अँजेलो मॅथ्यूज टाइम्ड आउट
वक़्त ने किया क्या हंसीं सितम…
‘वक़्त ने किया क्या हंसीं सितम, तुम रहें न तुम हम रहें न हम…’ हे ‘कागज के फूल’ चित्रपटातील कैफी आजमींचं गाणं फार सुरेख आहे. विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील बांगलादेशविरुद्ध श्रीलंका या सामन्यात हे गाणं प्रकर्षाने आठवलं. या जेंटलमन खेळात श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज ‘टाइम्ड आउट’ (Timed Out) नियमाचा बळी ठरला आणि नवा इतिहास घडला. तो दोन मिनिटांच्या आत चेंडूचा सामना करू शकला नाही, म्हणून नियमाप्रमाणे तो बाद ठरला. हा असा नियम होता, ज्याची गेल्या १४६ वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटला कधीच गरज भासली नव्हती. मात्र, या अवघ्या दोन मिनिटांत संपूर्ण विश्व दोन देशांत विभागले गेले. ‘मंकडिंग’च्या नियमावरही आयपीएलपासून महिला क्रिकेटपर्यंत असेच द्वंद्व उभे राहिले होते. अर्थात, क्रिकेटच्या नियमाप्रमाणे शाकीब चूक नसेलही. मात्र, क्रीडाभावनेत तो सपशेल ‘बाद’ ठरला, यात दुमत नाही. नियम माणसांसाठीच असतात; मशिनसाठी नाहीत. तरीही कोण योग्य, कोण अयोग्य हे द्वंद्व यानिमित्ताने थांबणार नाही.
Contents
- अँजेलो मॅथ्यूज असा ठरला टाइम्ड आउट
- नियम काय सांगतो?
- नियमावर पंच काय म्हणाले?
- …तर गांगुली ठरला असता पहिला ‘टाइम्ड आउट’
- या निमित्ताने धोनीच्या खिलाडू वृत्तीची एक आठवण…
- खिलाडू वृत्तीवर प्रश्नचिन्ह
- प्रथमश्रेणीत मात्र सहा वेळा ‘टाइम्ड आउट’!
- … तर अँजेलो मॅथ्यूज ‘टाइम्ड आउट’ नसता
- मॅथ्यूजचे काय चुकले?
- का हवा ‘टाइम्ड आउट’चा नियम?
अँजेलो मॅथ्यूज असा ठरला टाइम्ड आउट
वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामना सहा नोव्हेंबर 2023 रोजी झाला. तसं पाहिलं तर या सामन्याचं महत्त्व फारसं उरलं नव्हतं. कुणाच्याही जय-पराजयाने दोन्ही संघांना उपांत्य फेरीच्या आशा नव्हत्याच. प्रेक्षकांची संख्याही यथातथाच होती. फलंदाजी करताना श्रीलंकेचा चौथा गडी समरविक्रमा बाद झाला, त्या वेळी फलकावर 24.2 षटकांत 135 धावा झालेल्या होत्या. अँजेलो मॅथ्यूज मैदानावर उतरला तेव्हा त्याने सर्वप्रथम हेल्मेट अॅडजस्ट केलं. मात्र, त्याच्या हेल्मेटमध्ये काही तरी समस्या उद्भवली. त्याने ते परिधान केल्यानंतर हेल्मेटची पट्टी तुटली. त्या वेळी त्याने डगआउट खेळाडूकडे इशारा केला, की हेल्मेट बसत नाही, तू दुसरे घेऊन ये. या दरम्यान काही मिनिटे उलटली. शाकीब उल हसनने पाहिलं, की अँजेलो मॅथ्यूज दुसरे हेल्मेट मागण्यासाठी खेळपट्टीबाहेर गेला आहे. तो लगेच अंपायरकडे गेला आणि निर्धारित दोन मिनिटे झाली आहेत. हे नियमाविरुद्ध असल्याचे अंपायरच्या निदर्शनास आणून दिले. अंपायरने नियमानुसार अँजेलोला बादचा निर्णय दिला. अँजेलोने दुसरे हेल्मेट मागवले होते. त्याच्या हातात नवे आणि दुसरे तुटलेले असे दोन्ही हेल्मेट होते. ते बांगलादेशच्या कर्णधाराला दाखवले आणि निर्णय मागे घेण्याची दोन वेळा विनंती केली. अंपायरकडेही विनंती केली. मात्र, अंपायर नियमापुढे हतबल होते, तर शाकीब मागे निर्णय घेण्यास तयार नव्हता. दुर्दैवाने मॅथ्यूजला आल्यापावली तंबूत परतावे लागले.
