अखेर ज्युनिअर ज्यूदोपटू जितेश डागर दोषमुक्त
नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर |
गेल्या वर्षी निवड चाचणीदरम्यान ज्युनिअर ज्यूदोपटू जितेश डागरवर उत्तेजक द्रवसेवन केल्याचा आरोप होता. मात्र, राष्ट्रीय उत्तेजक द्रव प्रतिबंधक संस्थेचे (NADA) अधिकारी त्याच्यावरील आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याने ‘नाडा’च्या शिस्तपालन समितीने त्याला निर्दोष ठरवले आहे.
भोपाळमध्ये 13 जून 2019 रोजी झालेल्या आशिया ओशेनिया तथा ज्युनिअर ज्यूदो चॅम्पियनशिप निवड चाचणीदरम्यान जितेश उत्तेजक द्रव चाचणीस उपस्थित नव्हता.
सनी चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील नाडाच्या शिस्तपालन समितीने (ADDP) सांगितले, की जितेशविरुद्ध कोणतेही निर्णायक पुरावे नाहीत.
उत्तेजक द्रव प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी ज्यूदोपटू जितेशला उत्तेजक द्रव चाचणीचा नमुना करण्यास सांगितले होते.
शिस्तपालन समितीत कर्नल डॉ. आर. के. चेंगप्पा आणि कुलदीप हांडू यांचाही समावेश होता. जितेश डागरचे वकील पार्थ गोस्वामी यांनी २१ ऑक्टोबर २०२० रोजी सांगितले,
‘‘नाडाच्या अधिकाऱ्यांनी पाठविलेल्या अहवालात समितीने नमूद केले होते, की जितेशशी संपर्क साधल्यानंतरही त्याने नमुना दिला नाही. मात्र, यावर समितीचे समाधान करण्यात अधिकारी अपयशी ठरले.’’
जितेशचे वकील त्याचा बचाव करताना म्हणाले, ‘‘खेळाडूशी त्यांनी कोणताही संपर्क साधला नाही की त्यांना सूचितही केले नव्हते. त्यामुळे उत्तेजक द्रव चाचणीचा प्रश्नच उद्भवत नाही.’’
‘नाडा’ने जितेशवर एडीआरव्ही (उत्तेजक द्रवप्रतिबंधक नियमांचे उल्लंघन) कलम 2.3 नुसार आरोप केला होता. चार वर्षांच्या बंदीच्या भीतीमुळेच उत्तेजक द्रव चाचणी दिली नाही, असा जितेशवर आरोप होता.