टेबल टेनिस 2022- शरथ आणि मनिकाची चमक
टेबल टेनिस 2022- शरथ आणि मनिकाची चमक
टेबल टेनिस खेळासाठी 2022 हे वर्ष संमिश्र म्हणावे लागेल. प्रशासकीय संकटानंतरही शरथ कमल आणि मनिका बत्रा यांचं यश कौतुकास्पद म्हणायला हवं. दिग्गज खेळाडू अचंता शरथ कमल आणि मनिका बत्रा यांनी गेल्या 12 महिन्यांत टेबल टेनिस संघटनेतील प्रशासकीय संकटानंतरही चमकदार कामगिरी केली.
चाळीस वर्षीय शरथ कमल याने बर्मिंघम राष्ट्रकुल स्पर्धेच्या एकेरीत सुवर्ण पदकासह एकूण तीन सुवर्णपदके जिंकत त्याने सिद्ध केलं, की वय केवळ एक आकडा आहे. त्याने 2024 मध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेनंतर निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आता 2022 मध्येच शरथ कमल याने क्रीडा प्रशासनातही पाऊल ठेवले आहे.
शरथ कमल याला भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (IOA) ॲथलीट आयोगाच्या उपाध्यक्षपदी निवडले आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाच्या (ITTF) खेळाडूंच्या संघटनेवरही त्याची संयुक्त अध्यक्षपदी निवड झाली आहे. शरथला उशिराने का होईना, यंदा भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने से सन्मानित करण्यात आले. त्याला हा पुरस्कार पुरस्कार बर्मिंघम राष्ट्रकुल स्पर्धेतील उल्लेनीय कामगिरीसाठी प्रदान करण्यात आला. या स्पर्धेत त्याने एकेरी, सांघिक आणि 24 वर्षीय श्रिजा अकुला हिच्या साथीत मिश्र दुहेरीचे विजेतेपद जिंकले होते.
2018 मधील राष्ट्रकुल स्पर्धेत चार पदके जिंकणारी मनिका बत्रा हिच्याकडून बर्मिंघम स्पर्धेत बऱ्याच अपेक्षा होत्या. मात्र, ती अपेक्षांचं ओझं सहन करू शकली नाही. तिला या स्पर्धेतून रिकाम्या हाताने परतावे लागले. या स्पर्धेच्या तीन महिन्यांनंतर तिने बँकॉकमधील आशिया कप स्पर्धेत शानदार कामगिरी केली. दिल्लीच्या या खेळाडूने तीन दिवसांत अव्वल 10 खेळाडूंपैकी दोन खेळाडूंना पराभूत करीत कांस्य पदक जिंकले. आशिया कप स्पर्धेत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली. तसे पाहिले तर भारतीय टेबल टेनिस खेळासाठी यंदाच्या वर्षाची सुरुवात फारशी चांगली नव्हती. दिल्ली उच्च न्यायालयाने संचालनसंबंधी झालेल्या घोटाळ्यामुळे भारतीय टेबल टेनिस महासंघाला (TTFI) निलंबित केले होते. यामुळे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसह आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळाडूंच्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीने खेळाडूंच्या सरावावर त्याचा प्रभाव जाणवू दिला नाही. त्यानंतर डिसेंबरच्या सुरुवातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपवण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसमोर आता राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्याचं मोठं आव्हान असेल. प्रशासकीय समितीला महासंघाचे रोजचे कामकाज सुरू करण्याबरोबरच न्यायालयीन कारवाईलाही सामोरे जावे लागले. मानुष शहा, स्वस्तिका घोष, अर्चना कामथ आणि दिया चितळे या चार खेळाडूंनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी संघात स्थान न दिल्याने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. यात चितळे यशस्वी ठरली आणि तिला बर्मिंघमला जाणाऱ्या संघात सहभागी करण्यात आले.
