All SportsCricket

काय आहे टिम पेन याचं अश्लील मेसेज प्रकरण

का महिला सहकाऱ्याला अश्लील छायाचित्रे आणि संदेश पाठवल्याचे प्रकरण ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार टिम पेन याला चांगलंच भोवलं आहे. टीम पेन याला शुक्रवारी, 19 नोव्हेंबर 2021 रोजी कर्णधारपदावरून पायउतार व्हावे लागले. मुळात हे प्रकरण आताचे नाही, तर 2017 चे आहे. त्या वेळी काही महिन्यांनंतर पेनला कसोटी संघात परतण्याची संधी मिळाली. ही संधी पेनसाठी महत्त्वाची होती. कारण सात वर्षांनी तो कसोटी संघात परतला होता.

2017 मध्ये ज्या वेळी अश्लील मेसेज प्रकरण उघडकीस आलं, त्या वेळी टिम पेन याची चौकशी करण्यात आली होती. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि क्रिकेट तस्मानिया यांच्या चौकशी समितीने टिम पेन याला क्लीन चिट दिली होती. असं असलं तरी प्रश्न संपला नव्हता. हे प्रकरण राखेतल्या विस्तवासारखं होतं, हे टिम पेन याला आता जाणवलं असेल. कारण या प्रकरणाने तीन वर्षांनंतर पेट घेतला आहे.

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात ‘अॅशेस’ ही प्रतिष्ठेची कसोटी मालिका काही दिवसांवर येऊ ठेपलेली असतानाच टिम पेन याला अश्लील मेसेज प्रकरणाचे चटके सोसावे लागले आहेत. ही अॅशेस कसोटी मालिकेतील पहिला सामना ब्रिस्बेनमध्ये 8 डिसेंबर 2021 रोजी होणार आहे. तत्पूर्वीच टिम पेन याला कर्णधारपद सोडण्याची नामुष्की ओढवलीआहे.

एका पत्रकार परिषदेत पेन याचा उद्वेग स्पष्टपणे जाणवला. तो म्हणाला, ‘‘मी आज (19 नोव्हेंबर 2020) ऑस्ट्रेलिया संघाचे कर्णधारपद सोडत आहे. हा खूपच कठीण निर्णय आहे. मात्र, माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी आणि संघासाठी हा निर्णय योग्य आहे.’’

टिम पेन म्हणाला, ‘‘सुमारे चार वर्षांपूर्वी मी त्या वेळी महिला सहकाऱ्याला टंकलिखित संदेश (टेक्स्ट मेसेज) पाठवला होता. मी त्या घटनेप्रकरणी माफी मागितली होती. आजही मागतो. मी पत्नी आणि कुटुंबाशीही यावर चर्चा केली होती. त्यांनीही मला माफ केलं. त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे.’’

अश्लील मेसेज प्रकरणानंतरही टिम पेन संघात कायम

टिम पेन याने ज्या महिलेला अश्लील मेसेज व छायाचित्रे पाठविली होती, ती क्रिकेट तस्मानियाची कर्मचारी होती. तिने दावा केले आहे, की टिम पेन याने मला गुप्तांगाच्या एका छायाचित्रासोबत अश्लील मेसेज पाठवले. त्या महिलेने 2017 मध्येच नोकरीचा राजीनामा दिला होता. टिम पेन याच्यामागचं शुक्लकाष्ट इथंच संपलं नव्हतं. तो दक्षिण आफ्रिकेत चेंडू कुरतडण्याच्या एका प्रकरणातही सापडला होता. टिम पेन याची एकामागोमाग प्रकरणं बाहेर येत असली तरी तो नशीबवानच म्हणायला हवा. या प्रकरणातही क्रिकेट ऑस्ट्रेलिया त्याच्यावर मेहेरबान राहिली. 2018 मध्ये या चेंडू कुरतडण्याच्या घटनेनंतर त्याला कसोटी संघाचे कर्णधारपद बहाल करण्यात आले होते. आता पुन्हा अश्लील मेसेज प्रकरणाने डोके वर काढल्याने टिम पेन याने दिलेला कर्णधारपदाचा राजीनामा बोर्डाने स्वीकारला आहे. पेन म्हणाला, ‘‘आम्हाला वाटलं, हे प्रकरण आता संपलं आहे. मी संपूर्ण लक्ष आता संघावर ठेवू शकतो. मात्र, मला आताच समजलं, की माझे खासगी मेसेज सार्वजनिक झाले आहेत. 2017 मधील माझं हे वर्तन संघाच्या कर्णधारपदास साजेसं नाही.’’

