All SportsSports Review

खेळातल्या वेदना

तंदुरुस्तीसाठी व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. वजन कमी करण्यासाठी खेळणे उत्तम मानले जाते. मात्र, खेळताना काय काळजी घ्यायला हवी, सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना करायला हव्यात यावर गांभीर्याने चर्चा होत नाही. भारतातच शेकडो खेळांच्या संघटना कार्यरत आहेत, ज्या विविध खेळांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अनेक स्पर्धाही होतात, ज्याचे नियोजन करण्यासाठी बैठकी घेतल्या जातात. वार्षिक सर्वसाधारण सभांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान काय अवलंबता येईल यावरही बरीच चर्चा झडते. मात्र, जखमी खेळाडूंच्या भवितव्याबाबत काय चर्चा होते याबाबत कोणीही ठोस सांगू शकत नाही. खेळातल्या नेमक्या वेदना इथेच आहेत.

अमेरिकेतील नॅशनल इलेक्ट्रॉनिक इंज्युरी सर्व्हिलियन्स सिस्टिम (एनईईएसएस) संस्थेने केलेल्या सर्व्हेत सुमारे पावणेतीन लाख खेळाडू आजही विविध हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत, ज्यांना मैदानात गंभीर इजा झाली आहे. या सव्र्हेत जखमी होणार्‍या खेळाडूंमध्ये सायकलिस्ट सर्वात वरच्या क्रमांकावर आहेत, तर बास्केटबॉल आणि फुटबॉल दुसर्‍या व तिसर्‍या क्रमांकावर आहे. अनेक खेळाडू अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. संस्थेने जखमी खेळाडूंचीच यादी जाहीर केली आहे, ज्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. मात्र, या जखमी खेळाडूंच्या भवितव्याचे काय, हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे, ज्यांनी देशासाठी योगदान दिले आहे. खेळाडूंच्या योगदानावर कौतुक करताना खेळातल्या वेदना समजून घेणेही तितकेच गरजेचे आहे. 

खरं तर राष्ट्रीय स्तरावरील पहिल्या तीन क्रमांकात यश मिळवणार्‍या खेळाडूंचाच विचार होतो, ज्याला सध्या शासनाच्या क्रीडाधोरणात महत्त्वाचे स्थान आहे. मात्र, असेही खेळाडू आहेत, जे राज्य स्तरावर कर्तृत्व गाजवण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असतानाच मैदानात गंभीर जखमी झाले. मात्र, स्वखर्चाने उपचार घेऊन हे खेळाडू खेळापासून कायमचे वंचित राहतात. ‘एनईईएसएस’च्या सर्व्हेनुसार सायकलिंग खेळात डोक्याला गंभीर इजा होणे, जलतरणात बुडून मृत्यू होणे, स्कीइंगमध्ये झाडाला धडकल्याने आदी अनेक खेळाडूंना मैदानातच मृत्यू होण्याचे प्रमाण गंभीर आहे.

काही राज्य संघटनांनी इंज्युरीवर मात करण्यासाठी ‘लाइफ गार्ड’ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, स्थानिक पातळीवर खेळाडूंना पुरेशी सुरक्षा साधनेच मिळत नाहीत. डोक्याला इंज्युरी होण्याचे प्रमाण हॉकी वगळता अन्य खेळांमध्ये सर्वाधिक आहे. खेळांमध्ये खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना होतीलच; पण त्यानंतरही कायमचा जायबंदी झालेल्या खेळाडूंच्या भवितव्यासाठी राज्य संघटनांनी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. शासनाचे क्रीडा धोरण जाहीर झालेच आहे. गुणात्मक खेळासाठी यशाचे निकष लावले आहेच; पण मैदानावर जखमी होणार्‍या खेळाडूंच्या उपचारासाठी काही तरी धोरण ठरणे गरजेचे आहे.

(दिव्य मराठी : २७ एप्रिल २०१२)

[jnews_block_15 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”60″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!