All SportsSports Review

खेळांचे फौजदार!

नाशिकच्या क्रीडा चळव‍ळीला चालना देण्यासाठी गेल्याच महिन्यात जिल्हा क्रीडा महासंघ आणि ऑलिम्पिक असोसिएशन ऑफ नाशिक अशा दोन संघटना स्थापन झाल्या. या संघटना खरंच खेळाडूंचे प्रश्न सोडविणार आहे की नुसतीच फुकट फौजदारी ठरणार हे काळच ठरवेल… इतिहासात डोकावलं तर हे खेळांचे फौजदार पुढे काही करू शकतील याची सूतराम शक्यता वाटत नाही.

र्व क्रीडा संघटनांचं पालकत्व स्वीकारण्यासाठी, थोडक्यात म्हणजे खेळांचे फौजदार झालेल्या सध्या नाशिकमध्ये प्रचंड स्पर्धा सुरू झाली आहे. कधी नव्हे तो खेळ आणि खेळाडूंच्या विकासाचा प्रत्येकाने ध्यास घेतला आहे. विशेषतः छत्रपती पुरस्कारप्राप्त धुरंधरांनी पुढाकार घेतल्याने भविष्यात नाशिकचा क्रीडाविकास प्रचंड झपाट्याने वाढेल, असं काही तरी वाटू लागलंय. खेळाविषयी इतकी आपुलकी असलेलं नाशिक महाराष्ट्रातलं एकमेव शहर असेल!

अनेक बैठकींमागून बैठकी झडत अखेर नाशिक जिल्हा क्रीडा महासंघाची स्थापना झाली आणि छत्रपती पुरस्कारप्राप्त नरेंद्र छाजेड यांनी या नव्या संघटनेच्या पहिल्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. म्हणजेच खेळांचे फौजदार झालेल्या संघटनेचे नायक. क्रीडा महासंघाच्या स्थापनेनंतर काही दिवसांनी ‘ऑलिम्पिक असोसिएशन ऑफ नाशिक’ या संघटनेचीही स्थापना झाली. राष्ट्रवादीचे अर्जुन टिळे या संघटनेचे अध्यक्ष आहेत. खरं तर ही संघटना कागदोपत्री वर्षभरापूर्वीच स्थापन झाली होती. खूप दिवस कागदावर असलेल्या या संघटनेने ऑलिम्पिक सप्ताहाचा मुहूर्त साधत लोकांसमोर आणली एवढेच. विशेष म्हणजे या संघटनेच्या उद्‍घाटन कार्यक्रमाबाबत बऱ्याच क्रीडा संघटकांना माहितीच नव्हती! अर्थात, या संघटनेच्या नावावरून लक्षात येते, की ऑलिम्पिकमध्ये समावेश असणाऱ्या खेळांचे पालकत्व या संघटनेने स्वीकारले आहे. मग क्रीडा महासंघाची गरज नाही, असा त्याचा अर्थ आहे का? १९८५-८६ मध्येही नाशिक जिल्हा ऑलिम्पिक संघटनेची स्थापना झाल्याचं नाशिककरांना कदाचित स्मरत असेल… एखादी संघटना आठवणीत राहण्याची दोन कारणे आहेत, एक म्हणजे खूप काम केलं असेल म्हणून आणि दुसरे म्हणजे काहीच काम केलं नसेल तर..! ही संघटना आठवणीत राहिली असेल तर दुसऱ्या कारणामुळे आणि विस्मरणातही गेली असेल तरीही दुसऱ्या कारणामुळेच.

संघटनांना गरज आहे का?

एकूणच नाशिकमध्ये क्रीडा संघटनांचे तीन पालक झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात ७५ पेक्षा अधिक संघटना आहेत. नेमकी संख्या सांगता येत नाही. कारण सिलम्बम, शटलकॉक, मुथाई अशा विचित्र नावांच्या खेळांची रोजच भर पडत असल्याने अनेकांनी संघटना मोजणे सोडून दिले आहे. आता या सर्व संघटना क्रीडा महासंघाच्या पंखाखाली आल्या. या संघटनांना अशा क्रीडा महासंघ किंवा ऑलिम्पिक संघटनांची गरज आहे का, हा एक प्रश्न उपस्थित होतो. आपापल्या खेळाडूंचे प्रश्न त्या त्या क्रीडा संघटनांनी सोडवले तर सर्वव्यापी पालक संघटनांची गरजच भासणार नाही. मुळात जेवढे कार्यक्षेत्र मर्यादित असते तेवढा विकासाचा मार्ग प्रशस्त होत असतो. येथे खेळाडूंशी कोणालाही काहीही देणेघेणे नाही. त्यांना फक्त खेळांचे फौजदार व्हायचे आहे.