टिम पेन म्हणाला, ‘‘माझी पत्नी, परिवार आणि अन्य घटकांना वेदना दिल्याबद्दल मी माफी मागतो. खेळाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवल्याबद्दलही मी माफी मागतो.’’

टिम पेन म्हणाला, ‘‘कर्णधारपदावरून पायउतार होणे हेच माझ्यासाठी योग्य पाऊल आहे. अॅशेस मालिकेच्या तयारीत काही बाधा निर्माण व्हावी, ही माझी इच्छा नाही. मात्र, मी ऑस्ट्रेलिया संघाचा एक समर्पित सदस्य राहीन.’’ क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख रिचर्ड फ्रेडेन्स्टेन यांनी सांगितले, की हा टिम पेन याचा स्वत:चा निर्णय आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही आपली भूमिका मांडली आहे. त्यात त्यांनी टिम पेन याची पाठराखणच केली आहे. त्यांनी सांगितले, ‘‘बोर्डाने काही वर्षांपूर्वी या प्रकरणात टिम पेन याला क्लीन चिट दिली आहे.  मात्र, आम्ही त्याच्या निर्णयाचा आदर करतो. या प्रकारची भाषा किंवा वर्तन स्वीकारार्ह नाही. या चुकीनंतरही पेन उत्तम कर्णधार राहिला आहे. त्याच्या या योगदानाबद्दल आम्ही त्याला धन्यवाद देतो.’’

खेळाडू म्हणतात, टिम पेनचा निर्णय निराशाजनक

टिम पेन याचे अश्लील मेसेज प्रकरण गंभीर असले तरी खेळाडू म्हणून देशातील खेळाडूंनीही त्याची पाठराखणच केली आहे. टिम पेन याने कर्णधारपद सोडायला नको होते, असे ऑस्ट्रेलियन क्रिकेटर संघटनेने (ACA) म्हटले आहे. टिम पेन याचे समर्थन करताना संघटनेने शुक्रवारी, 19 नोव्हेंबर 2021 रोजी या घटनेला ‘दु:खद’म्हंटले आहे.

एसीएने (ACA) म्हंटले आहे, ‘‘आम्ही टिम पेन याच्या निर्णयाचा सन्मान करतो. मात्र, त्याने ऑस्ट्रेलिया कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देणे इष्ट समजले, हे आमच्यासाठी निराशाजनक आहे. ही अशी चूक होती जी दोन व्यक्तींपुरती मर्यादित होती. टिम पेन याने 2018 मध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या चौकशीत पूर्ण सहकार्य केले होते. त्यात त्याला दोषमुक्त करण्यात आले होते. टिम पेन खरोखर चुकला होता. मात्र, एसीएचं त्याला पूर्ण समर्थन मिळत राहील.’’

टिम पेन अश्लील मेसेज

टिम पेन याच्यावर यापूर्वीच कारवाई करायला हवी होती

टीम पेन याचे अश्लील मेसेज प्रकरण आणखी काही दिवस चर्चेत राहील, याचे संकेत आता मिळत आहेत. कसोटी क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी, 20 नोव्हेंबर 2021 रोजी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अध्यक्षांनीही या घटनेवर भाष्य केले आहे. महिला सहकाऱ्याला अश्लील मेसेज पाठविल्याप्रकरणी टिम पेन याला कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून हटविणे योग्य ठरले असते. मात्र, तसे न करणे हीच एक चूक होती, असे स्पष्ट मत क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे (CA) अध्यक्ष रिचर्ड फ्रायडेन्स्टीन यांनी व्यक्त केले आहे.

फ्रायडेन्स्टीन यांनी सीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकले यांच्यासोबत एका पत्रकार परिषदेत ही भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘‘मी 2018 मधील निर्णयावर चर्चा नाही करणार. मी त्या वेळी तेथे नव्हतो. मात्र, मी तथ्यांच्या आधारावर मी हे सांगू इच्छितो, की आज जर ही घटना घडली असती तर बोर्डाने असा निर्णय घेतला नसता.’’

