लक्षात येतं, की काय अवस्था केली असेल त्यांनी भारतीय गोलंदाजीची! वीक्स आयुष्याच्या खेळपट्टीवर टिकले असते तर कदाचित त्यांचं ते सहावं शतक असतं. पण छे! नियतीने त्यांची विकेट घेतली आणि अवघ्या पाच वर्षांनी त्यांचं तेही शतक हुकलं. असो…
वीक्स यांनी भारताविरुद्ध दहा कसोटी सामन्यांत 106.78 च्या सरासरीने तब्बल 1,495 धावा लुटल्या. या धावांत त्यांची सात शतके होती! पोर्ट ऑफ स्पेनमध्ये भारताविरुद्धच त्यांनी १९५३ मध्ये २०७ धावांची विक्रमी द्विशतकी खेळी साकारली होती.
वयाच्या 22 व्या वर्षी इंग्लंडविरुद्ध केनसिंग्टन ओव्हल मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारे वीक्स यांनी अखेरचा कसोटी सामना 1958 मध्ये पोर्ट ऑफ स्पेनमध्ये खेळला. त्यानंतर वीक्स यांच्या अनुभवाचा फायदा कॅरेबियन क्रिकेटपटूंनी पुरेपूर उठवला.
ते प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक, आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात पंच अशा अनेक भूमिकांमध्ये पाहायला मिळाले. क्रिकेटमधली सर्व रूपे साकारणारे ते एकमेव खेळाडू असावेत. 1994 मध्ये तीन कसोटी सामने आणि चार एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांत ते आयसीसीचे पंच होते. एवढेच नाही, तर ते आयसीसी हॉल ऑफ फेमचेही सदस्य होते.
सर एव्हर्टन वीक्स Sir Everton Weekes | यांनी अखेरचा निरोप घेतला तेव्हा कदाचित प्रशांत महासागराने वेढलेला बारबाडोस ढसाढसा रडला असेल. धाय मोकलून रडावं तशी त्या सागराची गाज कानी पडत असेल.
विंडीज संघाचा एकेकाळी दरारा होता. संघात चैतन्य होतं. त्यामागे वीक्स यांच्या बहारदार कारकिर्दीची प्रेरणा होती. आज विंडीज संघात पूर्वीचा दरारा नसला तरी तरुण पिढीच्या पंखात नव्याने भरारी घेण्याची उमेद आहे. ही उमेद जागृत ठेवणाराही वीक्स हाच एकमेव प्रेरणास्रोत होता.
विंडीज उभारी घेईलही, पण ते पाहायला वीक्स नसतील. डब्लू-त्रयींमधला तो अखेरचा डब्लू असेलही… पण वेस्ट इंडीज या नावातला डब्लू चिरंतन असेल… मैदानावर विंडीज क्रिकेट संघ राष्ट्रगीत नेहमी एका सुरात म्हणत असतो… या राष्ट्रगीतातील पहिलंच कडवं यापुढे वीक्स यांच्या अदृश्य आवाजात सतत विंडीज संघाला सांगत राहील…
दहा वर्षांपर्यंत
आम्ही या क्रिकेटविश्वावर राज्य केलं
आता हे राज्य ढासळताना दिसत आहे
पण इथं खाली
आवरणात फक्त एकच नाद पुरेसा आहे,
एक मित्र गमावण्यासाठी पुरेसा आहे
जुने सेनाधिकारी आता सेवानिवृत्त झाले आहेत आणि काही कायमचे गेले आहेत
आणि धावा आता पहिल्यासारख्या निघत नाहीत
पण जेव्हा तौसेंट्स जातो, तेव्हा डेसालीन येतो
आम्ही लढाई हरलो आहोत, पण तरीही आम्ही युद्ध जिंकू…
परिपूर्ण माहिती.
thank you so much
जबरदस्त लेखन
thank you so much