‘कोंबडीच्या पायाची…’ एलिसन फेलिक्स
अमेरिकेच्या ‘ट्रॅक अँड फील्ड’च्या इतिहासात सर्वाधिक ऑलिम्पिक पदके जिंकणारी एलिसन फेलिक्स (Allyson Felix) हिने निवृत्तीचे संकेत दिले. 2022 च्या मोसमानंतर निवृत्त होण्याचा इरादा तिने जाहीर केला. खरं तर यात आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. मात्र, एक हलकासा धक्का बसला. एलिसन केवळ खेळाडू नाही, तर उत्तम ‘माणूस’ आहे. वर्णद्वेषाचा तिला सामना करावा लागला असेलही, पण ती लढली, धावली समस्त महिलांसाठी. तिच्या लढ्यामुळेच ‘नाइके’ कंपनीलाही आपलं महिलांविषयक धोरण बदलावं लागलं… एका प्रायोजक कंपनीला धोरण बदलायला भाग पाडणं सोपं मुळीच नाही. म्हणूनच एलिसन फेलिक्सचा हा लढा आणि तिची कामगिरी या दोन्हींचा प्रवास रोमांचक आहे… कोंबडीच्या पायाची या टोपणनावाने ओळखली जाणारी फेलिक्स हिने निवृत्ती जाहीर करताना एक वाक्य लिहिलंय, ज्यावर ही संपूर्ण कहाणी बेतलेली आहे. ती म्हणते, ‘‘या मोसमात मी महिला आणि आपल्या मुलीच्या उत्तम भविष्यासाठी धावेन…”
गेल्या दोन वर्षांपूर्वीच एलिसन फेलिक्स हिचं एक धाडसी स्टेटमेंट वाचण्यात आलं. तिला ‘नाइके’सारख्या सर्वांत मोठ्या कंपनीचं प्रायोजकत्व लाभलं होतं. सर्वाधिक मार्केटिंग केलेल्या आघाडीच्या खेळाडूंपैकी ‘नाइके’ची तीही एक ब्रँड. मात्र, गर्भवती राहिल्याने माझ्या मातृत्वाची कोणतीही जबाबदारी कंपनी घेत नसेल, जर मी माझं मातृत्व सुरक्षित करू शकत नसेल, तर मग कोण करू शकेल? या वाक्याचा मथितार्थ काही कळला नाही. जेव्हा ही कहाणी वाचली, तेव्हा एलिसन आधाशासारखी वाचली.
मुळात महिला-पुरुष भेद किती सूक्ष्म स्तरावर असतो, याची कल्पनाच करता येणार नाही. एलिसन फेलिक्सच्या बाबतीतही असंच घडलं.
जर तुम्ही गर्भवती राहिला किंवा त्यानंतर तुम्हाला मूल झालं तर तुम्हाला प्रायोजकाकडून मिळणाऱ्या रकमेतून कपात सोसावी लागते. हा नियम तिला अजिबात पटला नाही. म्हणजे धोरणं फक्त पुरुषांना डोळ्यांसमोर ठेवूनच बनवली जातात का? एलिसन फेलिक्सचा हा प्रश्न थेट मनाला भिडतो.
एलिसन फेलिक्सची गर्भधारणेच्या काळातली कहाणी अशाच कठीण प्रसंगातून गेली. एलिसनने व्यावसायिक खेळाडू म्हणूनच स्वत:कडे पाहिले. तिचं लक्ष्य एकच, ते म्हणजे पदक जिंकणं. अर्थात, तिने लक्ष्य गाठलंही. वयाच्या ३२ व्या वर्षी तिच्याकडे काय नव्हतं? सहा वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदके आणि ११ वेळा जागतिक विजेती. ही डोंगराएवढी कामगिरी स्तिमित करणारी होती. 2018 च्या अखेरच्या टप्प्यात एलिसनने आपलं लक्ष्य थोडं आणखी विस्तारलं. तिने ठरवलं, की उत्तम व्यावसायिक खेळाडूबरोबर तिला आईही व्हायचं होतं.
