ग्रीन सोल्जर अजित टक्के
दिवसभर पर्यावरणाच्या गप्पा झोडायच्या आणि सकाळी उठलं की प्लास्टिकच्या टूथब्रशने दात घासायचे, असलं प्लास्टिक जगणं त्यांना अजिबात मान्य नाही. मग दातही घासायचे नाही का, असा प्रश्न विचारला तर त्यांचा प्रतिप्रश्न- का, टूथपेस्टशिवाय दात साफ करता येत नाही का? ते फक्त बोलत नाहीत, तर त्यांची संपूर्ण जीवनशैलीच पर्यावरणपूरक आहे. ते ना टूथब्रश वापरतात, ना साबण वापरतात, ना सिंथेटिक कपडे. जगण्यातलं 95 टक्के प्लास्टिक त्यांनी आपल्या आयुष्यातूनच वजा केलंं आहे. हा पर्यावरणरक्षक (ग्रीन सोल्जर) अवलिया आहे अजित टक्के.
प्लास्टिकचा इतका भयानक परिणाम आपल्यावर होत असतानाही आपण का टाळू शकत नाही? त्याचं उत्तर पुन्हा जीवनशैलीवर | Lifestyle | येऊन पोहोचतं. टक्के म्हणतात, हे टाळण्यासाठी लोकांची जीवनशैलीच तपासून पाहायला हवी. या जीवनशैलीत कुठे कुठे प्लास्टिक येतं हे तपासायला हवं. या सगळ्याला पर्याय आहेत. आपण जे काही सिंथेटिक कपडे वापरतो, ते प्लास्टिकच आहे. हे सगळं पॉलिमरच आहे. प्लास्टिकचाच वेगळा प्रकार आहे. टक्केंनी यावर काही पर्याय स्वतःच निर्माण केले आहेत. बटणाचं उदाहरण तर समोर आहेच. साबणावरही त्यांनी स्वतःच पर्याय शोधले आहेत. टक्के जेवढा बाहेर वेळ देतात तेवढाच ते घरातल्यांसाठीही देतात. कारण तेही समाजाचे घटक आहेत हे ते नाकारत नाहीत. त्याचा परिणाम असा झाला, की घरातही किमान 60 ते 70 टक्के वस्तू पर्यावरणपूरकच असतात. टक्के प्रत्येक गोष्ट टक्क्यातच सांगतात. हा आडनावाचा परिणाम म्हणावा की ते सार्थकी लावण्याचा हेतू ते इथं महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं एवढचं आहे, की आपण पर्यावरणपूरक जगू शकतो हा विश्वास मनात दाटला पाहिजे. अजित टक्के तत्कालिक विचार कधीच करीत नाहीत. त्यामुळे त्यांचा प्रत्येक विचार अचंबित करून जातो. म्हणूनच अजित टक्के खरेखुरे ग्रीन सोल्जर ठरतात.
प्लास्टिकचे विघटन | Plastic decomposition | होऊ शकत नसले तरी ते नष्ट करणाऱ्या काही बॅक्टेरियांचा शोध लागला आहे, हे जेव्हा त्यांच्या तोंडून ऐकले तेव्हा काही तरी आशादायी आहे असं उगाच मनाला चाटून गेलं. पण छे… प्लास्टिक खाणारे बॅक्टेरिया असतील तर तो पर्याय टक्केंना अजिबात योग्य वाटत नाही. म्हणजे जगात जे काही प्लास्टिक आहे, ते नष्ट करणारे जर बॅक्टेरिया असतील, तर त्या बॅक्टेरियांची संख्या वाढविण्याचेही आव्हान आहे. निसर्गात सर्व गोष्टींचा समतोल आहे. कोण जास्त, कोण कमी, कोण किती याचं प्रमाण निसर्गाचे ठरलेले आहे. या बॅक्टेरियांची संख्या माणसाने केवळ प्लास्टिकसाठी जर वाढवली तर ते बॅक्टेरिया आणखी काय काय डिग्रेट करत जातील याचा अजून अभ्यास कुठे झालाय? एकदा जर या बॅक्टेरियांची संख्या वाढायला लागली तर ती नियंत्रणात आणणं खूप अवघड आहे. अजून आपण लोकसंख्याच नियंत्रणात आणू शकलेलो नाही. पंधरा-वीस वर्षे झाली तरी अजून पोलिओ निर्मूलनाच्या मोहिमा सुरू आहेत. त्यामुळे आज माणसाकडे तंत्रज्ञान आहे, विज्ञान आहे; पण त्याचा तारतम्याने उपयोग करण्याची सवय लोकांमध्ये नाही. अजित टक्के (ग्रीन सोल्जर) यांचा हा विचार खरंच विचार करायला लावणारा आहे.