नियम काय सांगतो?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ‘40.1.1’च्या नियमानुसार, बाद झालेल्या खेळाडूने मैदान सोडल्यानंतर दुसऱ्या खेळाडूने दोन मिनिटांच्या आत चेंडूचा सामना करायला हवा. तसे न झाल्यास पंच त्या खेळाडूला बाद ठरवू शकतात. नेमक्या या नियमावर बोट ठेवत शाकीबने लाभ उठवला. हा दोन मिनिटांचा नियम वन-डेसाठी आहे. कसोटी सामन्यासाठी तीन मिनिटांचा अवधी असतो.
नियमावर पंच काय म्हणाले?
या घटनेनंतर ‘टाइम्ड आउट’च्या नियमाने संपूर्ण क्रिकेटविश्वाच्या भुवया उंचावल्या. कोण चूक, कोण बरोबर, यावरून सोशल मीडियावरही चर्चा सुरू झाली. मात्र, या सामन्याचे चौथे पंच अँड्रियन होल्डस्टोक यांनी महत्त्वाचा खुलासा केला. ते म्हणाले, की ‘हा निर्णय देण्यापूर्वी एक प्रोटोकॉल पाळला जातो. ज्या वेळी मॅथ्यूज खेळपट्टीवर उतरला, तेव्हापासून टीव्ही अंपायर सर्वांत आधी दोन मिनिटांवर लक्ष ठेवतो. तो मैदानावरील पंचाला माहिती देतो. हेल्मेटची स्ट्रॅप तुटण्यापूर्वीही दोन मिनिटांच्या आत चेंडूचा सामना करण्यासाठी मॅथ्यूज तयार नव्हता.’ याउलट मॅथ्यूजने पत्रकार परिषदेत सांगितले, की ‘माझ्याकडे पुरावे आहेत. टीव्ही फूटेज आहे. दोन मिनिटांना पाच सेकंद बाकी असताना मी चेंडूचा सामना करण्यासाठी तयार होतो. हे पुरावे आम्ही सर्वांसमोर ठेवू.’
…तर गांगुली ठरला असता पहिला ‘टाइम्ड आउट’
मॅथ्यूज ‘टाइम्ड्ड आउट’ पद्धतीने बाद होणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला फलंदाज ठरला. मात्र, दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ आने उदारपणा दाखवला नसता तर हा नकोसा विक्रम भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याच्या नावे १६ वर्षांपूर्वीच नोंदवला गेला असता. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात २००७ मध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात दुसऱ्यांदा ही घटना घडली. पहिल्या डावात ४१४ धावा केल्यानंतर दुसऱ्या डावात वसिम जाफर आणि वीरेंद्र सेहवाग हे भारताचे दोन्ही सलामीवीर तिसऱ्याच षटकात तंबूत परतले. फलंदाजीच्या क्रमवारीनुसार चौथ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर फलंदाजीला येणार होता. मात्र, दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी सुरू असताना सचिन काही काळ मैदानाबाहेर राहिल्यामुळे तितका वेळ त्याला फलंदाजीसाठी खेळपट्टीवर जाता येणार नाही, असे तिसऱ्या पंचांनी सांगितले. त्यामुळे सीमारेषेपर्यंत येऊन सचिन तिथेच उभा राहिला. सचिनच्या नंतर व्हीव्हीएस लक्ष्मण आणि त्यानंतर सौरव गांगुली फलंदाजीला येणे अपेक्षित होते. मात्र, सचिन फलंदाजीला जात असल्याचे पाहून लक्ष्मण शॉवर घेण्यासाठी बाथरूममध्ये गेला (लक्ष्मणची ही सवयच आहे. तो फलंदाजीला जाण्यापूर्वी शॉवर घेत असतो). इकडे गांगुली ट्रॅकसूट घालून ड्रेसिंग रूममध्ये फिरत होता. सचिनला फलंदाजीला जाता येणार नाही आणि लक्ष्मणसुद्धा तयार नाही हे कळताच भारताच्या गोटात एकच धावपळ झाली. सपोर्ट स्टाफच्या मदतीने गांगुली झटपट तयार होत गांगुली खेळपट्टीवर पोहोचला. मात्र, त्याला मैदानावर यायला सहा मिनिटे उशीर झाला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियमानुसार, कसोटी सामन्यांसाठी ‘टाइम्ड्ड आउट’ची वेळ तीन मिनिटे आहे. सामन्यात पंच म्हणून काम करणाऱ्या असद राऊफ आणि डॅरील हार्पर यांनी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅमी स्मिथला ‘टाइम्ड्ड आउट’ नियमाची आठवण करून दिली आणि गांगुलीच्या विरोधात अपील करायचे आहे का, असे विचारले. त्यावर खिलाडू वृत्ती दाखवत स्मिथने गांगुलीविरुद्ध अपील करण्यास नकार दिला आणि त्याला पुढे खेळू द्यावे, असे पंचांनी सांगितले. त्यानंतर गांगुलीने ४६ धावा काढल्या. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतावर पाच गड्यांनी मात केली.