ही एका महिलेची स्वाभाविक इच्छा आहे. तो तिचा हक्क आहे. मात्र, कामगिरीच्या परमोच्च शिखरावर असलेल्या एका महिला खेळाडूने अशी इच्छा व्यक्त करणे सध्याच्या करिअर ओरिएंटेड जगात भुवया उंचावणारे असते. झालंही तसंच. अनेकांच्या भुवया उंचावल्या. काही तरीच काय? भलतंच खूळ हिच्या डोक्यात, अशी निर्भर्त्सनाही काही जणांनी केली.
एलिसनचा विचार पक्का होता. तिने 2018 मध्ये आई होण्याचा निर्णय घेतला. यशाच्या शिखरावर असलेल्या महिला खेळाडूने आई होणं म्हणजे ‘मृत्यूचं चुंबन’ घेण्यासारखंच आहे. ‘दि टाइम्स’मध्ये धावपटू फोबे राइटने एका मुलाखतीत असंच काही तरी म्हंटलं होतं.
एलिसनने आई व्हावं की नाही हा संपूर्णपणे एलिसनचाच निर्णय असायला हवा. मात्र, इथे आपला घोळ होतोय. एलिसन साधीसुधी महिला नव्हती. ती होती जागतिक स्तरावरची धावपटू. अशा वेळी तिचा आई होण्याचा निर्णय ‘भयंकर’ होता. डिसेंबर 2017 मध्येच तिचा ‘नाइके’सोबतचा करार संपला होता. त्यामुळे नव्याने करार करण्यासंदर्भात तिची बोलणीही सुरू होती. तिचं ‘आईपणाचं’ खूळ तिच्या नव्या करारात अडथळा ठरलं.
एलिसन भयंकर दबावाखाली होती. नोव्हेंबर 2018 मध्ये मूल जन्माला घातल्यानंतर लवकरात लवकर तिला फॉर्ममध्ये यावं लागणार होतं. वयाच्या तिशीनंतर मैदानी खेळात पुनरागमन करणं खायचं काम नाही. त्यात एलिसन एक महिला. त्यात आणखी एक जीवघेणे आव्हान होते. ती ‘प्री-एक्लॅम्पिसिया’ने (Pre-eclampsia) ग्रासली.
ही ‘प्री-एक्लॅम्पिसिया’ समस्या काय आहे हे समजून घेतलं तर तुम्हाला एलिसनचा धोका नेमका काय आहे, हे समजू शकेल. ही गर्भधारणेतील अशी समस्या आहे, जी शंभरात केवळ दोन गर्भवती महिलांना जाणवते. अत्यंत दुर्मिळ समस्या. उच्च रक्तदाब आणि युरिनमध्ये प्रोटिन अधिक अशी दोन लक्षणे या समस्येत आढळतात. हा अतिसंवेदनशील आजार मानला जातो.
गर्भधारणेत एलिसनला या आजाराविषयी कळल्याने धक्काच बसला. कारण यात आई आणि मूल या दोघांच्याही जिवाला धोका असतो.
एकीकडे एलिसनच्या गुंतागुंतीच्या गर्भधारणेचा प्रश्न होता, तर दुसरीकडे ‘नाइके’शी होत असलेल्या नव्या करारातून दुसरा प्रश्नही उद्भवला होता. कारण जेव्हा एलिसन जिंकत होती तेव्हा तिला भरभरून रक्कम दिली जात होती. आता झालं काय, की जेव्हा ती गर्भवती झाली तेव्हा तिच्यासमोर ‘नाइके’ने नवा प्रस्ताव दिला. ‘नाइके’ने तिला आधीच्या करारापेक्षा 70 टक्क्यांनी कमी पैसे मोजण्याचा प्रस्ताव दिला. यातून एक मेसेज गेला- तो म्हणजे तुला जेवढे मिळताहेत ते घे. कारण तशीही तू आता आमच्या काहीच कामाची नाही. म्हणजे कोंबडीच्या पायाची एलिसन आता सोन्याचे अंडे देणार नव्हती! एकूणच काय, तर एलिसन आई होणार असली तरी तिचा खेळ वांझोटा राहणार असल्याने ‘नाइके’ने करारातील रकमेतून कपात केली.
एलिसनला धक्का बसला. तिचं म्हणणं एवढंच होतं, की जर मी मूल जन्माला येईपर्यंत काही काळ सर्वोत्तम कामगिरी करणार नसेल तर त्या कालावधीसाठी माझ्यावर कपातीचा दंड का?
