का झाला भारतीय कुस्ती महासंघ निलंबित?
भारतीय कुस्ती महासंघ निलंबित करण्याची कारणे नेमकी काय, निवडणुकीनंतर अवघ्या दोन दिवसांत सरकारने का निर्णय घेतला… तांत्रिक कारणे तर पुढे आली. मात्र, मूळ कारणे वेगळीच आहेत. काय आहेत ही मूळ कारणे यावर टाकलेला प्रकाश…
अमित शहाच्या जवळचे आणि भारतीय जनता पक्षाचे बाहुबली खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात भाजपने प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या पावले उचलली आहेत. त्यापैकीच पहिलं पाऊल म्हणजे भारतीय कुस्ती महासंघाचं निलंबन. याच बृजभूषण शरण सिंह यांना जाहीरपणे पाठीशी घातलं. अगदी जेल जाण्यापासूनही वाचवलं. आज निवडणुकीतील जागांच्या सारीपाटासाठी याच बृजभूषण शरण सिंह यांना बळीचा बकरा बनवलं. म्हणूनच प्रश्न उपस्थित होतो, की का झाला भारतीय कुस्ती महासंघ निलंबित? केवळ आंदोलक कुस्तीगिरांची नाराजी एवढंच एकमेव कारण अजिबात नसावं. तसं असतं तर कुस्तीगिरांना दोन टप्प्यांत आंदोलन करावं लागलं नसतं. मणिपूर प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खेद व्यक्त करायला बराच कालावधी लागला. अनेक घटनांची तर कधी दखलही घेतली गेली नाही. घेतली गेलीच तर त्यामागची कारणं वेगळी होती. इथं मात्र वेगळीच गणितं आहेत. इथं आहेत जातीची समीकरणं. कारण लोकसभा निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत.
आता भारतीय कुस्ती महासंघ निलंबित करण्याच्या मूळ कारणांवर चर्चा करूया. ज्या कुस्तीगिरांनी आंदोलन सुरू केलं, त्यातील बहुतांश पहिलवान जाट समुदायातील आहेत. दिल्ली, हरियाणा, पंजाब, राजस्थान ही राज्ये जाटबहुल आहेत. म्हणजे 30-40 जागांवर जाट समुदायाचा प्रभाव आहे. या जागांवर नुकसान सोसण्याचा धोका असल्याने भाजपने पावले उचलली आहेत. यामुळेच भाजपने विशेषतः नरेंद्र मोदींनी आपल्याच माणसाचा (बृजभूषण शरण सिंह) बळी दिला तर नसेल?
राजकीय चष्म्यातून पाहिलं तर गणितं वेगळी आहेत. केवळ सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कोणतंही राजकारण खेळलं जात नाही. त्या दृष्टिकोनात निवडणुकीत काय फायदा होईल, याचा प्राधान्याने विचार होतो. मग तो सकारात्मक असो वा नकारात्मक.
भारतीय कुस्ती महासंघ निलंबित का?
भारतीय कुस्ती महासंघ निलंबित करण्याचा निर्णय वरकरणी सकारात्मक वाटतो. मात्र, त्यात तथ्य नाही. कारण यापूर्वी असं कोणतंही ठोस पाऊल उचललेलं आठवत नाही. रमेश बिधुरी असेल किंवा रमेश सिन्हा असतील (संसदेत घुसखोरी प्रकरणातील तरुणांना रमेश सिन्हा ज्यांच्या सहीनेच संसदेचा पास मिळाला होता.), त्यांच्यावर कारवाई केली नाही. मग या घटनेत बृजभूषण शरण सिंह यांचाच का बळी दिला असेल, हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे.