टेबल टेनिस 2022 – महत्त्वाच्या घडामोडी
4 February 2022
जागतिक टेटे क्रमवारीत साथियन – मनिका 11 वे
जी. साथियन आणि मनिका बत्रा जागतिक टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरीच्या क्रमवारीत 11 व्या क्रमांकावर आले. त्यांनी चार क्रमांकाने प्रगती केली. मानव ठक्कर – अर्चना कामत 33 व्या क्रमांकावर आले. पुरुष एकेरीत साथियनने (33) शरथ कमलला (34) मागे टाकले. या दोघांव्यतिरीक्त कोणीही अव्वल शंभरमध्ये नाही. अँथनी अमलराज 103 वा आहे. मनिका बत्रा महिला एकेरीत 50 वी आहे. तिने सहा क्रमांकांनी प्रगती केली. महिला एकेरीच्या क्रमवारीत पहिल्या शंभरमध्ये केवळ मनिकालाच स्थान आहे. स्वस्तिका घोष 19 वर्षाखालील गटात नववी आहे. तिच्यासह दिया चितळे (15) आणि सुहानी सैनी (17) यांनी आपले स्थान राखले आहे. याच वयोगटात पायस जैन दुसरा आहे, तर य़शांक मलिक 22 वा. या गटात अव्वल असलेल्या जपानच्या हरीमातो तोमाकाकू याने पायसला 1745 मानांकन गुणांनी मागे टाकले.
11 Feb.
टेटे महासंघावर प्रशासक
नवी दिल्ली : भारतीय टेबल टेनिस महासंघावर प्रशासकांची नियुक्ती करण्याचा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी, 11 फेब्रुवारी 2022 रोजी दिला. मनिका बत्राच्या आरोपाने महासंघाने विश्वास गमावला आहे, अशी टिपणी करीत न्यायालयाने हा निर्णय दिला होता. मनिका बत्राने केलेल्या निकाल निश्चितीच्या आरोपाबाबत चौकशी समितीने दिलेल्या अहवालानुसार न्यायालयाने हे मत व्यक्त केले होते. ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत आपल्याला मुद्दामहून लढत गमावण्यास राष्ट्रीय प्रशिक्षकांनी सांगितले होते, असा आरोप मनिकाने दिल्ली उच्च न्यायालयात सादर केलेल्या याचिकेत केला होता. या संदर्भात दिल्ली उच्च न्यायालयातील न्यायाधीश रेखा पल्ली यांनी तीन सदस्यीय चौकशी समिती नेमली होती. या समितीने महासंघ आपल्या पदाधिकाऱ्यांचे हित जपत आहे. त्याचबरोबर खेळाडूंना प्रोत्साहित करण्याऐवजी पदाधिकारी हुकूमत गाजवत आहेत, असे म्हटले होते. `देशाने आपल्या खेळाडूंबाबत अभिमान बाळगायला हवा. जे खेळाडूंना समजून घेत नाहीत त्यांना दूरच करायला हवे, असे न्यायाधीशांनी म्हटले आहे.
न्यायालयाने नोंदवली ही निरीक्षणे
- प्रशासकाची नियुक्ती न केल्यास न्यायालयाने आपले काम केले असे नाही असेच दिसेल.
- भारतात अनेक गुणवान खेळाडू, पण पदाधिकाऱ्यांचे ऐकले नाही तर त्यांची प्रगती होणार नाही हीच सध्याची परिस्थिती
- हे सर्व तातडीने थांबवण्याची गरज. मनिका बत्राच्या आरोपाने महासंघाने विश्वास गमावला
- महासंघाचे काम पाहून आपण हादरलो आहोत
- न्यायालयाच्या आदेशाची प्रत आंतरराष्ट्रीय महासंघास सादर करण्याची सूचना
1 April
ज्येष्ठ टेबल टेनिसपटू मीना परांडे यांचे निधन
नागपूर : आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ज्येष्ठ टेबल टेनिसपटू मीना परांडे (वय 92) यांचे शुक्रवारी, 1 एप्रिल 2022 रोजी नागपुरात वृद्धपकाळाने निधन झाले. नागपूरच्चा अंबाझरी घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नागपूरमध्ये जन्मलेल्या मीना परांडे यांची खेळातील कारकीर्द पुण्यात गाजली. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे नेतृत्व केले होते. त्या आशिया खंडात तिसऱ्या मानांकित टेबल टेनिसपटू होत्या. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेले अनेक खेळाडू त्यांनी घडविले. त्या अखेरपर्यंत अविवाहित होत्या. दीर्घकाळ पुण्यात वास्तव्य केल्यानंतर सुमारे बारा वर्षांपासून परांडे या भाची अर्चना घाडगे यांच्याकडे वास्तव्यास होत्या. परांडे यांनी 1948 ते 1965 या कालावधीत टेबल टेनिसमध्ये देशांतर्गत, तसेच जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवला. राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेचे विजेतेपद चार वेळा पटकावले होते. 1954 मध्ये इंग्लमध्ये व 1956 मध्ये जपानमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धांमध्ये त्यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. ही कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील त्या पहिल्या महिला टेबल टेनिसपटू ठरल्या होत्या. सिंगापूर, बँकॉक, व्हिएतनाम, पाकिस्तान व श्रीलंका येथे आयोजित विविध स्पर्धांमध्ये त्यांचा सहभाग होता. श्रीलंका आणि पाकिस्तानमधील स्पर्धांमध्ये त्यांनी तीन वेळा विजेतेपद पटकावले होते. 1953 ते 1958 या काळात त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. 1959 ते 65 या काळात त्या भारतीय रेल्वे संघाकडून खेळल्या.
