All Sportssports newswrestling

महिला कुस्तीगिरांचे शोषण होतेय?

महिला कुस्तीगिरांचे शोषण होतेय?

महिला कुस्तीगिरांचे शोषण होतेय? सध्या या प्रश्नावरून संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या महिला कुस्तीगिरांचे शोषण दुसरेतिसरे कोणी नाही, तर भारतीय कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष ब्रजभूषण शरण सिंह यांनी केलं आहे, असा थेट आरोप भारताची आघाडीची मल्ल विनेश फोगट यांच्यासह भारताच्या आघाडीच्या पहिलवानांनी केला आहे. भारतीय कुस्तीगिरांनी जे आरोप ब्रजभूषण शरण सिंह यांच्यावर केले आहेत, त्यातील सर्वांत गंभीर आरोप म्हणजे लैंगिक शोषणाचा. विनेश फोगटने म्हटले आहे, की ‘माझ्यासोबत अशा महिला पहिलवान आहेत, ज्यांचं शोषण ब्रजभूषण शरण सिंह यांनी केलं आहे!’ ब्रजभूषण शरण सिंह यांनीही एक वक्तव्य केलं, की ‘मी जर तोंड उघडलं तर त्सुनामी येईल!’ या दोघांचीही वक्तव्ये धक्कादायक आहेत. विनेश फोगटने केलेले आरोप गंभीर असतानाही त्यावर काही जण टीका करताना आढळत आहेत आणि ब्रजभूषण शरण सिंह यांनी दिलेला इशारा म्हणजे दडपशाही किती भयंकर असावी, याची कल्पना न केलेली बरी. कुस्तीच नाही तर जवळपास सर्वच खेळांमध्ये महिला खेळाडूंचं शोषण होतंय. मग ते लैंगिक असो वा मानसिक छळ असो. कुस्तीगिरांच्या या आंदोलनाकडे या सगळ्या खेळांतील शोषणाविरुद्धचा एक ‘बुलंद आवाज’ म्हणूनच पाहायला हवं.

ऑलिम्पिकमध्ये पदके मिळवून देत देशाची मान उंचावणाऱ्या मल्लांनी 18 जानेवारी 2023 पासून नवी दिल्लीच्या जंतर मंतरवर ठिय्या आंदोलन सुरू केले. आघाडीची मल्ल विनेश फोगट, ऑलिम्पिक पदकविजेती साक्षी मलिकसह बजरंग पुनिया, रवी दहिया यांच्यासारख्या जवळपास 30 मल्लांनी भारतीय कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष ब्रजभूषण शरण सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. भारताची आघाडीची मल्ल विनेश फोगटने तर लखनऊ कुस्ती शिबिरात महिला मल्लांचे लैंगिक शोषण झाल्याचा थेट आरोप केला आहे.

“गेल्या कित्येक वर्षांपासून भारताच्या महिला कुस्तीगिरांना लैंगिक शोषणाला सामोरे जावे लागत असून, आतापर्यंत वीस महिला कुस्तीगिरांचे लैंगिक शोषण झाले आहे. विशेष म्हणजे त्यापैकी काही महिला पहिलवान आमच्यासोबत आंदोलनात सहभागी होत दाद मागण्यासाठीही आल्या आहेत,” असे विनेश फोगटने आंदोलनप्रसंगी सांगितले. महिला मल्लांवरील अत्याचाराबद्दल सांगताना विनेशला अश्रू अनावर झाले होते. या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह मंत्रालयाने तातडीने लक्ष घालावे, अशी विनंतीही विनेशने केली. मोदी आणि गृह मंत्रालयापुढे शोषणास बळी पडलेल्या मल्लांची नावे सांगू, असेही विनेश म्हणाली. आंदोलन सुरू झाले, त्याच वेळी केंद्र सरकार व गृह मंत्रालयाने दखल घ्यायला हवी होती. मात्र, तसं झालं नाही. कारण हे गंभीर आरोप ज्या व्यक्तीवर करण्यात आले, ती व्यक्ती भाजपचा बाहुबली नेता आहे. “हा आरोप म्हणजे माझ्याविरुद्धचा कट असून, एका बड्या व्यावसायिकाच्या सांगण्यावरून हे नाट्य सुरू आहे,” असं ब्रजभूषण शरण सिंह म्हणतात. दंबग नेता म्हणून ओळखले जाणारे ब्रजभूषण शरण सिंह या बड्या व्यावसायिकाचं नाव का जाहीर करीत नाहीत, हा प्रश्नच आहे.

