असा सुरू झाला जगजीत सिंग यांचा संगीत प्रवास (भाग 1)
असा सुरू झाला जगजीत सिंग यांचा संगीत प्रवास (भाग 1)
जगजीत सिंग यांच्या गझलेचे गारूड देशातच नाही तर विदेशातील संगीत प्रेमींवरही आहे. मात्र, जगजीत सिंग यांचा संगीत प्रवास तेवढा सोपा नव्हताच मुळी. जगमोहन ते जगजीत सिंग हा प्रवास स्वातंत्र्याच्या पहिल्या टप्प्यापासूनचा आहे. हा काळ होता एक स्वतंत्र देश म्हणून भारताचं उभं राहणं. म्हणजे देशातला प्रत्येक माणूस भाकरीचा चंद्र शोधण्यातच मश्गूल होता. असा तो काळ होता. अशा स्थितीत संगीतकलेचा विचार करणे शक्यच नव्हते. अशा वेळी हा कोण राजस्थानच्या गंगानगरच्या गल्लीतला तरुण, ज्याने आपल्या जादुई आवाजाने साऱ्या विश्वाला गझलेचं वेड लावलं…?
kheliyad.sports@gmail.com | M. +91 80875 64549
भारताला स्वातंत्र्यही मिळालेलं नव्हतं असा तो काळ. श्री गंगानगरचा एक किशोरवयीन मुलगा अमीनचंद शीख धर्मगुरूंच्या सान्निध्यात आला. कालांतराने त्याने शीख धर्म स्वीकारला. हळूहळू हिंदू धर्मातील आचरण पद्धती शीख धर्मात परावर्तित झाल्या. आता त्यांचे नाव होते सरदार अमरसिंग. दिवसभर मजुरी आणि रात्रभर शिक्षण. भाकरीसाठी जगण्याची लढाई सुरू असतानाही त्याची शिकण्याची जिद्द कौतुकास्पद होती. या मेहनतीचं अखेर चीज झालं. त्याला पोटापाण्यापुरती सरकारी नोकरी मिळाली. पहिली पोस्टिंग मिळाली बिकानेरमध्ये. तारुण्य आणि हाताशी सरकारी नोकरी. एक दिवस ट्रेनमधून गंगानगरला जात असताना समोरच्या सीटवर एक सुंदर शीख तरुणी बसली होती. दोघांमध्ये गप्पा सुरू झाल्या आणि या गप्पांमध्येच ते दोघे आयुष्यभराचे प्रवासी झाले. ही तरुणी होती बच्चनकौर. ती पंजाबमधील उट्टालन गावची रहिवासी. तिने अमरसिंगच्या जीवनात रंग भरले. अर्थात, ही कहाणी इथेच संपत नाही, तर येथून खरी सुरू होते.
यामुळे झाले जगमोहनचे जगजीत सिंग
त्यांची घरची परिस्थिती अशी, की चहावरही बंदी! अमरसिंग आणि बच्चनकौर या दोघांचा परिवार इतका वाढला, की त्यांना ११ मुले झाली. त्यापैकी चार मुलांचे निधन झाले. जी सात मुले वाचली त्यापैकी एक होता जगमोहन. त्याचा जन्म श्रीगंगानरचा- ८ फेब्रुवारी १९४१ चा. एके दिवशी वडिलांनी त्याला आपल्या नामधारी गुरूंकडे नेले. जगमोहनला पाहताच गुरू म्हणाले, “हा आपल्या गुणांनी विश्वाला जिंकेल. याचं नाव तुम्ही बदला.” आणि जगमोहनचा जगजीत झाला. हाच तो जगजीत, ज्याने खरोखर संपूर्ण विश्वाला आपल्या गझल गायकीने जिंकले.
