All SportsCricketsports newsWomen Power

महिला टी20 क्रिकेट वर्ल्ड कप : कोण आहेत या जगज्जेत्या भारतीय कन्या?

महिला टी 20 क्रिकेट वर्ल्ड कप : कोण आहेत या जगज्जेत्या भारतीय कन्या?

भारतीय मुलींनी पहिल्यावहिल्या 19 वर्षांखालील महिला टी 20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावून इतिहास रचला. अंतिम लढतीत तितस साधू, अर्चनादेवी आणि पार्श्वी चोप्रा यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर भारताने इंग्लंडवर सात विकेटनी संस्मरणीय विजय नोंदवला.

दक्षिण आफ्रिकेतील पोचेफस्ट्रूमच्या ‘सेनवेस पार्क’मध्ये 29 जानेवारी 2023 रोजी ही लढत झाली. भारतीय संघाला या स्पर्धेत केवळ ऑस्ट्रेलियाकडून हार पत्करावी लागली होती, तर दुसरीकडे इंग्लंड संघ स्पर्धेत अपराजित होता. साहजिकच या संघांत कोण बाजी मारणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोचली होती. भारताची कर्णधार शेफाली वर्माने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवला. तितस साधू, अर्चनादेवी आणि पार्श्वी चोप्रा यांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने इंग्लंडचा निम्मा संघ ३९ धावांतच माघारी पाठवला होता. त्यानंतरही इंग्लंडचा डाव स्थिरावला नाही. अखेरीस अठराव्या षटकात ६८ धावांत इंग्लंडचा डाव आटोपला.

प्रत्युत्तर देताना कर्णधार शेफाली वर्मा आणि श्वेता सेहरावत या लकर परतल्या. मात्र, त्यानंतर सौम्या तिवारी आणि त्रिशा गोंगाडी यांनी भारताला अर्धशतकी टप्पा पार करून दिला. विजयासाठी केवळ तीन धावांची आवश्यकता असताना त्रिशाला अॅलेक्साने बाद केले. त्रिशाने २९ चेंडूंत तीन चौकारांसह २९ धावा केल्या. त्यानंतर सौम्या तिवारीने चौदाव्या षटकात भारताचा संस्मरणीय विजय साकारला.

[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=TNOX52L5g7g” column_width=”4″]

पहिलाच देश

  • २९७ – १९ वर्षांखालील मुलींच्या या पहिल्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताच्या श्वेता सेहरावतने सात सामन्यांत ९९.००च्या सरासरीने सर्वाधिक २९७ धावा केल्या. त्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ इंग्लंडच्या ग्रेस स्क्रिवेन्सने २७३, तर भारताच्या शेफाली वर्माने १७२ धावा केल्या.
  • १२ – ऑस्ट्रेलियाच्या मॅकी क्लार्कने या स्पर्धेत सर्वाधिक बारा विकेट घेतल्या. त्यापाठोपाठ भारताच्या पार्श्वी चोप्राने सहा सामनयांत सातच्या सरासरीने ११ विकेट घेतल्या.
  • क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारांत (वनडे, टी-२०. ज्युनियर/सीनियर) महिलांचा वर्ल्ड कप जिंकणारा भारत हा आशिया खंडातील पहिलाच देश ठरला.

पंतप्रधानांकडून कौतुक

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजेत्या भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या. ‘तुम्ही खूप छान खेळलात अन् तुम्हा मुलींचे हे यश आपल्या उदयोन्मुख क्रिकेटपटूंना प्रेरणा देत राहील’, असे ट्विट मोदी यांनी केले आहे.

पाच कोटींचे बक्षीस

बीसीसीआयतर्फे युवा जगज्जेत्या संघ आणि सपोर्ट स्टाफला पाच कोटींचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. बीसीसीआयचे चिटणीस जय शहा यांनी रविवारी ही माहिती दिली. या संघास बुधवारी रंगणाऱ्या भारत-न्यूझीलंड तिसऱ्या अहमदाबाद टी-२० लढतीचे खास आमंत्रणही देण्यात आले आहे. तिथेच या यशाचे सेलिब्रेशन होईल, असे शहा यांनी सांगितले.

