All SportsCricketSports History

Why is this stadium called a paradise for batsmen?

या स्टेडियमला का म्हणतात फलंदाजांचं नंदनवन?

Why is this stadium called a paradise for batsmen? | ईडन गार्डन्सला | Eden Gardens | फलंदाजांचं नंदनवन म्हणतात. मात्र, या मैदानाचं नाव वेगळ्या अर्थाने महत्त्वपूर्ण आहे. या नावामागचा इतिहास जाणून घेण्यापूर्वी भारतातील क्रिकेटच्या मैदानांविषयी थोडेसे… 

भारतात क्रिकेटप्रेम ओसंडून का वाहतं, याचं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे इथली मैदानं. मैदानांवरूनच्या त्या देशातील खेळाची लोकप्रियता लक्षात येते. उगाच नाही मैदानांना खेळाची फुफ्फुसं म्हणतात… म्हणूनच जगातील सर्वाधिक क्रिकेटची मैदानं भारतात आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाची तब्बल 52 मैदानं भारतात आहेत. एवढी मैदानं जगातील कोणत्याच देशात नाहीत.

ज्या देशाने हा खेळ रुजवला त्या इंग्लंडमध्ये भारताखालोखाल मैदानं आहेत. इंग्लंडमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची 23 मैदानं आहेत. भारतात पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना डिसेंबर 1933 मध्ये खेळविण्यात आला होता. हा सामना होता मुंबईच्या जिमखाना मैदानावर.

भारतात पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना कुठे खेळविण्यात आला… याचं उत्तर अनेकांना माहीत नसेल. भारतात पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल मैदानावर 1981 मध्ये खेळविण्यात आला.

भारतात पहिला टी-20 सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळविण्यात आला. हा सामना 2007 मध्ये खेळविण्यात आला होता. भारतातील प्रत्येक स्टेडियमच्या उभारणीमागे काही ना काही कहाणी दडलेली आहे. ही कहाणी सुरू होते नावापासून.

अगदी अलीकडच्या दोन वर्षांत दोन स्टेडियमची नावं बदलल्यानंतर वादंग निर्माण झालं होतं. एक म्हणजे दिल्लीचं फिरोजशाह कोटला स्टेडियमचं नाव अरुण जेटलींच्या नावाने, तर अलीकडेच मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव देण्यात आलं आहे.

याला राजकारणाचा वास येत असला तरी अशी नावं यापूर्वीही बदलण्यात आली होती. मात्र, ही नावं देताना क्रिकेटपटूंचा कुठेही विचार झालेला दिसत नाही. त्यामुळेच भारतात एकाही मैदानाला क्रिकेटपटूचं नाव नाही. असलंच तर ते मैदानातील एखाद्या गॅलरीपुरतं मर्यादित आहे. यामागची कारणं शोधायची असेल तर भारतातील क्रिकेट स्टेडियमचा इतिहास जाणून घ्यायला हवा. त्यासाठीच ही स्टेडियमची मालिका खास खेळियाडच्या वाचकांसाठी…

ईडन गार्डन्स, कोलकाता
Eden Gardens


बंगभूमीतलं अर्थात पश्चिम बंगालमधील भारतातलं सर्वांत जुनं स्टेडियम म्हणून ईडन गार्डन्सचा उल्लेख करावा लागेल. भारतीय क्रिकेटच्या स्टेडियममध्ये ‘ईडन गार्डन्स’ सर्वांत लोकप्रिय म्हणायला हवं. या स्टेडियमचं नाव थोडं हटके आहे. ईडन गार्डन्स | Eden Gardens | हे कोलकात्यातील सर्वांत जुनं उद्यान आहे.

हे उद्यान १८४१ मध्ये लॉर्ड ऑकलंड याने तयार केलं आहे. लॉर्ड ऑकलंडच्या बहिणीचं नाव एमिली ईडन (Emily Eden). तिच्याच नावाने ‘ईडन गार्डन्स | Eden Gardens |’ उभं राहिलं. १८६४ मध्ये जेव्हा क्रिकेट स्टेडियम उभं राहिलं तेव्हा याच नावाने (‘ईडन गार्डन्स | Eden Gardens |’) स्टेडियमचं नाव देण्यात आलं.