[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=rQAm81JF0GI” column_width=”4″]

“जर लखनऊला येण्यास कुस्तीगिरांनी मनाई केली तर त्यांच्यावर थेट बंदी घालण्यात येते. जे काही आम्ही भोगले आहे, तसे भविष्यातील कुस्तीगिरांच्या बाबतीत होऊ नये, एवढंच मला वाटतं.”
– साक्षी मलिक, ऑलिम्पियन कुस्तीपटू

अन्यथा स्पर्धेत भाग घेणार नाही!

कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष कुस्तीगिरांशी अयोग्य वर्तन करीत आहे, असा थेट आरोप जागतिक अजिंक्यपद आणि ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या बजरंग पुनियाने म्हटले आहे. “कुस्तीगिरांना शिवीगाळ करणे, श्रीमुखात भडकावणे हे तर नित्याचेच आहे. बऱ्याचदा मल्लांना आर्थिक मोबदल्यापासूनही वंचित ठेवले जाते. अशा अध्यक्षाला पदावरून हटवत नाही, तोपर्यंत मी स्पर्धेत भाग घेणार नाही,” असा पवित्रा बजरंग पूनियाने घेतला आहे.

आत्यहत्येचा विचार होता : विनेश

या साऱ्या प्रकरणामुळे नैराश्य आल्याने आत्महत्येचा विचार मनात आला होता, असे विनेश फोगट उद्वेगाने म्हणते. जंतर मंतरवरील कुस्तीगिरांच्या आंदोलनाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विनेशने दिलेल्या माहितीनुसार, लखनऊ सराव शिबिरात अध्यक्ष ब्रजभूषण यांच्यासह काही प्रशिक्षकही महिला कुस्तीगिरांचे लैंगिक शोषण करीत होते. प्रशिक्षक आणि अध्यक्षांना काही महिला अधिकाऱ्यांचे पाठबळही लाभत होते, असाही विनेशचा आरोप आहे. विनेश, साक्षी, संगीता आणि बजरंगसह जागतिक अजिंक्यपद पदकविजेती सरिता मोर, सत्यव्रत मलिक, जिंतेंद्र, सुमित मलिक यांनीही या ठिय्या आंदोलनात भाग घेतला होता. मात्र, एका बाहुबली नेत्याविरुद्ध आवाज उठवणे सोपे नव्हते. या कुस्तीगिरांना धमकावण्याचेही प्रयत्न झाले.

ठार मारण्याची धमकी

कुस्ती फेडरेशनच्या काही अधिकाऱ्यांनी आपल्याला ठार मारण्याची धमकी दिल्याचे विनेश सांगते. “खूप दिवसांपासून मी हे सहन करीत आहे. सतत भीतीच्या छायेत जगते आहे अन् त्यातूनच वाट काढत मी आज इथे न्याय मागण्यास आले आहे. मी सीनिअर मल्ल असल्याने पुढाकार घ्यावा असे शोषणास बळी पडलेल्या महिला मल्लांनी सांगितले. मी त्यांच्यासाठी इथे येणार असं कळल्यावर मला ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत,” असा आरोप विनेशने केला आहे.

