All SportsCricket

भारतीय महिला क्रिकेट संघाचा प्रशिक्षक पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

भारतीय महिला क्रिकेट संघाचा प्रशिक्षक पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

भारतीय महिला क्रिकेट संघ पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. Indian women’s cricket team controversy | हे वाद नेहमीच प्रशिक्षक-खेळाडू-प्रशासन अशा त्रिकोणात अडकलेले पाहायला मिळाले आहेत. या वादाचा निकाल मात्र प्रशिक्षकाचा बळी देऊनच लागला आहे. 2018 मध्ये आघाडीची फलंदाज मिताली राज आणि प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यातील वादात पोवार यांची हकालपट्टी झाली होती. त्यांच्या जागी डब्लू. व्ही. रमण (W V Raman) यांची नियुक्ती झाली. गंमत पाहा, आता रमण यांचीही हकालपट्टी करण्यात आली आणि त्यांच्या जागी पुन्हा पोवार यांची वर्णी लागली आहे…

भारतीय महिला क्रिकेट संघाची कामगिरी उत्तम म्हणावी का, तर नाही. फार ढिसाळ म्हणावी तर तीही नाही. एप्रिल 2021 च्या जागतिक वन-डे क्रमवारीवर नजर टाकली, तर ती फारशी समाधानकारक नाही. भारतीय महिला ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, इंग्लंडनंतर चौथ्या स्थानावर आहेत. टी20 चा विचार केला तर तेथेही तिसऱ्या स्थानावर आहे. या कामगिरीचा विचार केला तर प्रशिक्षक दोषी आहे की खेळाडू की प्रशासन? मला वाटतं, सुसंवाद नसल्याने हे तिघेही दोषी आहेत.

रमण म्हणतात, महिला क्रिकेटमध्ये आत्मकेंद्रित संस्कृती


Indian women’s cricket controversy | डब्लू. व्ही. रमण यांनी 14 मे 2021 रोजी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना ई-मेल केला आहे. त्यात त्यांनी भारतीय महिला संघात ‘आत्मकेंद्रित संस्कृती’ रुजत असल्याचा आरोप केला आहे. रमण यांनी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख राहुल द्रविड़ यांनाही ई-मेल केला आहे. माजी क्रिकेटपटू मदन लाल यांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट सल्लागार समितीने 13 मे 2021 रोजी एक आश्चर्यकारक निर्णय घेतला. त्यांनी राष्ट्रीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदी रमण (W V Raman) यांच्या जागेवर रमेश पोवार यांची निवड झाली. रमण यांच्या मार्गदर्शनाखाली संघ गेल्या वर्षी टी20 विश्व कपमध्ये उपविजेता राहिला होता. रमण यांच्या पत्राचा तपशील स्पष्ट झालेला नाही. मात्र, त्यांनी या पत्रात जे आरोप केले आहेत, त्याने वाद उद्भवण्याची शक्यता आहे. कारण खेळाडू-प्रशिक्षकात वाद झाल्यास नेहमीच प्रशिक्षकाचा बळी दिला जातो. मिताली राज प्रकरण हे त्याचं अगदी अलीकडचं उदाहरण आहे. रमण यांनी जे आरोप केले आहेत, त्यात कुणाचेही नाव घेतलेले नाही. मात्र, त्यांनी संघातील स्टार संस्कृतीवर प्रकाश टाकला आहे. ही संस्कृती संघासाठी नुकसानकारक असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. रमण यांच्यावर आरोप आहे, की ते प्रशिक्षणावर फारसे लक्ष देत नव्हते.

