महिला टेनिसवर सेरेना विल्यम्स इफेक्ट
महिला टेनिसवर सेरेना विल्यम्स इफेक्ट
जेव्हा सेरेना विल्यम्स टेनिसपासून लांब जाते, तेव्हा तिचं जाणं सेवानिवृत्तीचे संकेत अजिबात देत नाही. हे संकेत प्रगल्भतेला चिन्हांकित करेल. कारण महिला टेनिसविश्वात क्रांती आणली असेल तर ते तिच्या प्रभावशाली खेळामुळेच. म्हणूनच टेनिसविश्वावर सेरेना विल्यम्स इफेक्ट कायम असेल.
महिला क्रीडाविश्वात सेरेना विलियम्सने जी क्रांती आणली, ती कौतुकास्पदच म्हणावी. ती जेव्हा कोर्टवर आपल्या खेळाने प्रभावित करायची, तेवढीच ती बिनधास्त स्वभावानेही प्रभावित करायची. तिने महिलांना स्वत:ला शोधण्यास प्रवृत्त केले. म्हणूनच की काय, तिच्यासमोर जी महिला लढली, तिच्यासाठी तो सामना सार्थकी लागल्याचे समाधान देऊन जायचा.
अव्वल महिला खेळाडूंमध्ये वयाच्या चाळिशीत सेरेनाने कमाईत नवा अध्याय रचला आहे. म्हणजे कोर्टवर कारकिर्दीतील विजेतेपदांची बक्षिसाची रक्कमच विक्रमी 94 मिलियन डॉलर आहे. (भारतीय रुपयांत हीच रक्कम जवळपास 747 कोटी 16 लाख 84 हजार होतात.)
तिचा हा प्रवास सोपा नव्हता. या प्रवासात तिने लवचिकतेची व्याख्या नव्याने केली आहे. अनेक टीकाटिप्पण्यांना तोंड देणे असो, दु:खाचे अनेक प्रसंग असो.. नंतर गर्भवतीपासून बाळंतपणापर्यंत पुन्हा तेच ते तेच ते.. टीका, वेदना! मग ती जगात प्रथम क्रमांकावर असली काय किंवा पहिल्या 100 च्या बाहेर गेली काय…
सेरेनाने मात्र कशाचीही पर्वा केली नाही. एवढेच काय, टेनिस चॅम्पियन कसे दिसतात, ते कसे कपडे घालतात आणि कसे वागतात याविषयीच्या कल्पनाही तिने मोडीत काढल्या.
कदाचित याच मुळे ती नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत असावी. नव्या पिढीतल्या मुला-मुलींना जर टेनिस आवडत असेल तर सेरेनाने या पिढीला या खेळासह जगण्यास प्रेरित केले.
अमेरिका टेनिस संघटनेची माजी अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कॅटरिना ॲडम्स यांनी सेरेनाच्या पैलूंवर प्रकाश टाकला. या कॅडरिना ॲडम्स जनसंपर्क अधिकारीही होत्या. त्या म्हणाल्या, “आमच्या खेळात सेरेनाने टेनिसमध्ये क्रांती आणली. तिने आपली शक्ती, धैर्य, दृढनिश्चयासह आपल्या फॅशनने टेनिसमध्ये बदल घडवला. जेव्हा ती एखाद्या सामन्यात पराभूत होते, तेव्हा ती पराभव न मानण्याच्या थाटातच कोर्ट सोडते.”
एका पत्रकार परिषदेत रफाएल नदालने सेरेना विल्यम्सला ‘दंतकथा’ आणि ‘खेळाची राजदूत’ म्हणून संबोधले.
नदाल म्हणाला, “तिची निवृत्ती टेनिससाठी मोठे नुकसान आहे. मात्र, दुसऱ्या बाजूने विचार केला, तर ती त्या सर्व गोष्टींसाठी पात्र होती, ज्या तिने मिळवल्या आहेत. कारण तिने दीर्घ कालावधीपासून दृढनिश्चयी, समर्पणभावना, शिस्तबद्धतेसह या खेळाला आयुष्य दिले आहे. तसे नसते तर काहीच शक्य झाले नसते. आता असा हा क्षण आहे, ती जे काही करू पाहतेय, ते निवडण्यास ती पात्र आहे.”
यंदाची (2022) यूएस ओपन ही सेरेना विल्यम्सची अखेरची स्पर्धा असेल, याचे संकेत तिने ‘Vogue’मध्ये एका लेखात नमूद केले होते. तिचा 41 वा वाढदिवस जवळ येत असताना टेनिसपासून दूर का, हे तिने स्पष्ट केले होते.
सेरेनाकडे अवघ्या 17 व्या वर्षी ‘ओपन’ युगातील तब्बल 23 प्रमुख स्पर्धांची विजेतीपदे होती. मला वाटतं, या एका ओळीत ती किती अव्वल दर्जाची खेळाडू आहे हे स्पष्ट होते.