केंद्र सरकारला आली जाग

विनेश आणि इतर मल्लांनी केलेल्या आरोपांची अखेर क्रीडा मंत्रालयाने दखल घेतली. या आरोपांबाबत भारतीय कुस्ती महासंघाकडे स्पष्टीकरणही मागण्यात आले आहे. हे स्पष्टीकरण पुढील ७२ तासांत देण्याचा आदेशही क्रीडा मंत्रालयाने काढला. स्पष्टीकरण दिले नाही, तर क्रीडा मंत्रालय नियमानुसार कारवाई करेल, असाही इशारा देण्यात आला. अर्थात, ही भूमिका केंद्र सरकारला घेणे भाग पडले आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हे आंदोलन थेट केंद्र सरकारलाच अडचणीत आणणारं होतं. कारण केंद्रात सत्ता भाजपची आणि ज्याच्याविरुद्ध आरोप तोही भाजपचाच खासदार. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे अध्यक्षांना पदावरून हटवणे आणि कुस्ती महासंघ बरखास्त करणे या मागणीवर मल्ल ठाम होते. त्यात कोणतीही तडजोड त्यांना मान्य नव्हती. त्यामुळेच क्रीडा मंत्रालयाचा कोणताही प्रस्ताव या मागण्यांशिवाय स्वीकारलाच जाणार नव्हता. आंदोलन लांबले तर त्याचा फटका थेट केंद्रातील भाजप सरकारला बसणार होता. त्यामुळेच क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाकडे स्पष्टीकरण मागितले. यातले सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मल्लांनी आंदोलन सुरू केल्याने जगभरात हा विषय चर्चेचा ठरला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा डागाळलीच, मात्र दखल घेतली गेली नाही तर त्याचे पडसाद क्रीडाविश्वात उमटतील. त्यामुळे आंदोलनापासून परावृत्त करण्यासाठी केंद्राला निर्णय भाग पडले. अर्थात, यामुळे कुस्तीगिरांचेच नाही, तर क्रीडाविश्वाचेही समाधान होणार नव्हते.

झालंही तसंच. “सरकारने आम्हाला आश्वासन दिलं; पण ते समाधानकारक नाही. त्यामुळे 20 जानेवारी 2023 पर्यंत ब्रजभूषण शरण सिंह यांना पदावरून हटवले नाही तर आम्ही त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार करू,” असा आक्रमक पवित्रा कुस्तीगिरांनी 19 जानेवारी 2023 रोजी घेतला. त्यामुळे आंदोलन सुरूच राहणार हे स्पष्टच झालं. ब्रजभूषण यांच्या अध्यक्षतेखालील संपूर्ण भारतीय कुस्ती महासंघ तत्काळ बरखास्त करावा, अशी आंदोलन करणाऱ्या मल्लांची ठाम भूमिका आहे.

आघाडीचे मल्ल एकवटले

आंदोलनाच्या पहिल्या दिवशी 18 जानेवारीला विनेश फोगटसह ऑलिम्पिक पदकविजेती साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह मानाच्या स्पर्धा जिंकणारे मल्ल होते. दुसऱ्या दिवशी आंदोलनात आणखी आघाडीचे मल्ल सहभागी झाले. त्यात रवी दहिया (ऑलिम्पिक पदकविजेता) आणि दीपक पुनिया (जागतिक पदकविजेता) यांचीही भर पडली. हे आंदोलन म्हणजे भारतीय कुस्तीगिरांना संजीवनी देण्यासाठी उभारलेला हा लढा आहे, असं या कुस्तीगिरांचे म्हणणे आहे.