या निमित्ताने धोनीच्या खिलाडू वृत्तीची एक आठवण…
[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=hFpSoRlpyMo” column_width=”4″]भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान 2011 मध्ये नॉटिंघम येथे तिसरा कसोटी सामना झाला, त्या वेळचा एक किस्सा आहे. त्या वेळी इयान बेल (Ian Bell) याच्या धावबादवरुन मोठा वाद उभा राहिला होता. त्या वेळी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) याने इयान बेल याला वादग्रस्त धावबाद केले. मात्र, धोनीच्या खिलाडू वृत्तीमुळे त्याला पुन्हा खेळण्यास माघारी बोलावले होते. एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बेल याने आपली चूक मान्य केली. धोनी त्या वेळी चूक नव्हता, याचीही कबुली त्याने दिली. झालं काय, की जुलै 2011 मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना सुरू होता. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इयॉन मॉर्गन आणि इयान बेल मैदानावर होते. चहापानापूर्वी अखेरच्या चेंडूवर मॉर्गनने चेंडू टोलवला. चेंडू सीमारेषेकडे गेला. बेलला वाटलं, की हा चौकार आहे. त्यामुळे बेलने खेळपट्टी सोडून मॉर्गनसोबत चर्चा करायला गेला. मात्र, इकडे मॉर्गनने मारलेला चेंडू प्रवीण कुमारने अडवत थ्रो केला. अभिनव मुकुंद याने यष्ट्या उडवत बेलला धावबाद केलं. पंचांनीही बेल याला धावबाद दिले. नेमके काय झाले हे प्रेक्षकांनाही समजले नाही. चहापानादरम्यान इंग्लंडचा कर्णधार अँड्र्यू स्ट्रॉस आणि प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांच्यात या धावबाद प्रकरणावर चर्चा झाली. त्यानंतर धोनीनेही खिलाडू वृत्ती दाखवत धावबादचे अपील मागे घेत बेल याला पुन्हा खेळण्याची संधी दिली. खरं तर इथेही नियमाप्रमाणे बेल बाद होताच. मात्र, धोनीच्या खिलाडू वृत्तीमुळे त्याला पुन्हा संधी दिली. याच खिलाडू वृत्तीमुळे धोनीला आयसीसी स्पिरिट ऑफ क्रिकेट ॲवॉर्डने गौरविण्यात आले होते.
खिलाडू वृत्तीवर प्रश्नचिन्ह
अँजेलो मॅथ्यूज नियमाप्रमाणे बाद आहे. मात्र, मानवतेच्या दृष्टीने पाहिले तर अशा पद्धतीने बाद देणे चूक आहे. कारण तो विनाकारण वेळ दडवत नव्हता. त्यामागे कारण होते. मात्र, हे करताना त्याने पंचांना तशी कल्पना द्यायला हवी होती. इथे मॅथ्यूज चुकला. असो. मुळात हेवेदावे विसरण्यासाठी खेळ महत्त्वाचा दुवा असतो. क्रिकेटला सभ्य माणसांचा खेळ म्हटले जाते. 2014 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात हाच अँजेलो मॅथ्यूज श्रीलंकेचा कर्णधार होता. त्या वेळी फिरकी गोलंदाज सचित्र सेनानायके याने जोस बटलरला ‘मंकडिंग’ पद्धतीने बाद केल्यानंतर त्याचे समर्थन मॅथ्यूजने केलेच होते. त्या वेळी मॅथ्यूज चूक होता, आज खिलाडू वृत्तीवर तोंडसुख घेताना तो योग्य कसा, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. नियम प्रत्येक माणसाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे असू शकतीलही. मात्र, खिलाडू वृत्तीचे काय? खेळातून ही खिलाडू वृत्ती विकसित होत नसेल तर ते नियम, ते खेळ काय उपयोगाचे?
प्रथमश्रेणीत मात्र सहा वेळा ‘टाइम्ड आउट’!
