वर्णद्वेषाविरुद्ध बंड पुकारणारा बेसिल डी’ओलिव्हेरो
वर्णद्वेषाविरुद्ध बंड पुकारणारा बेसिल डी’ओलिव्हेरो
सर्वोत्तम क्रिकेट खेळण्याचं लक्ष्य असलेल्या दक्षिण आफ्रिकेचा बेसिल डी’ओलिव्हेरो (Basil D’Olivero) याला मात्र वर्णद्वेषाचाही सामना करावा लागला. वर्णद्वेषाविरुद्ध तो लढला. ज्या देशात वर्णद्वेष पराकोटीला होता, अशा देशात तो वंचितांची प्रेरणा बनला.
वर्णद्वेषाविरुद्ध लढणाऱ्या बेसिलने व्यवस्थेविरुद्धच बंड पुकारले होते. या अन्यायाविरुद्ध प्रकाश टाकण्यापूर्वीच त्याला दक्षिण आफ्रिका सोडावी लागली. आपल्या क्रिकेट कौशल्याची छाप टाकण्यात असमर्थ ठरल्याने तो इंग्लंडमध्ये गेला. तिथलंच नागरिकत्व त्याने पत्करलं. इंग्लंडच्या संघातही त्याला स्थान मिळालं. तोपर्यंत बेसिल आंतरराष्ट्रीय स्तरावर कमालीचा चर्चेत आला होता. 1968 मध्ये दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडची संघाचा दौरा रद्द केला. कारण काय, तर इंग्लंड बेसिलला गोऱ्यांविरुद्ध स्पर्धेत सहभागी करणार होते म्हणून.
त्यामुळेच दक्षिण आफ्रिका 1991 पासून दीर्घकाळ एकही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळू शकला नाही. वर्णद्वेषाविरुद्धच्या लढाईचं नेतृत्व करणारे नेल्सन मंडेला यांनी बेसिल डी’ओलिव्हेरो प्रकरण आपल्या आंदोलनाच्या अखेरच्या टप्प्यातलं निर्णायक वळण असल्याचं म्हंटलं आहे.
बेसिल डी’ओलिव्हेरो याला नंतर पार्किन्सनने घेरलं आणि 19 नोव्हेंबर 2011 रोजी इंग्लंडमध्ये वयाच्या 80 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला, असं क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने म्ंहटलं आहे. कदाचित त्याने आपल्या वयाबाबत खोटं सांगितलं असावं, कदाचित तो तीन-चार वर्षे मोठाही असेल. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने त्याबाबत कोणतीही माहिती दिली नाही.
बेसिल डी’ओलिव्हेरो इंग्लंडचा उत्तम क्रिकेटपटू होता. तो 44 प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळला होता. इंग्लिश क्रिकेट लीगमध्ये 19,490 धावा आणि कसोटी सामन्यांत 1,859 धावा केल्या. ही विशेष कामगिरी मानली जाते. अभ्यासकांच्या मते, तो जर लवकर इंग्लंडमध्ये दाखल झाला असता, तर हीच संख्या दुप्पट असती.
डी’ऑलिव्हेरा प्रकरणावर ‘नॉट क्रिकेट’च्या नावाखाली वत्तांकन करणारे पॉल यूल यांनी डी’ओलिव्हेरोच्या वेब साइटवर मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी सांगितले, की त्याचं क्रिकेटकौशल्य उजवंच होतं. त्याबद्दल अजिबात शंका नाही. मात्र, तो क्रिकेटमुळे नाही, तर 20 व्या शतकातील राजकारणामुळे केंद्रस्थानी आला होता.
पॉल यूल म्हणतात, “इथं एक माणूस होता, जो विशेषत: गर्द रंगाचा दिसत नव्हता. मात्र, दक्षिण आफ्रिकेत भेदाभेदाचा अर्थ होता, की एक तर गोरा नाही तर काळा. असंच वर्गीकरण केलं जायचं. त्यामुळेच आपल्या देशाच्या राष्ट्रीय क्रीडाजीवनात त्याला कोणतीही भूमिका निभावता आली नाही.”