बबिता फोगटची मध्यस्थी

कुस्तीगिरांचे आंदोलन मागे हटत नसल्याने केंद्राने माजी कुस्तीगीर व भाजपची नेता बबिता फोगट यांची मध्यस्थी करण्याचा निर्णय घेतला. तसं पाहिलं तर बबिता फोगट यांची कुस्तीच्या आखाड्याव्यतिरिक्त पक्षात फारशी छाप पाडू शकलेली नाही. कुस्तीत भलेही प्रतिस्पर्ध्याची पकड मिळवून त्यांनी नावलौकिक मिळवला असेल. मात्र, राजकीय आखाड्यात तुम्हाला लोकांची नस ओळखता यायला हवी. बबिता फोगट यांच्याकडे नेमकं हेच कौशल्य नाही, याचा प्रत्यय 2021 मधील अल्ट बालाजीच्या ‘लॉकअप शो’मधून अनेकांना आला असेल. हा बिग बॉसच्याच धर्तीवर एक रिअॅलिटी शो होता. लॉकडाउनमध्ये सुरू झालेल्या या शोचं संचालन वादग्रस्त अभिनेत्री कंगना रनौटकडे होतं. बबिता फोगटसह वादग्रस्त अभिनेत्री पायल रोहतगी, कॉमेडियन मुनव्वर फारूकी, शिवम शर्मा, अंजली अरोरा अशी काही ‘बॅडास्ट’ मंडळी असल्याने हा शो कमालीचा यशस्वी झाला होता. या शोमध्ये स्वतंत्रपणे आपले विचार, भूमिका व्यक्त करणे आणि दिलेले टास्क चलाखीने पूर्ण करण्याचे कौशल्य आजमावले जात होते. यात अभिनय असणे किंवा आपल्या प्रोफेशनचा काडीचाही संबंध नव्हता. तुम्हाला फक्त नैसर्गिकपणे समाजात वावरण्याचं कौशल्य पार पाडायचं होतं. बबिता फोगट यात कुठेही आपली छाप पाडू शकल्या नाहीत. संपूर्ण शोमध्ये त्या पायल रोहतगीच्या अंकित झालेल्या दिसल्या. हे सगळं सांगायचा हेतू हाच, की बबिता फोगट केवळ कुस्तीपटू म्हणूनच देशाला परिचित आहेत. ‘दंगल’ चित्रपटाने तर त्या घरोघर पोहोचल्या. मात्र, त्यांचं व्यक्तिमत्त्व काय आहे, ‘लॉकअप शो’मधून समोर आलं. असो, तर इथं बबिता फोगट यांनी कुस्तीगिरांचं प्रतिनिधित्व करायला हवं होतं, अशी अपेक्षा अनेक मल्लांना होती. बबिता फोगट यांनी आंदोलनकर्ते मल्ल आणि सरकार यांच्यातील दुवा होण्याची तयारी दाखवली खरी. मात्र, त्या सरकारच्या प्रतिनिधींपैकी एक एवढीच भूमिका वठवू शकल्या. याउलट ऑलिम्पिक पदकविजेता मल्ल रवी दहिया आणि जागतिक स्पर्धेतील उपविजेता दीपक पुनिया यांनी गुरुवारी आंदोलक कुस्तीगिरांना उघडपणे पाठिंबा देत भूमिका स्पष्ट केली. सरकारशी झालेला संवाद कुस्तीगिरांना समाधानकारक वाटला नाही.

परिणामी, मल्लांनी आणखी आक्रमक पवित्रा घेतला. “आता आम्ही खूप वाट पाहणार नाही. शुक्रवारी आम्ही अध्यक्षांविरोधात तक्रार करणार आहोत,” अशी प्रतिक्रिया बजरंग पुनियाने दिली. “आम्हाला आश्वासन नको, कृती हवी. अध्यक्षांना पदावरून हटवत गजाआड करत नाही, तोपर्यंत आम्ही जंतर मंतरवरून हटणार नाही,” असा पवित्रा विनेश फोगटने घेतला.

इथे एक मुद्दा स्पष्ट करावासा वाटतो. सरकारला कोणत्याही मागणीशिवाय आंदोलन नको होते, तर मल्लांनाही लवकरात लवकर मागणी पूर्ण होण्याची आवश्यकता होती. कारण हे सगळे मल्ल भारताला पदक जिंकून देणारे आहेत. त्यांचा खेळ संपलेला नव्हता. त्यामुळे आंदोलनातला त्यांचा एकेक दिवस सरावाविना जाणे अजिबात परवडणारे नाही. वर्षानुवर्षे मेहनत केल्यानंतर त्यांनी पदके जिंकली आहेत. अशा परिस्थितीत मल्ल लैंगिक शोषणाविरुद्ध महिला मल्लांसाठी नेटाने लढत होते हे विशेष आहे.

