भारतीय हॉकीने ४१ वर्षांचा दुष्काळ संपवला
भारताने दोन दुष्काळ पाहिले. एक १९७२ चा, तर दुसरा १९८० नंतरचा. एका दुष्काळाने जगणं मुश्कील केलं, तर दुसऱ्या दुष्काळाने प्रतिष्ठा पणास लावली. ७२ चा दुष्काळ सरला, पण ८० नंतरचा दुष्काळ सरता सरत नव्हता. मात्र, पुरुषांच्या भारतीय हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकत तब्बल ४१ वर्षांचा हा दुष्काळही संपवला. टोकियोतील रोमहर्षक ऑलिम्पिक हॉकी स्पर्धेत भारतीय हॉकी संघ ब्राँझ जिंकला. भारतासाठी 5 ऑगस्ट 2021 हा दिवस संस्मरणीय ठरला. कारण भारतीय हॉकी संघाने केवळ ब्राँझ मेडल जिंकले नाही, तर मनेही जिंकली होती.
अखेरच्या काही सेकंदात जर्मनीला मिळालेला पेनल्टी कॉर्नर भारतीय गोटात धडकी भरवणारा होता. मात्र, गोलकीपर आर. श्रीजेश बर्लिनच्या भिंतीसारखा उभा ठाकत तो रोखला नि भारतीयांनी एकच जल्लोष केला. टीव्हीवर हा सामना याचि देही याचि डोळा पाहणाऱ्या कोट्यवधी भारतीयांची डोळे डबडबले. का नाही डबडबणार डोळे? ४१ वर्षांपासून ज्या यशाकडे डोळे लागले होते, ते आज साकार झालं होतं. पिछाडीवरून भारतीय हॉकी संघाने दणक्यात पुनरागमन करीत टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ब्राँझ पदकावर मोहोर उमटवली. जर्मनीवर 5-4 असा रोमहर्षक विजय मिळविणारे नायक अनेक आहेत. दोन गोल डागणारा सिमरनजीत सिंग ((17 व 34 वा मिनिट), हार्दिक सिंग (27 वा मिनिट), हरमनप्रीत सिंग (29 वा मिनिट) आणि रूपिंदरपाल सिंग (31 वा मिनिट) हे नायक तर होतेच, पण अखेरच्या क्षणी पेनल्टी वाचविणारा गोलकीपर श्रीजेश भारताचा सुपरहीरो ठरला.
भारतीय हॉकी संघाने अखेरचे पदक 1980 च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये जिंकले होते. ऑलिम्पिकच्या इतिहासात हे भारताचे आठवे सुवर्णपदक होते. त्यानंतर तब्बल 41 वर्षांनंतर भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ रूपाने पदक जिंकले आहे. मॉस्को ते टोकियोपर्यंतचा हा ऑलिम्पिक प्रवास भारतीय हॉकी संघासाठी भयंकरच म्हणावा लागेल. या प्रवासात 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकच्या वेदनाही भयकारी होत्या. या ऑलिम्पिकमध्ये भारताला पात्रताही गाठता आली नव्हती. नंतर पात्रता गाठली तरी प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये रिकाम्या हाताने परतण्याची नामुष्कीही अस्वस्थ करणारी होती.
आठ वेळचा ऑलिम्पिक चॅम्पियन ही ओळख घेऊन मैदानात उतरायचं आणि ४१ वर्षांपासून रिकाम्या हाताने परतायचं हे भारताला शोभणारं खचितच नव्हतं. जगातली तिसऱ्या क्रमांकाची हॉकीतली भारतीय महासत्ता ऑलिम्पिकमध्येही रिकाम्या हातानेच परतणार, अशी स्थिती होती. विश्वास बसणार नाही, पण 1-3 असा पिछाडीवर पडलेल्या भारतीय हॉकी संघाने पुढच्या आठ मिनिटांत चार गोल डागत ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले. जगात चौथ्या क्रमांकावर असलेल्या जर्मनीकडून तिमूर ओरूज (दुसऱ्या मिनिटात), निकलास वेलेन (24 वा मिनिट), बेनेडिक्ट फुर्क (25 वा मिनिट) आणि लुकास विंडफेडर (48 वा मिनिट) यांनी गोल केले.