कारण आंदोलकांविरुद्ध बृजभूषण शरण सिंह यांचंच एक वक्तव्य आहे. ते त्राग्याने आंदोलकांवर संतापत म्हणाले होते, की जाट मते तुमच्या मुठीत आहेत म्हणून तुम्ही काहीही करू शकता का? जिथं तुम्ही म्हणाल, तिथंच जाटांची मतं पडतील? जाटांनी मतं दिली नाही तर सरकार पडेल असं तुम्हाला वाटतं का?
खरं कारण इथं आहे. आंदोलकांमुळे जाटांची मते गमवावी लागू नये म्हणून लोकसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्यावर विरोधकांनी केलेल्या मिमिक्रीचा मुद्दा संवेदनशील करण्याचा प्रयत्न केला. धनखड जाट समाजाचे, त्यांनी या मिमिक्रीवर प्रतिक्रिया देताना म्हटले, की हा जाट समुदायाचा अपमान आहे. मात्र, तसं अजिबातच नव्हतं. यामुळे जाट समाजाची सहानुभूती धनखड यांना मिळू शकली नाही. असो.
एप्रिल 2023 मध्ये ऑलिम्पिक, जागतिक स्पर्धेतील पदकविजेते कुस्तीगिरांनी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध लैंगिक शोषण, मनमानीपणा, हुकूमशाहीचा आरोप करीत पुन्हा आंदोलन सुरू केले. भाजपचे बाहुबली नेते बृजभूूषण शरण सिंह यांच्यावर अनेक गुन्हे आहेत. मात्र ते अमित शहा यांच्या अगदी जवळचे. बृजभूषण यांच्याविरुद्ध आंदोलन सुरू झाल्यानंतर देशातच नव्हे, तर विदेशातही या घटनेने धक्का बसला. असे असतानाही नरेंद्र मोदी यांनी कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. बृजभूषण यांना ना जेलमध्ये धाडलं, ना त्यांची खासदारकी रद्द झाली.
या घटनेला सात-आठ महिने उलटले. प्रकरण थंडावलं. कुस्ती महासंघाची निवडणूक लागली. बृजभूषण शरण सिंह यांनी आपला विश्वासू अर्थात डमी उमेदवार संजय सिंह यांना अध्यक्षपदासाठी निवडणुकीत उभा केला. तो निवडूनही आला. 15 पैकी 13 जागांवर बृजभूषण यांचीच माणसं निवडून आली. तेव्हा बृजभूषण यांची पहिली प्रतिक्रिया आली- दबदबा है दबदबा रहेगा… यातून त्यांंचा अहंकार आणि महासंघावरील पकड स्पष्ट करीत होती. इथं आंदोलक निराश झाले. ज्याच्याविरुद्ध आपण लढलो, त्याचीच माणसं उरावर बसणार असतील तर काय उपयोग? पहिलवान साक्षी मलिकने कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतला, पाठोपाठ बजरंग पुनिया याने पद्मश्री पुरस्कार परत केला, तर पॅरा ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेते वीरेंदर सिंह तथा गुंगा पहिलवान यांनीही पद्मश्री पुरस्कार परत करण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे पुन्हा देशात भाजप सरकारच्या निर्ढावलेपणावर संताप व्यक्त होऊ लागला,. विशेषतः जाट समुदायात संताप तीव्र झाला. याचा फीडबॅक भाजपच्या केंद्रीय वर्तुळात गेलाच असेल. त्याचाच परिपाक म्हणजे नवनिर्वाचित कार्यकारिणीला दोन दिवसच झाले नाही तर भारतीय कुस्ती महासंघ निलंबित करण्यात आला.
बृजभूषण बळीचा बकरा?