एलिसनला नवे मापदंड स्थापित करायचे होते. जर मी ‘नाइके’च्या सर्वात मोठ्या मार्केटिंग केलेल्या खेळाडूंपैकी एक असूनही मी माझं मातृत्व सुरक्षित करू शकणार नाही, तर मग कोण करू शकेल?
‘नाइके’ने एलिसनचा प्रस्ताव धुडकावला. विडंबना बघा, दहा वर्षांपूर्वी एलिसनने ‘नाइके’शी करार करताना आधी त्यांच्या मूल सिद्धान्ताचा विचार केला, नंतर करारावर सह्या केल्या होत्या. कारण जेव्हा 2010 मध्ये ती कंपनीच्या प्रमुखाशी भेटली. त्या वेळी एका महिलेने एलिसनसमोर नाइकेच्या प्रायोजकत्वाचे, महिला सक्षमीकरणाच्या तत्त्वांचे गोडवे गायले होते. ‘नाइके’च्या प्रमुख महिलेने प्रायोजकत्वाचे सिद्धान्त सांगताना, आम्ही महिलांना कसे प्रोत्साहन देतो, याबाबत सांगितले. त्याला कंपनीने ‘गर्ल इफेक्ट’ असे संबोधले होते. यात किशोरवयीन मुलींना जगभरातील समाज सुधारणेची गुरुकिल्ली म्हणून प्रोत्साहित केले जाते. तुम्ही ‘नाइके’शी जोडला गेलात, तर मी महिला सक्षमीकरणासाठी तुम्हाला मदत करीन. ती महिला पुढे असेही म्हणाली, ‘नाइके’चा महिला आणि मुलींवर, तसेच तुझ्यावर विश्वास आहे.
एलिसनसमोर झर्रकन हा फ्लॅशबॅक तरळला. नेमके याच विश्वासाला तडा देणारे आताचे ‘नाइके’चे धोरण होते. त्यामुळे एलिसन प्रचंड निराश झाली.
एलिसनची नाराजी फक्त नाइके कंपनीवर होती असं नाही, तर एक कंपनी महिला खेळाडूंबाबत कसा दुजाभाव करते यावर होती. हा फक्त गर्भवती काळापुरताच विषय नव्हता.
आपण ज्यांना मान्यता देतो अशा ब्रँडच्या पाठीशी आपण राहतो. मात्र, आपल्याला एक जबाबदारीही घ्यायला हवी. कारण पुढच्या पिढीतल्या खेळाडूंना, तसेच ग्राहकांना आवाहन करण्यासाठी ते जर आमचे मार्केटिंग करीत असतील तर आपण त्यांना जबाबदार धरलेच पाहिजे, यावर एलिसन ठाम होती.
‘नाइके’ने प्रस्ताव धुडकावल्यानंतर 2019 मध्ये एलिसन गॅप इंक (Gap Inc.) या कपड्यांच्या कंपनीशी करारबद्ध झाली. या गॅप इंकची एलिसन ही पहिलीच प्रायोजित धावपटू होती.
एलिसनच्या या निर्णयानंतर सार्वजनिक स्तरावर ‘नाइके’च्या मातृधोरणावर टीकाही झाली. एलिसनच्या या लढ्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. अखेरच्या हप्त्यात तिच्या लढ्यामागे काही धाडसी महिला खेळाडू उभ्या राहिल्या. त्याचा परिणाम असा झाला, की अनेक उद्योगांना योग्य दिशेने पावले टाकण्यास भाग पाडले. बर्टन (Burton), अल्ट्रा (Altra), नन (Nuun), ब्रुक्स (Brooks) यांसारखे अनेक ब्रँड मूल असलेल्या महिला खेळाडूंना प्रायोजकत्व देण्यासाठी पुढे आल्या. आता एवढ्या कंपन्यांनी महिला सबलीकरणासाठी पावले टाकल्यानंतर ‘नाइके’ही ताळ्यावर आली. या कंपनीनेही काही दिवसांनी आपल्या मातृधोरणात बदल केला. ‘दि वॉल स्ट्रीट जर्नल’मध्ये ही बातमी झळकली. त्यात कंपनीने नमूद केले, की ‘आम्ही नवे करार करताना गर्भवती महिला खेळाडूंनाही संरक्षण देऊ. करारानंतर 18 महिने महिला खेळाडूला तिचं मातृत्व काळात कोणतीही कपात केली जाणार नाही आणि करारही संपुष्टात आणणार नाही.” हा केवढा मोठा बदल! ‘नाइके’ला हे जाहीर करावं लागलं होतं!
