अनुष्का शर्मा का भडकली सुनील गावस्कर यांच्यावर?
आयपीएलमध्ये समालोचन करताना सुनील गावस्कर एका टिपणीने वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. सुनील गावस्कर यांनी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्यावर जी टिपणी केली, त्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यावर अनुष्का शर्मानेही गावस्करांना सणसणीत उत्तर देताना, काही प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र, हे प्रकरण नेमकं काय आहे, हे यावर टाकलेला प्रकाशझोत…
किंग्स इलेव्हन पंजाबने विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूने ९७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. यात विराटची कामगिरी अतिशय निराशजनक झाली. त्याने दोन महत्त्वाचे झेल सोडलेच, शिवाय फलंदाजीतही केवळ एकच धाव काढू शकला. विराटची ही निराशाजनक कामगिरी सुनील गावस्करसारख्या Sunil Gavaskar | ज्येष्ठ समालोचकाकडून दुर्लक्षित होऊच शकत नाही. अर्थात, गावस्कर यांच्यासारख्या समालोचकाकडून शेलक्या शब्दांत टीका अपेक्षित होती. मात्र, त्यांच्या एका वक्तव्यामुळे क्रिकेटविश्वात गदारोळ माजला.
समालोचनात सुनील गावस्कर यांनी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्यावर अश्लाघ्य शब्दांत टिप्पणी केल्याचा आरोप आहे. सुनील गावस्कर म्हणाले होते, ‘तो जाणून आहे, की जेवढा सराव तेवढीच उत्तम कामगिरी. जेव्हा लॉकडाउन होतं, तेव्हा फक्त अनुष्का शर्मा हिच्या गोलंदाजीचाच त्याने सराव केला. आम्ही व्हिडीओ पाहिला आहे. त्यातून काहीच साध्य होणार नाही.’
हीच ती टिप्पणी आहे. मात्र, यातलं एक वाक्य द्वयर्थी आहे, ते म्हणजे अनुष्काच्याच गोलंदाजीचा विराटने सामना केला आहे. हे वाक्य व्हायरल करताना त्यात अनेक बदल झाले. काहींनी लिहिलं, लॉकडाउनमध्ये अनुष्काच्याच चेंडूंचा विराटने सराव केला. त्यामुळे गावस्करांनी समालोचन करताना जे म्हंटलं होतं, त्यापेक्षा व्हायरल झालेलं वाक्य अधिक आक्षेपार्ह होतं. ही टिप्पणी विराटच्या चाहत्यांनाच नव्हे, तर कुणालाही रुचली नाही. यामुळे गावस्कर वादाच्या भोवऱ्यात सापडले. गावस्करांना बीसीसीआयच्या समालोचक पॅनलमधूनच काढावे, इथपर्यंत लोकांनी मागणी केली होती.
सुनील गावस्कर यांच्या टिप्पणीवर अनुष्का शर्मा काय म्हणाली?
अनुष्काने हे समालोचन ऐकलं किंवा नाही, हे माहीत नाही. ऐकलं असेल तर ते बारकाईने ऐकलेलं नाही हे तिच्या संतापावरून स्पष्ट होतं. या टिप्पणीवर विराटने जाहीर मत व्यक्त केले नाही, पण अनुष्काने गावस्करांचा समाचार घेतला.
अनुष्का म्हणाली, “मिस्टर गावस्कर, तुम्ही एवढी वर्षे लोकांच्या वैयक्तिक आयुष्याचा सन्मान केला आहे. का, तुम्हाला नाही वाटत, की तुम्ही आमचा, माझाही असाच सन्मान करायला हवा?” अनुष्काने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करीत गावस्करांना सुनावले होते.
“मिस्टर गावस्कर, तुम्ही हे चांगलं नाही केलं. तुम्ही जे बोललात, ते अजिबात रुचणारं नाही. तुम्ही माझ्या पतीच्या खेळासाठी माझ्यावर आरोप करताना असं विधान का केलं? मला माहीत आहे, की एवढी वर्षे आपण समालोचन करीत आहात. त्या वेळी अनेकांच्या वैयक्तिक आयुष्याचा सन्मान केला आहे. का तुम्हाला नाही वाटत, की तसाच सन्मान माझ्या- आमच्याबाबत ठेवायला हवा? मला विश्वास आहे, की माझ्या पतीच्या कामगिरीवर विधान करण्यापूर्वी रात्रभर तुमच्या डोक्यात अनेक वाक्ये, शब्द आले असतील किंवा तुमचे शब्द तेव्हाच महत्त्वाचे वाटले असतील ज्यात माझं नाव आलं असेल.”
अनुष्का पुढे म्हणते, “हे २०२० वर्ष आहे आणि माझ्यासाठी आताही काहीही बदललेलं नाही. असं केव्हा होईल, जेव्हा क्रिकेटमध्ये मला घुसडणं बंद होईल? केव्हा अशा एकतर्फी टिपण्या बंद केल्या जातील?”
