All SportsCricketsports news

क्रिकेटवीरांनो, तुम्ही कधी बोलणार?

cricket-darren sammy
#blacklivesmatter

 

Team Kheliyad
क्रिकेटविश्वात वर्णद्वेष झाला नाही, असं अजिबातच नाही. ज्या वेळी वर्णद्वेषामुळे जॉर्ज फ्लॉयडला जीव गमवावा लागला त्या वेळी क्रिकेटविश्वातून विरोधाचा एक चकार शब्दही बाहेर आला नाही. आयसीसीने तर या प्रकरणावर कोणतेही भाष्य केले नाही. जेथे फिफासारखी फुटबॉलची सर्वोच्च संस्था या प्रकरणात वर्णद्वेषाविरुद्ध, वर्णद्वेषाचा विरोध करणाऱ्या खेळाडूंमागे उभी राहते, तेथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना मात्र गप्प राहिली आहे.
क्रिकेटविश्वातील अशा ढिम्म संघटनेवर डॅरेन सॅमीने थेट टीका केली आहे, तुम्ही वर्णद्वेषाविरुद्ध आवाज उठवावा किंवा वर्णद्वेषाच्या समस्येचे तुम्ही एक भाग आहात असे समजले जाईल. मात्र, यानंतर एकाही देशातील क्रिकेट संघटनेने यावर भाष्य केलेले नाही. या प्रकरणाशी क्रिकेटचे कोणतेही नाते नाही, असं जर आयसीसी व इतर क्रिकेट संघटनांना वाटत असेल तर सर्वांत मोठा मूर्खपणा समजला जाईल. कारण याच क्रिकेटमध्ये जोफ्रा आर्चरला वर्णद्वेषाचा सामना करावा लागला आहे.

हेही वाचा…


भारतीय क्रिकेटवीर स्वतःला कृष्णवर्णीयांमध्ये गोवत नसतील. कदाचित त्यांचा गव्हाळ वर्ण गोऱ्यांशी मेळ खात असेल. पण याच गव्हाळ वर्णाचा ब्रिटिशकाळात विटाळ होता हे कदाचित भारतीय क्रिकेटवीरांना माहीत नसेल. एकही निषेधाचा चकार शब्द कोणाही क्रिकेटपटूंच्या तोंडातून बाहेर पडत नाही? याला काय म्हणावं? कॅरेबियन क्रिकेटविश्वाने आता थेट आव्हान दिलं आहे, तुम्ही कधी बोलणार? पैशांच्या मागे लागलेल्या या क्रिकेटला कदाचित वर्णद्वेष माहीतच नसावा. पैसा हेच सर्वस्व मानणाऱ्या क्रिकेटविश्वाला डॅरेन सॅमीचा आवाज कदाचित ऐकू येणार नाही. हा आवाज त्याच्या एकट्याचा आहे. तो लाखो लोकांचा आवाज होईल, तेव्हा कदाचित हे क्रिकेटवीर भानावर येतील…

तुम्ही वर्णभेदाविरुद्ध आवाज उठवा, अन्यथा तुम्ही आमच्याविरोधात


किंगस्टन
विश्वकरंडक विजेत्या संघाचा माजी कर्णधार डॅरेन सॅमी Darren Sammy | याने आयसीसीला ICC | उद्देशून टिप्पणी केली आहे. तो म्हणाला, क्रिकेटविश्वाने वर्णभेदाविरुद्ध आवाज उठवावा किंवा या समस्येशी नातं तरी स्पष्ट करावं. आफ्रिकी अमेरिकी समुदायातील जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूनंतर सॅमीने हे वक्तव्य केलं आहे.
सॅमीने सोशल मीडियावर वर्णभेदाच्या समस्येवर एकापाठोपाठ पोस्ट केल्या आहेत. त्याने ट्विट केले, की ‘‘जॉर्ज फ्लॉयडचा व्हिडीओ पाहिल्यानंतर या वेळी जर क्रिकेटविश्व कृष्णवर्णीयांच्या मागे उभं राहिलं नाही तर तो या समस्येचा एक भाग मानला जाईल.’’ सॅमीने सांगितले, की वर्णभेद फक्त अमेरिकेत नाही, तर जगभर कृष्णवर्णीयांना द्वेषाचा सामना करावा लागत आहे.
सॅमीने क्रिकेटविश्वाला थेट प्रश्न विचारला आहे, ‘‘ माझ्यासारख्या लोकांवर काय अन्याय होतो हे आयसीसी ICC | आणि इतर सर्व मंडळांना हे दिसत नाही का? माझ्यासारख्या लोकांवर होणारा सामाजिक अन्याय या लोकांना दिसत नाही का?’’  तो म्हणाला, ‘‘हे फक्त अमेरिकेतच होतं असं नाही, तर जगात रोज कुठे ना कुठे तरी अशा घटना घडतात. आता गप्प बसण्याची ही वेळ नाही. मला तुमचा आवाज ऐकायचाय. अनेक वर्षांपासून कृष्णवर्णीय हे सहन करीत आहेत. मी सेंट लुसियामध्ये आहे आणि मला जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूचे दुःख झाले आहे. का तुम्ही बदल घडविण्यासाठी समर्थन देणार का? #blacklivesmatter’’