25 April
राष्ट्रीय टेटे स्पर्धेत शरथ कमल दहाव्यांदा जेता
शरथ कमलने दहाव्यांदा राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. शरथने जी. साथियनचा दोनदा पिछाडीवर पडल्यावर पाडाव करीत हे यश मिळवले. दरम्यान, श्रिजा अकुलाने पहिल्यांदा महिला एकेरीचे विजेतेपद जिंकले. तिने निर्णायक लढतीत दोन वर्षाच्या मुलाची आई असलेल्या मौमा दासचा पराभव केला. शरथने सोमवारी झालेल्या अंतिम सामन्यात 4-3 (7-11, 12-10, 9-11, 7-11, 12-10, 11-9, 11-6) असा पराभव केला, तर श्रिजाने निर्णायक लढतीत 4-1 (11-8, 11-13, 12-10, 11-8, 11-6) अशी बाजी मारली. श्रिजाने तेलंगणासाठी पहिले राष्ट्रीय विजेतेपद जिंकले.
9 June
टेबल टेनिस संघनिवडीविरुद्ध स्वस्तिकाही न्यायालयात
नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा टेबल टेनिस (टेटे) स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या फेरनिवडीत राखीव खेळाडू म्हणून स्थान देण्यात आलेल्या स्वस्तिका घोषनेही निवडीला गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले. दिया चितळे आणि मनुष शहा यांनी यापूर्वी संघनिवडीस आव्हान दिले होते. दियाची अर्चना कामतऐवजी संघात निवड झाली आहे. ही निवड करताना स्वस्तिकाची राखीव खेळाडू म्हणून निवड झाली. मनुष आणि स्वस्तिकाच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होईल. भारतीय टेबल टेनिस संघाने देशांतर्गत स्पर्धेस 50 टक्के, आंतरराष्ट्रीय स्पर्धेला 30 टक्के आणि निवड समितीच्या मतास 20 टक्के महत्व देत निवड होत असे. मात्र, प्रशासकांनी यात बदल करीत हेच प्रमाण 40-40-20 केले. मात्र, त्याच वेळी आंतरराष्ट्रीय स्पर्धात सातत्याने खेळणारे खेळाडू कमी देशांतर्गत स्पर्धा खेळण्याची शक्यता असते. यावरून संघनिवडीत वाद होतो, याकडे लक्ष वेधले जात आहे.
19 June
नाशिकची तनिषा राष्ट्रीय विजेती
मुंबई : नाशिकच्या तनिषा कोटेचाने 17 वर्षांखालील मुलींच्या राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. गेल्या दोन स्पर्धेत गुंगारा देत असलेले यश तनिषाने रविवारी मिळवले. दरम्यान, १९ वर्षांखालील मुलींच्या गटात मुंबईच्या रिषा मनचंदानीने उपविजेतेपद जिंकण्यात यश मिळवले. अलपुझा (केरळ) येथे झालेल्या या स्पर्धेत तनिषाने अंतिम लढतीत सुभंक्रिता दत्ताचा 11-6, 11-6, 11-5, 11-4 असा पराभव केला आणि विजेतेपद पटकावले. सुभंक्रिताने उपांत्य फेरीत पुण्याच्या पृथा वर्टीकरचे कडवे आव्हान 4-3 असे परतवून लावले. तत्पूर्वी, सुभंक्रिताने उपांत्यपूर्व लढतीतही 4-3 विजय मिळवला होता. तनिषाने उपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या जेनिफर व्हर्गिसवर 4-2 असा विजय मिळवला होता. सुभंक्रिता आक्रमक खेळ करून प्रतिस्पर्धीस निष्प्रभ करते, हे हेरून तनिषाने प्रशिक्षक जय मोडक यांच्या सूचनेनुसार खेळाची गती कमी केली आणि स्पिनवर भर दिला. तनिषाने सुभंक्रिताच्या खेळाची लयच बिघडवली आणि विजय सुकर केला.
