न ऐकलेल्या कॅप्टन कूलची कहाणी…
Sana Mir | पाकिस्तानच्या क्रिकेटला झळाळी मिळवून देणारी कर्णधार सना मिर. |
टीव्हीवर एक जाहिरात नेहमी पाहायला मिळते, ती म्हणजे महिलांच्या गोऱ्या व मुलायम त्वचेवरील क्रीमची. या जाहिरात कंपन्यांना एका महिला क्रिकेटपटूने फेसबुक पोस्टवर चांगलेच फैलावर घेतले. सुंदर त्वचा ही काय महिलांची ओळख असू शकते काय? मुलींमध्ये सुंदर दिसणे ही मानसिकता रुजविणे हेच चिंताजनक आहे…. मी बास्केटबॉल कोर्टवर कशी दिसते याची चिंता जर सतावत असेल तर त्यापेक्षा दुसरं दुर्दैव नाही…
जाहिरात कंपन्यांना सणसणीत चपराक मारणारी ही फेसबुक पोस्ट दुसऱ्या दिवशी प्रसारमाध्यमांमध्ये ब्रेकिंग न्यूज झाली. इतका परखडपणा नोंदविणारी ही कुणी महिला क्रिकेटपटू भारतीय नाही, तर पाकिस्तानची माजी कर्णधार (कॅप्टन कूल) सना मीर Sana Mir | होती.
आपल्याला सना मीर Sana Mir | माहिती असण्याचं काहीच कारण नाही. एक तर ती पाकिस्तानी. तिचं काय एवढं कौतुक? मुळात आपल्याला भारतीय महिला क्रिकेटपटूंचीच नावं तरी माहीत आहे का..? मिथाली राज, हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा, शफाली वर्मा ही दोनचार नावं सोडली तर इतर नावं सांगताही येणार नाहीत. हीच नावंही मस्तिष्काला बराच ताण देऊन आठवून आठवून महत्प्रयासाने सांगता येतील. पुरुष क्रिकेटपटूंची नावं विचारली तर..? पाकिस्तान, भारतातील क्रिकेटपटूंची पंधरावीस नावं तरी सहजपणे डोळ्यांसमोर येतील. ही अवस्था पुरुषांचीच नाही, तर महिलांचीही आहे. मात्र, या पुरुषी मानसिकतेला सना मीरने छेद दिला आहे.
ही सना मिर आठवण्याचं कारण म्हणजे, तिने २५ एप्रिल २०२० रोजी आपल्या १५ वर्षांच्या क्रिकेट प्रवासाला कायमचा अलविदा केला. ऑस्ट्रेलियातली दिग्गज खेळाडू मेगन शूटला मागे सारत गोलंदाजीत आयसीसीच्या रँकिंगमध्ये नुकतंच तिने पहिलं स्थान मिळवलं आहे. केवळ गोलंदाजीतच नाही, तर फलंदाजीतही सना आघाडीची क्रिकेटपटू. तिने क्रिकेटमध्ये जी उंची गाठली, ती आजपर्यंत पाकिस्तानातील एकाही महिला क्रिकेटपटूला गाठता आलेली नाही. अर्थात, त्यामागे मोठी संघर्षगाथा आहे…
सनाची संघर्षगाथा समजून घेण्यापूर्वी पाकिस्तान महिला क्रिकेटचा फ्लॅशबॅक पाहावा लागेल.