तसं पाहिलं तर कॅलिफोर्नियातील ‘कॉम्पटन’मध्ये तिचं पालनपोषण झालं. कॉम्पटन हे तसं कामगारांचं शहर. दारिद्र्याच्या गर्तेतलं. त्यामुळे टोळीयुद्ध, सामूहिक हिंसा इथं नवीन नाही. अशा वातावरणात आईवडिलांनी तिच्यासह बहीण व्हीनसला सार्वजनिक कोर्टवर टेनिस शिकवलं. जगातील सर्वांत मोठे टेनिस कोर्ट असलेल्या आर्थर एश स्टेडियमने तिला नवा आयाम दिला. कदाचित संघर्षाची बीजे तिच्या बालपणातच होती. जन्मजातच ती संघर्षकन्या होती.
यूएसटीए बिली जीन किंग टेनिस सेंटर येथील 23,771 आसनांचे एश स्टेडियम हे विल्यम्सच्या सहा यूएस ओपन विजयांचे, तसेच वादाचेही कारण बनले आहे.
[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=m28CB6MZbqY” column_width=”4″]रेटिंग बोनान्झा : सेरेना विल्यम्स इफेक्ट
रिचर्ड विल्यम्स (विल्यम्स भगिनींचे वडील) यांनी सुमारे चार दशकांपूर्वीच भाकीत केले होते, की त्यांची सर्वांत धाकटी मुलगी सेरेना ही व्हीनसपेक्षाही मोठी टेनिसपटू असेल. तेव्हा अनेकांना हे भाकीत अतिशयोक्ती वाटले असेल. ते पुढे असेही म्हणाले होते, की या दोघीही (सेरेना आणि व्हीनस) एक दिवस जगातील सर्वोत्तम टेनिसपटू होतील.
ही भविष्यवाणी खरी ठरली.
दोन्ही विल्यम्स भगिनींंनी वैयक्तिक आणि दुहेरीत जे काही साध्य केले ते कौतुकास्पदच आहे. फेब्रुवारी 2002 मध्ये व्हीनस जगातील नंबर 1 वर, तर जूनमध्ये सेरेना नंबर 2 वर आली. जुलैमध्ये सेरेना नंबर 1 आणि व्हीनस नंबर 2 वर पोहोचली. विल्यम्स भगिनींंच्या वर्चस्वाचं हे एक उदाहरण आहे. पहिला आणि दुसरा क्रमांक या दोघींंमध्येच विभागला.
टेनिस इतिहासकार स्टीव फ्लिंक म्हणतात, त्या दोघींकडे चेंडू परतावण्यासाठी प्रत्येक शॉट होते.
2002 आणि 2003 मध्ये व्हीनस आणि सेरेना सहापैकी पाच प्रमुख स्पर्धांच्या अंतिम फेरीत आमनेसामने आल्या. या पाचही अंतिम फेरी सेरेनाच जिंकली. याच मोसमात सर्व चार ग्रँडस्लॅम किताब जिंकत “सेरेना स्लॅम” टच दिला.
1999 मध्ये ती जेव्हा अमेरिकन ओपन खेळत होती, तेव्हा ती अवघ्या 17 वर्षांची होती. त्या वेळी तिने आपल्या धमाकेदार कामगिरीने टेनिसप्रेमींंची मने जिंकली. तिने गतविजेती लिंडसे डेवेनपोर्ट हिला पराभूत करत कारकिर्दीतल्या पहिल्याच ग्रँडस्लॅम स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. ही कामगिरी थक्क करणारी होती. कारण वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी टेनिसयुगातील मातब्बर खेळाडूला तिने पराभूत केले होते. या स्पर्धेनंतर सेरेनाला जेव्हा विचारलं, की तुला कुणाची भीती वाटते, तर तिने उत्तर दिलं, मी कुणालाही घाबरत नाही. मी फक्त देवाला घाबरते.
स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी तिच्यासमोर आव्हान होते जगातली नंबर वन टेनिसपटू मार्टिना हिंगिसचे. मात्र, तिलाही लीलया पराभूत करीत सेरेनाने पहिला ग्रँडस्लॅम किताब जिंकला.
सेरेना महिला टेनिसचं भविष्य होती. ती एक रेटिंग बोनान्झा होती. गेल्या वर्षीच्या महिला फायनलमध्ये जेवढे रेटिंग होते, त्यापेक्षा डबल रेटिंग सेरेनाने पुढच्या वर्षात कमावले होते.
