All SportsInspirational Sport storyWater Sports

चिंचखेड गावातल्या कष्टकऱ्यांनी घडवली स्पोर्टस क्रांती!

त्यांच्या जगण्याचा आधारच निसर्ग. रोजच्या भाकरीसाठी लढाई. या लढाईला पराभव मान्य नसतो. अशा कष्टकऱ्यांनी पिंपळगाव बसवंतजवळील चिंचखेडसारख्या शे-दोनशे उंबऱ्यांच्या गावात वॉटर स्पोर्टस क्रांती घडवली आणि पहिल्याच राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण, रौप्यपदकही जिंकले. हेमंत पाटीलसारख्या पारखी क्रीडाशिक्षकाने घडवलेल्या या तरुणांविषयी…

त्यांना स्पर्धा माहिती नाही, पण तरीही ते जगण्याची लढाई रोज लढत असतात, त्यांना जिंकणे माहीत नाही, पण त्यांना हे माहिती आहे, की जगण्याची लढाई कधी हरायची नसते! त्यांच्याकडे अर्थव्यवहारातल्या कागदी नोटा नाहीत, पण जगण्यातली मेहनत, चिकाटी, सचोटीची खानदानी श्रीमंती त्यांच्याकडे नक्कीच आहे. त्यांची हीच श्रीमंती कनोइंग या वॉटर स्पोर्ट्‍सवरील खेळात क्रांतिकारक ठरली. या कष्टकऱ्यांनी जी स्पोर्टस क्रांती घडवली ती कौतुकास्पद म्हणावी लागेल.

चिंचखेड (ता. दिंडोरी) या गावातल्या कष्टकऱ्यांची ही कहाणी आहे. पिंपळगाव बसवंतपासून अवघ्या दोन-तीन किलोमीटरवर असलेलं हे गाव महाराष्ट्राच्या वॉटर स्पोर्ट्सच्या नकाशावर अचानक झळकलं. कनोइंग हा क्रीडा प्रकार काय आहे, हे गावात अजूनही कुणाला माहीत नाही. विशेष म्हणजे या खेळाची सुरुवात मोठी रंजक आहे. पिंपळगाव बसवंत येथील के. के. वाघ कॉलेजचे हेमंत पाटील या क्रीडा संचालकाने कादवेच्या पाण्यावर कनोइंगचा विचार सुरू केला, तेव्हा त्यांच्याकडे बोटीही नव्हत्या. कनोइंग अतिशय महागडा, परंतु साहसी खेळ. या खेळात फायबरचं मोठं निमुळतं होडकं असतं, ज्यात दोन किंवा चार जण बसू शकतात. दोन बोटी त्यांनी पुणे विद्यापीठाच्या क्रीडा अनुदानातून मिळवल्या. पोहणं आणि बॅलन्स या दोन्ही गोष्टी आत्मसात केल्याशिवाय या खेळावर प्रभुत्व मिळूच शकत नाही. चिंचखेड येथील तब्बल दोन ते तीन किलोमीटर क्षेत्रातील विस्तीर्ण अशा बॅक वॉटरवर कनोइंगचा सराव सुरू झाला. कष्टकरी कुटुंबातल्या कॉलेजच्या मुलांचा सराव पाहून गावकऱ्यांना कमालीचं कुतूहल दाटलं. अख्खा गाव काठावर उभा राहिला. नंतर गावालाही ते सवयीचंच झालं. हेमंत पाटील मुलांना कनोइंगचे धडे देत होते. बोटीवर बॅलन्स साधताना ते पाण्यात पडायचे. लोकांना गंमत वाटायची. शाळेतली मुलं तर मोठ्याने हसायची. पाटील यांनी त्यांना विचारलं, तुम्हाला शिकायचं का? मुलं आनंदाने तयार झाली. सातवी-आठवीतली शाळकरी मुलेही पाण्यात उतरली. मासेमारी करणारा, प्रसंगी टोमॅटोच्या मोसमात खोकी भरण्यासाठी जाणारा योगेश जाधव, शेळ्यामेंढ्या चारणारा नारायण चारोस्कर यांना तर मोठी गंमत वाटायची. बोट पाण्याखाली गेली तर नारायण तळाशी जाऊन ती बोट बाहेर काढायचा. नंतर हे कष्टकरी तरुणही या खेळाकडे आकृष्ट झाले. या खेळाने या कष्टकऱ्यांना नवी उभारी दिली आहे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे विकास वाळुंज. स्पोर्ट्स कोट्यातून तो आता पोलिस झाला आहे.

चार बोटींवर खेचले यश

सध्या केवळ चार बोटींवर सराव सुरू आहे. सुरुवातीला कॉलेजच्या दोनच बोटी होत्या. मात्र, खेळाडूंनी यश खेचून आणल्यानंतर जाणवले, की आणखी बोटी हव्यात. मात्र, एक बोट ४५ हजार रुपयांच्या पुढे आहे. बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर यांनी दोन बोटी उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे सध्या चार बोटींवरच सराव सुरू आहे. बोटींची देखभाल आणि सुरक्षेची जबाबदारी गावातलाच तरुण श्याम संधान याने स्वतःकडे घेतली आहे.