फर्स्ट क्वार्टर ः दुसऱ्याच मिनिटाला गोल डागत जर्मनीची आघाडी
मध्यांतरापर्यंत दोन्ही संघ 3-3 अशा बरोबरीत होते. ही स्थिती येण्यापूर्वी भारताची अवस्था केविलवाणी होती. पहिल्या क्वार्टरमध्ये सुरुवात फारशी चांगली झालीच नाही. भारतीय सुरक्षा फळीने बऱ्याच चुका केल्या, पण गोलकीपर पीआर श्रीजेश ती भरपाई भरून काढायचा. जर्मनीची सुरुवात वेगवान होती. मात्र, त्यात सातत्य नव्हतं. म्हणजे पहिल्या 15 मिनिटांत त्यांनी भारतावर दबाव जरूर राखला, पण पुढच्या सत्रात भारतीय संघ जर्मनांवर तुटून पडले. जर्मनीने सुरुवातीला दोन्ही बाजूंनी हल्ले चढवत भारताच्या सुरक्षाफळीवर दबाव आणला. त्याचं फळही त्यांना मिळालं. सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला तिमूर ओरूजने गोलकीपर श्रीजेशच्या दोन्ही पायांतून गोल डागला. हा धक्का मोठा होता, पण भारताने हार मानली नाही. भारताने त्याच वेगवान गतीने जर्मनांवर हल्ला चढवला. पाचव्या मिनिटालाच भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. दुर्दैव… ड्रॅगफ्लिकर रूपिंदरचा शॉट क्षीण ठरला. जर्मनांचे हल्ले एकामागोमाग सुरूच राहिले. पहिल्या क्वार्टरमध्ये जर्मन संघ भारतीयांच्या डीमध्ये प्रवेश करता झाला. पण जर्मनांना काय माहीत, की श्रीजेश नावाची भिंत त्यांच्यासमोर उभी ठाकणार. आणखी आघाडी मिळवून देण्याचे जर्मनांचे मनसुबे त्याने उधळून लावले. त्यांचे दोन हल्ले त्याने परतावून लावले. जर्मनीला पहिल्या क्वार्टरच्या अखेरच्या मिनिटात सलग चार पेनल्टी कॉर्नर मिळाले. टीव्हीसमोर डोळ्यांत प्राण आणून बसलेल्या प्रेक्षकांची अवस्था काय झाली असेल, याची कल्पनाच न केलेली बरी. प्रत्यक्ष मैदानात असलेल्या भारतीय खेळाडूंच्या मनःस्थितीचा अंदाज बांधणे तर त्याहून अवघड. मात्र, अमित रोहिदासने प्रतिस्पर्ध्यांचे हल्ले निष्प्रभ ठरवले.