तेव्हा आणि आता

१९ वर्षांखालील मुलांचा पहिला टी-२० वर्ल्ड कप २००७मध्ये दक्षिण आफ्रिकेत पार पडला होता. त्यातही भारताने विजय मिळविला होता. १९ वर्षांखालील मुलींच्या पहिल्या टी-२० वर्ल्ड कपचा श्रीगणेशाही यंदा (२०२३) द. आफ्रिकेतच झाला अन् त्यातही भारतच जगज्जेता ठरला.

श्वेताची कमाल

पहिल्यावहिल्या १९ वर्षांखालील मुलींच्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताच्या श्वेता सेहरावतने सर्वाधिक २९७ धावा ठोकल्या. २०२२च्या मोसमात पार पडलेल्या १९ वर्षांखालील चॅलेंजर करंडक आणि १९ वर्षांखालील चौरंगी टी-२० मालिकेतही श्वेताने सर्वाधिक धावा तडकावल्या होत्या.

पार्श्वी प्रभावी

भारताची गोलंदाज पार्श्वी चोप्राने या स्पर्धेत भारतातर्फे सर्वाधिक ११ विकेट टिपल्या. मन्नत कश्यपने ९, अर्चनादेवीने ८, तितास साधूने ६, तर सोनम यादवने ५ फलंदाजांना बाद केले.

कोण आहेत या विश्वविजेत्या भारतीय कन्या?

आता या मुलींना कोणतीही नवी ओळख डकविण्याची गरज राहिली नाही. त्यांचं यश हीच त्यांची ओळख. भारत तसा क्रिकेटवेडा देश. मात्र, महिला क्रिकेटपटूंची नावं विचारली तर अगदी बोटावर मोजण्याइतपत नावंही आठवणार नाहीत. याउलट पुरुष क्रिकेटपटूंची नावं सांगताना कुठेही पॉज घेणार नाहीत. जाऊद्या… पण इथं विश्वविजेत्या भारतीय मुलींचं कौतुक करायला हवं. काहीसं नकारात्मक चित्र असतानाही या मुली क्रिकेट नेटानं खेळल्या आणि पहिलं विश्वविजेतेपदही जिंकलं. अर्थात, 19 वर्षांखालील आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा जिंकल्यानंतर भारतभर जल्लोषाचं वातावरण आहे. मात्र, या जेतेपदाच्या मानकरी असलेल्या या भारतीय मुलींबद्दल फारच कमी लोकांना माहिती असेल…

कोण आहेत या भारतीय मुली?