पाकिस्तानात ७० च्या दशकानंतर पाकिस्तान महिला क्रिकेट संघटना अस्तित्वात आली. त्याचं श्रेय शायझा आणि शर्मीन (Shaiza and Sharmeen) या खान भगिनींना द्यावं लागेल. कर्मठ विचारांच्या पाकिस्तानी मानसिकतेमुळे महिलांना घराबाहेरही पडू दिलं जात नव्हतं. तिथं या खान भगिनींनी क्रिकेट संघटना स्थापन केली होती! मग त्यांना जिवे मारण्याची धमकीही मिळू लागली. 1997 मध्ये पाकिस्तानी महिला क्रिकेट संघाला भारताचा दौरा करण्यासही सरकारने परवानगी दिली नाही. मुस्लिम धर्मात महिलांना सार्वजनिक ठिकाणी खेळणे मान्य नसल्याचं त्यामागचं कारण. नंतर खान भगिनींनी कसेबसे या सगळ्यांवर मात करीत 1997 मध्येच न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना खेळला. त्यानंतर त्यांनी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतही सहभाग घेतला. मात्र, 2000 पर्यंत या संघाला एकही आंतरराष्ट्रीय सामना जिंकता आला नाही. त्यामागचं एकमेव कारण म्हणजे कथित धर्ममार्तंडांकडून होणारी हेटाळणी. त्याचा या महिलांच्या मानसिकतेवर आणि सरावावरही परिणाम व्हायचा. मुळात सरावही कसा होणार? संपूर्ण देशातला संघ एका ठिकाणी एकत्र तर यायला हवा! ही सगळी परिस्थिती पाहता, किमान पाकिस्तानी महिला खेळत होत्या हेच मोठं धाडस. या धाडसामागे होत्या शायझा आणि शर्मीन या खान भगिनी. पुढे 2005 मध्ये आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट परिषद आयसीसीत विलीन झाल्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट संघटनांना या आयसीसीचे संलग्नत्व मिळाले. या संपूर्ण घडामोडीत पाकिस्तानी महिला क्रिकेट संघटनेच्या वाटेत अनेक संघर्ष आले. पुढे पीसीबीची पॉवर इतकी वाढली, की ज्यांनी या संघाचा पाया रचला, त्या सर्वच शिलेदारांना घरचा रस्ता दाखवला आणि नवोदितांचा नवा संघ उभा केला. या नव्या संघातून उभं राहिलेलं नवतरुण नेतृत्व म्हणजे सना मिर.
इस्लामी परिभाषेत हजरत मुहम्मद यांची गुणगाथा म्हणजेच ‘सना’. सना या नावातच कौतुक आहे. सनाची जीवनकहाणी सुरू होते, खैबर पख्तुनख्वा प्रांतातील एबोटाबाद शहरापासून. सरबन पर्वतांनी वेढलेलं एक निसर्गसंपन्न शहर. एबोटाबाद हे नाव ऐकल्यानंतर तुम्ही उगाच नखशिखांत थरारला असाल. हो… हे तेच शहर आहे, ज्या शहरात क्रूर दहशतवादी ओसामा बिन लादेनचा अमेरिकेने खात्मा केला होता. लादेनमुळे एबोटाबाद कधीच खुजं ठरणार नाही. मुळात या शहराचं स्वतःचं असं सौंदर्य आहे, महत्त्व आहे, लौकिक आहे. पाकिस्तानी सैन्याच्या छावणीने व्यापलेलं हे शहर इतकं सुरेख आहे, की जणू जन्नतचं द्वारच. पाकिस्तानी लोकांमध्ये तरी तशी भावना आहे. सैन्यातील निवृत्त अधिकारी उर्वरित आयुष्य मजेत घालवण्यासाठी एबोटाबादलाच निवडतात. म्हणूनच त्याला मेजरांचं शहरही म्हणतात. अशा या शहरात 5 जानेवारी 1986 रोजी सनाचा जन्म झाला. वडील सैन्यात होते. त्यामुळे तिला किमान खेळण्याची मुभा होती.
