चेस बॉक्सिंग : चाली रचा, नाही तर ठोसे द्या…! (भाग 1)
विश्वनाथन आनंदचा बॉक्सिंगशी संबंध नसला तरी बुद्धिबळाचा बॉक्सिंगशी थेट संबंध आहे. आता तुम्ही म्हणाल, बुद्धिबळाचा बॉक्सिंगशी काय संबंध? पण आहे. हा एक नवा हायब्रिड गेम आहे. या खेळाचं नाव आहे ‘चेस बॉक्सिंग.’ (Chess Boxing) यात बुद्धिबळाच्या तिरकस चाली आहेत आणि मुठीचे ठोसेही आहेत. चकित होण्याचे कारण नाही. कारण हा खेळ १९९२ पासून जगात लोकप्रिय होत आहे. भारतानेही हा खेळ आता स्वीकारला आहे. आपला एक गैरसमज झालेला आहे, तो म्हणजे बुद्धिबळ खेळणारे नाजूक देहयष्टीचे आणि बुद्धिमान असतात. त्यामुळेच ते या खेळात आपला लौकिक सिद्ध करतात. याउलट मुष्टियुद्ध म्हंटलं, की आपल्या डोळ्यांसमोर मुहम्मद अली, माइक टायसनसारखे मजबूत देहयष्टीचे खेळाडू येतात. वाटतं, यांच्यासाठीच मुष्टियुद्ध (बॉक्सिंग) हा खेळ बनवला आहे. आता मात्र या दोन्ही खेळांचं मिश्रण म्हणजे बुद्धिबळ-मुष्टियुद्ध (chess boxing) खेळ अस्तित्वात आला आहे. गेल्या २७ वर्षांपासून या खेळाने जगभरातील मुष्टियोद्ध्यांवर गारूड केलं आहे. विशेष म्हणजे भारतासह जर्मनी, इंग्लंड, रशियात हा खेळ विशेष लोकप्रिय आहे. काय आहे हा चेस बॉक्सिंग (Chess boxing) खेळ…?
या कॉमिक पुस्तकाने दिला चेस बॉक्सिंग खेळाला जन्म
या खेळाची कल्पना एका कॉमिक पुस्तकाने मांडली आणि तिला मूर्त रूप आणले इपे रुबिंघ यांनी. हा रुबिंघ एक डच कलाकार होता. त्याला ‘चेस बॉक्सिंग’ची कल्पना ‘फ्रॉइड इक्वेटिअर’ (Froid Equateur) या कॉमिक पुस्तकातून मिळाली. रुबिंघ साधारण १७- १८ वर्षांचा असताना त्याच्या हाती ‘फ्रॉइड इक्वेटिअर’ हे पुस्तक लागले. रुबिंघच्या वडिलांचा अनेक पुस्तकांचा संग्रह होता. त्यात हे पुस्तक होते. या पुस्तकाचा लेखक एंकी बिलाल आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर रुबिंघ यांच्या ते कायम स्मरणात राहिले. बिलालने या पुस्तकात बुद्धिबळ आणि बॉक्सिंगच्या मिश्रणाची एक कल्पना मांडलेली आहे. त्यात त्यांनी नमूद केले आहे, की भविष्यात चेस बॉक्सिंग खेळले गेलेच तर ते असे असायला हवे- १२ फेऱ्यांची हेविवेट बॉक्सिंग आणि नंतर बुद्धिबळाचा डाव, जो पाच तासांचा असावा. चेस बॉक्सिंग ही कल्पना रुबिंघ यांना आवडली खरी, पण बिलाल यांनी मांडलेली या खेळाची रचना त्यांना तितकीशी ‘लोकस्नेही’ वाटली नाही. त्यामुळे रुबिंघ यांनी त्यावर काम सुरू केले आणि बुद्धिबळ आणि मुष्टियुद्ध एकमेकांच्या जवळ आणण्यासाठी त्यांनी एक नियमपुस्तिका तयार केली. हेतू हाच, की या दोन्ही खेळांना समान महत्त्व प्राप्त होईल.
चेस बॉक्सिंग हा कलात्मक पद्धतीने खेळण्याची कल्पना जेव्हा पुढे आली तेव्हा खूप टीका झाली. चेस आणि बॉक्सिंग हे एकमेकांना पूरक कसे काय ठरतील? रुबिंघ यांना मात्र आशा होती, की हा खेळ लोकांना नक्की आवडेल. कारण माजी विश्वविजेता लीनॉक्स लेविस आणि विटाली क्लित्सोश्को हे दोघेही बुद्धिबळ खेळायचे. कारण बॉक्सिंगमुळे रागावर नियंत्रण मिळवता येतं आणि चेस बॉक्सिंगमुळे तर २०० टक्के रागावर नियंत्रण मिळवता येईल, असा रुबिंघ यांना विश्वास होता. त्यामुळे लोकांना आवडतील असे या खेळाचे नियम त्यांनी तयार केले.