पीडित मल्लांचा आंदोलनात सहभाग

आंदोलनाला सुरुवात झाली तेव्हा लैंगिक शोषण झालेल्या मल्लांपैकी केवळ दोन मुली हजर होत्या. दुसऱ्या दिवशी महिला कुस्तीगिरांची संख्या आणखी चारने वाढली. त्यांनी जंतर-मंतरवरील आंदोलनात सक्रिय सहभाग घेतल्याचे 20 जानेवारी 2023 रोजी विनेशने सांगितले.
भारताची युवा महिला कुस्तीगीर अंशू मलिकने ब्रजभूषण यांच्या वर्तनाबद्दल पत्रकारांशी संवाद साधला. गेल्या वर्षी 2022 मध्ये बल्गेरियात झालेल्या जागतिक ज्युनिअर अजिंक्यपद स्पर्धेच्या वेळी ब्रजभूषण शरण सिंह यांचे वास्तव्य खेळाडूंच्या हॉटेलातच होते. त्यांचे आसपास असणे महिला कुस्तीगिरांसाठी त्रासदायक झाले होते, असा अनुभव अंशू मलिकने सांगितला.

बंद खोलीत होते शोषण

[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=OmocC43-zNE” column_width=”4″]

क्रीडामंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर विनेश फोगटने बृजभूषण शरण सिंह यांच्याविर धक्कादायक आरोप केला आहे. विनेश म्हणाली, की महिला पहिलवानांचं बंद खोलीत शोषण होतं. या खोलीत कॅमेरा नसतो. ज्या मुलींचे शोषण झाले त्या स्वत:च या घटनेच्या साक्षीदार आहेत. विनेश फोगटने माध्यमांशी बोलताना आरोप केला, की अखेर असं काय कारण आहे, की राष्ट्रीय शिबिर लखनऊमध्येच आयोजित केले जाते? विनेश फोगटने असाही दावा केला आहे, की लखनऊमध्ये राष्ट्रीय शिबिरात महिला पहिलवानांचं लैंगिक शोषण होते. लखनऊच्या राष्ट्रीय शिबिरात अनेक प्रशिक्षक आणि डब्लूएफआयच्या अध्यक्षांनी महिला पहिलवानांचं लैंगिक शोषण केलं आहे.

काही महिलांचाही सहभाग

काही महिलांचाही यात सहभाग असल्याचा आरोप विनेश फोगटने केला आहे. डब्लूएफआयचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यासाठी महिला पहिलवानांशी संपर्क केला जायचा. बृजभूषण शरणसिंह याचं लखनऊमध्ये घर आहे. त्यामुळेच तेथे राष्ट्रीय शिबिर आयोजित केले जाते. त्यामुळे बंद खोलीत मुलींचे लैंगिक शोषण करणे सोपे जायचे.

‘लैंगिक शोषणाचे आमच्याकडे पुरावे’

महिला पहिलवान विनेश फोगट हिने आरोप केला आहे, की डब्लूएफआयचे अध्यक्ष महिला पहिलवानांचं खासगी जीवन आणि नात्यात हस्तक्षेप करण्याचाही प्रयत्न करायचे. पहिलवानांनी माध्यमांशी बोलताना दावा केला आहे, की आमच्याकडे भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षाविरुद्ध सगळे पुरावे आहेत. आमच्यासोबत पाच-सहा मुली आहेत, ज्यांचे लैंगिक शोषण झाले आहे. लैंगिक शोषण सिद्ध करण्यासाठी पुरावेही आहेत. अर्थात, आम्हाला या मुलींना सार्वजानिक करायचे नाही. पहिलवानांनी सांगितलं, की आम्ही या प्रकरणी याचिका दाखल करणार असून, बृजभूषण शरण सिंह यांचा राजीनामा घेऊन त्यांना जेलमध्ये पाठवू.

तासभर बैठकीत तोडगा नाहीच

बजरंग पुनिया, विनेश फोगट, अंशू, साक्षी मलिक, सत्यव्रत काडियन यांनी सरकारच्या प्रतिनिधींची 19 जानेवारी 2023 रोजी भेट घेतली. सरकारकडून केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, क्रीडा चिटणीस सुजाता चतुर्वेदी, भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे सरसंचालक संदीप प्रधान आणि सहसचिव कुणाल यांनी कुस्तीगिरांचे म्हणणे जाणून घेतले. तासभर चालेल्या या बैठकीत कुस्तीगिरांना आंदोलन थांबवण्याची विनंती करण्यात आली तसेच कारवाईचे आश्वासनही दिले गेले. मात्र नाराज कुस्तीगिरांना आश्वासनाऐवजी ठोस कृती हवी आहे. भारतीय कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष ब्रजभूषण यांना पदावरून हटवून या फेडरेशनसह देशातील राज्य असोसिएशनही बरखास्त कराव्यात, असे कुस्तीगिरांचे म्हणणे आहे.