सरबन पर्वतराजीत जेव्हा दुपारी अस्रच्या नमाजपठणाचे सूर कानी पडायचे तेव्हा एक चिमुकली मोठ्या भावाच्या मित्रांसोबत रस्त्यावर क्रिकेट खेळायला जायची. सैन्याच्या छावणीतल्या एका कॉलनीत मुलांमध्ये सनाने खेळणंच एक अप्रूप होतं. त्या वेळी ती वकार युनूसची भयंकर चाहती होती. चिमुकली सना वकारसारखी हेअरबँड बांधायची आणि अगदी त्याच्यासारखा ३० यार्डांचा रनअप घेत गोलंदाजी करायची. मुलांच्या दांड्या उडणार नाही तरच नवल. गल्लीतल्या रस्त्यांवर खेळणारी सना पुढे कधी तरी पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघात स्थान मिळवेल असं कुणालाही वाटलं नव्हतं. त्याचं कारण म्हणजे पाकिस्तानातील कर्मठ धर्मनिष्ठ विचारसरणी.
सनाने आपल्या बालपणीची एक आठवण सांगितली. ती अवघ्या तीन वर्षांची होती तेव्हा ती आपल्या मोठ्या भावासोबत रस्त्यावर क्रिकेट खेळायची. त्या वेळी सना क्रिकेटचा मुख्य हिस्सा अजिबात नसायची. तिचा मोठा भाऊ तिला थर्डमॅनला पाठवायचा. म्हणजे चेंडू आणणे वगैरे. मूळ सामन्यात तिला कोणतीही भूमिका नव्हती. अगदीच न खेळण्यापेक्षा तिच्यासाठी हे बरं होतं. नंतर एबोटाबादच्या छावणीतून तिच्या वडिलांची बदली झाली जी सनाच्या पथ्यावर पडली असंच म्हणावं लागेल.
पाकिस्तानात शाळा, महाविद्यालयांत मुलींसाठी क्रिकेट नव्हतंच. मात्र, तिच्या क्रिकेटची जडणघडण तिच्या मोठ्या भावामुळेच झाली. तो तिचा पहिला कोच. तो तिला रस्त्यावरच क्रिकेटचे अनौपचारिक धडे देऊ लागला. जेव्हा १९९२ मध्ये पाकिस्तानने वर्ल्डकप जिंकल्यानंतर सना वेगवान गोलंदाजीकडे वळली. सना सहावीत होती तेव्हा तिची शालेय क्रिकेट संघात निवड झाली. मात्र, जसजशी ती पुढच्या इयत्तेत जाऊ लागली तसतसं तिला क्रिकेट खेळणं कमी करावं लागलं. कारण बालपणात ती जितक्या सहजपणे रस्त्यावर क्रिकेट खेळायची, तसं खेळण्यास किशोरावस्थेत मर्यादा आल्या नव्हे, त्या घातल्या गेल्या. कारण रस्त्यावर मुलीने खेळणं हेच निंदणीय मानलं जायचं. त्यामुळे मग ती बास्केटबॉल, स्विमिंग, मार्शल आर्टसकडे वळली. अर्थात, हा निर्णय घेणंही तिच्यासाठी थोडं जडच गेलं. कारण जो खेळ खेळू शकत होती, तो न खेळता उगाच इतर खेळांकडे जाणं खरोखरच तिला पचनी पडत नव्हतं.
पाकिस्तानातील सर्वांत प्रतिष्ठित विद्यापीठात विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेत अभियांत्रिकी शिक्षण घेऊ लागली तेव्हा तिच्या आईला तिची विशेष काळजी वाटू लागली. साधारणपणे सर्वच मातापित्यांना आपल्या मुलीची काळजी वाटणे तसे स्वाभाविकच होते. अशातच एक जाहिरात वाचण्यात आली. ती म्हणजे, पाकिस्तान महिला क्रिकेट संघासाठी खेळाडूंची निवड चाचणी. या वेळी तिच्या वडिलांनी तिला प्रोत्साहन दिलं. तिला म्हणाले, “आपल्याकडे पाकिस्तानमध्ये अनेक इंजिनीअर आहेत; पण अनेक महिला क्रिकेटपटू नाहीत. तू जा या चाचणीला आणि तुझं स्वप्न साकार कर.”