डोकं चालवा नाही तर ठोसे मारा
या खेळाचे नियम अतिशय सोपे आहेत. एकूण ११ फेऱ्या असतात. बॉक्सिंगची एक फेरी झाली की नंतर बुद्धिबळाचा डाव असतो. अशा पद्धतीने बॉक्सिंगसाठी ६, तर बुद्धिबळासाठी ५ फेऱ्या असतात. जिंकायचे असेल तर तुम्ही नॉकआउट करा किंवा चेकमेट. यापैकी काहीही घडले नाही तर मग ज्याचे सर्वाधिक गुण असतात तो विजयी ठरतो.
इथे खेळली पहिली चेस बॉक्सिंग स्पर्धा
जर्मनीत चेस बॉक्सिंगची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. कारण जर्मनीची राजधानी बर्लिनला २००३ मध्ये पहिल्या चेस बॉक्सिंग स्पर्धेचा मान मिळाला. या स्पर्धेनंतर तातडीने जागतिक चेस बॉक्सिंग महासंघाची स्थापना झाली आणि या संघटनेच्या अधिपत्याखाली याच वर्षी २००३ मध्येच नेदरलँडमधील अॅमस्टरडॅममध्ये पहिली जागतिक चेस बॉक्सिंग स्पर्धा झाली. त्यानंतर २००४ मध्ये बर्लिनमध्ये चेस बॉक्सिंग क्लबही अस्तित्वात आला. जागतिक चेस बॉक्सिंग महासंघाच्या अध्यक्षपदी अर्थातच या खेळाचा जनक इपे रुबिंघ हेच विराजमान झाले. चेस बॉक्सिंगला प्रोत्साहन देणे, प्रशिक्षण देणे जगभरात या खेळाचा प्रसार करणे असा या महासंघाच्या स्थापनेमागील उद्देश होता. या महासंघाचे ब्रिद म्हणजे ‘रिंगमध्ये लढाई आणि पटावर युद्ध’. या महासंघाशी संलग्न दोनच संघटना सध्या तरी आहेत. एक म्हणजे बर्लिनचा चेस बॉक्सिंग क्लब आणि दुसरा बल्गेरियन चेस बॉक्सिंग संघटना.
खेळाची पद्धत एकदम सोपी आहे. दोन्ही खेळाडू एकदा बॉक्सिंग रिंगमध्ये समोरासमोर येतात नि एकदा बुद्धिबळाच्या पटावर. हे दोन्ही खेळ आलटूनपालटून खेळायचे असतात. बुद्धिबळासाठी पहिली फेरी चार मिनिटांची फेरी असते, तर बॉक्सिंगसाठी तीन मिनिटांची एक फेरी. प्रत्येक फेरीनंतर एक मिनिटांचा ब्रेक म्हणजेच विश्रांती असते. एकूण 11 फेऱ्यांच्या या सामन्यात हे खेळाडू बॉक्सिंग रिंगमध्ये एकूण 6 फेऱ्या, तर बुद्धिबळाच्या पटावर पाच फेऱ्या खेळतात. एकूणच काय, तर हा ब्रेन आणि ब्रॉन खेळ आहे.
बॉक्सिंगची फेरी झाली, की दोन्ही खेळाडू ग्लोव्हज काढतात आणि बुद्धिबळाच्या पटावर डोकं खाजवत बसतात. म्हणजे बुद्धी वापरतात. गंमत म्हणजे, बॉक्सिंग रिंगमध्ये असताना खेळाडूंना चीअरअप करण्यासाठी प्रेक्षक ओरडत असतात तेव्हा या मुष्टियोद्ध्यांना स्फुरण चढते, पण तेच जर बुद्धिबळाच्या पटावर आले, की हाच आवाज त्रासदायक ठरू शकतो. म्हणून त्यांच्या कानाला हेडफोन लावण्याची परवानगी असते. हेतू हाच, की प्रेक्षकांच्या आवाजाने लक्ष विचलित होऊ नये. बुद्धिबळाची एक फेरी 18 मिनिटांची असते. म्हणजे दोघांना प्रत्येकी नऊ मिनिटे मिळतात. चेस क्लॉकवर हे पटावरचे युद्ध असते. यात ब्लिट्झ गेमप्रमाणे एका चालीमागे अतिरिक्त वेळ (बुद्धिबळाच्या भाषेत इंक्रीमेंट) नसते. त्यामुळे वेगवान चाली रचून प्रतिस्पर्ध्यावर मात करण्याशिवाय गत्यंतर नाही. कारण टाइम कंट्रोल बुद्धिबळाच्या डावात ज्याचा वेळ लवकर संपतो तो हरतो. भलेही पटावर तुमच्याकडे वजीर, हत्ती, उंट असा सगळा सैन्यफाटा असला आणि समोरच्याकडे फक्त राजा असला तरी वेळेपुढे सर्व निरर्थक आहे.