भारतीय कुस्ती महासंघ (डब्लूएफआय) तातडीने बरखास्त करण्याची मागणी मागे घेण्यास मल्लांनी स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप करणाऱ्या कुस्तीगीरांचे ठिय्या आंदोलन शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही कायम राहिले.

डब्लूएफआयचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध मल्लांच्या विरोधाच्या दुसऱ्या दिवशी 19 जानेवारी 2023 रोजी रात्री दहाच्या सुमारास क्रीडामंत्र्यांसोबत मॅरेथॉन बैठक सुरू झाली. सर्व मल्ल रात्री पावणेदोनच्या सुमारास ठाकूर यांच्या घरातून बाहेर पडले. या मल्लांनी बाहेर असलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींशी कोणतीही चर्चा केली नाही. ब्रजभूषण उत्तर देण्यापूर्वी कुस्तीगिरांना लक्ष्य करणार असल्याची चर्चा होती. त्यासाठी त्यांनी सुरुवातीला शुक्रवारी सकाळी दहाला आणि त्यानंतर सायंकाळी सहाला पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर केले. ही पत्रकार परिषद झाली नाही; पण ब्रजभूषण यांनी आपलं उत्तर पाठवलं आहे, असे त्यांचा मुलगा प्रतीक भूषण याने सांगितलं.

ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया, रवि दहिया, साक्षी मलिक आणि जागतिक स्पर्धेतील पदक विजेती विनेश फोगट या बैठकीत सहभागी झाले होते. सरकारी अधिकारी आणि विरोध करणाऱ्या मल्लांमध्ये झालेल्या बैठकीत कोणताही निर्णय न झाल्याने ठाकूर हिमाचल प्रदेशातून दिल्लीत पोहोचले. सरकारी अधिकाऱ्यांच्या मते, मल्ल पुन्हा क्रीडामंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. जोपर्यंत क्रीडा मंत्रालय बृजभूषण शरणसिंह यांचा राजीनामा घेण्यास सांगत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, अशी ठाम भूमिका मल्लांनी घेतली आहे. मल्लांना डब्लूएफआयकडून लेखी उत्तर हवं आहे. कारण सरकारने स्वत:च कुस्ती महासंघाकडे स्पष्टीकरण मागितलं आहे.

आंदोलन थांबवण्याचे प्रयत्न अयशस्वी

सरकारचं म्हणणं आहे, की मल्लांनी आधी आंदोलन थांबवावे. मात्र, डब्लूएफआय बरखास्त करण्याच्या मागणीवर खेळाडू ठाम राहिले. मल्लांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले, की ‘‘सरकार इतर मद्द्यांवर नंतर तोडगा काढू शकते. आम्हाला त्याबाबत काहीच अडचण नाही. मात्र, तत्पूर्वी डब्लूएफआय बरखास्त करायला हवी.’’
बजरंग, विनेश, अंशू मलिक, साक्षी आणि तिचे पति सत्यव्रत कादियान यांच्यासह मल्लांच्या एका पथकाने गुरुवारी सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. क्रीडा सचिव सुजाता चतुर्वेदी आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे (साई) महाप्रबंधक संदीप प्रधान यांच्याशी अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. तासभर चाललेल्या या बैठकीदरम्यान मल्लांना विरोध थांबवण्याची सूचना करण्यात आली आणि आश्वासन दिले, की त्यांच्या तक्रारींचे निरसन केले जाईल. सरकारची भूमिका मांडण्यासाठी माजी पहिलवान आणि भारतीय जनता पक्षाची नेता बबिता फोगटही बैठकीत सहभागी झाली होती.

