नाओमी ओसाकाचा नैराश्याविरुद्ध फोरहँड
व्यावसायिक खेळाडू म्हंटला, की प्रसिद्धी, पैसा आणि लोकांचं प्रेम चिक्कार. बरं हा खेळाडू, टेनिस खेळाडू असेल तर विचारायलाच नको. कसलं टेन्शन नाही की आर्थिक चणचण नाही. फक्त शारीरिक तंदुरुस्तीकडं तेवढं लक्ष द्यायचं… पण छे… तुम्हाला आश्चर्य वाटेल, या खेळाडूंनाही मानसिक तणाव असतो!
मला एक विनोद आठवला…
एक जण डॉक्टरकडे आला. म्हणाला, “डॉक्टर माझ्यासोबत काही तरी चुकीचं घडतंय. संपूर्ण शरीरात कंप सुटतो.”
डॉक्टरांना जाणवलं, की तो खूप दुःखी आहे. त्यांंनी त्याच्या सगळ्या तपासण्या केल्या. सगळं काही सामान्य होतं.
डॉक्टर म्हणाले, “तुझ्यासोबत काहीही चुकीचं होत नाही. तू असं कर, सर्कस पाहा. त्यातल्या जोकरला बघ. त्याला पाहून तुला हसू येईल.”
ती व्यक्ती म्हणाली, “मीच तो सर्कशीतला जोकर.”
या खेळाडूंची नेमकी अवस्था सर्कशीतल्या जोकरसारखीच झालेली आहे. हा विनोद असला तरी त्यातलं एक सत्य अस्वस्थ करतं. जो दुसऱ्याचा तणाव दूर करतो, तो स्वतःच्या तणावावर मात्र मात करू शकत नाही.
अगदी अलीकडची म्हणजे मार्च २०२१ ची घटना. गीता आणि बबिता फोगटची मामेबहीण रितिका फोगट ही उत्तम मल्ल. मात्र, या महिला पहिलवानाने आत्महत्या केली. कारण होतं सबज्युनिअर गटातील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेतला पराभव.
2016 च्या रियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळविलेली अमेरिकेची सायकलिस्ट केली कॅटलिन तुम्हाला माहीतच असेल. दोन वर्षांपूर्वीच म्हणजे मार्च 2019 मध्ये तिने वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी आत्महत्या केली. कारण होतं नैराश्य.
कॅनडाची टेनिसपटू रिबेका मारिनो हिने वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी टेनिसमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली. कारण होतं क्रिपलिंग डिप्रेशन. म्हणजेच जगण्याची मूलभूत कार्ये मर्यादित बिंदूपर्यंत येण्याचा गंभीर आजार.
टेनिसच्या उत्तुंग यशानंतरही सेरेना विल्यम्स मातृत्वानंतर खचली होती. तिने 2018 मध्ये रॉजर कप हार्ड कोर्ट स्पर्धेतूनच माघार घेतली. कारण होतं पोस्टपार्टम डिप्रेशन. म्हणजेच प्रसूतीनंतरचं नैराश्य.
ही यादी संपता संपणार नाही. किती भयंकर हा तणाव! या नैराश्याने काही जण मृत्यूला कवटाळतात, काही जण नैराश्यासह जीवन कुंठतात, तर काही जण या नैराश्याविरुद्ध लढतात. जपानची नाओमी ओसाका अशीच एक स्टार टेनिस खेळाडू आहे, जी या मानसिक तणावाविरुद्ध लढलीच नाही, तर नवा लढा उभारला (Naomi Osaka depression). तिने असे पाऊल उचलले, की टेनिसविश्वात खळबळ उडाली. तिच्या याच निर्णयामुळे किती तरी खेळाडूंना तणावाविरुद्ध सामोरं जाण्याचं धाडस मिळालं.