सेकंड क्वार्टर ः 3-3 बरोबरीने चुरस शिगेला
दुसरे सत्र भारताचे होते. सुरुवात जोरदार होती. नीलकांता शर्माने डीमध्ये असलेल्या सिमरनजीतकडे दीर्घ पास दिला. शर्माच्या या पासचं सिमरनजीतने सोनं केलं नि दुसऱ्याच मिनिटाला रिव्हर्स शॉट मारत जर्मनीचा गोलकीपर अलेक्झांडर स्टेडलरला चकवत गोल केला. भारताने आता जर्मनीशी 1-1 अशी बरोबरी साधली होती. निश्चिंत झालेल्या भारताने नंतर हल्ल्यांची मालिकाच लावली. एव्हाना जर्मनीची सुरक्षाफळी भानावर आली होती. भारतीयांना ही सुरक्षाफळी भेदताच आली नाही. भारतीय सुरक्षाफळी मात्र जर्मनांच्या तुलनेत सक्षम दिसली नाही. त्यांनी एकापाठोपाठ चुका केल्या. त्याचा फायदा गमावण्याइतके जर्मन खुळे नव्हते. त्यांनी दोन मिनिटांत दोन गोल डागले आणि 3-1 अशी आघाडी घेतली. पुन्हा एकदा भारतीय गोटात गंभीर वातावरण. यान क्रिस्टोफर रूरने चेंडू वेलेनकडे पास केला तेव्हा नीलकांता तो रोखू शकला असता. पण तसं झालं नाही आणि वेलेनने श्रीजेशला चकवत गोल केला. त्यानंतर उजव्या बाजूने जर्मनांचे हल्ले सुरूच ठेवत भारतीय सुरक्षाफळी भेदली. इथंही भारतीय सुरक्षाफळीच्या उणिवा समोर आल्या. त्याचा लाभ उठवत बेनेडिक्ट फुर्कने गोल डागला. भारतीय संघने 1-3 पिछाडीवर पडला होता. मागे काय झालं त्यापेक्षा पुढे काय करायचं हे तंत्र भारतीयांना गेल्या काही लढतींतून उमजलं होतं. पिछाडीनंतर गलितगात्र न होता भारतीयांनी प्रतिहल्ले चढवले. काय आश्चर्य, तीन मिनिटांत दोन करीत भारताने सामना पुन्हा बरोबरीत आणला. भारताला 27 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. ड्रॅगफ्लिकर हरमनप्रीतने प्रयत्न तर केला, पण गोलकीपर स्टेडलरने सुरेख बचाव केला. मात्र, हा आनंद क्षणिक ठरला. रोखलेला चेंडू रिबाउंड झाला नि हार्दिकने तो पुन्हा गोलजाळ्यात सोपवला. भारताला एका मिनिटानंतर आणखी पेनल्टी कॉर्नर मिळाला. या वेळी हरमनप्रीतने कोणतीही चूक केली नाही. आपल्या दमदार ड्रॅगफ्लिकने चेंडू गोलजाळ्यात पोहोचवून भारताला बरोबरी साधून दिली.
थर्ड क्वार्टर ः भारतीय हॉकी संघाची मजबूत वापसी
तिसऱ्या क्वार्टरमध्ये जर्मनांमध्ये गोंधळ जाणवला. भारतीय संघाने जर्मनांवर पुरते वर्चस्व प्रस्थापित केले. पहिल्याच मिनिटात जर्मनीच्या डिफेंडरने गोलपोस्टच्या समोरच मनदीपसिंगला पाडलं. इथं भारताला महत्त्वपूर्ण पेनल्टी स्ट्रोक मिळाला. निर्णायक सामन्यात अशी संधी मिळणं म्हणजे लॉटरीच. रूपिंदरने स्टेंडलरच्या उजव्या बाजूने गोल डागला. पहिल्यांदा भारताने जर्मनांवर एका गोलची आघाडी घेतली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये रूपिंदरचा हा चौथा गोल आहे. यानंतर भारताने उजव्या बाजूने उत्तम व्यूहरचना करीत जर्मनांच्या डीमध्ये सुरेख खेळाचे प्रदर्शन केले. गुरजंतने डीमध्ये दिलेल्या पासवर सिमरनजीतने गोल केला. आता भारताने 5-3 अशी दोन गोलची आघाडी घेतली. यानंतर दोन्ही संघांमध्ये घमासान युद्ध रंगले. भारताला नंतर सलग तीन, तर जर्मनीलाही तेवढेच सलग तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले. मात्र, दोन्ही संघ गोल करण्यात अपयशी ठरले. इथं भारतीय हॉकी संघाचा ब्राँझ मेडलकडे प्रवास सुरू झाला होता. पण…