‘टाइम्ड आउट’चा नियम आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रथमच अवलंबण्यात आला असला तरी या नियमाचं अप्रूप वाटण्याचं काही कारण नाही. कारण अशा पद्धतीने बाद देण्याची ही काही पहिलीच घटना नाही. भलेही, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हा नियम प्रथमच अवलंबला असला तरी यापूर्वी सहा वेळा ‘टाइम्ड आउट’ देण्यात आले आहे. मात्र, हे सर्व ‘टाइम्ड आउट’ प्रथमश्रेणी क्रिकेट सामन्यातील आहेत.
… तर अँजेलो मॅथ्यूज ‘टाइम्ड आउट’ नसता
मेरीलबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) ‘टाइम्ड आउट’ निर्णयाचे समर्थन केले आहे. कारण मॅथ्यूजने हेल्मेट बदलण्यासाठी थेट ड्रेसिंग रूमकडे पाहून खूण केली. हे करण्यापूर्वी त्याने पंचांना याबाबत सांगितले असते तर तो या प्रकारे बाद होण्यापासून वाचला असता,’ असे ‘एमसीसी’ने 11 नोव्हेंबर 2023 रोजी स्पष्ट केले. ‘एमसीसी’ही क्रिकेटच्या नियमांचे संरक्षण करणारी संस्था आहे. ‘टाइम्ड आउट’चा हा निर्णय एरास्मस (दक्षिण आफ्रिका) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इंग्लंड) या मैदानावरील पंचांनी हा निर्णय दिला होता. त्या वेळी पंचांनी विचारणा केल्यावरही बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसनने मॅथ्यूजविरुद्धचे अपील मागे घेण्यास नकार दिला होता. मॅथ्यूजने सामन्यानंतर बांगलादेश संघावर टीका केली होती. एवढेच नव्हे तर सामन्यानंतर दोन्ही संघांनी एकमेकांशी हस्तांदोलनही केले नव्हते.
मॅथ्यूजचे काय चुकले?
आपले हेल्मेटची स्ट्रॅप तुटल्याचे मॅथ्यूजच्या लक्षात आले, त्या वेळी त्याने पंचांशी कोणतीही चर्चा केली नाही. कोणताही फलंदाज नवे साहित्य मागवतो, त्या वेळी त्याने पंचांना त्याची कल्पना द्यायला हवी. त्याने केवळ ड्रेसिंग रूमकडे पाहून खूण केली. त्याने पंचांना काय झाले, याची कल्पना दिली असती आणि पंचांकडून नव्या हेल्मेटसाठी वेळ मागून घेतला असता तर पंचांनी त्यासाठी नक्कीच वेळ दिला असता. त्यांनी ‘टाइम’ असे संबोधून मॅथ्यूज ‘टाइम्ड आउट’ होण्याची शक्यताही दूर केली असती. पंच ‘टाइम’ म्हणाले नाहीत, त्याचबरोबर अपील झाले त्या वेळी दोन मिनिटे उलटून गेली होती. त्यामुळे पंचांनी नियमानुसार मॅथ्यूजला बाद दिले. क्रिकेटच्या नियमानुसार, पंचांकडे त्या वेळी अन्य कोणताही पर्याय नव्हता, असे एमसीसीने पत्रकात नमूद केले आहे.
का हवा ‘टाइम्ड आउट’चा नियम?
‘टाइम्ड आउट’चा नियम का आवश्यक आहे, याचे स्पष्टीकरणही एमसीसीने दिले आहे. जर हा नियम नसता तर फलंदाज विनाकारण वेळ दवडतील. प्रकाश कमी होत आहे. सामना हरायचा नसेल, त्या वेळी ‘टाइम्ड आउट’चा नियम नसेल तर नवा फलंदाज मैदानात यायला वेळ घेऊ शकेल. त्यापेक्षाही मर्यादित षटकांच्या सामन्यांत षटकांची गती न राखल्याची शिक्षा कायम क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघालाच होते हेही लक्षात घ्यायला हवे, याकडेही एमसीसीने लक्ष वेधले आहे. वेळ वाया दवडणे हा उद्देश नसला, तरीही फलंदाज बाद झाल्यावर पुन्हा खेळ सुरू होण्यास जास्त वेळ जाऊ नये हा विचारही आहेच. खिलाडूपणा जपणे ही कोणा एका खेळाडू, एक संघ किंवा एका देशाची किंवा एका संस्कृतीची जबाबदारी नाही. प्रत्येक नियमाचा वेगवेगळ्या प्रकारे अर्थ काढता येऊ शकतो. त्याचबरोबर सर्वच गोष्टी विचारात घेऊन नियम तयार करणे अशक्य आहे. आता सामना कसा खेळायचा हे खेळाडूंवरच अवलंबून असते, असेही ‘एमसीसी’ने म्हटले आहे.
kheliyad.sports@gmail.com
[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”1805,65″]