म्हणून अजित टक्के ग्रीन सोल्जर ठरतात…
अजित टक्के ग्रीन सोल्जर आहेत. कारण टक्केंनी ज्यात प्लास्टिक पाहिलं ते ते त्यांच्या आयुष्यातून वजाच होत गेलं. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातून पेनही वजा झालं. म्हणजे पेन वापरतात; पण तो त्यांचा स्वतःचा नसतो. सोशल मीडिया हा शब्दच सांगतो, की मला सोशली वापरायचं. म्हणूनच टक्केंच्या सोशल मीडियाचे अकौंट बऱ्याच मोबाइलमध्ये असतात. कारण सोशल मीडियासाठी ते सर्वांचे मोबाइल वापरतात. अर्थात, ते फोन वापरतात; पण तो बेसिक आहे. सोशल मीडिया हा सामायिकतेने वापरायचा असतो म्हणून ते दुसऱ्याचा मोबाइल वापरतात. ते फारसं लिहीत नाहीत. अगदीच लिहायचं असेल तर वापरलेला कागद वापरतात. अगदीच कुठे काही पाठवायचं असेल तर प्रिंट काढून ते पाठवतात. या जीवनशैलीतून कोणी वेगळा अर्थ तर नाही ना काढणार, ही अनामिक भीती त्यांना वाटते. ती अकारण आहे असंही नाही. कारण आजचा जमाना असा आहे, की माणसाला माणूस म्हणून कुणी जगूच देत नाही. त्याला कुठल्या तरी साच्यात अडकवण्याचा प्रयत्न करीत असतो. नाही मग हा असाच आहे, तसाच आहे वगैरे. टक्केंना हेच मुळी आवडत नाही. माणूस म्हणून जगण्याचे स्वातंत्र्य का नसावे? तुमचे स्वतःचे विचार पर्यावरणपूरक का नसावेत, हा त्यांचा प्रश्न आहे.
टक्के नावाची ही व्यक्ती तुमच्या-आमच्यासारखीच आहे. त्यांनी तिनाचा आकडा लिहिला आणि तुम्ही तुमच्या आरशात सहा वाचला. घोळ इथं आहे. लोकांना वाटतं, की हा माणूस अश्मयुगात जगतो आहे. मात्र, तसं अजिबात नाही. जो माणूस लोकांना विज्ञानाच्या गोष्टी सांगतो, तो तुमच्या आरशातल्या सहासारखा उलट्या विचाराचा कसा असू शकेल? लोकांमध्ये अर्थाचा अन्वयार्थ काढण्याची खोड अलीकडे खूपच रुजलेली आहे. तसे न होवो ही टक्केंची भावना 100 टक्के योग्य आहे. त्यांच्याच भाषेत सांगायचं, तर लोकांनी तारतम्याचं सूत्र समजून घ्यायला हवं.
पेन सामायिकपणे वापरतात!
त्यांचं पेन न वापरण्याचं धोरण पर्यावरणाला | Eco friendly | साजेसं आहे. रोज आपण किती पेन वापरतो, यावरून ते लक्षात येईल. किती तरी वर्षांपासून पेनाचे उत्पादन होत आहे. रोज लाखो पेन बाजारात येतात. लोकसंख्येच्या किती तरी जास्त पेन उपलब्ध आहेत. म्हणूनच त्यांनी पेन सामायिक वापरण्याची वस्तू मानली आहे. विरोधाभास असा आहे, की एकीकडे आपण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वाढावी यासाठी प्रयत्न करीत असतो. दुसरीकडे मारुती कंपनीने दहा वर्षांत सर्वाधिक कारची विक्री केली म्हणून आपण त्यांना गौरवान्वितही करीत असतो. टाटाने नॅनो काढली म्हणून टाटांचा सत्कार, मग टाटाने मोठी बस का नाही काढली, जी पर्यावरणपूरक असेल, जी गॅसवर चालेल किंवा त्याचा प्रसार टाटाने का नाही केला, हा टक्केंचा प्रश्न म्हणूनच विचारात पाडतो. टक्केंच्या या जीवनशैलीने अनेक जण बुचकळ्यात पडतात. एकदा त्यांच्यासाठी एकाने प्लास्टिकच्या थैलीत सफरचंद आणले. त्यांनी ते सफरचंद अजिबात स्वीकारले नाहीत. ती व्यक्ती म्हणाली, मी प्लास्टिक माझ्याकडे ठेवतो. तुम्ही फक्त सफरचंद घ्या. पण कसले काय, सफरचंद नको नि ते प्लास्टिकही घेऊन जा. असे हे टक्के.