इतिहासात डोकावताना…

नाशिकमध्ये स्थापन झालेल्या तिन्ही फौजदार संघटनांचे पदाधिकारी तपासले तर अनेक पदाधिकारी या तिन्ही संघटनांवर पाहायला मिळतील. म्हणजे ऑलिम्पिकच्या दोन संघटना आणि क्रीडा महासंघाचे पदाधिकारी वेगळे नाहीच. म्हणूनच नव्या क्रीडा महासंघाविषयी प्रचंड ‘उत्सुकता’ निर्माण झाली आहे. चमकोगिरीऐवजी खेळाडूंची चमकदार कामगिरी उंचावण्यासाठी प्रयत्न अपेक्षित आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रातील जिल्हा स्तरावर स्थापन झालेल्या क्रीडा महासंघांचा किंवा ऑलिम्पिक संघटनांचा इतिहास तपासला तर तो फारसा चांगला नाही. जळगाव आणि साताऱ्यात त्याचा प्रत्यय येतो. जळगावमध्येही २००९ मध्ये क्रीडा महासंघाची स्थापना झाली. सुरुवातीला मोठ्या उत्साहाने खेळाच्या विकासासाठी पुढे आलेल्या या महासंघात नंतर मरगळ आली आहे. २००९ ते २०११ अशी सलग तीन वर्षे उन्हाळी क्रीडा शिबिर भरवले. आरंभशूर महासंघाचे हे शिबिर तीन वर्षांपासून झालेले नाही. धक्कादायक बाब म्हणजे, जळगाव क्रीडा महासंघाला स्थापनेच्या काही महिन्यांतच फुटीचा पहिला झटका बसला आणि जैन स्पोर्ट‍्स अॅकॅडमीच्या तब्बल १८ संघटना महासंघातून बाहेर पडल्या. हा क्रीडा महासंघ सध्या खेळासाठी, खेळाडूंसाठी काहीही करीत नाही. सातारा जिल्ह्यात विविध एकविध क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी २०१० मध्ये सातारा जिल्हा क्रीडा फेडरेशनची स्थापना केली होती. तशा साताऱ्यात देशी आणि विदेशी खेळांच्या दोन फेडरेशन आहेत. या दोन्ही फेडरेशनचे अस्तित्व आजही कागदावरच आहे. या फेडरेशनच्या निष्क्रियतेमुळे सातारा जिल्ह्यातील खेळाडू आणि पालकांचा सर्वच संघटनांवरचा विश्वास उडाला आहे. जळगाव, साताऱ्याचा हा इतिहास नाशिकच्या क्रीडा महासंघाला खोटा ठरवण्याचे मोठे आव्हान आहे.

महासंघासमोरील आव्हाने

दोन वर्षांपूर्वी म्हणजे जुलै २०१३ मध्ये क्रीडा संघटनांच्या निष्क्रीयतेवर भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालक जी. जी. थॉमसन यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. ‘साई’कडून विविध खेळांच्या संघटनांना दरवर्षी १६० कोटी रुपये दिले जातात. मात्र, क्रीडा संघटनांकडून खेळांना चांगल्या प्रकारे चालना मिळत नसल्याचे त्यांनी म्हटले होते. गेल्या वर्षी ऑक्टोबर २०१४ मध्ये वारंवार इशारा दिल्यानंतरही आपले वार्षिक आर्थिक अहवाल जाहीर न करणाऱ्या भारतीय ऑलिम्प‌कि संघटना, तसेच राष्ट्रीय क्रीडा महासंघांना केंद्रीय क्रीडा खात्याने नोटीस बजावली होती. हाच नियम जिल्हा क्रीडा संघटनांनाही लागू होतो, तेव्हाच कोणत्याही अनुदान, सवलतींचा विचार होतो. क्रीडा संघटनांना जे प्रश्न सुटत नाहीत, असे विषय क्रीडा महासंघाकडून सुटावेत, ही अपेक्षा बाळगणे गैर नाही. मात्र, किती क्रीडा संघटनांनी त्यांच्या खेळाडूंना क्रीडा साहित्य उपलब्ध करून दिले आहे, किती संघटना जिल्हास्तरीय स्पर्धा घेतात? या प्रश्नांची उत्तरे निराश करणारी आहेत. ज्युनिअर गटात राष्ट्रीय स्तरावर चमकणाऱ्या नाशिकचे स्थान पहिल्या पाचमध्ये असेल तर सीनिअर गटात ते पहिल्या दहातही नसते. म्हणजे दहावी, बारावीनंतर खेळाडू मैदानावर थांबत नाही. सावरपाडा एक्स्प्रेस कविता राऊतनंतर या नाशिकला कळले, की पाड्यावरही गुणवंत खेळाडू आहेत. नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटना डळमळीत असतानाही नाशिकचा ग्रँडमास्टर विदित गुजराथी जागतिक युवा खेळाडूंच्या यादीत पहिल्या दहात आहे. नाशिकचे क्रीडा क्षेत्र तसंही मोठं होत आहेच. क्रीडा महासंघाकडून हे क्षेत्र आणखी भक्कम व्हावं, ही अपेक्षा.
[jnews_hero_8 include_category=”60″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!