हा बदल आवश्यकच होता. एलिसनने ‘नाइके’च्या या बदलाचे स्वागत केले. ‘नाइके’च नाही, तर इतरही उद्योगांनी करारबद्ध महिलांचे संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध राहावे, अशी अपेक्षाही एलिसन या वेळी व्यक्त करते.
खेळाडूंना बोलू दिले जात नाही. तुम्ही फक्त खेळायचं. खेळाडूंबाबत जे राजकारण होतंय, त्याची कोणालाही पर्वा नाही. आम्हाला सांगितलं जातं, की तुम्ही फक्त मनोरंजनकार आहात. वेगाने धावा, उंच उडी मारा आणि लांबवर गोळा फेकत राहा. बाकी त्यांना कोणतीही झंझट नकोय. एलिसनने जे आजवर पाहिलं ते ती स्पष्टपणे बोलत होती.
एलिसन म्हणते, गर्भारपण ही काही झंझट नाही, तर तो एक समृद्ध व्यावसायिक खेळाडूच्या कारकिर्दीतला मैलाचा टप्पा आहे. मी असं एक स्वप्न पाहतेय, जेथे आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करतो, तेथे आम्हाला संघर्ष करावा लागू नये.
मातृत्वादरम्यानची सुरक्षा केवळ ऑलिम्पियनपर्यंत सीमित नाही, तर अमेरिकेतील सर्वच चाकरमान्या महिलांना मूल झाल्यानंतर सुरक्षेची गरज असते. आपल्याला योग्य काम करण्यासाठी कंपन्यांवर अवलंहून राहण्याची गरज नाही. एलिसनचे मत एका ‘नाइके’सारख्या मोठ्या ब्रँडविरुद्ध नाही तर महिलांच्या हक्कासाठी व्यक्त केलेली एक रास्त भावना होती.
All Allyson Felix Olympic Highlights |
[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=gzXyl7kq3og” column_width=”4″] |
एलिसन फेलिक्स हिचा मैदानावरचा प्रवास
एलिसन फेलिक्स हिने 14 एप्रिल 2022 रोजी इन्स्टाग्राम पेजवर निवृत्तीची घोषणा केली, तेव्हा तिने लिहिलं, की ‘‘हा मोसम (2022) वेळेसाठी नाही, तर आनंद घेण्यासाठी आहे.’’ ती पुढे म्हणते, ‘‘जर तुम्ही मला यंदा (2022) ट्रॅकवर पाहणार असाल तर मी अपेक्षा करते, की तुमच्याशी एक क्षण आणि एक आठवण शेअर करीन.’’ या पोस्टनंतर क्रीडाप्रेमींमध्ये फेलिक्स नावाचं वादळ घोंगावत राहिलं. का नाही घोंगावणार? ती होतीच विक्रमी आणि धाडसी. गेल्या वर्षी 2021 मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये 400 मीटर शर्यतीत तिने कांस्य पदक जिंकलं. त्यानंतर 4×400 मीटर रिले शर्यतीत सुवर्ण पदकावर नाव कोरलं. हे दोन्ही अनुक्रमे 10 वे आणि 11 वे ऑलिम्पिक पदक होते. ही अशी कामगिरी होती, जिथे कार्ल लुईसचाही विक्रम मोडीत निघाला. अमेरिकेच्या विक्रमवीरांमध्ये एलिसन फेलिक्स हे नवं नाव समाविष्ट झालं. फिनलंडची पावो नुर्मी ही जगातली सर्वाधिक पदके जिंकणारी एकमेव धावपटू आहे. तिने 1920 ते 1928 दरम्यान तब्बल 12 पदके जिंकली होती. या नुर्मीला गाठायचं असेल तर एलिसनला आणखी एकच पदक हवंय. खरं तर एलिसनला विक्रमांच्या मागे अजिबात धावायचं नाही. तिला धावायचंय, तिच्या मुलीच्या उत्तम भविष्यासाठी. इन्स्टाग्रामवर ती पुढे म्हणतेही, ‘‘या मोसमात मी महिला आणि आपल्या मुलीच्या उत्तम भविष्यासाठी धावेन.” एलिसन फेलिक्स 14 वेळा विश्वविजेती राहिली. म्हणजे तिच्या नावावर विश्व चॅम्पियनशिपमध्ये विक्रमी 14 सुवर्ण आणि एकूण 18 पदके आहेत.