कशी असते गुणपद्धत?
सामान्यपणे इतर ज्या बॉक्सिंग स्पर्धा असतात, तशीच ही स्पर्धा असते. त्यामुळे गुणपद्धत इथे वेगळी नाही. फरक एवढाच आहे, की केवळ बॉक्सिंगचे गुण विजयाचा निकाल निश्चित करू शकत नाही. त्यासाठी बुद्धिबळातही जिंकणे आवश्यक आहे. जर बॉक्सिंगमध्ये बरोबरी झाली तर बुद्धिबळाच्या निकालावर तुमचा विजय निश्चित होईल आणि बुद्धिबळात बरोबरी झाली तर बॉक्सिंगच्या गुणाधिक्यावर तुमचा विजय निश्चित होईल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, जर दोन्ही खेळांमध्ये बरोबरी झाली तर? त्यावरही उपाय आहे. बुद्धिबळात तुम्ही काळ्या मोहऱ्या घेऊन किती डाव जिंकला त्यावर विजय-पराजय निश्चित केला जातो.
चेस बॉक्सिंगचे नियम |
खेळाडू विनाकारण वेळ वाया घालवताना आढळला तर पंच त्या खेळाडूला 10 सेकंदांचा दंड करू शकतो. म्हणजे त्याला मिळालेल्या एकूण वेळेतून दहा सेकंद वजा केले जातात. |
खेळाडूंना बॉक्सिंग आणि बुद्धिबळाची शिस्त पाळणे आवश्यक आहे. |
हा नियम खूप महत्त्वाचा आहे. बुद्धिबळात ज्या खेळाडूचे किमान 1800 किंवा त्यापेक्षा अधिक एलो रेटिंग असेल, असाच खेळाडू या स्पर्धेसाठी पात्र असेल. केवळ खेळता येतं म्हणून कोणत्याही मुष्टियोद्ध्याला स्पर्धा खेळता येणार नाही. म्हणजे दोन्ही खेळाडू दोन्ही खेळातले माहीर असणे आवश्यक केले आहे. त्यातून कोणतीही पळवाट नाही. |
खेळाडूला बॉक्सिंगमध्ये किंवा बुद्धिबळात उत्तम गुण मिळवून जिंकण्याची समान संधी असते. |
स्पर्धेचा निकाल केव्हा निश्चित होतो? |
नॉकआउट किंवा तांत्रिक नॉकआउट असेल तर |
बुद्धिबळात चेकमेट झाली तर |
वेळेच्या बंधनात बुद्धिबळाचा डाव गमावला तर |
बुद्धिबळात वेळ वाया घालवल्यास किंवा बॉक्सिंग रिंगमध्ये निष्क्रियता दाखवल्यास पंच अशा खेळाडूला अपात्र ठरवू शकतील. तत्पूर्वी त्याला वॉर्निंग दिली जाईल. |
स्पर्धेतील वजनगट कसे असतात? |
चेस बॉक्सिंगमध्ये वेगवेगळे वजनगट आहेत. ऑक्टोबर 2014 पासून काही वयोगट आणि वजनगट नव्याने समाविष्ट करण्यात आले आहेत. |
पुरुष गट : 17 वर्षांपुढील वयोगट |
लाइटवेट : जास्तीत जास्त 70 किलो वजन |
मिडलवेट : जास्तीत जास्त 80 किलो |
लाइट हेविवेट : जास्तीत जास्त 90 किलो |
हेविवेट : 90 किलोपेक्षा जास्त |
महिला गट : 17 वर्षांपुढील वयोगट |
लाइटवेट : 55 किलोपर्यंत वजन |
मिडलवेट : 65 किलोपर्यंत |
लाइट हेविवेट : 75 किलोपर्यंत |
हेविवेट : 75 किलोपुढील |
[jnews_widget_facebookpage title=”Follow us Facebook Page: kheliyad” url=”https://www.facebook.com/kheliyad” small=”true” header_icon=”fa-facebook-square” url=”https://www.facebook.com/kheliyad” header_type=”heading_3″ header_background=”#3b5998″ header_text_color=”#ffffff”]
5 Comments