  • शेफाली वर्मा, कर्णधार, सलामीची फलंदाज : शेफाली रोहतकची. 19 वर्षांखालील टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाची कर्णधार असलेली शेफाली वर्मा सर्वाधिक चर्चेतली खेळाडू. हा वर्ल्डकप खेळण्यापूर्वी शेफाली वरिष्ठ संघात तीन वर्ल्ड कपच्या फायनल खेळली आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये तीन अर्धशतक झळकावलं होतं, त्या वेळी तिचं वय होतं अवघं 15 वर्षे 285 दिवस. तिचा आदर्श खेळाडू सचिन तेंडुलकरलाही मागे टाकत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावणारी ती सर्वांत कमी वयाची खेळाडू ठरली.
  • श्वेता सहरावत, सलामीची फलंदाज : दिल्ली दिलवाल्यांची, तशी दिल्ली श्वेता सहरावतचीही म्हणायला हवं. दक्षिण दिल्लीतील ही मुलगी काय नाही खेळली…! व्हॉलीबॉल, बॅडमिंटन आणि स्केटिंग असे खेळ खेळल्यानंतर ती क्रिकेटमध्ये आली. महिला टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत 69 धावांचं लक्ष्य साधताना ती तशी लवकरच तंबूत परतली. मात्र, संघाच्या अंतिम फेरीपर्यंतच्या प्रवासात तिची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. तिने सात डावांत 99 ची सरासरी आणि सुमारे 140 च्या स्ट्राइक रेटने 297 धावा रचत अव्वल फलंदाज राहिली.
  • सौम्या तिवारी, उपकर्णधार : सौम्याचं क्रिकेट पॅशन भयंकर. आईच्या कपडे धुण्याच्या थापीने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. मात्र, हे पॅशन तिला थेट संधी देऊन गेलं नाही. सुरुवातीला तर सौम्याला प्रशिक्षक सुरेश चियानानी यांनीही निवडलं नव्हतं. मात्र, नंतर त्यांनी तिला फलंदाजीची संधी दिली. कमाल पाहा, तिने अंतिम फेरीत इंग्लंडविरुद्ध सात गडी राखून भारताला विजयी लक्ष्य गाठून दिलं.
  • तृषा रेड्डी, सलामीची फलंदाज : तेलंगणाच्या भद्राचलम येथील तृषा ही गोंगादी रेड्डी यांची मुलगी. आता या गोंगादी रेड्डी अनेकांच्या विस्मरणात गेल्या असतील. गोंगादी माजी हॉकीपटू. त्या एकेकाळी 16 वर्षांखालील राष्ट्रीय हॉकी खेळल्या आहेत. तृषाने बालपणीच आपले डोळे आणि हातांचे अनोखे संतुलन राखत वडिलांना प्रभावित केलं. वडिलांनीच तिची क्रिकेटची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपली चार एकर वडिलोपार्जित जमीन विकली होती. मुलीसाठी एवढं सॅक्रिफाइस करणारा बापमाणूस फार कमी आढळतो. मात्र, तृषानेही वडिलांचा विश्वास सार्थ ठरवला. तो कसा हे तुम्ही पाहतच आहात!
  • ऋषिता बासू, पर्यायी यष्टिरक्षक : अनेक खेळाडूंसारखीच ऋषिता बासू हिनेही आपल्या क्रिकेटची सुरुवात गल्लीतूनच केली. कोलकात्यातील हावडा येथे राहणारी ऋषिता हिला नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. त्याचा फायदा तिला महिला टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत झाला.
  • रिचा घोष, यष्टिरक्षक- फलंदाज : रिचा यष्टिरक्षक (विकेटकीपर) आहेच, शिवाय आक्रमक फलंदाजही आहे. तिचा आदर्श महेंद्रसिंह धोनी. मात्र, तिचे वडील मानवेंद्र घोष यांनी तिचा ‘पॉवर गेम’ सुधारण्यास मदत केली. रिचाने गेल्या महिन्यात डिसेंबर 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय टी 20 मालिकेत 36 आणि 26 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. या कामगिरीने रिचा विशेष चर्चेत आली होती.