6 August
मनिका-दिया अपयशी
बर्मिंगहॅम : भारताच्या मनिका बत्रा आणि दिया चितळे यांना राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील टेबल टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. उपांत्यपूर्व लढतीत अॅना हर्सी-कॅरी चार्लेट या वेल्सच्या जोडीने मनिका-दिया यांच्यावर 11-7, 11-6, 11-13, 12-10 अशी मात केली. मिश्र दुहेरीत अचंता शरथ कमल आणि अकुला श्रीजा यांनी अंतिम फेरी गाठली. त्यांनी उपांत्य लढतीत ऑस्ट्रेलियाच्या जी मिन्हयंग-नोकिलस ल्यूम यांच्यावर 11-9, 11-8, 9-11, 12-14, 11-7 अशी मात केली. अचंता शरथ कमलने पुरुष दुहेरीतून जी. साथियनची साथीत अंतिम फेरी गाठली. अचंता शरथ कमल-जी. साथियन यांनी निकोलस ल्यूम-लू फिन या ऑस्ट्रेलियन जोडीवर 8-11, 11-9, 10-12, 11-1, 11-8 अशी मात केली.
7 August
पॅरा-टेबल टेनिस- भविना पटेलला सुवर्ण
बर्मिंगहॅम : भारताच्या भविना पटेलने पॅरा-राष्ट्रकुल स्पर्धेतील पॅरा-टेबल टेनिसमध्ये महिला एकेरीच्या क्लास 3-5 मध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली. भारताची दुसरी खेळाडू सोनलबेन पटेलने ब्राँझ पदक मिळवले. 35 वर्षीय गुजरातच्या भविनाने अंतिम फेरीत नायजेरियाच्या इफेचुक्वूजे ख्रिस्टिना इकपेओकीवर 12-10, 11-2, 11-9 असा विजय मिळवला. भविनाने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले आहे. त्याचबरोबर 2013 च्या बीजिंगमधील एशियाड पॅरा- टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदक मिळवले आहे. याच स्पर्धेत 2017 मध्ये तिने ब्राँझ पदकाची कमाई केली होती. दरम्यान, याच गटात 34 वर्षीय सोनलबेन पटेलने इंग्लंडच्या सुए बेलीवर 11-5, 11-2, 11-3 अशी मात करून ब्राँझ पदकाची कमाई केली. पुरुष एकेरीच्या क्लास 3-5 मध्ये राजव अरविंदन अल्गारला ब्राँझ पदकाच्या लढतीत नायजेरियाच्या इसायू ओगुन्कुन्लेकडून 0-3 असा पराभव पत्करावा लागला.
8 August
चाळीस वर्षीय शरथ कमलचे सुवर्णयश
बर्मिंगहॅम : पुरुष सांघिक, मिश्र दुहेरीपाठोपाठ भारताच्या शरथ कमलने बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये एकेरीतही सुवर्णपदक मिळवले. ही त्याची राष्ट्रकुलमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली. एकेरीत त्याने 16 वर्षांनंतर सुवर्णपदक मिळवले. 40 वर्षीय तमिळनाडूच्या शरथ कमलने वय हा केवळ आकडा असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. पाच राष्ट्रकुलमध्ये मिळून त्याच्या नावावर आता तेरा पदके जमा झाली आहेत. पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत शरथने इंग्लंडच्या लिअॅम पिचफोर्डला 11-13, 11-7, 11-2, 11-6, 11-8 असे नमविले. याआधी शरथने 2006 च्या मेलबर्न राष्ट्रकुलमध्ये एकेरीचे सुवर्णपदक जिंकले होते. त्याआधी शरथ कमलने श्रीजा अकुलाच्या साथीने मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकले. शरथ-अकुला जोडीने अंतिम फेरीत मलेशियाच्या जॅव्हेन चूंग-कारेन लीन जोडीवर 11-4, 9-11, 11-5, 11-6 अशी मात केली. अकुलाचे हे पहिलेच राष्ट्रकुल पदक ठरले.
जी. साथियनला ब्राँझ
भारताच्या जी. साथियनने एकेरीत ब्राँझपदक मिळवले. त्याने इंग्लंडच्या पॉल ड्रिंकहॉलवर 11-9, 11-3, 11-5, 8-11, 9-11, 10-12, 11-9 असा विजय मिळवला. जी. साथियनचे हे राष्ट्रकुलमधील एकूण सहावे पदक ठरले. जी. साथियनने रविवारी (7 August 2022) शरथ कमलच्या साथीने पुरुष दुहेरीत रौप्यपदक मिळवले होते.