बिस्लेरीचे पाणीही नाकारतात…
त्यांना एका कार्यक्रमात बिस्लेरीची पाण्याची बाटली देण्यात आली. इतरही अनेक जण होते. त्यांनी ते पाणी घेतलं, पण टक्केंनी ते स्पष्टपणे नाकारलं. टक्केंनी त्यांच्या आयुष्यातून प्लास्टिक वजा केलंय हे अनेकांना माहीत नसतं. एखाद्या कार्यक्रमात त्यांना प्लास्टिकचा बुके दिला किंवा काही वस्तू दिली तर ती ते स्पष्टपणे नाकारतात. सगळ्यांना आश्चर्य वाटतं. अरे ही नाकारणारी व्यक्ती इथे कशी काय? मग तिथं सगळी ही स्पष्टीकरणं द्यावी लागतात. त्यामुळे गोंधळ उडतो. टक्केंना मग लाकडी मोमेंटो दिला तरी तो त्यांना मान्य होत नाही. कारण कुठल्या तरी झाडाचा बळी देऊनच हे लाकूड वापरलं असेल ही भावना त्यांच्या मनात सतत जागी असते. त्यामुळे त्यांनी सत्कार हा विषयच बंद करून टाकला. यावर ते बाबा आमटेंंचं उदाहरण देतात. बाबा आमटे म्हणायचे, की एवढे खंडीभर पुरस्कारांचं करायचं काय? मग आमटेंनी ते सगळे पुरस्कार पोत्यात भरून गोडावूनमध्ये टाकून दिले. कारण लोकं बदलायला तयार नाहीत.
मराठी विज्ञान परिषद, महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेच्या माध्यमातून ते काहीना काही उपक्रम सातत्याने राबवत असतात. या दोन्हींत ते स्वतःला एक कार्यकर्ता मानतात. 2006 पासून ते मराठी विज्ञान परिषदेचे काम पाहतात. मुलांच्या मानसिकता बदलवून, त्यांना संशोधनाची गोडी लागावी यासाठी ते काम पुढे नेत आहेत. हे विज्ञानही ते सुंदर पद्धतीने समजून सांगतात- गाडी वापरली, अँड्रॉइ़डचा फोन वापरला, इंटरनेट वापरलं म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन अजिबात नाही. आम्ही चंद्र किंवा मंगळावर पाणी आहे म्हणून ते पृथ्वीवर आणणं हाही वैज्ञानिक दृष्टिकोन नाही. हा तंत्रज्ञानाचा दृष्टिकोन आहे. पृथ्वीवरील पाणी चांगलं ठेवणं, ते योग्य पद्धतीने वापरणं हा खरा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. आम्हाला वाहतुकीच्या आणि पार्किंगच्या समस्या आहे म्हणून मल्टिस्टोअरिंग पार्किंग बांधणं हा वैज्ञानिक दृष्टिकोन नाही. तो तंत्रज्ञानाचा भाग आहे. गाड्यांचा वापर मर्यादित करणं, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली करणं, मोठ्या गाड्या योग्य कारणासाठीच बाहेर काढणं याला वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणतात. बाजारात इनो मुबलक मिळतं म्हणून खाणे हा वैज्ञानिक दृष्टिकोन नाही, तर स्वतःच्या पोटाची क्षमता ओळखून अन्नसेवन करणं हा वैज्ञानिक दृष्टिकोन. टक्केंचे हे विचार शंभर टक्के खरे आहेत. दहावी, बारावीचे टक्के कदाचित तुम्हाला रुचले नसतील, पण आयुष्यात पर्यावरण रोखायचे असेल तर हे टक्के समजून घ्यावेच लागतील.
नाशिकमध्ये पहिल्यांदा शिकारबंदी आणणारा पक्षीमित्र दिगंबर गाडगीळ
Facebook page kheliyad
[jnews_block_37 first_title=”Read more at:” post_offset=”5″ include_category=”1635″]
Verry nice concept plastic injuriats to health and
yes
thanx for your reply 🙂
महेश खूप छान लिहिले.
Thank you so much 🙂