एलिसन फेलिक्सने 2012 मधील लंडन ऑलिम्पिकमध्ये 200 मीटर शर्यतीत सुवर्ण जिंकले. एवढेच नाही, तर 4×100 आणि 4×400 मीटर रिलेमध्येही सुवर्ण जिंकले. एकाच ऑलिम्पिकमध्ये ट्रॅक प्रकारात तीन सुवर्णपदके जिंकणारी ती फ्लोरेन्स ग्रिफिथ-जॉयनर (1988) हिच्यानंतर पहिलीच अमेरिकी महिला खेळाडू ठरली. कारकिर्दीत ती पाच ऑलिम्पिक स्पर्धा (2004, 2008, 2012, 2016, 2020) खेळली. त्यात तिने सात सुवर्णपदके, तीन रौप्य, तर एक कांस्य पदक जिंकले. केवळ पदकांवर नजर टाकली तरी त्यासाठी तिने किती मेहनत घेतली असेल, याची नुसती कल्पना केली तरी थक्क व्हायला होतं. 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये एलिसन 100 मीटर धावली अवघ्या 10.89 सेकंदात.
एलिसन फेलिक्सची सर्वोत्तम कामगिरी
10.89 सेकंद | 16.36 सेकंद | 21.69 सेकंद | 49.26 सेकंद |
100 मीटर (लंडन 2012) | 150 मीटर (मँचेस्टर 2013) | 200 मीटर (युजीन 2012) | 400 मीटर (बीजिंग 2015) |
कौटुंबिक पार्श्वभूमी
एलिसनचं शिक्षण कॅलिफोर्नियातील लॉस एंजिल्समधील बाप्तिस्ट हायस्कूलमध्ये झाले. ती नववीत होती, त्या वेळी तिचे सडपातळ लांबलचक पाय आणि सडसडीत देहयष्टी यामुळे तिचे सहकारी तिला ‘कोंबडीच्या पायाची’ म्हणायचे. याच टोपणनावाने ती पुढेही ओळखली गेली. एलिसनचा जन्म (18 नोव्हेंबर 1985 ) लॉस एंजिल्समधला. ती तशी सुखवस्तू कुटुंबातली. वडील पॉल. ते सन व्हॅलीतल्या दि मास्टर्स सेमिनारीमध्ये प्रोफेसर, तर आई मार्लिअन शिक्षिका. तिचा मोठा भाऊ वेस फेलिक्स हाही उत्तम धावपटू. कदाचित त्यामुळेच एलिसन ट्रॅकवर वळली असावी. मात्र, तिच्या धावण्यातली जादू कमालीची होती. एलिसन फेलिक्स म्हणते, मला ही देवाची भेट (गॉड गिफ्ट) आहे. मी उत्तम धावते यामागे देवाची माझ्यावर कृपा आहे. एलिसन फेलिक्स विवाहित असून, अमेरिकेचा धावपटू केनीथ फर्ग्युसन (Kenneth Ferguson) याच्याशी तिचा विवाह झाला. 2018 मध्ये तिने मुलीला जन्म दिला असून, तिचं नाव कॅमरिन (Camryn) आहे.
एक अशीही चुरशीची स्पर्धा…
‘ईएसपीएन’वर एलिसन फेलिक्सविषयी जेना प्रंदिनी (Jenna Prandini) हिने एक किस्सा शेअर केला होता. एलिसन आणि जेना दोघीही अमेरिकेतील ट्रॅक अँड फिल्डमधील आघाडीच्या खेळाडू. एलिसन उत्तम धावपटू, तर जेना धावण्याबरोबरच लांब उंडीतही अमेरिकेचं प्रतिनिधित्व करीत होती. 2016 मध्ये एक प्रसंग जेनाच्या कायम लक्षात राहील. झालं काय, की 2016 मध्ये रियो ऑलिम्पिकच्या पात्रता फेरीसाठी या दोघीही 200 मीटरमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्या वेळी एलिसनचं केवढं नाव! म्हणजे एलिसनच्या नावावर त्या वेळी तीन ऑलिम्पिक पदके होती, तर जेना एकही ऑलिम्पिक खेळलेली नव्हती. 100 मीटरमध्ये तर तिचा ऑलिम्पिक पत्ता केव्हाच कट झाला होता. आता 200 मीटरवरच आशा उरल्या होत्या.