मात्र, हे करताना बृजभूषण शरण सिंह यांना दुखावलं जाऊ नये याचीही काळजी घ्यावी लागणार आहे. कारण ठाकूर समुदायातील बृजभूषण यांचा प्रभाव गोंडासह बहराइच, बलरामपूर, अयोध्या या पट्ट्यातील तीन-चार जागांवर आहे. असं म्हणतात, की योगी आदित्यनाथ आणि अमित शहा यांचं फारसं जमत नाही. दुसरं म्हणजे योगी आणि बृजभूषण यांच्यातही सख्य नाही. त्यामुळे शहा आणि बृजभूषण यांच्यातील नातं घट्ट होण्यासाठी हे कारण पुरेसं होतं. कारण दोघेही योगींच्या विरोधातले. आता जाट समुदायाचा रोष पत्करावा लागण्याच्या भीतीने भाजपने बृजभूषण यांचाच बळी दिला तर त्यात आश्चर्य वाटू नये. कदाचित त्यांना उमेदवारीही नाकारली जाऊ शकते. कारण बृजभूषणचा प्रभाव असलेल्या 3-4 जागा महत्त्वाच्या की जाटांचा प्रभाव असलेल्या 30-40 जागा महत्त्वाच्या? प्रश्नातच उत्तर आहे.
राहिला प्रश्न बृजभूषण शरण सिंह यांच्या प्रभावाचा. तिथंही राजकीय समीकरणं बदलायला किती वेळ लागणार? त्यामुळे राजकारणाच्या सारीपाटावर काहीही घडू शकतं.
थोडक्यात काय, तर या निर्णयामागे आंदोलक कुस्तीगिरांविषयी कणव आली असं अजिबातच नाही. यापूर्वी अनेक आंदोलने झाली, हिंसाचार झाला, त्याचं काहीही सोयरसुतक नरेंद्र मोदी- अमित शहा यांना नव्हतं. हा संपूर्णपणे राजकीय निर्णय आहे, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. त्यात काहीअंशी तथ्य आहे.
पुढे काय?
भारतीय कुस्ती महासंघ निलंबित झाला. आता पुढे काय, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. इथं कुस्ती महासंघ केवळ निलंबित झाला आहे. बरखास्त नाही. मात्र सरकारच्या या निर्णयामुळे कुस्तीगिरांंना आंतरराष्ट्रीय स्पर्धेची दरवाजे बंद होतील. कारण आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाचे काही नियम आहेत. जर सरकारचा हस्तक्षेप झाला किंवा कुस्ती महासंघ निलंबित करण्यात आला, तर आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघ भारतीय कुस्तीला आंतरराष्ट्रीय कुस्तीत बंदी घालू शकते. आंदोलनादरम्यान अशी कारवाई झाली आहे. आता पुन्हा या कारवाईची पुनरावृत्ती होईल. नुकसान कुस्तीगिरांचेच होणार आहे. सरकारला मात्र त्यांंचा फायदा साध्य करता येईल. पण खेळाडूंना काहीही मिळणार नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कुस्ती महासंघ निलंबनाने काय साध्य होणार आहे? हे खरं आहे, की 15 पैकी 13 पदाधिकारी बृजभूषण शरण सिंह यांच्या गोटातील आहेत. निलंबन केलं तरी ते किती दिवसांसाठी? कारण निलंबन म्हणजे बरखास्त नव्हे! निलंबन हटवून पुन्हा हीच कार्यकारिणी कार्यरत होणार असेल तर आंदोलनाचा हेतूच धुळीस मिळेल. दुसरं म्हणजे निलंबनाचं कारण जे सांगितलं आहे, ते पुरेसं आहे का? न्यायालयात ते कितपत तग धरेल? प्रकरण आता न्यायालयात गेलं आहे. तिथं जो काही निर्णय लागेल तो लागेल. एक मात्र खरं आहे, निलंबनाने कुस्तीगिरांना न्याय मिळू शकणार नाही.
महिला कुस्तीगिरांचे शोषण होतेय?
Visit Us
- Facebook page : @kheliyad
- Instagram : @kheliyad
- X : @kheliyad
- Linkedin : @MaheshPathade03
- Youtube Channel : Team Kheliyad
- WhatsApp Channel: kheliyad
- email : kheliyad.sports@gmail.com