नाओमी ओसाकाने छेडली नैराश्याविरुद्धची लढाई
Naomi Osaka depression | नाओमी ओसाका हिने असं काय केलं होतं? ही कहाणी टेनिस स्टार नाओमी ओसाका हिच्याच तणाव, नैराश्यापासून सुरू होते. टेनिस आणि नाओमी ओसाका हे समीकरण माहीत आहेच, पण त्यात आता तणाव या शब्दाने जागा घेतली आहे. नाओमी ओसाका हिला ‘सोशल एंग्झायटी’ने घेरलं. हा मानसिक तणावाशी संबंधित एक आजार आहे. या आजाराचं लक्षण म्हणजे लोकांमध्ये मिसळताना असुरक्षिततेची भावना निर्माण होणे, स्वत:ला दुर्बल समजणे. ग्रँडस्लॅमच्या टेनिस स्पर्धेचा एक नियम आहे. तो म्हणजे विजय होवो किंवा पराजय, तुम्हाला सामन्यानंतर पत्रकारांना सामोरं जावंच लागेल. असं नाही केलं, तर दंडात्मक कारवाई होतेच, शिवाय स्पर्धेतून निलंबितही केलं जातं. टेनिसविश्वात ग्रँडस्लॅम स्पर्धा सर्वांत प्रतिष्ठेची असते. या स्पर्धेसाठी टेनिसपटू आपलं करिअर पणाला लावतात. ही संधी कुणालाही सहज मिळत नाही. ती कामगिरीच्या आधारेच मिळते. मग अशी संधी कोण गमावेल? मात्र, नाओमीने जूनमधील फ्रेंच ओपनमध्ये पहिलं धाडसी पाऊल उचललं, ते म्हणजे पत्रकारांना सामोरं जाण्यास थेट नकार दिला. त्याचं कारण म्हणजे पराभवानंतर खेळाडू आधीच प्रचंड मानसिक तणावात असतो. त्यात त्याने पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरं जाणं म्हणजे त्या खेळाडूचं मानसिक खच्चीकरणच आहे. मी असं होऊ देणार नाही. माझ्या मानसिक तणावाचा आदर स्पर्धेने ठेवावा. तुम्हाला काय कारवाई करायची ती करा; पण मी सामन्यानंतर पत्रकारांना सामोरी जाणार नाही. तुम्हाला नियम बदलावाच लागेल. नाओमीने हे पाऊल पत्रकारांविरुद्ध अजिबात उचललेलं नाही. उलट तिने पत्रकारांना अनेक मुलाखती दिल्या आहेत. मात्र, खेळाडूची मनोवस्था जाणून न घेता स्पर्धा आयोजकांनी केलेला हा नियम आता बदलायला हवा. नाओमीचा रोख नेमका याच विषयाकडे होता.
Naomi Osaka depression | नाओमीच्या या निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या. हा खूपच धाडसी निर्णय होता. कारण तिला फ्रेंच ओपनसारख्या ग्रँडस्लॅम स्पर्धेला मुकावे लागणार होते. मात्र, तिच्या या निर्णयाने अनेकांच्या डोळ्यांवरची झापडं उडाली. नाओमीने खेळाडूंच्या तणावाचा विषय छेडला आणि आयोजक नव्याच तणावाखाली आले. नाओमी म्हणते, “लोकांना खेळाडूंच्या मानसिक स्वास्थ्याचा आदरच नाही. मी हे पत्रकार परिषदेत अनुभवलं आहे. खेळाडूला असे प्रश्न विचारले जातात, ज्याबद्दल तो स्वत:लाच संशयाने पाहू लागतो. अनेक खेळाडूंना खचताना मी पाहिलं आहे. जेव्हा खेळाडू अशा अवस्थेत असतो, तेव्हा काही प्रश्न त्याच्या हृदयावर घाव घालतात.”
नाओमीला टेनिस संघटनेने खूप समजावले. हा नियम सर्वांसाठी समान आहे. स्पेशल केस म्हणून तुझ्यासाठी तो बदलता येणार नाही वगैरे वगैरे. नाओमी तरीही आपल्या भूमिकेवर ठाम राहिली. फ्रेंच ओपनच्या पहिल्या फेरीत नाओमीने विजय मिळवला; पण ती पत्रकारांना सामोरी गेली नाही. त्यामुळे नाओमीवर १५ हजार डॉलरचा दंड करण्यात आला. यापुढेही तिने नियम मोडला तर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, अशी तंबीही टेनिस अधिकाऱ्यांनी दिली. नाओमीवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. उलट तिने ट्विटरवर पोस्ट करताना म्हंटले, की मला आशा आहे, की माझ्यावर जो दंड लावला तो मानसिक स्वास्थ्याशी संबंधित संस्थेला दिला जाईल. यानंतर नाओमीने स्पर्धेतूनच माघार घेतली.
या घटनेचे पडसाद टेनिसविश्वात तीव्रतेने उमटले. अनेक दिग्गज खेळाडू नाओमीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, तर काही जणांनी तिच्या या निर्णयावर नाराजीही व्यक्त केली. स्टार खेळाडू सेरेना विलियम्सने उघडपणे नाओमीला समर्थन दिलं. ती म्हणाली, “प्रत्येक जण वेगळा आहे. त्याला त्याच्या पद्धतीने पुढे जाण्याचा अधिकार आहे. नाओमीने जे केले ते सर्वोत्तम आहे.” माजी टेनिसपटू मार्टिना नवरातिलोवा, बिली जीन किंग अशा अनेकींनी नाओमीला पाठिंबा दिला. नाओमी म्हणते, हा नियम कालबाह्य झाला आहे आणि नेमके याच प्रश्नाकडे लक्ष मला वेधायचे आहे.