अमरसिंगचा परिवार श्रीगंगानगरमध्ये राहत होता. ज्या घरात जगजीतचा जन्म झाला, ते घर कुटुंबातील प्रत्येकाचं सन्मानाचं प्रतीक आहे, तर जगजीत सिंग यांच्या चाहत्यांसाठी वंदनीय आहे. त्यानंतर अमरसिंग यांना सरकारी घर मिळालं आणि अमरसिंग परिवाराचं बिऱ्हाड जी-२५ क्रमांकाच्या घरात राहू लागलं. त्या वेळी जगजीत सिंग यांचं वय होतं अवघं दोन वर्षे. त्या वेळी स्वातंत्र्यासाठी सुरू असलेलं आंदोलन अंतिम टप्प्यात आलं होतं. ब्रिटिशांचं भारत सोडून जाणं जवळजवळ नक्की होतं. वर्षानुवर्षांची गुलामीची जोखडं गळून पडणार होती. देशभर उत्सवाचं आणि उत्साहाचं वातावरण होतं. स्वातंत्र्य तर मिळालं; पण भारतीयांच्या काळजावर मोठा घाव बसला. तो होता फाळणीचा. गंगानगरच्या सीमेलाही त्याचा फटका बसला. या वेदना जगजीत सिंगच्या गळ्यातून निघालेल्या गुरबानीतून बाहेर पडल्या..
“इक ओंकार सतनाम करता पुरख.. निर्मोह निर्वैर अकाल मूरत अजूनी सभम…”
जगजीतच्या गळ्यातून बाहेर पडलेले हे भक्तिमय सूर परिवार आणि शेजारपाजार नेहमी ऐकत होता. जगजीतचे बालपण आता श्रीगंगानगरच्या गल्लीबोळातून सुरू झालं. शालेय शिक्षण खालसा शाळेत झाले. शाळेची अवस्था फारशी चांगली नव्हती. जमिनीवर मांडी घालून बसावं लागायचं. लिहायला खापराची पाटी. माध्यम उर्दूतून. घरची छोटी-मोठी कामे जगजीत करायचा. विहिरीतून बादली बादली पाणी उपसून आणणे, भाजीपाला खरेदी करणे इ. घरी वीज नव्हतीच. अभ्यास मग कंदिलाच्या प्रकाशातच करावा लागायचा.
जखमेवर आईने लावला मिरचीचा लेप!
जगजीत खोडकरही तेवढाच होता. पतंग उडवणे हा त्याचा आवडता छंद. पतंग कटला, की पळत पळत तो पकडायचा हा त्याचा दिनक्रमच. एके दिवशी कटलेला पतंग हवेत हेलकावे घेत जमिनीच्या दिशेने खाली येत होता. लहानगा जगजीत पतंगाचा वेध घेत उलटा जात होता. पतंग हेच त्याचं लक्ष्य. त्यामुळे मागे खाली एक कुत्रं बसलेलं होतं हे जगजीतच्या काही लक्षात आलं नाही. त्याचा पाय कुत्र्यावर पडला नि कुत्र्याने जगजीतचा चावा घेतला. जगजीत रडत रडत घरी गेला. आईने यावर काय करावं, तर जेथे कुत्र्याने चावा घेतला तेथे तिने पिसलेल्या लाल मिरच्या लावल्या. काय अवस्था झाली असेल चिमुकल्या जगजीतची कल्पनाच न केलेली बरी. ही गोष्ट 1952 ते 54 च्या दरम्यानची. हा काळ असा होता, की त्या वेळी १२-१४ आण्याचा भाजीपाला मिळायचा. एक रुपयात तर आठवड्याचा भाजीपाला यायचा. अर्थात, बाजारातून भाजीपाला आणण्याची जबाबदारीही जगजीत हौसेने करायचा. तो त्या रुपयातून दोन-तीन आणे वाचवायचा आणि त्यातून तो रसगुल्ला खायचा, चहा प्यायचा. मग हे महाशय घरी यायचे.
त्या काळात चित्रपटांतली गाणी जगजीतला खूप आवडायची. केवळ ती गाणी शिकण्यासाठी तो चित्रपट पाहायला जायचा. अनेक वेळा फाटलेली तिकिटे जोडण्याची चलाखीही करायचा. थिएटरवाल्याला काही कळत नव्हतं. चोरूनलपून चित्रपट पाहण्याची हौस जगजीत अशा पद्धतीने पुरवायचा. त्या काळात पाच आण्याला एक तिकीट असायचं.