“आदरणीय मिस्टर गावस्कर, तुम्ही महान आहात, सभ्य माणसांच्या खेळात तुमचं स्थान नेहमीच मोठं आहे. मी फक्त तुम्हाला सांगू इच्छिते, की जेव्हा तुम्ही असं बोललात तेव्हा मला कसं वाटलं असेल?”
गेल्या काही वर्षांत बॉलिवूड अभिनेत्री असलेल्या अनुष्काला विराटच्या कामगिरीवरून नेहमीच जबाबदार ठरवले आहे. त्यामुळे गावस्करांनीही आपल्यालाच दोषी ठरवलं असा अनुष्काचा ग्रह झाला आणि तिने आपला संताप इन्स्टाग्रामवरून व्यक्त केला.
किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध बेंगलुरू संघाचा कर्णधार विराट कोहलीची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आहे. सामन्यादरम्यान त्याने दोन महत्त्वाचे झेल सोडले. लोकेश राहुल ८३ धावांवर खेळत असताना विराटच्या हातून झेल सुटला. नंतर ८९ धावांवर असताना पुन्हा राहुलचा झेल घेण्याची संधीही गमावली. फलंदाजीतही त्याने निराशा केली. अवघ्या एका धावेवर तो बाद झाला.
सुनील गावस्कर अनुष्का शर्मा हिला असं का म्हणाले?
लॉकडाउनमध्ये अनुष्का शर्मा विराटला गोलंदाजी करताना. याच व्हिडीओवरून गावस्कर यांनी टिप्पणी केली होती. |
सुनील गावस्कर अनुष्का शर्मा हिला असे का म्हणाले, हा प्रश्न अनेकांना पडला असेल. किंबहुना या वादावर अनेकांनी सुनील गावस्कर यांना दोषी मानलंही असेल. मात्र, त्यांनी आजपर्यंत केलेल्या समालोचनात किंवा टीका करतानाही कधीच पातळी सोडून कोणतंही विधान केलेलं नाही. मात्र, आज असं काय घडलं असेल, की त्यांनी कोहली दाम्पत्याच्या मनाला वेदना देणारं विधान केलं? अनुष्काने सुनील गावस्करांना सणसणीत उत्तर दिल्यानंतर गावस्करांनी आपल्या विधानाचा खुलासा दुसऱ्याच दिवशी 25 सप्टेंबर 2020 रोजी केला.
गावस्कर यांनी सांगितले, की इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सामन्यादरम्यान विराट कोहलीच्या निराशाजनक कामगिरीसाठी मी त्याची पत्नी अनुष्का शर्मा हिला कुठं दोषी मानलं आहे? त्याच वेळी ते म्हणाले, की मी महिलाविरोधी टिप्पणीसुद्धा केलेली नाही. माझं वाक्य चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आलं आहे.
गावस्करांचं समर्थन नाही, पण त्यांचं समालोचन ऐकल्यानंतर ते अगदी खरं बोलत आहेत. त्यांनी कुठेही चुकीचा शब्द वापरलेला नाही. विशेष म्हणजे अनुष्का आणि विराटचा लॉकडाउनच्या काळात एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात अनुष्का विराटला गोलंदाजी करीत असल्याचे स्पष्टपणे दिसते. किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध 24 सप्टेंबर 2020 रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूचा कर्णधार विराट कोहलीची कामगिरी निराशाजनक होती. सामन्यादरम्यान त्याने दोन झेल सोडल्यानंतर कोहली फलंदाजीतही अपयशी ठरला. त्याने केवळ एकच धाव घेतली.
समालोचन कक्षात बसलेले गावस्कर यांनी यावर विराटची पत्नी अनुष्काचं नाव घेऊन टिपणी केली. गावस्कर समालोचन करताना म्हणाले होते, ‘‘तो जाणून आहे, की जेवढा सराव तेवढीच उत्तम कामगिरी. जेव्हा लॉकडाउन होता तेव्हा फक्त अनुष्काच्या गोलंदाजीचाच त्याने सराव केला. आम्ही व्हिडीओ पाहिला आहे. त्यातून काहीच साध्य होणार नाही.’’
मात्र, गावस्कर यांच्या वाक्यातला मथितार्थ समजून न घेता याला अश्लील टिप्पणीचा रंग देण्यात आला. अनुष्काने खरं तर खातरजमा करून प्रत्युत्तर द्यायला हवे होते. ते न करता तिने या प्रकरणावर आणखी चर्चा घडवून आणली. ही टिप्पणी वादाच्या भोवऱ्यात सापडली. ही टिपणी अश्लील आणि अश्लाघ्य असल्याचं मत बेंगलुरूच्या चाहत्यांना वाटणं स्वाभाविकच होतं. अनुष्काने याला ‘वाईट टिप्पणी’ म्हंटले होतं.
