The tragedy of a footballer | एका फुटबॉलपटूची शोकांतिका
एका फुटबॉलपटूची शोकांतिका
आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना… ही विदारक अवस्था एका फुटबॉलपटूच्या वाट्याला आली आहे. फुटबॉल त्याचा श्वास आहे आणि हा श्वास आता बंद होण्याच्या मार्गावर आहे.
कुणाच्याही हृदयापर्यंत या खेळाडूची ही करुण कहाणी पोहोचलीच नाही. हा खेळाडू फुटबॉलवेड्या ब्राझीलचा नाही, तर क्रिकेटवेड्या भारतातला आहे. त्याचं नाव आहे अन्वर अली. anwar ali footballer |
जन्मजात हृदयाच्या आजाराने त्याचं फुटबॉल करिअर संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.
जगात एकमेव अन्वर अली या संकटाला सामोरा जातोय असं अजिबात नाही. इंग्लंड आणि मँचेस्टर यूनायटेड क्लबचा एक खेळाडू अशाच एका जन्मजात आजाराने पीडित होता.
तो संघासाठी ६० मिनिटे खेळला. त्याचं प्रशिक्षणच तज्ज्ञांच्या नियंत्रणाखाली झालं. याच न्यायाने अन्वरलाही खेळायचंय.
अन्वरच्या मागे मोहम्मडन स्पोर्टिंग क्लब Mohammedan S.C.| ठामपणे उभा राहिला आहे. मात्र, क्लबच्या पाठिंब्याने अन्वरचा प्रश्न सुटलेला नाही.
कारण अखिल भारतीय फुटबॉल संघटनेने अन्वरला खेळण्यास परवानगी दिलेली नाही. अन्वर अवघ्या वीस वर्षांचा आहे. ज्या वयात मुले खेळात करिअर करतात, त्या वयात त्याला फुटबॉल सोडावा लागतोय. हीच खरी शोकांतिका आहे.
ज्या वेळी कर्णाला कवचकुंडलं काढावी लागली होती, त्या वेळी कर्णाचं सगळं सौंदर्य गळून पडलं होतं. तो शक्तिहीन झाला होता.
मात्र, इंद्राच्या वरामुळे त्याला पुन्हा सौंदर्य प्राप्त झालं. इथं अन्वरला वर देणारा कोणी नाही. त्याला फुटबॉल कौशल्याची सगळी कवचकुंडलं ओवाळूनच टाकावी लागणार आहे!
पण त्याला कर्ण व्हायचं नाही; त्याला अन्वरच राहायचंय. तोच अन्वर ज्याने १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत anwar ali footballer u-17 | आपली छाप पाडली होती. दुर्दैवाने त्याची वाट आता बिकट झाली आहे.
मोहम्मेडन स्पोर्टिंग क्लबला मनापासून वाटतंय, की एका जन्मजात आजारामुळे अन्वरचं फुटबॉल करिअर संपुष्टात न येवो. भलेही त्याला प्रत्येक सामन्यात किमान ६० मिनिटे खेळवावं लागलं तरी बेहत्तर!
मोहम्मडन स्पोर्टिंगचे सचिव दिपेंदू बिस्वास म्हणाले, की आम्ही त्याला प्रत्येक सामना तीस मिनिटेही खेळवायला तयार आहोत.
अन्वर अलीला फुटबॉल खेळायचंय. त्याने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला (AIFF) पत्र लिहिले आहे. फुटबॉलपासून लांब राहणं म्हणजे माझ्यासाठी मृत्युदंड आहे, असं तो म्हणतो.
त्याने भारतीय संविधानाचा आधार घेतला आहे. संविधानाच्या कलम २१ नुसार मला उदरनिर्वाह करण्याचा अधिकार आहे.
काय घडलं अन्वरच्या आयुष्यात?
अन्वर अलीच्या कौशल्यावर फुटबॉलप्रेमी फिदा आहेत. त्याने भारतीय फुटबॉल संघाच्या दरवाजापर्यंत दस्तक दिली होती. मात्र, २०१८ मध्ये लक्षात आलं, की त्याला हृदयाचा आजार आहे. हे ऐकल्यानंतर अन्वरच्या पायाखालची वाळूच सरकली.
त्याने सर्वांत आधी ही माहिती मिनर्वा पंजाब क्लबचे मालक रंजित बजाज यांना दिली. बालपणी अन्वर याच क्लबकडून खेळायचा. त्यामुळे या क्लबशी त्याचं नातं अजूनही घट्ट आहे.
अन्वरची घरची स्थिती अगदी बेताची आहे. त्याला या आजारामुळे खेळू दिलं नाही तर त्याचं आयुष्य किमान वाढेलही, पण उर्वरित आयुष्यात त्याला रोज मृत्यू पाहावा लागणार आहे!
कारण फुटबॉलपासून वंचित राहिला तर त्याला मजुरीशिवाय पर्याय नाही.
अन्वर अली मात्र खचलेला नाही. त्याला फुटबॉल खेळायचं आहे. मात्र अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (AIFF) वैद्यकीय समितीने त्याला खेळविणे धोक्याचे असल्याचे म्हंटले आहे.