डी’ओलिव्हेरो भारतीय-पोर्तुगाली वारसा असल्याने त्याच्या रंगाचे सहजपणे वर्गीकरण केले होते. अनेक इतर अश्वेत (गोरे नसलेले) क्रिकेटपटूंना मात्र पेन्सिल परीक्षणातून जावे लागले. ते यासाठी, की हे खेळाडू कोणत्या लीगमध्ये खेळण्यास योग्य आहेत. ही चाचणी कौशल्यावर नाही, तर रंगाच्या आधारावर होती. खेळाडूच्या केसांना पेन्सिल लावली जायची. जर पेन्सिल खाली पडली तर तो खेळाडू रंगीत मानला जायचा. मग त्याला रंगीत लीगमध्ये ठेवले जायचे. जर पेन्सिल पडली नाही, तर तो कृष्णवर्णीय ठरवला जायचा आणि त्याला काळ्या लीगमध्ये ठेवले जायचे.
केपरंगी हे दक्षिण आफ्रिकेचे वांशिक वर्गीकरण आहे. यात प्रामुख्याने मिश्र वंशातील आफ्रिकन, आशियाई आणि युरोपीय वंशाच्या व्यक्तींचा समावेश आहे. यामुळे त्यांचा वेगळा गट तयार झाला, जो दक्षिण आफ्रिकेत केपरंगी अल्पसंख्याक गट म्हणून ओळखला गेला. पश्चिम केप प्रांतात हा गट आढळत असल्याने त्यांना केपरंगी असे म्हंटले जाते.
1950 च्या दशकात टेबल टेनिससह जागतिक खेळांमध्ये दक्षिण आफ्रिकेवर बहिष्कार टाकण्यात आला. वर्णभेदविरोधी आयोजकांना 1964 पर्यंत दक्षिण आफ्रिकेला ऑलिम्पिकपासून रोखण्यात यश आले. 1970 मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने आफ्रिकेवरील बहिष्कार मागे घेण्यात आला.
दक्षिण आफ्रिका 1889 पासून कसोटी सामन्यांसाठी संघांत केवळ गोऱ्यांचीच निवड करीत आला. कॅरेबियन, भारत आणि पाकिस्तानसारख्या देशांत हा खेळ बहरत असताना दक्षिण आफ्रिका केवळ इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील गोऱ्या संघांविरुद्धच खेळताना दिसला. पीटर ओबोर्न यांनी 2004 मध्ये ‘बेसिल डी’ओलिव्हेरो, क्रिकेट आणि कॉन्स्पिरसी : द अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकात म्हटले आहे, की क्रिकेट हा गोर्यांचा खेळ आहे, असे सांगून दक्षिण आफ्रिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याचे समर्थन केले. कृष्णवर्णीय किंवा अश्वेत लोक अत्यंत खालच्या पातळीवर खेळतात अशी धारणा त्यांच्यात होती.”
बेसिल लुईस डी’ओलिव्हेरो शिंप्याचा मुलगा. शिंप्याचं पोरगं काय क्रिकेटमध्ये नाव थोडीच कमावणार, असं म्हंटलं जायचं. मात्र, केपटाउनच्या परिसरातील मैदाने गाजवत बेसिल डी’ओलिव्हेरोने टीकाकारांची तोंडे बंद केली. केपटाउनमध्ये 4 ऑक्टोबर 1931 रोजी जन्मलेल्या अश्वेत डी’ओलिव्हेरो संघातील स्टार खेळाडू ठरला. केनिया दौऱ्यात तो अश्वेत संघाचा कर्णधारही होता.
अखेर बेसिल डी’ओलिव्हेरो याने सोडला देश
मात्र, वयाच्या विसाव्या वर्षी त्याला जाणवलं, की दक्षिण आफ्रिकेत खेळण्यात काहीच हशील नाही. कारण वर्णद्वेष पराकोटीला पोहोचलेला होता. कृष्णवर्णीय व रंगीत वर्णाच्या खेळाडूंचा वेस्ट इंडीजचा प्रतिष्ठित संघाविरुद्ध दक्षिण आफ्रिका संघाचा दौरा होता. या संघाचा कर्णधार डी’ओलिव्हेरो होता. मात्र, वर्णद्वेषी लोकांच्या विरोधामुळे हा दौरा रद्द करण्यात आला.