ईएसपीएनचे उपाध्यक्ष जेमी रेनॉल्ड्स म्हणतात, जसा गोल्फमध्ये टायगर वूडचा इफेक्ट असतो, तसा टेनिस कोर्टवर सेरेना इफेक्ट असतो. म्हणजे टायगर वूड गोल्फ कोर्सवर आहे किंवा नाही, यावर मैदानावरील गर्दी अवलंबून असते. सेरेनाने टेनिस कोर्टवर अशीच कमाल केली होती.
सेरेनाचे ग्राउंडस्ट्रोक आणि तिची सर्व्हिस कमाल होती. विल्यम्स भगिनींंच्या युगापूर्वी महिला टेनिसमध्य सर्व्ह आणि व्हॉली एका ठराविक स्थानापासून केलेली फक्त एक सुरुवात असायची.
सेरेना, व्हीनस आणि इतर काही ताकदीच्या खेळाडूंची सर्व्ह आणि व्हॉली वेगळी होती. त्या जेव्हा सर्व्हिसचा उपयोग करायच्या, तेव्हा त्यावर गुण वसूल केल्याशिवाय थांबत नसायच्या. तिच्या सर्व्हिसचा वेग 128 प्रतिमैल इतका असायचा. जॉन मॅकेन्रो याने सेरेनाच्या सर्व्हिसची तुलना पुरुषांच्या तोडीची मानली आहे.
जॉन मॅकेन्रोने एनबीएचा खेळाडू स्टीफ करी याच्याशी सेरेनाच्या खेळाची तुलना केली आहे. स्टीफ करी याने बास्केटबॉल खेळ बदलून टाकला. प्रत्येक जण त्याच्यासारखं थ्री पॉइंटर्स शूटिंगचा प्रयत्न करायचा. पण एकालाही त्याच्याइतकं चांगलं शूटिंग करता आलेलं नाही. मॅकेन्रो पुढे म्हणतो, टेनिसमध्येही सेरेनाच्या ताकदीचा खेळ इतर कोणानाही जमला नाही.
सेरेना उत्कटता आणि भावनांची संपूर्ण श्रेणी आहे. कधी राग, कधी आनंद आणि बर्याचदा ओरडणे, गर्जना आणि मुठ आवळून तिचा जो आवेश आहे, ते पाहता ती खेळाला उत्तेजित करीत असते.
जून 2021 मध्ये विम्बल्डनच्या पहिल्या फेरीत दुखापतीमुळे सेंटर कोर्टमधून बाहेर पडल्यानंतरच्या 14 महिन्यांत विल्यम्सने फक्त चार सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामने तिने गमावले आहेत. ती 26 सप्टेंबर 2022 रोजी 41 वर्षांची होईल. जागतिक क्रमवारीत ती 321 (12 सप्टेंबर 2022) व्या क्रमांकावर आहे. गेल्या महिन्यात ती 410 क्रमांकावर होती. वीस वर्षांपूर्वी अव्वल क्रमांकावर असलेल्या सेरेनाचे तीनशे-400 च्या खाली घसरणं अनेकांसाठी धक्कादायक वाटत असेल. मात्र, खेळातमध्ये हे चढ-उतार कुणालाही चुकलेले नाहीत.
तिचा सर्वांत अलीकडचा अमेरिकन ओपन स्पर्धेतला सामना निराशाजनकच ठरला. एम्मा राडुकानू हिने तिला सरळ सेटमध्ये पराभूत केले. त्या वेळी सेरेनाची चार वर्षांची मुलगी ऑलिम्पिया अतिथी बॉक्समध्ये काकू ईशाच्या मांडीवर बसून आईचा सामना पाहत होती. सेरेनाच्या टेनिस कारकिर्दीतली ही 21 अमेरिकन ओपन स्पर्धा होती. यात ती पराभूत झाली तरी तिच्या उतरंड लागलेल्या खेळावर टीका करणं अयोग्य ठरेल. ती जेव्हा एश स्टेडियममध्ये दिव्यांच्या प्रकाशात कोर्टवर उतरते तेव्हा तिला पाहण्यासाठी गर्दी ओसंडून वाहत असते. कारण सेरेनाने कारकिर्दीतली 26 वर्षे टेनिसमध्ये घातली आहेत. एक विजेती खेळाडू होण्यासाठी तिने काय काय नाही केलं… प्रतिकूल परिस्थितीशी झगडली, कमबॅक करताना अनेक कठीण प्रसंगातून तिने सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केलं आहे. प्रत्येकाकडे सेरेनासारखी क्षमता नसते. कदाचित कोणाकडेही केव्हाही पुढे जाण्याची क्षमता नसेलच, जी फक्त सेरेनात पाहायला मिळते. सेरेनामुळे महिला जर प्रेरित झाल्या नाहीत तरच नवल. कदाचित पुढची अनेक दशके सेरेना विल्यम्स इफेक्ट कायम असेल.
[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#1e73be” header_line_color=”#1e73be” exclude_category=”90″]