वेस्ट इंडीज क्रिकेट वर्ल्ड कपसाठी पात्र का ठरला नाही?

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाची घसरण का झाली, हा प्रश्न क्रिकेटप्रेमींच्या मनात निर्माण होणं स्वाभाविक आहे. कारण ज्या संघाचा एकेकाळी दबदबा होता, तो संघ वर्ल्ड कप स्पर्धेत पात्रही ठरू शकला नाही. याउलट स्कॉटलंड, नेदरलँडसारखे संघ वर्ल्ड कपसाठी पात्र ठरले आहेत. वेस्ट इंडीज क्रिकेट वर्ल्ड कपसाठी पात्र का ठरला नाही? वेस्ट इंडीज संघाच्या घसरणीमागची काय आहेत कारणे?
एक काळ असा होता, की क्रिकेटविश्वात वेस्ट इंडीज संघाचं नाव घेतलं तरी प्रतिस्पर्ध्यांची पाचावर धारण बसायची. फलंदाजीपासून गोलंदाजीपर्यंत त्यांचा डंका होता. सत्तरच्या दशकात वेस्ट इंडीजच्या संघाचा काय दरारा होता? हा दरारा आज कुठेही दिसत नाही.
नेमकं असं काय झालं, की पन्नास वर्षांत चित्र एकदम बदललं.
वेस्ट इंडीजला 2 जुलै 2023 चा तो दिवस अस्वस्थ करीत असेल की नाही माहीत नाही. मात्र, त्यांच्या क्रिकेटविश्वातला प्रत्येक जण हळहळला नक्कीच असेल. दोन वेळा विश्वविजेता ठरलेला वेस्ट इंडीज संघ वन-डे वर्ल्ड कप स्पर्धेत पात्रही ठरू शकलेला नाही.
तब्बल 48 वर्षांत प्रथमच असं घडलंय. यंदा 2023 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडीज दिसणार नाही.
काय होता वेस्ट इंडीजचा दरारा!
वेस्ट इंडीजचा सुवर्णकाळ सत्तरच्या दशकापासून सुरू होतो. या संघाने 1975 आणि 1979 मध्ये वन-डे वर्ल्ड कप उंचावला होता. काय संघ होता तो…! क्लाइव्ह लॉइड, ग्रार्डन ग्रीनिज, व्हिवियन रिचर्ड्स, डेस्मंड हेन्स, रोहन कन्हाई, एल्विन कालिचरण..
फलंदाजीची ही फळी प्रतिस्पर्ध्यांच्या गोलंदाजांना फाडूनच खायची. 1983 मध्येही फायनलमध्ये धडक मारली; पण भारताने हा दिग्गज संघ लोळवला तेव्हा संपूर्ण क्रिकेटविश्व अवाक झालं होतं. हे अवाक होणंच वेस्ट इंडीजच्या दराराची ग्वाही दितं.
1975 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कर्णधार क्लाइव्ह लॉइड (102 धावा आणि 1/38) यांची अष्टपैलू खेळी लाजवाब होती. क्लाइव्ह लॉइडच सामनावीर ठरले. 1979 मध्ये व्हिवियन रिचर्ड्स (नाबाद 138 धावा) यांनी ब्रिटिशांची अक्षरश: पिसं काढली.
या संघाकडे माल्कम मार्शल, अँडी रॉबर्ट्स, जोएल गार्नर, मायकेल होल्डिंग यांच्यासारखी भेदक गोलंदाजी होती. नंतरच्या काळात कर्टली अॅम्ब्रोज, कोर्टनी वॉल्श, इयान बिशप यांनीही गोलंदाजीचा हाच वारसा पुढे नेला.
वेस्ट इंडीजचा दरारा इथेच थांबला नाही. नव्वदच्या दशकात ब्रायन लारा, कार्ल हूपर, रिची रिचर्डसन, रामनरेश सरवान, शिवनारायण चंदरपॉल, जिमी अॅडम्स अशी फलंदाजांची नवी फळी क्रिकेटविश्वावर अधिराज्य गाजवू लागली.
नंतर ख्रिस गेल, मार्लन सॅम्युअल्स, वॉवेल हाइंड्स, डॅरेन सॅमी, आंद्रे रसेल यांनी आपली फलंदाजीची ताकद दाखवली.
वेस्ट इंडीजच्या घसरणीमागे टी-20 स्पर्धांचं ग्लॅमर
टी-20 क्रिकेट लीगने अनेकांना भुरळ घातली. वेस्ट इंडीजही त्याला अपवाद ठरला नाही. या संघाचे अनेक स्टार खेळाडू टी-20 लीगला महत्त्व देऊ लागले. आंद्रे रसेल, सुनील नरीन, ड्वेन ब्राव्हो, कायरन पोलार्ड, ख्रिस गेल टी-20 लीगमध्येच रमले. इतके, की संघापेक्षा त्यांना लीग महत्त्वाची वाटू लागली. त्यामुळे सांघिक कामगिरी खालावत गेली. वेस्ट इंडीजच्या पतनाचं हे एक महत्त्वाचं कारण म्हणावं लागेल.