  • तितस साधू, वेगवान गोलंदाज : तितस हिचं कुटुंब वयोगटातला क्लब चालवतात. तितस वयाच्या दहाव्या वर्षीच क्लबच्या क्रिकेट संघासोबत ‘स्कोअरर’ म्हणून जात होती. 19 वर्षांखालील टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्टार खेळाडूंत गणना होत असलेली तितस पश्चिम बंगालची. दिग्गज खेळाडू झूलन गोस्वामी तिच्याच राज्यातली. झूलनच्याच मार्गाने तितसचाही प्रवास सुरू आहे. तितस वेगवान गोलंदाज असून, चेंडूला उंची देण्यात वाकबगार आहे. ती दोन्ही बाजूने चेंडू स्विंग करू शकते. खरं तर तिला वडिलांसारखं वेगवान धावपटू बनायचं होतं. तिने दहावीच्या परीक्षेत 93 टक्के गुण मिळवले होते. मात्र, क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी तिने शिक्षण अर्धवट सोडलं.
  • सोनम यादव, डावखुरी फिरकी गोलंदाज : उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमधील सोनम अवघ्या 15 वर्षांची आहे. तिचे वडील मुकेश कुमार काचेच्या फॅक्टरीत काम करतात. सोनमने आधी मुलांसोबत खेळायला सुरुवात केली. तिची आवड पाहून मुकेश कुमार यांनी तिला एका अकादमीत पाठवले. फलंदाज म्हणून क्रिकेटमध्ये सुरुवात करणाऱ्या सोनमला प्रशिक्षकांनी गोलंदाजी करण्याचा सल्ला दिला. त्याचे रिझल्ट आपण आता पाहतच आहोत…!
  • मन्नत कश्यप, डावखुरी फिरकी गोलंदाज : हवेत वेगाने गोलंदाजी करणाऱ्या मन्नतची शैली सोनमपेक्षा उत्तम आहे. पतियाळात राहणारी मन्नत मुलांसोबत गल्लीत क्रिकेट खेळतच मोठी झाली. तिच्या एका नातेवाइकाने तिला गांभीर्याने क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला. हा सल्ला शिरसावंद्य मानत खरंच ती क्रिकेटकडे गांभीर्याने पाहू लागली. आज त्याचं फळ तिला मिळत आहे.
  • अर्चना देवी, ऑफ स्पिन अष्टपैलू : क्रिकेट प्रवासाच्या सुरुवातीलाच अर्चनाला जबरदस्त धक्का बसला. कॅन्सरमुळे वडिलांचे निधन झाले. अर्चनाचा जन्म उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील रताई पूर्वा गावातला. कौटुंबिक स्थिती हलाखीची. अशातच अर्चनाला आणखी एक धक्का बसला. फलंदाजी करताना अर्चनाने चेंडू असा मारला, की तो चेंडू शोधताना तिचा भाऊ बुद्धिराम याचा सर्पदंशाने मृत्यू झाला. तिच्या भावाचीच इच्छा होती, की अर्चनाने क्रिकेटपटू व्हावं. अर्चनाने भावाची इच्छा पूर्ण केली; पण ते पाहायला आज भाऊ नाही!
  • पार्श्वी चोपड़ा, लेगस्पिनर : बुलंदशहरातल्या या मुलीला स्केटिंग खेळायला, तर क्रिकेट पाहायला खूप आवडायचं. राज्याच्या संघात तिने निवड चाचणीत भाग घेतला होता. मात्र, त्यात तिला यश आलं नाही. एक वर्षानंतर तिने पुन्हा निवड चाचणीत भाग घेतला. त्यात तिची निवड झाली. तिने वर्ल्ड कप स्पर्धेत सहा सामन्यांत 11 विकेट घेतल्या. श्रीलंकेविरुद्ध तर तिने अवघ्या पाच धावांत चार विकेट घेतल्या.
  • फलक नाज, वेगवान गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू : वर्ल्ड कप स्पर्धेत फलकला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामन्यात फलकने तीन षटकांत फक्त 11 धावा मोजल्या होत्या. मात्र, एकही विकेट घेता आली नाही. तिचे वडील नासिर अहमद उत्तर प्रदेशातील एका शाळेत काम करतात, तर आई गृहिणी आहे.
  • हर्ली गाला, अष्टपैलू : मुंबईतील एका गुजराती कुटुंबात जन्मलेली हर्ली हिने अवघ्या 15 व्या वर्षी वरिष्ठ संघात पदार्पण केले. स्थानिक क्रिकेट सामन्यांत शेफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा यांच्या विकेट घेत लोकांचं लक्ष वेधलं होतं.
  • सोनिया मेधिया, फलंदाज अष्टपैलू : हरियाणाच्या सोनियाने वर्ल्ड कप स्पर्धेत चार सामने खेळले. मात्र, तिला एकही विकेट मिळवता आली नाही. तिने पाच षटके गोलंदाजी करताना 30 धावा दिल्या.
  • शब्बम एमडी, वेगवान गोलंदाज : विशाखापट्टणमच्या या 15 वर्षीय वेगवान गोलंदाजाने दोन सामने खेळले. त्यात तिने एक विकेट मिळवली. तिचे वडील नौसेनेत आहेत. तेपण वेगवान गोलंदाज होते. वडिलांचेच गुण घेत शब्बम क्रिकेटमध्ये स्वत:ला आजमावत आहे.