कर्मठ पाकिस्तान सनाच्या वडिलांसारखे मोठ्या मनाचे पालक होते. वडिलांच्या प्रोत्साहनामुळे सनाला बळ मिळालं. अर्थात, ती अशा समाजातून खेळात पाऊल ठेवत होती, ज्या समाजाने महिलांना कधीच मोकळीक दिली नाही. असं काही वेगळं करू पाहणाऱ्या महिलांच्या वाट्याला नेहमीच अवहेलना आली. अर्थात, हा तोच समाज आहे, ज्या समाजातून एक पाकिस्तानी क्रिकेट संघ उभा राहिला. सना तिच्या संघातील खेळाडूंशी जेव्हा बोलते तेव्हा तिला जाणवलं, की ती एकमेव अशी मुलगी आहे, जी शेजारपाजारच्या मुलांमध्ये रस्त्यावर क्रिकेट खेळून आली आहे. इतर महिला खेळाडू चौकटीबाहेर आल्या खऱ्या, पण वाढल्या चौकटीतच. त्यामुळे प्रत्येक महिलेला केवळ इच्छा-आकांक्षांचीच गरज नसते, तर त्या जोडीला भावनिक आणि सामाजिक समर्थनाचीही गरज असते.
सनाची वर्णी पाकिस्तानी क्रिकेट संघात लागली. त्याच वर्षी म्हणजे २००५ मध्ये भारतीय महिला संघाने प्रथमच पाकिस्तानचा दौरा केला होता. पाकिस्तानी संघात सना नवखीच होती. मुळात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) नियंत्रणाखाली महिला क्रिकेट संघटना आल्यानंतर त्यांनी पहिला धाडसी निर्णय घेतला. तो म्हणजे त्यांनी सर्वच जुन्या खेळाडूंना घरी बसवले आणि त्यांच्या जागी नऊ नव्या महिला खेळाडूंना संधी दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघातील हा महत्त्वपूर्ण बदल होता, की संपूर्ण पाकिस्तानी संघच नवोदितांचा बनला. संघात प्रथमच पदार्पण करणाऱ्या या नऊ खेळाडूंपैकी सना एक होती. कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर भारताविरुद्ध सामना रंगला होता. त्या वेळी सना गोलंदाजी करीत होती आणि समोर होती भारताची अव्वल फलंदाज मिथाली राज. सनाने आपल्या इनस्विंग यॉर्करवर मिथालीचा लेग स्टम्पच उखाडला. महत्त्वाची विकेट मिळविणाऱ्या सनाचा आत्मविश्वास दुणावला. अर्थात, सांघिक पातळीवर भारतीय संघाने नवशिक्या पाकिस्तानी संघाची अक्षरश: पिसं काढली होती. या अनुभवातून सनाला सांघिक पातळीवर अनेक उणिवा जाणवल्या. प्रशिक्षण व्यवस्थाच चुकीची असल्याचे तिच्या लक्षात आले. तिला पाठीचं दुखण्याने ती बेजार झाली. या वेळी तिला पाकिस्तानमधील वैद्यकीय सुविधेचा अभाव प्रकर्षाने जाणवला. डॉक्टरांनी तर तिला खेळच सोडण्याचा सल्ला दिला. मात्र, तिने हा सल्ला धुडकावला. शेवटी तिने सेकंड ओपिनियन घेतले. तेव्हा तिला कळले, की वेगवान गोलंदाजीऐवजी ऑफ स्पिन गोलंदाजी करता येऊ शकेल. बाहेर सराव करता येत नसल्याने घरातच तिने फिरकी गोलंदाजीचा सराव सुरू केला.
इथं वेगवान गोलंदाजी थांबल्यानंतर सनाची कहाणी खऱ्या अर्थाने सुरू होते. सनाने स्वत:ला गोलंदाज म्हणूनच नाही तर उत्तम फलंदाज म्हणूनही स्वत:त बदल केले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, मैदानावर तिच्या नेतृत्वाची चुणूकही मिळत गेली.