6 September
आशियाई ज्युनियर टेबल टेनिस स्पर्धेत सुवर्ण
यशस्विनी घोरपडे आणि पायस जैनने आशियाई टेबल टेनिस स्पर्धा इतिहासातील भारताचे पहिले सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. यशस्विनी-पायस यांनी आशियाई ज्युनिअर स्पर्धेत यश मिळवताना निर्णायक लढतीत चीनच्या जोडीला पराभूत करण्याचा पराक्रम केला. यशस्विनी-पायस जोडीने लाओसला झालेल्या आशियाई ज्युनिअर स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या विजेतेपद जिंकले. त्यांनी निर्णायक लढतीत हॅन झिनयुआन-क्विन युझयुआन यांचा 3-2 असा पराभव केला. भारतीय जोडीने विजेतेपदाच्या लढतीत 11-9, 11-1, 10-12, 7-11, 11-8 असा विजय मिळवला.
8 September
जागतिक क्रमवारीत साथियन-मनिका पाचवे
नवी दिल्ली : जी. साथियन आणि मनिका बत्रा यांनी जागतिक टेबल टेनिस क्रमवारीच्या मिश्र दुहेरीत अव्वल पाच जोड्यांत स्थान मिळवले. भारतीय जोडीने हे प्रथमच साध्य केले आहे. मनिका-साथियनने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये एकमेकांच्या साथीत मिश्र दुहेरीची लढत खेळण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी मनिका ही शरथ कमलच्या साथीत खेळत होती. आता मनिका-साथियनने एका वर्षातच प्रगती केली आहे. त्यांनी जागतिक टेबल टेनिस मालिकेतील स्लोवेनियातील स्पर्धेत उपविजेतेपद जिंकले. या यशाचा त्यांना फायदा झाला. या स्पर्धेत ते निर्णायक लढतीत दक्षिण कोरियाच्या जोडीविरुद्ध पराभूत झाले होते.
8 November
शरथ कमलची निवड
नवी दिल्ली : भारताच्या अचंता शरथ कमलची आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशनच्या (आयटीटीएफ) खेळाडूंच्या आयोगात निवड झाली असून, या आयोगावर निवड झालेला तो पहिला भारतीय ठरला. आशिया, आफ्रिका, अमेरिका, युरोप आणि ओशिनियामधून चार महिला आणि चार पुरुष खेळाडू निवडण्यात आले. ही निवड 2022 ते 2026 या चार वर्षांसाठी आहे.
17 November
पृथा वर्टीकरचे पहिले आंतरराष्ट्रीय विजेतेपद
पुण्याची पृथा वर्टीकर हिने डब्लूटीटी यूथ कन्टेंडर टेबल टेनिस स्पर्धेतील सतरा वर्षांखालील मुलींच्या गटाचे विजेतेपद पटकावले. हे पृथाचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पहिलेच जेतेपद ठरले. लेबाननमध्ये ही स्पर्धा झाली. सतरा वर्षांखालील मुलींच्या अंतिम लढतीत पृथाने हाँगकाँगच्या होइ तुंग वाँगला 3-1 असा धक्का दिला. सतरा वर्षांखालील मुलींच्या जागतिक क्रमवारीत 17 वर्षीय वाँग 31 व्या, तर 16 वर्षीय पृथा 47 व्या क्रमांकावर आहे. पहिल्या वाँगने चांगली सुरुवात केली होती. तिने पहिली गेम 11-6 अशी जिंकली होती.
19 November
आशिया कप : मनिका बत्रा हिला ब्राँझ पदक
मनिका बत्राने शनिवारी आशिया कप टेबल टेनिस स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू होण्याचा मान मिळवला. तिने जागतिक क्रमवारीत सहाव्या असलेल्या हिना हायाता हिला पराभूत करून शनिवारी हे ऐतिहासिक यश मिळवले. जागतिक क्रमवारीत 44 व्या स्थानावर असलेल्या मनिकाने तिसऱ्या क्रमांकासाठी झालेली लढत 11-6, 6-11, 11-7, 12-10, 4-11, 11-2 अशी जिंकली. या यशामुळे मनिकाला 10 हजार डॉलरचे बक्षीस देण्यात आले. मनिकाला यापूर्वी उपांत्य फेरीत द्वितीय मानांकित मिमा इटोविरुद्ध 2-3 अशा पराभवास सामोरे जावे लागले होते.
|
|
|
|
|