आम्ही वर्णभेदाविरुद्ध बोलणाऱ्या खेळाडूंसोबत


किंग्स्टन
क्रिकेट वेस्ट इंडीजने cricket west indies | सांगितले, की कॅरेबियन लोकांनी ‘मैदानात आणि मैदानाबाहेर’ वर्णभेदाविरुद्ध बरीच लढाई लढली आहे आणि आम्ही जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूनंतर निषेध करणाऱ्या खेळाडूंसोबत आहोत.
आफ्रिकी-अमेरिकी फ्लॉयडच्या मृत्यूनंतर अमेरिकेत तीव्र निदर्शने होत आहेत. क्रिकेट वेस्ट इंडीजने सांगितले, ‘‘वर्णभेद आणि असमानतेविरुद्ध बोलण्यासाठी आमचे खेळाडू, अन्य क्रिकेट हितचिंतक, सर्व पुरूष व महिला खेळाडू आणि क्रीडा प्रशासकांसोबत आहोत.’’
महान गोल्फर टायगर वूड्सपासून वेस्ट इंडीजचे क्रिकेटपटू ख्रिस गेल आणि डॅरेन सॅमीसारख्या अनेक खेळाडूंनी वर्णभेदाविरुद्ध आवाज उठवला आहे. क्रिकेट वेस्ट इंडीजने सांगितले, ‘‘वेस्ट इंडीजच्या नागरिकांनी मैदानात आणि मैदानाबाहेर अनेक लढाया लढल्या आहेत.’’

‘ख्रिस गेलनेही केला वर्णभेदाचा सामना?’


नवी दिल्ली
‘ब्लॅक लाइव्स मॅटर’ black lives matter | अभियानात एकजूट दाखवताना वेस्ट इंडीज आघाडीचा फलंदाज ख्रिस गेल यानेही क्रिकेटवर टीकास्त्र डागले आहे. तो म्हणाला, की क्रिकेटही वर्णभेदातून सुटलेलं नाही. माझ्या कारकिर्दीत मीही वर्णद्वेषी टिप्पणी सोसल्या आहेत. मात्र, गेलने हा खुलासा केला नाही, की त्याला कुठे आणि कधी वर्णद्वेषाचा सामना करावा लागला. मात्र, त्याने संकेत दिले, की वर्ल्डकप टी-20 लीग स्पर्धेदरम्यान त्याने या समस्येचा सामना केला आहे.
त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली आहे. त्यात नमूद केले आहे, ‘‘मी जगभर खेळलो आहे. कृष्णवर्णीय असल्याने मला वर्णद्वेषी टिप्पणी सोसाव्या लागल्या आहेत.’’
तो म्हणाला, ‘‘वर्णद्वेष फक्त फुटबॉलमध्येच नसतो, तर क्रिकेटमध्येही असतो. संघात कृष्णवर्णीय असल्याने मी बरंच काही सोसलं आहे.’’ गेलने हे विधान जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूनंतर केलं आहे.
गेल्या वर्षी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरवरही न्यूझीलंडमध्ये एका प्रेक्षकाने वर्णद्वेषी टिप्पणी केली होती. या प्रकारावरून न्यूझीलंडचा आघाडीच्या खेळाडूंनी, तसेच क्रिकेट मंडळाने त्याची माफीही मागितली होती.
विंडीज शर्टवर लावणार ‘ब्लॅक लाइव्स मॅटर’चा लोगो


मँचेस्टर | 29 June

क्रिकेटमध्ये वर्णभेदाविरुद्ध उभे ठाकलेले विंडीजचे खेळाडू आता इंग्लंडसोबतच्या कसोटी मालिकेतही आपली वर्णभेदाविरुद्धची मोहीम पुढे सुरूच ठेवणार आहे. इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडीजचे खेळाडू शर्टच्या कॉलरवर ‘ब्लॅक लाइव्स मॅटर’चा black lives matter | लोगो लावून खेळणार आहेत. अमेरिकेत कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूनंतर वर्णभेदाविरुद्ध कर्णधार जेसन होल्डर jason holder | याने एकदा खुलेपणाने सांगितले होते, ‘‘आम्हाला वाटतं, की एकजूट होणे आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी पुढाकार घेणे हे आम्ही कर्तव्य समजतो.’’ आयसीसीने या लोगोला मान्यता दिली असून, अलिशा होसाना Alisha Hosannah | याने हा लोगो डिझाइन केला आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रीमियर लीगमध्ये विंडीजच्या सर्वच २० खेळाडूंनी या लोगोचा शर्ट परिधान केला होता. होल्डरच्या पुष्ट्यर्थ ‘ईएसपीएन क्रीकइन्फो’ने espn cricinfo | सांगितले, ‘‘हा क्रीडा इतिहास व वेस्ट इंडीज क्रिकेट संघासाठी महत्त्वाचा क्षण आहे.

होल्डर म्हणाला, आम्ही इथं विज्डेन ट्रॉफी जिंकण्यासाठी आलो आहे, परंतु जगात जे काही होत आहे त्याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे आणि न्याय-समानतेसाठी आम्ही लढू. तरुण खेळाडूंच्या रूपाने आम्हाला वेस्ट इंडीजच्या समृद्ध क्रिकेट इतिहासाची आम्हाला माहीत आहे आणि आम्हाला हेही माहिती आहे, की आमची येणारी पिढीपर्यंत हा वारसा घेऊन जात आहे.’’

होल्डरला वाटते, की “डोपिंग आणि भ्रष्टाचारावर जशी कारवाई होते, तशीच वर्णभेदाविरुद्धही व्हायला हवी. आम्ही हा लोगो परिधान करण्याचा निर्णय गांभीर्याने घेतला आहे. आम्हाला माहिती आहे, की चामड्याच्या रंगावर जशी टिपणी केली जाते, तसा हा वर्णभेद आहे. समानता आणि एकता आवश्यक आहे. जोपर्यंत ते होत नाही, तोपर्यंत आम्ही गप्प नाही बसणार.’’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!