फलंदाजांची सुमार कामगिरी हे दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेतील पराभवाचे कारण असल्याचे मत भारताचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केली आहे. भारताने निर्णायक कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेपुढे अवघे 212 धावांचे लक्ष्य ठेवले होते. यजमान दक्षिण आफ्रिकेने हे माफक लक्ष्य अवघ्या तीन फलंदाजांच्या मोबदल्यात गाठले. सामन्याच्या बक्षीस वितरण समारंभात विराट कोहली याने नाराजी व्यक्त करीत पराभवाचे खापर फलंदाजांच्या सुमार कामगिरीवर फोडले.
‘फलंदाजीमुळेच हा पराभव पदरी पडला आहे. या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पैलूवर बोट ठेवताच येणार नाही. काही जण वेगवान गोलंदाजी, चेंडूला लाभणारी उसळी असे मुद्दे उपस्थित करत आहेत; पण दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी आपल्या मुबलक उंचीचा वापर करत अशाच खेळपट्ट्यांचा तीनही कसोटींमध्ये फायदा करून घेतला’, याकडे विराटने लक्ष वेधले. महत्त्वाच्या क्षणी भारतीय फलंदाजांचे लक्ष विचलीत झाल्याचेही टीम इंडियाच्या या कर्णधाराने नमूद केले.
‘आमची एकाग्रता भंगली आणि त्या प्रत्येकवेळी दक्षिण आफ्रिकेने संधी साधली. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी आमच्यावर दडपण कायम ठेवण्यात यश मिळविलेच, पण त्यांनी आम्हाला चुका करण्यासही भाग पाडले. साहजिकच त्यांना आपल्या खेळपट्ट्या आणि वातावरणाची आमच्यापेक्षा चांगली जाण आहे’, असे विराट नमूद करतो.
कोहलीच्या वक्तव्यावर गंभीरची टीका
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यादरम्यान वादग्रस्त डीआरएस निर्णयावर विराट कोहली याने नाराजी व्यक्त केली होती. ही नाराजी स्टम्पच्या माइकजवळ स्पष्टपणे ऐकू आली. त्यावर भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने विराटवर टीका केली. अपरिपक्व आणि अतिशयोक्तीपूर्ण ही प्रतिक्रिया असून, अशा वर्तनामुळे भारतीय कर्णधार युवा खेळाडूंचा आदर्श होऊ शकणार नाही, असे मत गौतम गंभीर याने व्यक्त केले.
दक्षिण आफ्रिकेच्या केपटाउनवर 13 जानेवारी 2022 रोजी झालेल्या दुसऱ्या डावातील 21 व्या षटकात अश्विनच्या गोलंदाजीवर मैदानावरील पंच इरास्मूस यांनी एल्गरला पायचीत दिले होते. मात्र, रिव्ह्यूमध्ये हा निर्णय बदलण्यात आला. या निर्णयाने विराटने संताप व्यक्त केला. स्टम्प माइकजवळ जाऊन कोहलीने म्हटले होते, की जेव्हा तुमचा संघ चेंडू चमकवतो, तेव्हाही लक्ष देत जा. केवळ प्रतिस्पर्धी संघावरच लक्ष ठेवू नका. केवळ विराट कोहलीनेच संताप व्यक्त केला नाही, तर उपकर्णधार राहुल आणि अश्विननेही संताप व्यक्त केला. पूर्ण देश 11 खेळाडूंविरुद्ध खेळत आहे, असा संताप राहुलने व्यक्त केला, तर जिंकण्यासाठी यापेक्षा चांगला मार्ग तुम्हाला शोधावा लागेल, असे अश्विनने म्हटले होते.
विराटने व्यक्त केलेली ती स्वाभाविक प्रतिक्रिया असली तर त्यावर क्रिकेटवर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. स्टार स्पोर्टसवर गौतम गंभीर यानेही विराटवर टीका केली. तो म्हणाला, हे खूप वाईट होते. स्टम्प माइक जवळ जाऊन कोहलीने दिलेली प्रतिक्रिया अपरिपक्वपणाचे लक्षण आहे. एक आंतरराष्ट्रीय कर्णधार, भारतीय कर्णधाराकडून अशा प्रकारची प्रतिक्रिया अपेक्षित नाही.
पहिल्या कसोटीत मयंग अगरवाल यालाही अशा प्रकारे जीवदान मिळाले होते. त्या वेळी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर याने अशी प्रतिक्रिया दिली नव्हती, याकडे गंभीर याने लक्ष वेधले. गंभीरने म्हटले आहे, की टेक्नॉलॉजी तुमच्या हातात नाही. मयंकच्या बाबतीत तो बाद आहे, असे वाटत होते. मात्र, एल्गरने तशा पद्धतीची प्रतिक्रिया दिली नाही.
गंभीरने म्हटले आहे, की अशा प्रकारची प्रतिक्रिया अतिशयोक्तीपूर्ण आहे. अशा पद्धतीने तुम्ही आदर्श होऊ शकत नाहीत. कोणत्याच उदयोन्मुख खेळाडूला विशेष करून भारतीय कर्णधाराकडून अशा पद्धतीची प्रतिक्रिया पाहायला आवडणार नाही. सामन्याचा निकाल काहीही असो. मात्र, दीर्घकाळापासून कर्णधारपदी असणाऱ्यांकडून ही अपेक्षा नाही. आशा आहे, की राहुल द्रविड याबाबतीत त्याच्याशी बोलतील.
दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज डॅरील कलिनन यानेही विराटवर टीका केली. कलिनन याने म्हटले आहे, की तो नेहमीच असे करतो. तो मनमानी पद्धतीने वागतो. भारत महाशक्ती आहे. असे अनेक वर्षांपासून घडत आहे. मला विराट आवडतो. त्याचा खेळ आवडतो. मात्र, वागणुकीवर काही मर्यादा असायला हवी. त्याला दंड झाला पाहिजे.
virat rohit ipl | विदेशी भूमीत विराट, रोहित अपयशीच
Follow on Facebook page kheliyad
[jnews_block_37 header_icon=”fa-angle-double-down” first_title=”Read more at :” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”65″]