गंमत म्हणजे उद्यानाचं नाव आधी ‘ऑकलंड सर्कस गार्डन’ (Auckland Circus Gardens) होतं. नंतर हे नाव ‘ईडन गार्डन्स’ असं ठेवण्यात आलं. बायबलमध्ये ‘गार्डन ऑफ ईडन’चा उल्लेख आहे. त्याला नंदनवन किंवा देवाचं उद्यान असंही म्हंटलं जातं.

हिब्रू भाषेतील पहिलं बायबल ‘बुक ऑफ जेनेसिस’ (Book of Genesis) आणि याच भाषेतील  ‘बुक ऑफ इझेकिएल’ (Book of Ezekiel) या प्रॉफेटमध्ये ‘देवाचं गार्डन’ संकल्पनेचा उल्लेख आहे. त्यावरूनच हे नाव कोलकात्यातील उद्यानाला देण्यात आलं. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ईडन हे ऑकलंडच्या बहिणीचंही नाव होतं. एकूणच असा या ‘ईडन गार्डन्स | Eden Gardens |’च्या नावामागचा इतिहास आहे.

या नावामागे क्रिकेटशी थेट संबंध नसला तरी स्टेडियमचा संबंध देवाच्या उद्यानाशी आहे. देवाचं नंदनवन ही संकल्पना पचनी पडेल की नाही माहीत नाही, पण हे स्टेडियम ‘फलंदाजांचं नंदनवन’, ‘भारतीय क्रिकेटचं मक्का’ म्हणून नक्कीच लोकप्रिय आहे.

मैदानाचे दोन वेळा नूतनीकरण


या मैदानाचे 1987 आणि 2011 असे दोन वेळा नूतनीकरण करण्यात आले. 1987 च्या वर्ल्डकपपूर्वी या मैदानाची प्रेक्षकक्षमता अवघी 40 हजार होती. 1987 मध्ये या मैदानाचे नूतनीकरण केल्यानंतर ही क्षमता 94,000 पर्यंत वाढवण्यात आली. मैदानात आणखी काही बदल करण्यात आले. प्रेस बॉक्स, क्लब हाउस आणि टीव्हीवरील प्रक्षेपणासाठी पायाभूत सुविधा हे यातील महत्त्वाचे बदल करण्यात आले. यातील महत्त्वाचा बदल म्हणजे 42 स्तंभ उभे करीत गॅलऱ्यांना छप्पर घालण्यात आले. एवढे करूनही संपूर्ण प्रेक्षक गॅलऱ्यांना छप्पर घालता आले नाही.

2011 च्या वर्ल्डकपपूर्वी या मैदानाचे दुसऱ्यांदा नूतनीकरण करण्यात आले. अर्थात, हे नूतनीकरण वर्ल्डकपसाठीच करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या मानकांप्रमाणे या स्टेडियमची रचना करण्यात आली. यात नव्याने क्लब हाउस उभारण्यात आले, त्याचबरोबर खेळाडूंसाठी अधिक चांगल्या सुविधा देण्यात आल्या. महत्त्वाचा बदल म्हणजे प्रेक्षकक्षमता घटवण्यात आली. आधी 94,000 प्रेक्षक क्षमता होती. नूतनीकरणानंतर ती 68,000 करण्यात आली.

अर्थात, एवढं करूनही नूतनीकरण पूर्ण झालं नाही. त्यामुळे आयसीसीने भारत विरुद्ध इंग्लंड हा सामना बेंगलुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळविला. 27 फेब्रुवारी 2011 रोजी हा सामना खेळविण्यात आला होता.

गॅलरी

ईडन गार्डन्स | Eden Gardens |च्या गॅलरींची नावे क्रिकेटपटूंबरोबरच सैनिकांवरूनही ठेवण्यात आली. 22 जानेवारी 2017 रोजी दोन गॅलरींचे नामकरण झाले. त्यापैकी एका गॅलरीला सौरव गांगुली, तर दुसऱ्या गॅलरीला पंकज रॉय यांचं नाव देण्यात आलं. बी एन दत्त आणि जगमोहन दालमिया या क्रिकेट प्रशासकांचीही नावं गॅलरींना देण्यात आली आहेत.

