म्हणूनच ऑलिम्पिकमध्ये सिंधूच्या ‘कांस्य’ला ‘सुवर्ण’झळाळी!
रियो ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्य पदकविजेती, जगातली सातवी मानांकित बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधू हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. तिने बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीत कांस्य पदक जिंकले. चीनची नववी मानांकित ही बिंगजियाओ (He Bingjiao) हिचा रविवारी, 1 ऑगस्ट 2021 रोजी दोन सरळ सेटमध्ये पराभव करीत कांस्य पदकावर मोहोर उमटवली. सुवर्णपदकासाठी उतरलेल्या सिंधूला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले असले तरी या पदकालाही सुवर्णझळाळी आहे. त्याचे कारण म्हणजे कारकिर्दीत ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती एकमेव भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. दिग्गज पहिलवान सुशील कुमारने 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य आणि 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले आहे. ऑलिम्पिकमध्ये दोन वैयक्तिक पदके जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. त्यानंतर अशी कामगिरी सिंधूने केली आहे.
मुसाहिनो फॉरेस्ट स्पोर्टस प्लाझाच्या बॅडमिंटन कोर्टवर झालेल्या या सामन्यात ही बिंगजियाओने सुरुवातीला कडवा प्रतिकार केला. मात्र, नंतर सिंधूच्या आक्रमकतेपुढे तिची डाळ शिजली नाही. सिंधूने बिंगजियाओचे आव्हान 53 मिनिटांत मोडीत काढले. सिंधूने डावखुऱ्या बिंगजियाओचा 21-13, 21-15 असा पराभव केला.
‘‘मी खूप आनंदी आहे. कारण इतकी वर्षे मी मेहनत घेत होते. सुरुवातीला संभ्रमावस्था होती. कांस्य पदक जिंकले म्हणून मी आनंदी व्हावं की अंतिम फेरीची संधी गमावली म्हणून दुःखी व्हावं. पण मी खूप खूश आहे. मला वाटतं, मी खूप चांगलं केलं आहे. देशासाठी पदक जिंकणं गौरवास्पद क्षण आहे.’’
– पी. व्ही. सिंधू
ऑलिम्पिक बॅडमिंटन स्पर्धेत सिंधू सुरुवातीला दोलायमान स्थितीत होती. एक तर अंतिम फेरीची संधी गमावली होती. आता कांस्य पदकासाठी झुंजावं लागणार होतं. कारण कांस्य पदकाच्या लढतीत सिंधूसमोर बिंगजियाओचं आव्हान सोपं मुळीच नव्हतं. या दोघींच्या लढतींवर कटाक्ष टाकला तर त्यात बिंगजियाओचंच पारडं जड होतं. या दोघी 16 वेळा आमनेसामने आल्या आहेत. त्यात सिंधूने रविवारी नोंदवलेला हा सातवा विजय आहे. उर्वरित नऊ लढती सिंधू पराभूत झाली आहे. विशेष म्हणजे या लढतीपूर्वी पाच सामन्यांत सिंधू बिंगजियाओविरुद्ध पराभूत झाली होती. त्यामुळेच ही लढत सिंधूसाठी सोपी नव्हतीच. मात्र, सिंधू ज्या आक्रमकतेने लढली त्याला तोड नव्हती. सिंधू उपांत्य फेरीत तैपेईच्या ताइ जू यिंग हिच्याविरुद्ध 18-21, 12-21 अशी पराभूत झाली होती.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतले भारताचे हे दुसरे पदक आहे. यापूर्वी भारतोलक मीराबाई चानूने रौप्य पदक जिंकले आहे. मुष्टियोद्धा लवलीना बोरगोहेन हिने उपांत्य फेरीत स्थान मिळवत भारतासाठी एक पदक निश्चित केलं आहे. त्यामुळे पदकतालिकेत भारताच्या खात्यात आता तीन पदकांची भर पडली आहे. साईना नेहवालने 2012 च्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकले होते. ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती भारताची पहिली बॅडमिंटनपटू आहे. त्यानंतर चार वर्षांनी सिंधूने रियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले.