पोलिसांच्या मदतीने अर्चनाच्या घरी इन्व्हर्टर

टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत 29 जानेवारी 2023 रोजी भारतीय मुलींच्या संघाची इंग्लंडविरुद्ध अंतिम लढत होती. या लढतीत उत्तर प्रदेशच्या रताई पूर्वा गावातील अष्टपैलू अर्चना देवीचाही समावेश होता. आपल्या आईला वर्ल्ड कप पाहता यावा म्हणून तिने मोबाइल घेऊन दिला होता. मात्र, सातत्याने जाणाऱ्या विजेचं काय, असा प्रश्न तिच्या कुटुंबीयांना पडला होता. त्यांची ही समस्या गावातील पोलिसांनी सोडविली. तिच्या घरी इन्व्हर्टर आला. त्यामुळे कोणत्याही अडचणीविना तिच्या घरच्यांना आणि ग्रामस्थांना हा वर्ल्ड कप पाहता आला. यात अर्चना देवीने गोलंदाजीत चमक दाखवली; त्याचबरोबर एक अप्रतिम झेलही टिपला. अर्चना देवीचं चारशे उंबऱ्यांचं गाव. इथं विजेचा लपंडाव ठरलेला. त्यामुळे तिचं कुटुंबीय इन्व्हर्टरच्या शोधात असल्याचं वृत्त वृत्तपत्रात आलं आणि त्यांच्या मदतीला स्थानिक पोलिस धावून आले. अर्चनाच्या वडिलांचं २००८ मध्ये कर्करोगाने निधन झाले. यानंतर २०१७ मध्ये सर्पदंशाने तिच्या भावाचा मृत्यू झाला. अर्चनाला क्रिकेटची आवड होती. हे पाहून आईने तिला होस्टेलमध्ये ठेवलं. त्या वेळी ग्रामस्थांकडून तिच्या आईवर टीका झाली. अर्चनाला पूनम गुप्ता आणि कपिल पांड्ये या प्रशिक्षकांचं मार्गदर्शन लाभलं. होस्टेलमध्ये प्रवेश मिळण्यापूर्वी तिला शाळेत जाण्यासाठी दररोजच्या बस भाड्याचे ३० रुपयांसाठीही संघर्ष करावा लागत होता. सुरुवातीला तिच्यावर टीका करणारे लोकच भारतीय मुलींनी विजेतेपद मिळवल्यानंतर कौतुक करू लागले. अर्चनाचा भाऊ रोहित म्हणाला, ‘लढतीपूर्वी आम्ही खूप चिंतेत होतो. ऐन वेळी वीज गेली तर बहिणीची लढत पाहता येणार नाही, असं वाटत होतं. मात्र, स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी आम्हाला मदत केली. आम्हाला इन्व्हर्टर आणि बॅटरी मिळाली. त्यामुळे घराच्या बाहेर टीव्ही ठेवून आम्ही आणि ग्रामस्थ लढत पाहू शकलो.’ प्रशिक्षक पांड्ये यांच्याकडे भारताचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवही मार्गदर्शन घेत होता. कानपूरमधील पांड्ये यांच्या अकादमीत एकत्र सराव करताना कुलदीपने अर्चनाला मदत केली होती. पांड्ये म्हणाले, ‘अर्चना २०१७ मध्ये माझ्या अकादमीत आली होती. गोलंदाजी बघून तिच्यातील गुणवत्ता दिसली. मात्र, तिला कानपूरमध्ये राहण्यास घर नव्हतं. तिचं गाव कानपूरपासून ३० किलोमीटरवर होतं. बससाठी पैसे नसल्याने ती रोज येऊ शकत नव्हती. मात्र, या मुलीने चांगली मेहनत घेतली. सुरुवातीला ती मध्यमगती गोलंदाजी करीत होती. नंतर मी तिला फिरकी गोलंदाजी करण्याचा सल्ला दिला.’ अर्चनाची आई सावित्री म्हणाली, ‘मला क्रिकेटबद्दल फारसं माहिती नाही. मात्र, मी मुलीला टीव्हीवर खेळताना पाहिलं आणि खूप आनंद झाला. आम्ही सर्व ग्रामस्थांना लाडू वाटले.’