‘‘मी रस्त्यावरील क्रिकेटचं प्रॉडक्ट आहे. कारण मी क्रिकेटचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण कोणत्याही अकादमीत घेतलेले नव्हते. मात्र, मला कर्णधारपद भूषवायला आवडायचे. जेव्हा मी क्रिकेट खेळायचे तेव्हा माझ्यासोबत खेळणारी मुले माझ्यापेक्षा सात-आठ वर्षांनी मोठी असायची. क्षेत्ररक्षण करताना मी गोलंदाजाला अनेक सूचना करायचे. शेवटी ते म्हणायचे, बाई, तूच हो कर्णधार आणि मी कर्णधारपदाची धुरा सांभाळायचे. तशीही मी कोणाचं ऐकत नव्हतेच.’’
२००७ मध्ये राष्ट्रीय महिला क्रिकेट स्पर्धेसाठी सनाची कराची संघात कर्णधारपदासाठी (कॅप्टन कूल) निवड झाली. मात्र, सनाने पीडब्लूसीसीएला सांगितले, की तुम्ही वरिष्ठ खेळाडूला नेतृत्वाची संधी द्या. मात्र, संघटनेच्या प्रशासनाने ऐकले नाही. या स्पर्धेत सनाच्या नेतृत्वाखालील कराची संघाने कट्टर प्रतिस्पर्धी लाहोरच्या संघावर सनसनाटी विजय मिळवला. सना एकमेव अशी खेळाडू होती, जी सामाजिक दबाव झुगारून संघाच्या मागे ठामपणे उभी राहू शकत होती.
त्या वेळी पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघाची कर्णधार उरूझ मुमताज हिने पीसीबीला सांगितले, की मी कर्णधारपदाचा कार्यभार स्वीकारू शकणार नाही. कारण दंत चिकित्सक परीक्षेसाठी मला अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. मुमताज हुशार होती. क्रिकेटच नाही तर इतरही अनेक खेळांमध्ये तिने आपली छाप सोडली होती. आता पीसीबीला अशा खेळाडूची गरज होती, जी मुमताजप्रमाणे उत्तम नेतृत्व करू शकेल आणि या नव्या जबाबदारीचा आपल्या वैयक्तिक कामगिरीवरही परिणाम होऊ देणार नाही.
अष्टपैलू सना मिरसारखं नेतृत्व कोणत्याही संघाला दिशा देणारं ठरू शकतं… |
प्रशासनाने सनावर विश्वास दाखवला. पाकिस्तान संघाने 2009 मध्ये आयर्लंड दौरा केला तेव्हा कर्णधारपदाची धुरा सनाकडेच चालून आली.
‘‘कर्णधाराने केवळ जिंकण्यासाठी खेळले पाहिजे. मात्र, त्यासाठी कर्णधाराला हाही विश्वास ठेवला पाहिजे, की संघातला प्रत्येक खेळाडू तुमच्यासाठी जिंकू शकेल.’’
सनाला माहीत होते, की आपला संघ बलाढ्य संघाविरुद्ध केवळ साधनसुविधांच्या जोरावर अजिबात लढू शकत नाही. कौशल्य, जिद्द, इच्छाशक्ती आणि जोपर्यंत लढाई संपत नाही तोपर्यंत लढण्याच्या क्षमतेवरच संघ जिंकू शकतो.
सनाच्या नेतृत्वाची खरी कसोटी इंग्लंडविरुद्ध लागली. 2013 मध्ये लोफबोरोफ Loughborough | येथे झालेल्या टी-20 सामन्यात पाकिस्तानने 116 धावसंख्या उभारली होती. इंग्लंडला जिंकण्यासाठी 117 धावांची गरज होती. विजय इंग्लंडच्या आवाक्यात होता. मात्र, सगळी मदार अखेरच्या षटकावर होती. इंग्लंड आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना अखेरचे षटकच कमाल करणार होते. त्यामुळे हे निर्णायक षटक कोणाला द्यायचं, असा प्रश्न सनापुढे होता. तसे तिच्याकडे उत्तम पर्याय होते, पण तिने धक्कादायक आणि धाडसी निर्णय घेतला. तो म्हणजे अननुभवी लेग स्पिनर बिस्माह मारूफकडे या अखेरच्या षटकाची जबाबदारी सोपवली.