कष्टकऱ्यांनी अशी घडवली स्पोर्टस क्रांती

पिंपळगाव कॉलेजने २०१२ व २०१३मध्ये पदार्पणातच पुणे विद्यापीठाच्या विभागीय महाविद्यालयीन कनोइंग स्पर्धेत सलग दोन वर्षे गोल्ड मेडल मिळविले. कॉलेजची ही ऐतिहासिक कामगिरी ठरली. ज्या खेळाची माहितीही कोणाला नव्हती, त्या खेळात गोल्ड मिळविणारे हे तरुण कॉलेजच्या फलकावर प्रथमच दिमाखात झळकले होते. याच कॉलेजचा रामकृष्ण आहेर याने गेल्या वर्षी पुणे विद्यापीठाचं कर्णधारपदही भूषवलं. चिंचखेडच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेनेही याच क्रीडा प्रकारात ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. सोमनाथ शिंदे, द्वारकाधीश गुंबाडे यांनी पदार्पणातच शाळेला सबज्युनिअर गटातील राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून दिलं. त्यानंतर गेल्या वर्षीच सागर नागरे, समाधान वाळुंज, आकाश शिवले यांनीही नाशिकमध्ये ज्युनिअर गटातील राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले. विशेष म्हणजे या गटातली कनोइंगमधील राज्यातील ही पहिलीच स्पर्धा होती. ऐतिहासिक कामगिरी करणारी ही मुलं जेव्हा व्यासपीठावर बक्षीस घेण्यासाठी गेली तेव्हा त्यांचा निरागस आणि भांबावलेला चेहरा सगळं काही सांगून गेला. द्वारकाधीशच्या अंगात फाटलेला शाळेचा गणवेश होता. चड्डीला ठिगळ होतं. मात्र, कर्तृत्वाच्या सुवर्णझालरीपुढे त्यांचं दैन्य आता झाकोळलं होतं. टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचा गौरव झाला तेव्हा त्यांच्या पालकांसह उपस्थितांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. ही अशी घडवली कष्टकऱ्यांनी स्पोर्टस क्रांती, जी शब्दातीत आहे.

म्हणूनच ते जिंकले!

द्राक्षाच्या मोसमात मजुरी करणारा एसवायबीएचा सागर गाढवे, पंक्चर काढून गुजराण करणारा, प्रसंगी लग्नाचे मांडव बांधणारा गोकुळ निकम, शेळीपालन करणारा आकाश बोंबले, तुषार जाधव, मासेमारी करणारा योगेश जाधव, शेळ्यामेंढ्या चारणारा नारायण चारोस्कर, तसेच विशाल ठाकरे, प्रवीण जाधव, रामकृष्ण आहेर, विकास वाळुंज, किरण उघडे यांच्या जगण्याचा आधार निसर्गच. निसर्गाशीच तादात्म्य साधणाऱ्या कनोइंग खेळात कदाचित या तरुणांनी त्यांच्या जीवनाचंच प्रतिबिंब पाहिलं असेल. पदार्पणातच त्यांनी खुल्या गटातील सांगली, परळी वैजनाथ, नांदेडमधील स्पर्धांत सुवर्ण, रौप्य पदक जिंकले. ते जिंकले, कारण यात त्यांनी जगण्याची लढाई पाहिली. ते जिंकले, कारण सोबतीला त्यांचा निसर्ग होता. ते जिंकले, कारण त्यांना माहिती होतं, जगण्याची लढाई कधी हरायची नसते.

लक्ष्य आशियाई स्पर्धेचं..!

कष्टकऱ्यांनी घडवली स्पोर्टस क्रांती
Hemant Patil

कष्टकऱ्यांमध्ये मी जिंकण्याची ऊर्मी पाहिली, असं पिंपळगाव कॉलेजचे क्रीडा संचालक हेमंत पाटील यांनी सांगितले. शाळकरी मुलं, कष्टकरी तरुणांकडे पाहिल्यानंतर मला जाणवलं, की जिम्नॅस्टलाही लाजवेल, अशी त्यांची शरीरयष्टी आहे. आता टीम इतकी मजबूत झाली आहे, की आम्ही दोन लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले आहेत. एक पुणे विद्यापीठात सुवर्ण पदक आणि तर दुसरे आशियाई स्पर्धेचे. त्या दृष्टीनेच सराव सुरू असल्याचा आत्मविश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.

मला या खेळातलं काहीही माहिती नव्हतं. मासेमारी करताना सरांनी मला सांगितलं आणि कनोइंग शिकलो. दहावीनंतर शाळा सोडली. घरची जबाबदारी माझ्यावरच आहे. पण या खेळाने मला जगण्याचा आनंद दिला.
– योगेश जाधव, राज्यस्तरीय स्पर्धेतला रौप्य पदक विजेता

(Maharashtra Times, Nashik, 19 Oct 2014)

[jnews_block_37 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”60″]

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!