अश्लील संदेश प्रकरणावर टिम पेन याला तीन वर्षांपूर्वी क्लीन चिट देण्यात आली होती. या चुकीचा निर्णय असल्याचे उघडपणे फ्रायडेन्स्टीन यांनी मान्य केले आहे. फ्रायडेन्स्टीन म्हणाले, ‘‘मला मान्य आहे, की त्या निर्णयाने स्पष्टपणे चुकीचा संदेश गेला, की ते प्रकरण स्वीकारार्ह आहे आणि त्याचे गंभीर परिणाम होणार नाहीत. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाच्या कर्णधाराच्या भूमिकेत उच्चतम मानदंड असायला हवेत.’’ फ्रायडेन्स्टीन पुढे म्हणतात, ‘‘आचारसंहिता (सध्या) उपयुक्त आहे, हे महत्त्वाचे आहे. काळ लोटल्यानंतर बऱ्याचशा गोष्टींत बदल झाले आहेत.’’

अश्लील मेसेज प्रकरण पुन्हा चर्चेत आल्याने पेन कुटुंब निराश

अश्लील आणि अश्लाघ्य मेसेज’ पुन्हा सार्वजनिक झाल्याने टिम पेन याची पत्नी बोनी मॅग्स ‘निराश’ झाली आहे. बोनी मॅग्स हिने पती टिम पेन याला त्याच वेळी माफ केलं होतं. हे प्रकरण पुन्हा सार्वजनिक होणं ‘अन्यायकारक’ आहे. मॅग्स आणि पेन यांचा विवाह 2016 मध्ये झाला. पेन कुटुंबाला दोन मुले आहेत. मॅग्सने सांगितले, की मी या प्रकरणात टिम पेन याला माफ केलं होतं. मॅग्सने पती टिन पेन याच्यासोबत ‘न्यूज कॉर्प’ला सांगितले, ‘‘मी या प्रकरणावर संतापही व्यक्त केला होता. आम्ही भांडलोही आणि चर्चाही केली. यानंतर आम्ही हे सगळं विसरून पुढे जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही दोघांनी मिळून हा निर्णय घेतला.’’ बोनी मॅग्स म्हणाल्या, ‘‘मला काहीशी निराशा जाणवत आहे. कारण आम्ही काही वर्षांपूर्वीच हे प्रकरण मागे टाकले होते. आता पुन्हा हे प्रकरण सार्वजनिक करण्यात आले आहे. मला वाटते, की हे प्रकरण पुन्हा ताणले जाणे खूपच अन्यायकारक आहे.’’ ऑस्ट्रेलियाचा अनुभवी यष्टिरक्षक असलेला टिम पेन याने 2017 मध्ये पत्रकार परिषद घेऊन माफीही मागितली होती. मॅग्सने मान्य केले, की या घटनेबाबत ऐकल्यानंतर मी स्तब्ध झाले होते. मॅग्स म्हणाली, ‘‘मला छळवणूक वाटत होती. मी दुखावले होते, निराश झाले होते. मात्र, माझ्यात कृतज्ञताची भावनाही होती. कारण तो माझ्याशी प्रामाणिक होता.’’

स्मिथ होणार कसोटी संघाचा कर्णधार?

अनुभवी बल्लेबाज स्टीव स्मिथ याला कसोटी संघाच्या कर्णधारपदी नियुक्त करण्याची शक्यता आहे. निवड समितीने माजी कर्णधार स्टीव स्मिथ याच्याकडे संघाची कमान सोपविण्याबाबतचा प्रस्ताव क्रिकेट बोर्डाकडे पाठवला आहे. टिम पेन याने कर्णधारपद सोडल्यानंतर क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, खरं तर उपकर्णधार पॅट कमिन्स याचं नाव कर्णधारपदासाठी सर्वांत पुढे आहे. मात्र, स्मिथही या शर्यतीत आहे. अश्लील मेसेज प्रकरणावर खेद व्यक्त करीत टिम पेन याने शुक्रवारी, 19 नोव्हेंबर 2021 रोजी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. 2017 मध्ये हे प्रकरण घडलं होतं. या घटनेनंतर आता कर्णधारपदासाठी उमेदवाराचा शोध घेण्याची मोहीम वेगाने सुरू झाली आहे.

अशीही अटकळ आहे, की राष्ट्रीय संघाच्या निवड समितीतील वरिष्ठ सदस्य स्मिथच्या बाजूने आहेत. तसा प्रस्ताव मंजुरीसाठी बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, कमिन्सचीही बाजू मजबूत आहे. असं म्हंटलं जात आहे, की स्मिथला संघाचा उपकर्णधार केले जाऊ शकते. जर कमिन्स कर्णधार झालाच तर 1956 मध्ये रे लिंडवाल यांच्यानंतर संघाचं नेतृत्व करणारा तो पहिलाच गोलंदाज असेल. लिंडवाल यांनी एका सामन्यात संघाचं नेतृत्व केलं होतं.

टिम पेन

 [jnews_block_37 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”65″]

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!