Indian women’s cricket team controversy


Indian women’s cricket team controversy | यापूर्वी 2018 मध्ये असाच एक वाद रंगला होता. या वादात प्रशिक्षक रमेश पोवार यांची हकालपट्टी करण्यात आली होती. पोवार प्रशिक्षकपदी असताना भारतीय महिला संघाने 2018 मध्ये टी20 वर्ल्ड कपची उपांत्य फेरी गाठली होती. या संघाचं नेतृत्व होतं हरपनप्रीत कौर हिच्याकडे. उपांत्य फेरीचा सामना इंग्लंडविरुद्ध होता. नेमक्या याच महत्त्वाच्या सामन्यात मिताली राजला संघातून वगळण्यात आलं. त्यावरून मितालीने संताप व्यक्त करीत पोवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. बीसीआयला पत्र पाठवत मितालीने म्हंटले होते, की पोवार माझी कारकीर्द संपवण्यासाठी, माझा उपमर्द करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पोवार यांनीही मितालीवर आरोप केले. ते म्हणाले, की मिताली संघात विनाकारण वाद निर्माण करीत आहे. या वादात रमेश पोवारची हकालपट्टी करण्यात आली. मात्र, हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना या खेळाडूंनी पोवार यांना उघडउघड समर्थन दिलं होतं. यावरून संघात खेळाडूंमध्येही मतभेद आहेत हे स्पष्ट होतं. मात्र, एकूणच या प्रकारात पोवार यांची विकेट पडली. रमेश पोवार ज्या वेळी 2018 मध्ये प्रशिक्षकपदी नियुक्त झाले, त्या वेळी डब्लू. व्ही. रमण हेही प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत होते. त्यांच्यासह 35 जणांनी या पदासाठी अर्ज केले होते. त्यात अंतिम आठ जण निवडले. यात रमण, रमेश पोवार, ऋषिकेश कानिटकर, अजय रात्रा, सुमन शर्मा, ममाथा माबेन, हेमलता काला आणि देविका वैद्य यांचा समावेश होता. या आठ जणांत रमेश पोवार यांनी बाजी मारली आणि प्रशिक्षकपदावर विराजमान झाले. ही निवडप्रक्रिया प्रमुख प्रशिक्षक तुषार आरोठे यांच्या राजीनाम्यानंतर पार पडली होती.

रमण यांच्या हकालपट्टीनंतर सीएसीवर प्रश्न


Indian women’s cricket team controversy | भारतीय संघाचे माजी सलामीवीर डब्लू. व्ही. रमण यांना महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून हटवल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. यामुळे मदन लाल यांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट सल्लागार समिती (CAC) बीसीसीआयच्या निशाण्यावर आली आहे. एवढेच नाही, तर नीतू डेव्हिड यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कारण रमण यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलियातील टी20 विश्व कपमध्ये अंतिम फेरीत पोहोचला होता. रमण भारतातील सर्वोत्तम प्रशिक्षकांपैकी एक आहेत. मात्र, रमण यांची कामगिरी कुणाला तरी खुपत होती. मदन लाल, सुलक्षणा नाईक आणि माजी वेगवान गोलंदाज आर. पी. सिंह यांच्या सीएसीने रमण यांच्याऐवजी पोवार यांना आणले. ज्याला दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 2018 मध्ये हटविण्यात आले, त्यालाच सन्मानाने प्रशिक्षकपदावर नियुक्त करण्यामागचा हेतू काय, याचा उलगडा मात्र होत नाही. लोढा समितीच्या शिफारशींनुसार आता मदन लाल यांच्या समितीवर काही प्रश्न उपस्थित होत आहेत. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की मदन लाल यांनी यंदा 20 मार्च 2021 रोजी 70 वा वाढदिवस साजरा केला होता. बीसीसीआयने लोढ़ा समितीच्या काही शिफारशींविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांनी 70 वर्षांपर्यंतची वयोमर्यादा हटविण्याची मागणी केली आहे. अशा परिस्थितीत मदन लाल अजूनही सीएसीच्या बैठकीत कसे उपस्थित राहू शकतात?

महिला क्रिकेटमध्ये वशिल्याची कीड


क्रिकेटमध्ये कसे लागेबांधे असतात पाहा. याच सीएसीमध्ये सुलक्षणा नाईक सदस्या आहेत. या सुलक्षणा नाईक कोण आहेत, तर त्या मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष संजय नाईक यांची लहान बहीण आहे. सय्यद मुश्ताक अली टी20 या स्थानिक क्रिकेट स्पर्धेत पोवार मुंबई संघाचे प्रशिक्षक होते. पोवार आणि नाईक कनेक्शन यातून स्पष्ट होतं. रमण यांच्याऐवजी पोवारची एंट्री कशी झाली, याचा एकूणच अंदाज येतो. म्हणजे प्रशिक्षकपदासाठी जे आठ उमेदवार होते, त्यात पोवारचा अर्ज असणे हा योगायोग नव्हता. ज्याची दोनच वर्षांपूर्वी हकालपट्टी झाली आहे, ती व्यक्ती पुन्हा प्रशिक्षकपदासाठी अर्ज कशी काय करू शकते, काही तरी स्वाभिमान नावाची गोष्ट असते की नाही… तरीही पोवार यांनी अर्ज करणं म्हणजेच त्यांना प्रशिक्षकपद मिळणार हे जवळजवळ निश्चित होतं. म्हणजेच या प्रशिक्षकपदाची स्क्रीप्ट आधीच लिहिली गेली होती. सुलक्षणा नाईक यांनीही ठरवले होते, की केवळ एका मालिकेतील संघाच्या खराब कामगिरीवरून रमण यांना प्रशिक्षकपदावरून हटवायचेच. सुलक्षणा नाईक यांना हे तर माहीत असेलच, की संघनिवडीत आपली कोणतीही भूमिका नाही. संघनिवडीचे अधिकार तर नीतू डेव्हिड यांच्या नेतृत्वाखालील समितीला आहे. (नीतू डेव्हिड या सुलक्षणा नाईक यांच्यासोबत एकेकाळी खेळलेल्या आहेत.)