27 एप्रिल 2017 रोजी आणखी चार गॅलऱ्यांना नावं देण्यात आली. त्यांना मात्र भारतीय सैनिकांची नावं देण्यात आली. कर्नल नीलकांतन जयचंद्रन नायर, हवालदार हांगपन दादा, लेफ्टनंट कर्नल धनसिंग थापा आणि सुभेदार जोगिंदर सिंग साहनन या चार सैन्याधिकाऱ्यांची नावं या गॅलऱ्यांना देण्यात आली. लेफ्टनंट कर्नल थापा आणि सुभेदार सिंग यांना परमवीरचक्र, तर कर्नल नायर आणि हवालदार दादा यांना अशोकचक्र पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

हे माहीत आहे काय?

  • 1946 ची ही घटना आहे. त्या वेळी ऑस्ट्रेलियन सर्विसेस इलेव्हनविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली होती. या सामन्यासाठी निवड समितीने मुश्ताक अली यांना भारतीय संघातून वगळले होते. क्रिकेटप्रेमींना ही बाब अजिबात रुचली नाही. त्यांनी चक्क आंदोलन करीत नो मुश्ताक, नो टेस्ट अशा घोषणा देण्यात आल्या. अखेर निवड समितीने मुश्ताक अलींना संघात परत बोलावले तेव्हा कुठे आंदोलन थांबले.

  • पश्चिम बंगाल केवळ क्रिकेटप्रेमींचंच नाही, तर फुटबॉलवेड्यांचंही राज्य आहे. या मैदानावर 1977 मध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामनाही रंगला होता. न्यू यॉर्क कॉसमॉस विरुद्ध मोहन बगान असा हा सामना होता. विशेष म्हणजे न्यूयॉर्क कॉसमॉसकडून पेले खेळले होते. हा सामना 2–2 असा बरोबरीत सुटला.

  • 16 ऑगस्ट 1980 रोजी पूर्व बंगाल विरुद्ध मोहन बगान या सामन्यात दोन्ही संघांच्या समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारीत 16 फुटबॉल समर्थकांमध्ये मृत्यू झाला होता.

  • 1999 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सचिन तेंडुलकर शोएब अख्तरला धडकल्याने धावबाद झाला. यामुळे भारतीय प्रेक्षक संतप्त झाले. यातून दंगल उसळल्याने पोलिसांना संपूर्ण स्टेडियम रिकामे करावे लागले. हा सामना रिकाम्या स्टेडियममध्ये खेळविण्यात आला.

  • याच मैदानावरील एकदिवसीय सामन्यात कपिलदेव यांनी 1991 मध्ये श्रीलंकेविरुद्ध हॅटट्रिक नोंदवली होती.

  • कसोटीतली हॅटट्रिकही या मैदानाने पाहिली आहे. फिरकी गोलंदाज हरभजनसिंग यांने 2000-01 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात ही कामगिरी केली. हरभजन हा पहिलाच भारतीय गोलंदाज आहे, ज्याने कसोटीत हॅटट्रिक नोंदवली.

Why is this stadium called a paradise for batsmen?

हे मैदान व्हीव्हीएस लक्ष्मणसाठीच नव्हे, तर भारतीय क्रिकेट संघासाठीही व्हेरी व्हेरी स्पेशल म्हणावे लागेल. 2000-01 मधील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सामन्यात व्हीव्हीएस लक्ष्मण याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 281 धावांची द्विशतकी खेळी रचली होती. ही या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या ठरली. आणखी विशेष म्हणजे लक्ष्मणने द्रविडसोबत 376 धावांची त्रिशतकी भागीदारी नोंदवली. द्रविडने 180 धावा केल्या होत्या. या दोघांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली. कारण या दोघांनी एकही विकेट न गमावता चार दिवस मनसोक्त खेळून काढले. गंमत म्हणजे ऑस्ट्रेलियाने भारताला फॉलोऑन दिला होता. असे असतानाही भारताने हा सामना जिंकला. क्रिकेटच्या इतिहासातला हा तिसराच कसोटी सामना होता, ज्यात फॉलोऑन मिळाल्यानंतरही भारताने विजय नोंदवला. म्हणूनच कसोटी क्रिकेटच्या इतिहासात हा सर्वांत यादगार आणि सर्वोत्तम सामना म्हणून ओळखला जातो.

 

Related Articles

One Comment

  1. खूप छान माहिती!! कुठून गाेळा करताे एवढी माहिती? Really hats off to you Mahesh!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!