अंजनेरीवरील एक श्रावणी ट्रेक
Anjaneri trek nashik |
महेश पठाडे
(मो. 8087564549)
चैत्रात कधी तरी अंजनेरी गडावर गेलो होतो… तो पानगळीचा काळ. जिथे झाडे असतील तिथे पानांचा सडा पाहायला मिळतो. या वेळी मी प्रथमच श्रावणात 15 ऑगस्टला अंजनेरी सर केला. सोबत आमची चार जणांची ❛टीम मटा❜ होतीच.
खरं तर 15 ऑगस्टला ट्रेकला जाण्याचं आधीच ठरलं होतं. फक्त कोण कोण येणार हाच प्रश्न होता. तशी नंतर ठरवायला बरीच मोठी सुकाणू समिती होती. थेट्यांच्या संपतरावांनी थोडा जोर लावला आणि विनोद पाटील, आदित्य वायकुळ अशी आम्ही चौघेच उरलो. पण पुढे जी धम्माल झाली ती अवर्णनीयच.
अंजनेरीवरील काय अप्रतिम हिरवाई! श्रावणातली ही जादू प्रथमच न्याहाळत होतो. गडावर जणू हिरवाईची मखमली चादर पांघरलेली होती. हिरवाईचे किती तरी रंग पाहायला मिळाले. गडद हिरवा, पोपटी हिरवा, निळसर हिरवा… चालताना वाटेत लागणारी वानरसेना तर पावलापावलावर स्वागताला सज्ज होती. अंजनीसुताच्या गडावर आल्याची वानरसेनेने दिलेली ही सलामी होती. मर्कटलीला म्हणून काही जण त्यांची खोडी काढण्याचा प्रयत्न करीत होते. पण वानरसेनेने कुणालाही आपल्या मर्कटलीलांनी दुखावले नाही हे विशेष. कदाचित माणसांच्या मर्कटलीलांनी अचंबित झाले असतील..!
काळ्या पाषाणांतून जाणारा पायऱ्या पायऱ्यांचा रस्ता, मधूनच येणाऱ्या पावसांच्या सरींनी वाहणारे पाण्याचे छोटे छोटे ओहोळ… अंजनेरीच्या गडावरून दिसणारा धबाबा कोसळणारा तो धबधबा…. हिरव्या, पांढऱ्या रानफुलांची मैफल… क्या बात है..! हा नवपल्लवांचा बहार शब्दांत बांधताच येणार नाही. ती किमया दुर्गाबाईंनीच करावी. अंजनेरीचा धबधबा पाबिला तरी रिव्हर्स फॉल काही पाहायला मिळाला नाही. पावसाचा जोर ओसरल्याने असेल, पण उलट्या धबधब्याने हुलकावणी दिली. सर्वांत अप्रतिम म्हणजे मेघांची गर्दी जवळून न्याहाळली. हिरवाईने नटलेल्या अंजनेरीवर मी पहिल्यांदाच ढग सरकताना खूपच जवळून पाहिले… सोबतीने चालणारे मित्रही काही क्षणांत ढगांमध्ये धूसर झाले. गंधाळलेल्या धुक्यांनी केलेली ती दाटीवाटी इतकी सुरेख भासत होती, की निःशब्दपणे तो देखणा क्षण आम्ही फक्त न्याहाळतच राहिलो…
❛मी किनारे सरकताना पाहिले…❜
मी मला आक्रंदताना पाहिले
कोणती जादू अशी केलीस तू
मी धुके गंधाळताना पाहिले
ही नीता भिसे यांची गझल आठवावी इतका तो विलक्षण अनुभव होता.. मी या गझलेत किनारेऐवजी ढग या शब्दाचा बदल करून हीच गझल ❛मी ढग सरकताना पाहिले❜ असं म्हणेन. आमचे मित्र, टाइम्स ऑफ इंडियाचा फोटो जर्नालिस्ट आदित्य वायकुळ संपूर्ण अंजनेरी पालथा घालेपर्यंत काही तरी वेगळं शोधत होता. जेव्हा ढगांतली हालचाल सुरू झाली आणि काही क्षणांत बदललेला तो नजारा पाहून तो इतका आनंदित झाला, की त्याने पटकन जे फोटो शूट केले ते विचारता सोय नाही… 12 बोअरची बंदूक मशीनगनसारखी धडाडावी तसा तो आपल्या कॅमेऱ्यातून एकेक नजारा नेम धरून टिपत होता… याच फोटोंतून अंजनेरी ट्रेकच्या आठवणींचा धांडोळा सोबत घेऊन आम्ही परतीच्या वाटेला लागलो… अर्थात, पुन्हा परतण्याच्या निश्चयानेच…
या सफरीची व्हिडीओ लिंक…
(15 Ausgust 2017)