अन्वर म्हणाला, की मला माहीत नाही माझ्या वैद्यकीय अहवालात काय आहे. पण मला माहीत आहे, की मी जे काही करतोय ते चांगलंच करतोय. मला पुन्हा खेळायचंय. फुटबॉलमध्ये मला करिअर करायचंय. सराव करताना मला कोणतीही अडचण आलेली नाही.
वर्ल्ड कपमध्ये कौतुकाचा वर्षाव
२०१७ मध्ये झालेल्या १७ वर्षांखालील फिफा वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धेत अन्वर अलीने भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. वयोगटातल्या फिफा वर्ल्डकपमध्ये सहभागी होणे ही भारतीय फुटबॉलच्या इतिहासातली पहिलीच घटना होती.
या स्पर्धेत सेंटर बॅकवरील अन्वर अली अधिक चर्चेत आला. हाच तो अन्वर अली होता, ज्याच्यासाठी मुंबई फुटबॉल क्लबने इंडियन सुपर लीगमध्ये (ISL) खेळण्यासाठी घसघशीत रक्कम मोजली होती.
मात्र, त्याच्या आजाराबाबत कळल्यानंतर मुंबईने त्याचा करार संपुष्टात आणला. यानंतर अन्वरला 2019 च्या राष्ट्रीय संघाच्या शिबिरासाठीही निवडले होते.
अन्वर अलीची कामगिरी anwar ali stats |
भारतीय संघाचे प्रतिनिधित्व : 15 वर्षांखालील, 17 वर्षांखालील, 19 वर्षांखालील, 17 वर्षांखालील फिफा वर्ल्डकप
खेळण्यासाठी अन्वर कोर्टात!
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करणारा अन्वर अली आता अखिल भारतीय फुटबॉल महासंघाविरुद्ध (AIFF) थेट कोर्टात गेला आहे.
हृदयाच्या गंभीर आजारामुळे एआयएफएफने त्याला सराव सामन्यास खेळण्यास बंदी घातली आहे. एआयएफएफच्या या निर्णयाविरुद्ध अन्वरने २९ ऑक्टोबर २०२० रोजी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
अन्वर अलीचे वकील अमिताभ तिवारी व अभिमन्यू तिवारी यांनी न्यायाधीश नवीन चावला यांना सांगितले, की अन्वर अतिशय गरीब कुटुंबातला आहे.
जर त्याला सराव करण्यास परवानगी दिली नाही तर या वीस वर्षीय खेळाडूवर अन्याय होईल. त्याला खेळता येणार नाही आणि पैसेही कमावता येणार नाहीत.
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने AIFF | ७ सप्टेंबर २०२० रोजी कोलकात्याच्या मोहम्मडन स्पोर्टिंग क्लबला Mohammedan S.C. | पत्र पाठवले आहे.
त्यात स्पष्टपणे नमूद केले आहे, की अलीला संघासोबत सराव करण्यास परवानगी नाही. फुटबॉल हे त्याच्या कमाईचं एकमेव साधन आहे आणि ते अशा प्रकारे कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.
अन्वर हृदयाशी संबंधित ‘एप्सियल हायपरकार्डियो मायोपथी’ (espial hypercardio myopathy) या आजाराने पीडित आहे.
एआयएफएफचे वकील प्रेमतोश मिश्रा यांनी सांगितले, की अन्वर उत्तम खेळाडू आहे, यात कोणतीही शंका नाही. तो देशासाठीही खेळला आहे. आता तो अशा स्थितीत आहे, की त्याला जर खेळण्यास परवानगी दिली तर त्याचं आयुष्य धोक्यात येईल. अलीला वेगवेगळ्या डॉक्टरांना दाखवलं. तज्ज्ञांचा सल्लाही घेण्यात आला आहे. त्यानंतरच त्याला खेळण्यास परवानगी दिलेली नाही. मुळात तपासणी अजूनही प्रलंबित आहे. त्यामुळे हा अंतिम निर्णय नाही.
अॅड. मिश्रा म्हणाले, की अली एआयएफएफच्या क्रीडा वैद्यक समितीसमोर (एआयएफएफचीस्थायी समिती) सादर होऊ शकतो आणि आपले मत आणि आजाराचा व्हिडीओ त्यांना दाखवू शकतो. ही बैठक पुढच्या दहा दिवसांत होईल. त्याची माहिती अलीला देण्यात येईल.
यावर अलीचे वकील अॅड. तिवारी यांनी सांगितले, की जर वैद्यक समिती यावर अद्याप विचार करीत असेल तर तोपर्यंत त्याला संघासोबत सराव करण्यास परवानगी द्यायला हवी. कोर्टाचा निकाल जर अलीच्या बाजूने लागला तर त्याला किमान खेळता तरी येईल.
या प्रकरणी आता पुढची सुनावणे २० ऑक्टोबर रोजी आहे. हा निर्णय काय लागतो, त्यावर अन्वरचे फुटबॉल भविष्य अवलंबून राहील.
एकूणच हे सर्व प्रकरण पाहता, यात ना एआयएफएफ खलनायक आहे, ना अन्वर दोषी आहे.. नियतीनेच असा पेच निर्माण केला आहे, की अन्वरचाच फुटबॉल झाला आहे!
[jnews_block_8 first_title=”Read more at :” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”63″]