हुकली जरी हर्लीची फायनल…

भारतीय मुलींनी १९ वर्षांखालील टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. हे यश साजरे करताना हर्ली गाला कमालीची खूश होती; पण या स्पर्धेतील सुरुवातीच्या सामन्याच्या वेळी अंगठ्याला दुखापत झाली नसती, तर आपला या यशात थेट सहभाग असता याची हुरहूर तिला होती. या स्पर्धेपूर्वी न्यूझीलंडविरुद्ध मुंबईत झालेल्या मालिकेतील तीन सामन्यांत सात विकेट घेऊन हर्लीने निवड समितीस प्रभावित केलं होतं आणि भारतीय संघात स्थान मिळवलं होतं. तिचं अष्टपैलुत्व संघाची जमेची बाब असेल, असे भारतीय संघाच्या प्रशिक्षक नूशन अल खादीर यांनी सागितलं होतं. तिची वर्ल्ड कपमधील पहिल्या दोन सामन्यांसाठी निवडही झाली होती. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीच्या वेळी तिच्या अंगठ्याला दुखापत झाली आणि त्यामुळे तिला संघाबाहेर राहावं लागलं होतं, असं हर्लीचे वडील तन्मय गाला यांनी सांगितलं.  हर्ली ही जुहूची. तिची क्रिकेट कारकीर्द घडवण्यात इवान रॉड्रिग्ज यांचा मोलाचा वाटा आहे. इवान यांची मुलगी जेमिमा भारतीय महिला क्रिकेट संघातील आघाडीची फलंदाज आहे. हर्लीला अर्थातच जेमिमासह सराव करण्याची, खेळण्याची संधी लाभली. जेमिमाला जशी लहानपणी हॉकीची जास्त आवड होती, तशीच हर्लीलाही स्केटिंगची. मात्र, शाळेत असतानाच झालेल्या दुखापतीमुळे तिला स्केटिंग सोडून क्रिकेटकडे वळावं लागलं. वर्ल्ड कप विजेत्या संघाची कर्णधार शेफाली वर्माला वरिष्ठ आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे. शेफालीला; तसेच दीप्ती शर्माला हर्लीने वरिष्ठ महिला क्रिकेट स्पर्धेत मुंबईकडून खेळताना बाद केले होते. वरिष्ठ मुंबई संघातून खेळल्यानंतर हर्लीचा आत्मविश्वास उंचावला. तिने १९ वर्षांखालील संघात स्थान मिळवले. तंदुरुस्ती ही तिची सर्वांत जमेची बाब आणि तिच्या वेगवान गोलंदाजीत काही वर्षांत खूपच सुधारणा झाली आहे, याकडे पृथ्वी सावची कारकीर्द घडवणारे; तसेच जेमिमा आणि हर्लीला उच्चस्तरीय प्रशिक्षण दिलेल्या प्रशांत शेट्टी यांनी लक्ष वेधलं होतं.

महिलांवरील टिप्पणी पडली महागात! Offensive comment on women will be expensive

[jnews_block_34 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”65″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!