रमण यांच्यावर काय आरोप आहेत?


रमण यांच्यावर जे आरोप ठेवले ते हास्यास्पद आहेत. रमण यांच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने टी20 वर्ल्डकपच्या फायनलपर्यंत धडक मारली. मात्र, आरोप असा करण्यात आला, की हा संघ तर पोवार यांनीच निवडला होता. तोच संघ टी20 च्या अंतिम फेरीत पोहोचला. त्यामुळे याचे श्रेय पोवार यांना द्यायला हवे. त्यामुळे रमण यांना कसे काय या संघाचे श्रेय मिळू शकते? गंमत म्हणजे हा प्रश्न रमण यांना विचारला गेला! जातपंचायतीत जसे हास्यास्पद निवाडे होतात, तशातला हा प्रकार म्हणावा लागेल. पोवार यांना प्रशिक्षकपदावर निवडायचेच असेल तर रमण किती खुजे आहेत हे दाखवण्याचा हा हास्यास्पद प्रकार म्हणावा लागेल. 2018 मध्ये हेच झालं होतं… पोवार आणि मिताली राज यांच्यात जे वाद झाले, त्यात पोवार यांना हटवणे योग्य नव्हते. मग आताही तशीच समस्या असताना दोन्ही चुकांवर एकच चांगला निर्णय घेऊन तो बदलता येणार नाही का, असा प्रश्न आता रमण यांनी उपस्थित केला आहे. सुलक्षणा नाईक यांनी रमण यांच्या यशाचं श्रेय पोवार यांना दिलं आहे. हरकत नाही, पण आता पोवार जर प्रशिक्षकपदी नियुक्त झाले तर त्यांनाही रमण यांनी तयार केलेला संघ मिळणारच आहे ना?

काय आहे वाद?


Indian women’s cricket team controversy | रमण यांना हटविण्यामागची कारणे वेगवेगळी आहेत. यापूर्वी दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी भारतीय महिला संघाची निवड करताना रमण आणि निवड समितीच्या प्रमुख नीतू डेव्हिड यांच्यात मतभेद होते. धडाकेबाज युवा फलंदाज शेफाली वर्माला वनडे मालिकेसाठी, तर अनुभवी वेगवान गोलंदाज शिखा वर्माला टी20 व वनडे मालिकेसाठी संघातून वगळण्यात आलं होतं. यावर रमण यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली होती. मात्र, निवड समितीने या दोघींना वगळण्यामागची कारणं हास्यास्पद दिली. निवड समिती म्हणते, की लॉकडाउनमध्ये शिखाचं वजन वाढलं होतं. तिला वजन कमी करण्यास सांगितलं, तर ती त्यात अपयशी ठरली. (तरी बरं, ही निवड समिती पुरुषांच्या क्रिकेटमध्ये नाही.. नाही तर रोहित शर्माची निवडच झाली नसती!) शेफालीनेही खराब क्षेत्ररक्षण केल्याने तिला वनडे संघात निवडलं नाही. गंमत पाहा, क्षेत्ररक्षण जमत नाही असा जिच्यावर आरोप आहे, त्या शेफालीला मात्र टी20 संघात निवडलं जातं! उलट टी20 मध्ये क्षेत्ररक्षणाला अधिक महत्त्व आहे. इथेच रमण यांनी निवड समितीला कोंडीत पकडलं.  संघात कोणाची निवड केली, तर प्रत्युशा आणि मोनिका पटेलची. ही मोनिका डावखुरी मध्यमगती गोलंदाज आहे. यावरूनही निवड समितीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. या दोन्ही खेळाडू बेंगलुरूतील फाल्कॉन क्लबशी संबंधित आहेत. बीसीसीआयच्या वरिष्ठ समितीतील शांता रंगास्वामी या क्लबच्या सदस्या आणि संस्थापक सचिव आहेत. आता लक्षात आलंच असेल, की या दोघींची संघात का वर्णी लागली असेल ते. निवड समितीवर प्रश्न उपस्थित होत असले तरी या समितीचे निगरगट्ट सदस्य कुणालाही जुमानत नाहीत. म्हणूनच रमण यांनी आता सौरव गांगुली आणि जय शहा यांना लक्ष घालायला सांगितले आहे. मात्र, यावर काही ठोस निर्णय होऊ शकेल असे वाटत नाही.