संगीत ऐकताना जगजीत एकाग्र व्हायचा. हे कसं काय व्हायचं, ते त्याचं त्यालाच माहीत नव्हतं. गुरबानी तर तो तन्मयतेने म्हणायचा. दिवसभर तो गात राहायचा. महंमद रफी, नूर जहाँ, के. एल. सहगल आणि लता मंगेशकरांनी गायिलेली गाणी त्याला चांगलीच तोंडपाठ होती. लता मंगेशकर आणि महंमद रफी यांची गाणी तर ते आजही गुणगुणतात. ही गाणी गुणगुणताना त्यांच्या डोळ्यांसमोर आजही ते अवखळ बालपण तरळून जातं. ही गाणी म्हणजे त्यांच्या बालपणीच्या आठवणींचा ठेवा होती. आता या आठवणी धूसर होत चालल्या आहेत.
लता मंगेशकरांनी गायलेलं ‘बैजू बावरा’मधील एक गाणं आजही ते गुणगुणतात…
[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=P53Pekl-kkc” column_width=”4″]“बचपन की मोहब्बत को दिल से ना जुदा करना
जब याद मेरी आये मिलने की दुआ करना”
एक प्रकारे संगीत-कला जगजीत सिंग यांच्या अंगात भिनली होती. जगजीत सिंग यांचं हे संगीतप्रेम पाहूनच वडिलांनी संगीत शिक्षक छगनलाल शर्मा यांच्याशी चर्चा केली असावी. जगजीतचा संगीतप्रवास इथूनच खऱ्या अर्थाने सुरू झाला. शर्मांकडून जगजीतने शास्त्रीय शिक्षणाचे धडे घेतले. त्यानंतर उस्ताद जमाल खाँ यांच्याकडून ध्रुपद, ठुमरी, ख्याल आदी रागदारी शिकले. एकूणच काय, तर आईवडिलांनीच संगीत शिक्षणासाठी जगजीतला प्रोत्साहित केलं. असं असलं तरी त्यांची इच्छा होती, की जगजीतने आयएएस बनावं.
शाळेत बेंच वाजवत गुणगुणायचा गाणी
खालसा स्कूलमध्ये पाचवीनंतर जगजीतचं शिक्षण बेंचवर बसून सुरू झालं. सहावीत असताना बेंचलाच तबला बनवत त्यांनी सुरांची साधना केली. खालसा स्कूल जगजीतच्या आयुष्यातली पहिली शाळा. याच शाळेत त्यांनी दहा वर्षे काढली. जगजीतसोबत बेंचवर शेजारी दर्शनसिंग बसायचा. वार्धक्याकडे झुकलेल्या दर्शनसिंग यांनी आठवणींना उजाळा देत सांगायचे, की जेव्हा तासिका नसायची तेव्हा बेंच वाजवत जगजीत सतत गुणगुणायचा.
जगजीत सिंग यांच्यावर संतापले संगीत शिक्षक
जगजीत सिंग जिथे संगीत शिक्षण घेत होता, तेथेच सागर शर्माही शिक्षण घेत होता. संगीत शिक्षक छगनलाल शर्मांचा हा मुलगा. सागरच्या घरात संगीताचे वातावरण होतेच. जगजीतने प्राथमिक धडे त्यांच्याकडूनच गिरवले होते. एकदा छगनलाल शर्मा जगजीत सिंग याला म्हणाले, की तू जिथे संगीत शिक्षण घेतो, तेथे सागरलाही घेऊन जात जा. मग जगजीत सिंग सागरला सायकलवर बसवून संगीत शिकायला जाऊ लागला. सागर त्या वेळी तबला शिकत होता. छगनलाल शर्मा कडक शिस्तीचे. फक्त शास्त्रीय संगीत शिकवायचे. चित्रपटांतील गाणी वगैरे त्यांना अजिबात मान्य नव्हती. एकदा ते जेवण करीत होते. सागर आणि जगजीत तेथूनच काही अंतरावर होते. जगजीत सागरला म्हणाला, “मी गाणे म्हणतो, तू मला तबल्यावर साथ दे.” जगजीतने सूर पकडले आणि सुरू झाला…‘‘तू प्यार का सागर है, तेरी एक बूँद के प्यासे हम…’’ छगनलाल शर्मांच्या कानावर हे गाणे पडताच त्यांचा संताप अनावर झाला. त्यांनी तेथून खडावा फेकून मारत, “कोण गाणं म्हणतंय? बंद करा!” सागर आणि जगजीतची पुढे बोलण्याची हिंमतच झाली नाही. दोघेही चिडीचूप.