सनाने तिची जिंकण्यासाठी सुरू असलेली तळमळ पाहिली होती. तिने एका खेळाडूला धावबादही केले होते. सनाने पाहिलं, की किती प्रतिकूल परिस्थितीत ती जिंकण्यासाठी धडपडतेय! तिने मग मारूफकडेच चेंडू सोपवला. हा सामना पाकिस्तान अतिशय नाट्यमयरीत्या जिंकला. अखेरच्या षटकात चौथ्याच चेंडूवर खणखणीत षटकार खेचूनही इंग्लंड मात्र एका धावेने पराभूत झाला होता.
तुम्हाला त्या क्षणी क्लिक होण्याची गरज आहे. मग ते वैशिष्ट्यपूर्ण षटक असू शकतं किंवा धावबाद करण्याचा एखादा क्षण तरी. मग तुम्ही सुरक्षित झोनमध्ये येतात, हे सांगताना सना हळूच मिश्कील चिमटा काढते- पाकिस्तानी लोकांमुळे आम्हाला या सुरक्षित झोनमध्ये येणे तसे अवघडच आहे; पण आम्ही जर सुरक्षित झोनमध्ये आलो तर मग आम्हाला बाहेर काढणं अवघड आहे हेही तितकंच खरं, असा विश्वासही सना व्यक्त करते.
श्रीलंकेतील गॅलेच्या मैदानावरचा 2012 मधील भारताविरुद्धचा सामना सनासाठी अविस्मरणीय आहे. आयसीसी टी-20 वर्ल्डकपमधील हा सामना होता. त्या वेळी सनासमोर सलामीला कोणाला पाठवायचे हा मोठा प्रश्न होता. शेवटी सनानेच सलामीला खेळण्याचा निर्णय घेतला. सनाने सलामीला येऊन 38 चेंडूंमध्ये 26 धावा केल्या. पाकिस्तान संघात सनाची ही सर्वोच्च धावसंख्या होती. पाकिस्तानचा संघाचा डाव अवघ्या 98 धावांत आटोपला. माफक धावसंख्या असतानाही अटीतटीच्या या लढतीत लढावू सनाच्या नेतृत्वाखालील संघाने भारताला कडवी लढत दिली. अखेरचे निर्णायक षटकही सनाने स्वतःकडेच घेतलं आणि अवघ्या एका धावेने भारताचा पराभव केला. जागतिक स्पर्धेत भारताला पराभूत करणारा सनाच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानचा हा पहिलाच संघ होता. ही मोठी अभिमानास्पद बाब होती. सनाच्या नेतृत्वाची आणि अष्टपैलू खेळाची ही चुणूकच म्हणावी लागेल.
सामन्यानंतर सनाने या विजयाचं गुपित उघड केलं. ती म्हणाली, की आम्हाला माहीत होतं, की माफक लक्ष्य असल्याने भारत शक्यतो मोठे फटके मारणार नाही. त्यामुळे शक्यतो एकेरी धाव घेण्यापासून रोखण्याची रणनीती आखली. हेतू हाच, की भारतीय फलंदाज मोठे फटके मारण्याच्या नादात बाद होतील. झालेही तसेच. सनाच्या जाळ्यात भारतीय संघ अडकला. एकेरी धावा मिळत नसल्याने त्यांनी अवसानघातकी फटके मारण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम असा झाला, की 50 धावांत भारताने दोन गडी गमावले. नंतर टप्प्याटप्प्याने भारताच्या विकेट पडल्या आणि जी माफक धावसंख्या होती अखेर भारताच्या आवाक्याबाहेर गेली.