बोर्ड आणि खेळाडूंमध्ये संघर्ष
वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड आणि खेळाडू यांच्यात समन्वय नाही. त्यामुळे अनेक स्टार खेळाडूंचे बोर्डाशी खटके उडाले आहेत.
ख्रिस गेल, ड्वेन ब्राव्हो, आंद्रे रसेल, सुनील नरिन, शिमरोन हेटमायर अशा अनेक खेळाडूंचे बोर्डाशी मतभेद दिसले. यामुळेच त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून अंतर राखलं. हा संघर्ष आताच्या क्रिकेटपटूंबाबतही सुरूच आहे.
त्यामुळेच वर्ल्ड कप पात्रताफेरीत खेळणाऱ्या सध्याच्या संघात रसेल, नरिन, केमार रोच, हेटमायर यांचा समावेश नव्हता. यामुळेच वेस्ट इंडीजचा संघ कोणत्याही मोठ्या स्पर्धेत पूर्ण ताकदीने कधी खेळूच शकला नाही.
या संघर्षाचे महत्त्वाचे कारण म्हणजे खेळाडूंचं वेतन. कमी वेतनामुळे अनेक स्टार क्रिकेटपटू राष्ट्रीय संघापेक्षा टी-20 स्पर्धेलाच अधिक महत्त्व देत आले आहेत. महत्त्वाचे खेळाडूच नसल्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत हा संघ दुबळ्या संघांकडूनही सहज पराभूत होत आला आहे.
नेदरलँड संघाकडून जेव्हा विंडीज पराभूत झाला, तेव्हा डॅरेन सॅमी म्हणाला होता, की आमचा संघ ‘सुमार फिल्डिंग’वाला आहे.
विंडीजच्या खेळाडूंना किती मिळते वेतन?
‘ईएसपीएन क्रिकइंफो’च्या आकड्यांनुसार 2017 मध्ये वेस्ट इंडीजच्या खेळाडूंना कसोटी सामन्यासाठी 5,750 डॉलर (प्रतिसामना सुमारे 4.72 लाख रुपये), वन-डेसाठी 2,300 डॉलर (प्रतिसामना सुमारे 1.88 लाख रुपये) आणि टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी 1,735 डॉलर (सुमारे 1.42 लाख रुपये) मिळतात.
‘सीडब्लूआय’ने (क्रिकेट वेस्ट इंडीज) यात काही बदल केले होते किंवा नाही, याची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. जर एवढेच वेतन खेळाडूंना मिळत असेल, तर भारतीय खेळाडूंच्या तुलनेत फारच कमी वेतन आहे.
भारतीय खेळाडूला एका कसोटी सामन्यासाठी 15 लाख रुपये, वनडेसाठी आठ लाख, तर टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी चार लाख रुपये मिळतात. वेस्ट इंडीज खेळाडूंकडे एक केंद्रीय करारही असतो.
संघासाठी कमीत कमी दोन प्रारूप खेळणाऱ्या खेळाडूची वर्षाला 2,40,000 डॉलर (जवळपास 1.97 कोटी रुपये) कमाई होऊ शकते. तीन प्रारूपमध्ये खेळणाऱ्या खेळाडूला वर्षाला 3,00,000 डॉलर (जवळपास 2.5 कोटी) कमवू शकतात.
या आकड्यांमध्ये सामनाशुल्काचाही समावेश आहे. भारताशी तुलना केली तर चेतेश्वर पुजारासारख्या एका प्रारूपात खेळणाऱ्या खेळाडूलाही यापेक्षा जास्त पैसे मिळतात. विशेष म्हणजे पुजाराकडे आयपीएलचा करारही नाही.
त्याला बीसीसीआयच्या केंद्रीय करारातून तीन कोटी मिळतात. यात सामनाशुल्काची रक्कम समाविष्ट केली तर त्याची वार्षिक कमाई सुमारे चार कोटींपेक्षाही अधिक होते.
आता हेटमायरचंच उदाहरण घ्या. तो सहा महिन्यात पाच वेगवेगळ्या टी-20 लीग खेळून सहजपणे एवढी कमाई करू शकतो. ही रक्कम वेस्ट इंडीज संघाकडून कमवायची असेल तर त्यासाठी त्याला आठ टेस्ट, 15 वनडे आणि 20 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळावे लागतील.
एवढ्या सामन्यांसाठी त्याला जवळपास वर्षभर संघात राहावं लागेल. वेस्ट इंडीज क्रिकेटमध्ये आणखी एक समस्या आहे, ती म्हणजे राष्ट्रवादी भावनेचा अभाव. वेस्ट इंडीज संघ अनेक कॅरेबियन देशांतील खेळाडूंनी बनलेला आहे. म्हणूनच खेळाडू देशाऐवजी वेस्टइंडीज क्रिकेटचं प्रतिनिधित्व करतात.
[jnews_block_8 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ header_filter_category=”65″]
One Comment