बिंगजियाओवर एकतर्फी मात
ऑलिम्पिक बॅडमिंटन स्पर्धेत सिंधू अप्रतिम लढली. सिंधूने बिंगजियाओवर सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले. त्यासाठी तिला फारसा घाम गाळावा लागला नाही. मात्र, नेटवर खेळताना सिंधूला अडचणी जाणवल्या. असं असलं तरी रॅलीत तिने वर्चस्व राखले. तिचे क्रॉस कोर्ट स्मॅश आणि ड्रॉप शॉट अप्रतिमच होते. या शॉटचे उत्तर मात्र बिंगजियाओकडे नव्हते. एक मात्र खरं, की बिंगजियाओच्या हालचाली तितक्याशा सहज नव्हत्या. याचा फायदा सिंधूने पुरेपूर उचलला. ही बिंगजियाओ युवा ऑलिम्पिक स्पर्धेतली सुवर्ण पदकविजेती खेळाडू आहे. तिने सिंधूच्या नेटवरील उणिवा हेरलेल्या होत्या. म्हणूनच तिने बरेचशे शॉट नेटवर टाकले. मात्र, काही शॉट बाहेरही मारले. सिंधूने सुरुवात तर चांगली केली होती. तिने बिंगजियाओच्या संथ सुरुवातीचा फायदा उचलत 4-0 अशी आघाडी घेतली. मात्र, या आघाडीचा आनंद काही वेळच टिकला. सिंधूने तिला नेटवर खेळण्याचा प्रयत्न केला. ही चूक सिंधूला भोवली आणि बिंगजियाओने अप्रतिम रिटर्न शॉट खेळत पुढच्या सात गुणांपैकी सहा गुण वसूल करीत 6-5 अशी आघाडी घेतली. या दोन्ही खेळाडूंमध्ये कमालीची चढाओढ सुरू झाली. सिंधूने दीर्घ रॅलीनंतर क्रॉस कोर्ट स्मॅशवर एक गुण घेतला. नंतर मात्र बिंगजियाओचे काही शॉट परतावण्यात सिंधू अपयशी ठरली आणि विश्रांतीपर्यंत बिंगजियाओकडे 11-8 अशी आघाडी होती. सिंधूने ब्रेकनंतर जोरदार खेळ करीत पिछाडी भरून काढत 14-8 आणि नंतर 18-11 अशी आघाडी घेतली. नंतर सिंधूने मागे वळून पाहिलेच नाही. तिने नेटजवळ शटल परतावून गुण वसूल करीत 20-12 अशी निर्णायक आघाडी घेतली. बिंगजियाओने सिंधूला रोखताना एक गुण वसूलही केला, पण क्रॉस कोर्ट शॉट परतावून लावण्याच्या प्रयत्नात तिने शॉट बाहेर मारला. सिंधूने 23 मिनिटांपर्यंत चाललेला पहिला सेट 21-13 असा जिंकला.
दुसऱ्या सेटमध्येही सिंधूने सुरुवात चांगली केली. सुरुवातीलाच 4-1 अशी तीन गुणांची आघाडी घेली. मात्र, नंतर सिंधून बिंगजियाओा पुनरागमन करण्याची संधी दिली. बिंगजियाओने निकाल 7-8 पर्यंत नेला. नंतर पुन्हा सिंधूने वर्चस्व मिळवत तीन गुणांची आघाडी घेतली. ब्रेकनंतर सिंधूने काही चुका केल्या. त्याचा फायदा बिंगजियाओ उचलणार नाही तरच नवल. बिंगजियाओने परतावलेला शॉट बाहेर गेल्याचे समजून सिंधूने तो सोडून दिला. ही चूक भोवली आणि बिंगजियाओला आयता गुण मिळाला. नंतर सिंधूने स्वतःच बिंगजियाओचा शॉट परतावना बाहेर मारला. यामुळे बिंगजियाओला वापसी करता आली आणि स्कोअर 11-11 असा बरोबरीत आला. सिंधूने स्वतःला सावरत सलग चार गुण घेतले आणि 15-11 अशी आघाडी घेतली. या वेळी मात्र सिंधूने बिंगजियाओला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही. सिंधूने क्रॉस कोर्ट स्मॅश मारत 20-15 अशी निर्णायक आघाडी घेतली. पुन्हा तोच क्रॉस कोर्ट स्मॅश मारत विजयावर शिक्कामोर्तब केले.
[jnews_block_17 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”95″]
One Comment