जगजीत गल्लीत आला, की सर्व मित्रांना एकत्र करायचा. त्या वेळी कधी काळी सर्कस पाहिली असेल. तो सर्व मित्रांना जोकर जसा सायकलीवरच्या कसरती करायचा, तशा कसरती तो मित्रांमध्ये करून दाखवायचा. एका चाकावर सायकल चालवणे, हँडलवर बसणे इ… असा हा खोडकर जगजीत.
चॉकलेटचे आमिष दाखवून बहिणीला तानपुरा धरायला लावायचे
जगजीत सिंग यांना त्यांची लहान बहीण इंदर यांनीही सुरेल साथ दिली. इंदरजित कौर सध्या बर्नालामध्ये राहतात. गाण्याची तालीम करताना जगजीतला इंदरने तानपुऱ्यावर साथ दिली. अर्थात, ती तानपुराच चांगली वाजवायची असे नाही, तर तिला चांगला गळाही होता. या इंदर गालिबची गझलही छान गातात…
दिल ही तो है न संग-ओ-ख़िश्त
दर्द से भर न आये क्यों
रोएंगे हम हज़ार बार
कोई हमें सताये क्यों
इंदर लहान बहीण असल्याने जगजीत त्यांना हक्काने रियाज करण्यासाठी सोबत घ्यायचे. म्हणायचे, ”चल इथे बैस. हा तानपुरा छेड.” आणि बैठक मारून रियाज सुरू करायचे. दोन-दोन तास हा रियाज सुरू असायचा. बाहेर मुले खेळायची. लहानग्या इंदरचे सगळे लक्ष त्या खेळणाऱ्या मुलांकडे. जगजीत म्हणायचे, ”थोड्यावेळ बैस. अजून थोड्याच वेळ. तुला संत्रीवाली गोळी आवडते ना…? (त्या वेळी छोट्या छोट्या संत्र्यांची चव असलेल्या गोळ्या तिला खूप आवडायच्या.) खूप साऱ्या आणून देईन.” इंदर बिचारी गोळ्यांच्या आशेने तानपुरा छेडत बसून राहायची. आणि थोड्या वेळ म्हणता म्हणता हे महाशय चांगले दीड-दोन तास बसायचे. तेव्हापासून इंदर यांच्या कानाला सुरांची सवय लागली. जगजीत सिंग यांचे लहान बंधू कर्तारनेही संगीत शिक्षण घेतले होते.
“कुछ ना कुछ तो जरूर होना है,सामना आज उनसे होना है”
हे त्यांच्या आवाजातले सुरेल गीत अनेकांना आवडायचे. अशी संगीताची जाणकार असलेली सगळी भावंडे एकत्र जमली, की घरात वेगळाच माहोल व्हायचा. एकमेकांप्रती स्नेह होता. आईवडीलही सपोर्टिंग आणि स्पोर्टिंग होते. जगजीत सिंग यांच्या वडिलांनाही आवड होतीच संगीत-कलेची. ते गाणे आवडीने ऐकायचे, पण ते संगीत काही शिकू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना वाटायचं, की मी आपल्या एका तरी मुलाला संगीत शिकवावं. त्यामुळे गंगानगरमधील जेवढे संगीत शिक्षक होते त्या सगळ्यांकडे जगजीतला घेऊन गेले. त्या वेळी उस्ताद जमाल खाँ यांना विनंती केली, की तुम्ही माझ्या मुलाला संगीत शिकवा.
ते म्हणाले, “मी नाही शिकवणार.”
मग जगजीतच्या वडिलांनी त्यांची मनधरणी केली. शेवटी ते म्हणाले, “ठीक आहे. घेऊन ये त्याला. चांगला आवाज असेल तर शिकवेन.” मग ते जगजीतला त्यांच्याकडे घेऊन गेले. त्यांनी जगजीतला ऐकले आणि म्हणाले, “ठीक आहे. शिकवतो.”