नाओमीला दंड, जोकोविचला सवलत !
Naomi Osaka depression | नाओमीने नैराश्याविरुद्ध एक लढाई छेडली खरी. मात्र, खेळातली पुरुषी मानसिकता अजूनही संपलेली नाही. टेनिसविश्वातली नंबर दोनची महिला नैराश्यावर बोलली म्हणून तिला दंड केला जातो. मात्र, दीड वर्षापूर्वी पुरुषांमधील नंबर एकचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविच ज्या वेळी बाल्कन प्रांतात करोनाचे सर्व नियम झुगारून स्पर्धा आयोजित करतो, त्या वेळी तर त्याच्यावर काहीच कारवाई होत नाही. तो तर सुपरस्प्रेडर ठरला होता. त्याच्यासह पत्नी व चार खेळाडू पॉझिटिव्ह आढळले होते. नियमांवर बोट ठेवणारे आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाचे धुरीण कुठे गेले होते? एवढेच काय, तर जागतिक क्रमवारीतला सहाव्या क्रमांकाचा अलेक्झांडर झ्वेरेव याने त्याच्या पूर्वाश्रमीच्या मैत्रिणीला मारहाण केली, मानसिक छळ केला. त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. मात्र, अलेक्झांडरने साळसूदपणे हे सगळे आरोप नाकारले. टेनिस महासंघ लगेच खूश झाला. अरे वाह पठ्ठ्या, आम्हाला खात्री तू असं करणार नाही. त्याने आरोप नाकारल्याने टेनिस महासंघही निश्चिंत झाला. लगेच त्याला निर्दोषत्वाचं सर्टिफिकेट देऊन टाकलं. पुन्हा हाच अलेक्झांडर 2016 मध्ये उत्तेजक द्रवसेवन प्रकरणी दोषी आढळला होता. आता हे तर अतीच झालं. डोपिंग टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळणं म्हणजे काय… इथंही या महाशयांनी कारण सांगितलं. म्हणाला, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेतले. टेनिस संघटनेने तेव्हाही त्याच्यावर कारवाई केली नाही. मात्र, नाओमीने नैराश्याविरुद्ध निडरपणे भूमिका मांडली म्हणून तिच्यावर कारवाई करण्यात टेनिस संघटनेने तत्परता दाखवली. कारण तिने खेळाडूंच्या समस्येवरच बोट ठेवलं होतं… पण छे.. महिलेचं ऐकायला टेनिस महासंघाची पुरुषप्रधान संस्कृती ऐकेल थोडीच. तिच्यावरील कारवाईला लिंगभेदाची किनार नकळतपणे जाणवत राहते.
नाओमी ओसाका म्हणते, तो हा तणाव म्हणजेच मानसिक आजार काय आहे, हे टेनिस महासंघाने खूप आधी समजून घ्यायला हवं होतं. नाओमीला मात्र कळलं. 2018 ची अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकल्यानंतरच नाओमीला सोशल एंग्झायटी हा आजार जाणवू लागला होता. सामन्यापूर्वी किंवा सामन्यानंतर तिला कुठेही पाहा, तिच्या कानावर नेहमी हेडफोन लावलेला असतो. ती कोणतीही स्टाइल वगैरे नाही, तर सामाजिक भीतीची तीव्रता जाणवू नये म्हणून शोधलेला तो एक उपाय होता. आता याच आजाराविरुद्ध ती लढत आहे. तिच्या एकाकी लढ्यानंतर विम्बल्डन, फ्रेंच, अमेरिकन, ऑस्ट्रेलियन ओपन या चारही ग्रँडस्लॅम स्पर्धांचे अधिकारी जमिनीवर आले. टेनिसमध्ये नियमांत सहजासहजी बदल होत नाहीत. मात्र, नाओमीमुळे या चारही ग्रँडस्लॅमच्या अधिकाऱ्यांना मानसिक आजाराशी संबंधित विषयावर स्पष्टीकरण द्यावं लागलं. जे अधिकारी तिच्या निलंबनाची धमकी देत होते, त्याच अधिकाऱ्यांना या विषयावर गंभीरपणे विचार करू, असे आश्वासन नाओमीला द्यावे लागले. यावर पुढे काय निर्णय होईल माहीत नाही. मात्र, नाओमीने अनेक खेळाडूंचा तणाव हलका केला हे नक्की.