त्यामुळेच डी’ओलिव्हेरोने दक्षिण आफ्रिका सोडण्याचा निर्णय घेतला. त्याने इंग्लंडमधील एक प्रमुख क्रिकेट समालोचक जॉन अरलॉट याला पत्र लिहून मदत मागितली. अरलॉट याच्या मदतीने डी’ओलिव्हेरो लँकेशायर लीगमधील एका दुय्यम संघाशी करारबद्ध झाला.
डी’ओलिव्हेरोचं इंग्लंडमधील जगणं तसं आव्हानात्मकच होतं. दारिद्र्याचे चटके सोसत होता. दीर्घकाळापासून रंगभेदात होरपळलेला डी’ओलिव्हेरो स्वत:ला अश्वेतांच्या मैदानावर उत्तम जीवन जगण्याचा व्यर्थ शोध घेत होता. काहीही असो, पण सुरुवात संथ झाली तरी नंतर त्याच्या खेळाने गती पकडली. सोबतीला पत्नी, मुलगा होता. कुटुंबच त्याच्यासाठी सर्वस्व होतं. अखेरीस इंग्लंडच्या राष्ट्रीय संघात त्याने स्थान मिळवलं.
इंग्लंडचा दक्षिण आफ्रिका दौरा होणार होता, तेव्हा डी’ओलिव्हेरोने इंग्लंडच्या संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, इंग्लंडच्या क्रीडा प्रशासनाने, तसेच मेरिलबोन क्रिकेट क्लबने त्यास नकार दिला. अधिकाऱ्यांनी सांगितले, की तो परदेशी खेळाडू असल्याने त्याला संघात घेतले नाही, असे वृत्त ब्रिटिश वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले. नंतर कळले, की दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष जॉन व्होर्स्टर यांनी डी’ऑलिव्हेरो याच्या इंग्लंड संघातल्या निवडीस आक्षेप घेतला होता. त्याला जर संघात घेतले तर आम्ही कार्यक्रम रद्द करू, अशी धमकी दिली होती.
डी’ओलिव्हेरोचं नशीब पाहा, इंग्लंड संघातला एक खेळाडू जखमी झाल्याने मेरिलबोन क्रिकेट क्लबचं मतपरिवर्तन झालं आणि त्यांनी त्या खेळाडूच्या जागी डी’ओलिव्हेरो याची निवड केली. दक्षिण आफ्रिकेला हे अजिबात रुचलं नाही. दक्षिण आफ्रिकेने डीओलिव्हेरोला संघातून नाव मागे घेण्यासाठी मोठी लाच देण्याचा प्रयत्न केला, तसेच दक्षिण आफ्रिकेत प्रशिक्षक म्हणून संधी देण्याचा प्रस्ताव ठेवला. डी’ओलिव्हेरो यानेच ही माहिती दिली. मात्र, डी’ओलिव्हेरो याने स्पष्टपणे नकार दिल्याने ही स्पर्धाच रद्द करण्यात आली.
महाराणी एलिझाबेथ यांनी 1969 मध्ये डी’ओलिव्हेरो याला ‘ऑर्डर ऑफ दि ब्रिटिश एम्पायर’चा अधिकारी बनवलं. पुढे 2005 मध्ये त्याला पदोन्नती देत कमांडर केलं. दक्षिण आफ्रिकेसाठी तो कधी खेळला नाही. असे असतानाही 2000 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील शतकातील दहा क्रिकेटपटूंमध्ये डी’ओलिव्हेरो याला नामांकन मिळाले होते. एवढेच नाही, तर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान कसोटी मालिकेला डी’ओलिव्हेरो याचं नाव देण्यात आलं.
डी’ओलिव्हेरो वयाच्या चाळिशीपर्यंत इंग्लिश क्रिकेटच्या प्रमुख विभागांत खेळला. बहुतांशी क्रिकेटपटू वयाच्या तिशीतच निवृत्त होतात. डी’ओलिव्हेरो मात्र वयाच्या चाळिशीतही खेळत होता. “आधी मी फक्त खेळाडू होतो. इंग्लंडमध्ये आल्यानंतर शिखरावर पोहोचलो,” असे डी’ओलिव्हेरो म्हणतो.
[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”cricket”]