फोर्थ क्वार्टर ः भारतीय हॉकी संघाचे ऑलिम्पिक स्पर्धेतील ऐतिहासिक ब्राँझ मेडल
चौथे सत्र जर्मनांसाठी आशेचा किरण ठरला. तिसऱ्याच मिनिटाला जर्मनीला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. या वेळी लुकास विंडफेडरने कोणतीही चूक केली नाही. त्याने श्रीजेशच्या पायांतून चेंडू गोलजाळ्यात धडकावला. जर्मनांनी आता आघाडी 4-5 अशी एका गोलने कमी केली. भारताला 51 व्या मिनिटाला गोल करण्याची नामी संधी होती. एका दीर्घ पासवर मनदीपने चेंडूवर ताबा मिळवला आणि तो डीमध्ये घेऊन गेला. आता मनदीप आणि गोलकीपर स्टेडलर समोरासमोर आले होते. स्टेडलर चकवून गोल करणं एवढंच बाकी होतं. मात्र, मनदीप यात अपयशी ठरला. जर्मनी बरोबरीसाठी इरेला पेटली होती. अखेरच्या पाच मिनिटात तर हा संघ गोलकीपरविनाच खेळला. संघाला 58 आणि 60 व्या मिनिटात पनेल्टी कॉर्नर मिळाले. मात्र, भारतीय सुरक्षाफळीने हे हल्ले परतावून लावत कांस्य पदकावर शिक्कामोर्तब केले.
भारतीय पुरुष हॉकी संघाचा टोकियोपर्यंतचा ऑलिम्पिक प्रवास |
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत 5 ऑगस्ट 2021 रोजी ब्राँझ पदक जिंकणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाने 41 वर्षांचा पदकांचा दुष्काळ संपवला. मेजर ध्यानचंदपासून मनप्रीत सिंगपर्यंत भारतीय पुरुष हॉकी संघाचा आतापर्यंतचा ऑलिम्पिक प्रवास असा आहे. |
1928 अम्सटरडॅम : ब्रिटिश साम्राज्यात भारतीय हॉकी संघाने अंतिम फेरीत नेदरलँडचा 3-2 असा पराभव करीत ऑलिम्पिकमध्ये प्रथमच हॉकीमध्ये सुवर्णपदक जिंकले. भारतीय हॉकीला ध्यानचंदच्या रूपाने नवा तारा गवसला. ध्यानचंदने 14 गोल केले. |
1932 लॉस एंजिलिस : या ऑलिम्पिक स्पर्धेत फक्त तीन संघ होते- भारत, अमेरिका आणि जपान. भारतीय हॉकी संघ 42 दिवसांचा सागरी प्रवास करीत अमेरिकेत पोहोचला. अमेरिका आणि जपान या दोन्ही संघांचा पराभव करीत सुवर्णपदकावर नाव कोरले. |
1936 बर्लिन : ध्यानचंद यांच्या नेतृत्वाखालील भारतीय हॉकी संघाने यजमान जर्मनीचा 8-1 असा पराभव करीत तिसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकले. |
1948 लंडन : स्वतंत्र भारताची ही पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा. या हॉकी स्पर्धेने भारताने जगाला आपली ओळख दिली. ब्रिटनला 4-0 असे पराभूत करीत भारतीय हॉकी संघाने सलग चौथ्यांदा ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकले. याच ऑलिम्पिकमधून बलबीरसिंग सीनिअर यांच्या रूपाने हॉकीला नवा नायक मिळाला. |
1952 हेलसिंकी : यजमान नेदरलँडला पराभूत करीत भारत पुन्हा सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. भारताने केलेल्या एकूण 13 पैकी नऊ गोल एकट्या बलबीरसिंग सीनिअर यांच्या नावावर होते. त्यांनीच अंतिम फेरीत सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम नोंदवला. |
1956 मेलबर्न : पाकिस्तानला अंतिम फेरीत एका गोलने पराभूत करीत भारताने सलग सहाव्यांदा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले. या विजयासह भारताने हॉकीतला आपला दबदबा कायम राखला. |