म्हणे, रमण खेळाडूंचं कौतुक करीत नाहीत!


रमण एकेकाळचे कलात्मक फलंदाज आहेत. उत्तम प्रशिक्षक म्हणूनही त्यांची ख्याती आहे. मात्र, चांगले काम करणाऱ्यांचे विरोधक अधिक असतात. विशेषतः क्रिकेटमध्ये तर मुबलक असतात. त्यांनी जाणूनबुजून रमण यांच्यावर आरोप केले. त्यांच्या मते, सराव सत्रात रमण संघाकडे लक्ष देत नव्हते. रमण यांच्या विरोधी गटातील एका सदस्याचं म्हणणं आहे, की काही खेळाडूंचा आरोप आहे, की सराव सत्रातून अनेक वेळा ते बाहेर जायचे. काही खेळाडूंना वाटतं, की ते कोणत्याही खेळाडूचं कौतुक करीत नाहीत. राजेश्वरी गायकवाड़ अशीच एक खेळाडू आहे, जिने सातत्याने उत्तम कामगिरी केली. मात्र, रमण यांनी तिचं अजिबातच कौतुक केलं नाही. नुजहत परवीन हिने यष्टिरक्षक म्हणून क्रिकेटमध्ये केव्हाच पदार्पण केलं आहे. मात्र, रमण यांनी तिला ‘डेब्यू कॅप’ (पदार्पणातील टोपी) दिली. हे रमण यांच्या बेपर्वाईचं लक्षण आहे.

माझ्याविरुद्ध जाणीवपूर्वक मोहीम : रमण


Indian women’s cricket team controversy | रमण यांच्यावरील हे आरोप त्यांच्या अयोग्य असण्याचे कारण कसे असू शकते, हे कळत नाही. कौतुक करीत नाही म्हणून तो प्रशिक्षक नालायक आहे, असा युक्तिवाद कसा होऊ शकतो? म्हणजेच रमण यांच्याविरुद्ध जाणीवपूर्वक डाळ शिजत होती हे स्पष्टच आहे. रमण यांनी याबाबत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख राहुल द्रविड आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना पत्र लिहिलं आहे. माझ्याविरुद्ध जाणीवपूर्वक मोहीम सुरू असल्याची खंत रमण यांनी पत्रात नमूद केली आहे. विशेष म्हणजे माझी प्रतिमा मलिन करण्याच्या या मोहिमेत बीसीसीआयच्या काही अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचे रमण म्हणाले. मात्र, हे अधिकारी कोण, याचा उल्लेख रमण यांनी केलेला नाही. रमण यांनी अशा व्यक्तींविरुद्ध आरोप केले आहेत, ज्यांचं लक्ष क्रिकेट संघाच्या हिताऐवजी वैयक्तिक स्वार्थाकडे आहे. रमण यांनी भारतीय संघातील स्टार संस्कृतीवर कटाक्ष टाकला आहे.

माझ्या वीस वर्षांच्या प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीत मी नेहमीच संघसंस्कृती तयार केली आहे, ज्यात संघ पहिला असतो. कोणताही खेळाडू संघ किंवा खेळापेक्षा मोठा नाही. आता वेळ आली आहे. राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांनी महिला क्रिकेट संघाला आत्मकेंद्री संस्कृतीतून बाहेर काढावं.
– डब्लू. व्ही. रमण

Follow us:

Indian women's cricket team controversyIndian women's cricket team controversyIndian women's cricket team controversy
Indian women's cricket team controversyIndian women's cricket team controversyIndian women's cricket team controversy

[jnews_block_9 first_title=”Read more” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”65″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!