वडिलांनी जगजीतला एक जुना हार्मोनिअम खरेदी करून दिला. या हार्मोनिअमवरच त्यांनी संगीत अभ्यास केला. तो आजही मोठे भाऊ जसवंतसिंग यांच्याकडे जयपूरमध्ये आहे. जसवंतसिंग जगजीतवर खूप प्रेम करायचे. शिक्षणामुळे या दोन्ही भावांना वेगवेगळ्या शहरांमध्ये जावे लागले. त्यामुळे त्यांचा संपर्क थोडा कमी झाला. जसवंतसिंग यांचा आवाजही तितकाच सुरेल आहे. वय झालं तरी ते गीतांचे सूर छेडायचे…
“शिकवा ना कर गिला ना कर
ये दुनिया है प्यारे
यहाँ दम के मारे
तडपते रहे…”
जसवंतसिंग यांना जगजीतचा सहवास बारा वर्षांपर्यंत होता. नंतर जसवंतसिंग यांनी शिक्षणानिमित्त पंजाबमधील पतियाळा येथे महेंद्र कॉेलेजमध्ये प्रवेश घेतला. जगजीत नववीत असताना साधारणपणे १९५५-५६ मध्ये शाळेत मोठा संगीत सोहळा झाला. त्या वेळी जगजीतला स्थानिक कलाकार म्हणून सादर करण्यात आले. त्या वेळी पंजाबचे दिग्गज कलाकार या सोहळ्याला आले होते- असासिंग मस्ताना, सुरिंदर कौर, प्रकाश कौर ही त्या वेळची पंजाबच्या संगीत क्षेत्रातली दिग्गज व्यक्तिमत्त्वे होती. अशा व्यासपीठावर जगजीतला संधी मिळाली. त्या वेळी त्यांनी त्यांची सर्वांत पहिली पंजाबीतली रचना सादर केली.
की तेरा एतबार ओ रहिया
उर जा लेकर रैन बसेरा
उजडे फिर संसार ये मेरा
त्याला उत्स्फूर्त दाद मिळाली. पंजाबमध्ये दाद देण्याचे दोन प्रकार आहेत. एक तर “बोले सो निहाल…” असा जयघोष केला जातो, नाही तर पैसे दिले जातात. एकेक, दोन-दोन रुपयांच्या नोटा… या गाण्यावर जगजीत यांना रसिकांकडून 125 रुपये मिळाले होते. ही 1956 ची बात आहे. लोकांना गाणे आवडल्याने त्यांच्या अपेक्षा वाढल्या. म्हणाले, “आणखी एक ऐकव.” जगजीतची पंचाईत झाली. ते एवढंच एकमेव गाणं तयार करून आले होते. त्या काळात “बैजू बावरा” चित्रपट खूप हिट झाला होता. त्यातले एक गाणे होते, “ओ दुनिया के रखवाले…” ते जगजीत यांचं या सोहळ्यातलं स्टेजवर सादर केलेलं दुसरं गाणं. एकूणच जगजीत यांचा हा पहिलाच यशस्वी लाइव्ह स्टेज शो ठरला. यश काय असतं, टाळ्या काय असतात हे जगजीत यांनी या सोहळ्यातून पहिल्यांदाच अनुभवलं.
[jnews_element_socialiconitem social_icon=”facebook” social_url=”https://www.facebook.com/kheliyad”] [jnews_element_socialiconitem social_icon=”twitter” social_url=”https://twitter.com/kheliyad”] [jnews_element_socialiconitem social_icon=”youtube” social_url=”https://www.youtube.com/channel/UCtDg3ouSUEsZ-kt8Z83dhAA?sub_confirmation=1″] [jnews_element_socialiconitem social_icon=”linkedin” social_url=”https://www.linkedin.com/in/maheshpathade03″] [jnews_element_socialiconitem social_icon=”instagram” social_url=”https://www.instagram.com/kheliyad/”]
(क्रमशः)
One Comment