गावस्करांनी खुलासा करताना सांगितले, की मी जे म्हणालो होतो त्याचा संदर्भ चुकीचा घेतला गेला. सुनील गावस्कर यांच्या मतानुसार, ही टिप्पणी एका व्हिडीओ क्लिपच्या संदर्भात होती, ज्यात विराट आणि अनुष्का शर्मा हिला आपल्या घराच्या परिसरात टेनिसबॉल क्रिकेट खेळताना पाहिले होते.
अनुष्काला दोषी धरण्याबाबत सुनील गावस्कर यांनी इंडिया टुडे वाहिनीशी बोलताना सांगितले, ‘‘सर्वांत आधी मला विचारायचं आहे, की मी तिला (अनुष्का शर्मा) कुठे दोष देत आहे? मी तिला अजिबातच दोष दिलेला नाही. मी केवळ हे सांगतोय, की व्हिडिओमध्ये विराटला ती गोलंदाजी करीत होती. विराटने या लॉकडाउनच्या काळात केवळ तिच्याच गोलंदाजीचा सराव केला आहे.’’
गावस्कर म्हणाले, ‘‘हा टेनिसबॉलवरील मनोरंजक खेळ होता. अनेकांनी लॉकडाउन काळात वेळ घालवण्यासाठी टेनिसबॉलची मदत घेतली. हे एवढेच आहे. आता यात मी विराटच्या अपयशासाठी कुठे तिला जबाबदार धरले आहे?’’
गावस्करांनी सोशल मीडियावर ही टिप्पणी महिलाविरोधी असल्याच्या अपप्रचारावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘मी अशा व्यक्तींपैकी एक आहे, ज्यांनी नेहमीच खेळाडूंसोबत आपल्या पत्नीला घेऊन जाण्याची मागणी केली आहे. मी नेहमीच म्हणतो, की जेव्हा नोकरदार व्यक्ती ऑफिस संपल्यावर घरी येतो तेव्हा तो पत्नीकडे येतो. त्याचप्रमाणे क्रिकेटपटूंनाही आपल्या पत्नीसोबत का नाही राहू शकत?’’
त्यांनी आपल्या टिप्पणीचं विश्लेषण करताना सांगितले, ‘‘तुम्ही समालोचनात ऐकू शकता, की आकाश (चोप्रा) या वस्तुस्थितीवर चर्चा करीत होता. लॉकडाउनमध्ये कोणालाही उत्तम सराव करण्याची संधी मिळालेली नाही.’’
गावस्करांनी सांगितले, ‘‘काही खेळाडूंना पहिल्या सामन्यात सराव नसल्याचा परिणाम जाणवला. रोहित (शर्मा) चेंडू व्यवस्थित टोलवू शकत नव्हता. मात्र, दुसऱ्या सामन्यात त्याने धावा केल्या. एमएसडीलाही (महेंद्रसिंह धोनी) पहिल्या सामन्यात चेंडू चांगल्या प्रकारे मारता येत नव्हता.’’
ते म्हणाले, ‘‘मी त्या सामन्यादरम्यान फक्त हेच म्हणालो, की अनुष्का त्याला (विराट) गोलंदाजी करीत होती. मी कोणत्याही वेगळ्या शब्दाचा उपयोग केलेला नाही. ‘अनुष्का गोलंदाजी करीत होती,’ यात मी तिला (अनुष्का) कुठं दोषी ठरवलं, यात महिलाविरोधी काय आहे?’’
गावस्कर म्हणाले, ‘‘मी फक्त हे सांगण्याचा प्रयत्न करीत होतो, की लॉकडाउनमध्ये विराट किंवा अन्य दुसऱ्या कोणत्याही क्रिकेटपटूला सरावाची संधी मिळालेली नाही.’’
ते म्हणाले, ‘‘माझे शब्द महिलाविरोधी नव्हते. जर कोणी याची वेगळी व्याख्या केली असेल तर त्यात मी काय करू शकतो?’’
हे प्रकरण एकूण असं आहे. सध्या सोशल मीडियावर जे व्हायरल होतं, त्याची खातरजमा कोणालाही करावीशी वाटत नाही हे दुर्दैव आहे. गावस्कर यांनी कारकिर्दीत कुठेही चुकीचं वर्तन केलेलं नाही. त्यामुळे अशा सोशल मीडियावरून कोणीही कोणाविषयी द्वेषमूलक मजकूर व्हायरल करू नये… कारण आज ज्याच्याविषयी तुम्ही बोलत आहात, त्याच जागेवर उद्या तुम्हीही असाल…
[jnews_hero_8 include_category=”87″]