चौकशी समितीच्या मागणीवर जोर

भारतीय कुश्ती महासंघाच्या (डब्लूएफआय) अध्यक्षाविरुद्ध लैंगिक शोषणाच्या आरोपांच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करण्याची मागणी भारतीय मल्लांनी शुक्रवारी, 20 जानेवारी 2023 रोजी भारतीय ऑलिम्पिक महासंघाकडे (आयओए) केली आहे. तत्पूर्वी मल्लांनी गुरुवारी क्रीडा प्रशासनाविरुद्ध एफआयआर नोंदविण्याची धमकी दिली होती. आयओएच्या अध्यक्षा पीटी उषा यांना पहिलवानांनी पत्र लिहिले आहे. पत्रात नमूद केले आहे, की बृजभूषण शरण सिंह यांनी अनेक युवा पहिलवानांचे लैंगिक शोषण केले आहे. या पत्रावर पाच पहिलवानांच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यात टोकियो ऑलिम्पिक पदक विजेता रवि दहिया आणि बजरंग पूनिया यांचाही समावेश आहे.
रियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणारी साक्षी मलिक आणि जागतिक कुस्ती स्पर्धेत पदक जिंकणारी विनेश फोगट आणि दीपक पूनिया यांनीही या पत्रावर स्वाक्षरी केली आहे. डब्लूएफआय बरखास्त करावी, या मागणीचा पहिलवानांनी पुनरुच्चार केला. पहिलवानांशी सल्लामसलत करून राष्ट्रीय महासंघाच्या संचालनासाठी नवी समिती नियुक्त केली जावी, अशी मागणीही पहिलवानांनी केली आहे.

‘…तर सुनामी येईल’

[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=n9MWXTYGx5g” column_width=”4″]

‘पत्रकार परिषदेतच मी आरोपांना उत्तर देणार आहे,’ असे खासगी मुलाखतीत सांगणारे ब्रजभूषण यांनी, ‘मी तोंड उघडले तर सुनामी येईल,’ असा इशारा त्यांनी कुस्तीगीरांना दिला. ‘मी राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही. मी याबाबत कोणासह चर्चाही केलेली नाही,’ असेही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. “हा आरोप म्हणजे माझ्याविरुद्धचा कट असून, एका बड्या व्यावसायिकाच्या सांगण्यावरून हे नाट्य सुरू आहे,” असे स्पष्टीकरण फेडरेशनचे अध्यक्ष ब्रजभूषण शरण सिंह यांनी दिले.

मी कोणाच्या दयेवर महासंघाचा अध्यक्ष झालेलो नाही. मी निवडून आलेला अध्यक्ष आहे. जनतेने मला निवडून दिले आहे.
– ब्रजभूषण शरण सिंग, अध्यक्ष, भारतीय कुस्ती महासंघ

भारतीय कुस्ती महासंघ तातडीने बरखास्त करण्यात यावा ही आमची मुख्य मागणी आहे. आम्ही अखेरच्या श्वासापर्यंत लढण्यास तयार आहोत.
– बजरंग पुनिया

भारतातील जवळपास सगळ्याच फेडरेशन आणि असोसिएशनमध्ये ब्रजभूषण यांनी आपल्य़ा माणसांना पदे दिली आहेत. त्या प्रत्येक ठिकाणी कुस्तीगिरांचे शोषण होते आहे. या सगळ्याच संघटनांना बरखास्त करायला हवे.
-साक्षी मलिक, ऑलिम्पिक पदकविजेती मल्ल

माझादेखील आंदोलन करणाऱ्या कुस्तीगीरांना पाठिंबा आहे. जोपर्यंत न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही लढणार आहोत.
– रवी दहिया, ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता मल्ल

लैंगिक शोषणासह बळी पडलेल्या एक-दोन मुली बुधवारी इथे आल्या होत्या. आज त्यातील आणखी पाच, सहा मुली आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. आम्ही त्यांची नावे जाहीर करू शकत नाही. त् कुणाच्या ती मुली आणि बहिणीदेखील आहेत. मात्र त्यांची नावे जाहीर करण्याची सक्ती झाली, तर तो भारतीय कुस्तीतील काळा दिवस ठरेल.
– विनेश फोगट, जागतिक पदकविजेती मल्ल

[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”73″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!