पाकिस्तानच्या क्रिकेट इतिहासात सर्वांत यशस्वी कर्णधार म्हणून सनाने जो लौकिक मिळवला, तो अन्य एकाही पाकिस्तानी कर्णधाराच्या वाट्याला आलेला नाही. तिच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघाने वनडे सामन्यात 24 सामने गमावले, तर 21 सामने जिंकले आहेत. टी-२० सामन्यातही २२ सामने जिंकले आहेत. एवढे सामने जिंकणारी सना एकमेव पाकिस्तानी कर्णधार आहे.
सनाने स्थानिक खेळाडूंना नेहमीच मार्गदर्शन केले आहे. सनाला एक कर्णधार म्हणून नाही, तर एक नेता म्हणूनच पाहिले. कारण ती खेळाडूंच्या बाजूने ठामपणे, भिडस्तपणे उभी राहते. परदेश दौऱ्यातही कर्णधार म्हणून तिच्यासमोर अन्य खेळाडूंच्या तुलनेने उत्तम सुविधा पीसीबीने देऊ केल्या जात होत्या. मात्र, तिने त्या सर्व अत्याधुनिक सुविधा नाकारल्या आणि खेळाडूंसोबतच राहण्याचा निर्णय घेतला. कर्णधार म्हणून केवळ मैदानावरच तिने नेतृत्व केले नाही, तर खेळाडूंचे वेतन, तसेच भत्ता वाढवून मिळावा म्हणून बोर्डाकडे अनेकदा पाठपुरावाही केला. सना संघातील खेळाडूंसाठी नेहमीच लढली. प्रत्येक खेळाडूने लौकिक मिळवावा, ही तिची धडपड उत्तम नेतृत्वगुणाचं लक्षण आहे. सनामध्ये ते होतं, म्हणूनच तिच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानच्या ८ खेळाडूंनी आयसीसीच्या जगातील सर्वोत्तम २० खेळाडूंमध्ये स्थान मिळवलं. पाकिस्तानच्या इतिहासात कोणत्याही महिला कर्णधाराच्या कारकिर्दीत असं कधीच घडलं नव्हतं.
सनाच्या कामगिरीवर एक झलक
‘‘गेल्या महिन्यात मला विचार करण्यास वेळ मिळाला. मला वाटते, हीच योग्य वेळ आहे निर्णय घेण्याची. मी खेळ आणि देशासाठी माझे सर्वश्रेष्ठ योगदान दिले आहे. मी माझा परिवार आणि आप्तस्वकियांनाही धन्यवाद देते, ज्यांनी विनाशर्त मला सहकार्य केले आणि पाकिस्तानची सेवा करण्याचे माझे स्वप्न पूर्ण केले.’’
चौतीस वर्षीय सनाने 226 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यापैकी 2009 ते 2017 दरम्यान झालेल्या १३७ सामन्यांत ती कर्णधार होती. तिने 120 वनडे सामन्यांत 151, तर 106 टी-20 सामन्यांत 89 विकेट घेतल्या आहेत. पाकिस्तानसाठी वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी सना तिसऱ्या स्थानावर आहेत. सनाने वन-डे कारकिर्दीत 1630 धावा केल्या आहेत.
सध्या करोना विषाणूच्या संक्रमणामुळे जगभरातील क्रिकेटच्या स्पर्धा स्थगित आहेत. भविष्यात त्या कशा सुरळीत होतील, याचाही अंदाज कुणाला नाही. अशा स्थितीत वयाच्या चौतिसाव्या वर्षी पाकिस्तानच्या या यशस्वी महिला कर्णधाराला क्रिकेटला अलविदा करण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. एरव्ही अस्रच्या नमाजाचे सूर कानी पडले, की रस्त्यावर ही मुलगी कल्ला करायची. आता ‘अस्र’चे सूर कानी पडतीलही, पण रस्त्यावर क्रिकेटचा कल्ला करणारी सना मात्र दिसणार नाही.
3 Comments