1960 रोम : अंतिम फेरीत पुन्हा भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले. या वेळी पाकिस्तानने एका गोलने विजय मिळवत भारताचा अश्वमेध रोखला. |
1964 टोकियो : पेनल्टी कॉर्नरवर मोहिदंरलाल यांनी केलेल्या एका गोलमुळे भारताने पाकिस्तानला पराभूत करीत पुन्हा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले. |
1968 मेक्सिको : ऑलिम्पिक इतिहासात भारत प्रथमच अंतिम फेरीत स्थान मिळवू शकला नाही. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. |
1972 म्युनिख : भारताला उपांत्य फेरीत पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला. मात्र, प्लेऑफमध्ये नेदरलँडला 2-1 असे पराभूत करीत कांस्य पदक जिंकले. 1976 माँट्रियल : फिल्ड हॉकीत प्रथमच अॅस्ट्रो टर्फचा वापर करण्यात आला. भारत गटसाखळीत दुसऱ्या स्थानी राहिला आणि 58 वर्षांत प्रथमच भारत पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडला. भारताला या ऑलिम्पिक स्पर्धेत सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. |
1980 मॉस्को : नऊ संघांनी बहिष्कार टाकल्याने या ऑलिम्पिकमध्ये फक्त सहा संघ उरले. भारताने स्पेनचा 4-3 असा पराभव करीत सुवर्णपदक जिंकले. ऑलिम्पिकमधील भारताचे हे आठवे सुवर्णपदक ठरले. |
1984 लॉस एंजिलिस : बारा संघांमध्ये भारत पाचव्या स्थानी राहिला. |
1988 सिओल : परगटसिंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची सर्वसाधारण कामगिरी. पाकिस्तानकडून क्लासिफिकेशन सामन्यात पराभूत झाल्याने भारत सहाव्या स्थानी राहिला. |
1992 बार्सिलोना : भारताला अर्जेंटिना आणि इजिप्त या दोनच संघांविरुद्ध विजय मिळवता आला. या निराशाजनक कामगिरीमुळे भारत सातव्या स्थानी राहिला. |
1996 अटलांटा : भारताच्या कामगिरीचा आलेख सातत्याने घसरता राहिला. या वेळी भारत आठव्या स्थानी राहिला. |
2000 सिडनी : पुन्हा एकदा भारत क्लासिफिकेशन मॅचपर्यंत घसरला. भारताला पुन्हा सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. |
2004 अथेन्स : धनराज पिल्लेची ही चौथी ऑलिम्पिकवारी. भारत गटात चौथ्या, तर एकूण सातव्या स्थानावर राहिला. |
2008 बीजिंग : भारतीय हॉकीच्या इतिहासातला सर्वांत काळा दिवस. चिलीच्या सँटियागो येथे झालेल्या पात्रता स्पर्धेत भारताला ब्रिटनकडून पराभव स्वीकारावा लागला. यामुळे भारतीय हॉकी संघ 88 वर्षांत प्रथमच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकला नाही. |
2012 लंडन : भारतीय हॉकी संघाला एकही सामना जिंकता आला नाही. ऑलिम्पिकमध्ये प्रथमच बाराव्या म्हणजेच तळातल्या स्थानी राहण्याची नामुष्की ओढवली. |
2016 रियो : भारतीय संघ उपउपांत्यपूर्व फेरीत दाखल. मात्र, बेल्जियमकडून पराभूत. भारत आठव्या स्थानी घसरला. |
2020 टोकियो : तीन वेळचा विजेता जर्मनी संघाला 5-4 असे पराभूत करीत भारताने 41 वर्षांनंतर ऑलिम्पिक पदक जिंकले. मनप्रीतसिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ब्राँझ पदक जिंकत इतिहास रचला. |