पात्रता फेरीच्या स्पर्धेत जेना आणि एलिसन दोघीही धावल्या. टोरी बोवी (Tori Bowie) हिने पहिले, तर दिजाह स्टीव्हन्स (Deajah Stevens) हिने दुसरे स्थान मिळवत ऑलिम्पिक तिकीट पक्के केले. ते अगदी स्पष्ट होते. मात्र, तिसऱ्या स्थानी जेना आणि एलिसन या दोघींनी एकाच वेळी फिनिश लाइन पार केली. तिसरा क्रमांक नेमकी कोणी पटकावला, हे सांगणं अवघड होतं. एलिसन चौथे ऑलिम्पिक पदक घेणार की प्रंदिनी ऑलिम्पिक स्वप्न साकारणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली होती.
कोणी फिनिश लाइन पहिल्यांदा पार केली, यावर दोघीही साशंक होत्या. फेलिक्स म्हणाली, ‘‘मी काहीही ठामपणे सांगू शकत नाही. मी फक्त एवढंच सांगू शकते, की मी माझे सगळे प्रयत्न पणाला लावले आणि फिनिश लाइनजवळ झुकले.”
प्रंदिनीची भावना त्या वेळी वेगळी होती. मी इथपर्यंत पोहोचले तेच खूप आहे. मात्र, जेव्हा निकाल हाती आला तेव्हा प्रंदिनीला धक्काच बसला. अर्थात सुखद.
फिनिश लाइनवर सूक्ष्म निरीक्षणांती असं समजलं, की जेना प्रंदिनीने एका सेकंदातल्या शंभराव्या भागाने तिसरे स्थान मिळवले होते. म्हणजे एलिसनपेक्षा जेना प्रंदिनीने 10 मिलिसेकंद (एका सेकंदाचा शंभरावा भाग) आधी फिनिश लाइन पार केली होती. अगदी थोडक्यात सांगायचं, तर दोघींमधील अंतरात डोक्याचा एका केसच मुश्किलीने मावू शकेल!
जेनाचं नशीब म्हणावं की एलिसनचा बॅडलक. काहीही असो, पण एलिसन प्रथमच ऑलिम्पिकमध्ये 200 मीटर शर्यतीपासून वंचित राहिली, तर जेना प्रथमच ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली.
अमेरिकेत ट्रॅक अँड फिल्डमध्ये आघाडीवर राहणं किती आव्हानात्मक असतं, याचं हे एक उदाहरण पुरेसं आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम येणं म्हणजे ऑलिम्पिक सुवर्ण पक्क करणं इतकी ही स्पर्धा चुरशीची असते.
एलिसन फेलिक्स
खेळ | ट्रॅक अँड फिल्ड |
इव्हेंट | 400 मीटर, 400 मीटर रिले |
उंची | 5 फूट 6 इंच |
जन्मतारीख | 18 नोव्हेंबर 1985 |
जन्मस्थान | लॉस एंजिल्स, कॅलिफोर्निया |
हायस्कूल | लॉस एंजिल्स बाप्तिस्त हायस्कूल |
महाविद्यालय | युनिव्हर्सिटी ऑफ साउदर्न कॅलिफोर्निया |
प्रशिक्षक | बॉब कर्सी (Bob Kersee) |
ऑलिम्पिक कामगिरी | पाच वेळा ऑलिम्पियन (2004, 2008, 2012, 2016, 2020) |
11 वेळा ऑलिम्पिक पदके (7 सुवर्ण, 3 रौप्य, 1 कांस्य) | |
विश्वविजेती कामगिरी | सुवर्ण (4×400 मी. रिले, 4×400 मी. मिश्र रिले) |
पदके 19 (14 सुवर्ण, 3 रौप्य, 2 कांस्य) |
जॅकी जॉयनर : मैदान गाजविणारी ‘फर्स्ट लेडी’
Follow us
[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”1485″]