पहिलवानाच्या खून प्रकरणात सुशील कुमारला अटक
पहिलवानाच्या खून प्रकरणात सुशील कुमारला अटक
ऑलिम्पिकमध्ये दोन वेळा पदक जिंकणारा पहिलवान सुशील कुमार (Sushil Kumar) आणि त्याच्यासोबत असलेल्या एकाला रविवारी, 24 मे 2021 रोजी अटक (arrested) करण्यात आली. पोलिस उपायुक्त पी. एस. कुशवाह यांनी सांगितले, की सुशील कुमार (वय 38) आणि त्याचा साथीदार अजय उर्फ सुनील (48) या दोघांना मुंडका भागातून अटक केली.
Sushil Kumar arrested
सुशील कुमार गेल्या तीन आठवड्यांपासून फरार होता. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी बक्षीस जाहीर केले होते. सुशीलची (Sushil Kumar) माहिती देणाऱ्यास एक लाख, तर त्याचा साथीदार अजयची माहिती देणाऱ्यास 50 हजारांचे बक्षीस ठेवले होते. कोर्टाने सुशील कुमारला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. न्यायालयाने 30 मिनटे युक्तिवाद झाल्यानंतर सुशीलच्या पुढील चौकशीसाठी 12 दिवसांची कस्टडी मागितली होती.
मेट्रोपॉलिटन मजिस्ट्रेट दिव्या मल्होत्रा यांनी सुशीलला सहा दिवसांची पोलिस कोठडी दिली. दिल्ली पोलिसांनी सांगितले, की सुशील कुमार आणि त्याच्या इतर साथीदारांनी चार मे 2021 रोजी रात्री दिल्लीतील छत्रसाल स्टेडियम परिसरात सागर धनखड व त्याचे दोन मित्र सोनू व अमित कुमार यांना मारहाण केली. यात सागरचा मृत्यू झाला. या प्रकरणी सुशीलने 18 मेस जामीन अर्ज केला होता. मात्र, तो फेटाळण्यात आला होता.
Sushil Kumar arrested | न्यायालयाने सांगितले, की पहिलवान सुशील प्राथमिकदृष्ट्या मुख्य सूत्रधार आहे. त्याच्याविरुद्धचे आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. दिल्ली पोलिसांनी भारतीय दंड संहितेतील कलम 302 (हत्या), 308, 365 (अपहरण), 325 (गंभीर जखमी करणे), 323 (जाणीवपूर्वक जखमी करणे), 341 (गैरमार्गाने रोखणे) आणि 506 (धमकी देणे) यानुसार गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 188 (लोकसेवकाच्या आदेशाचे उल्लंघन), 269 (बेजबाबदारपणे करोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता), 120-बी (गुन्ह्याचा कट) आणि 34 (सामूहिक कट) तसेच अवैधरीत्या शस्त्र बाळगल्याचे इतर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.
गुन्हे शाखेकडे सोपवणार प्रकरण
दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये २३ वर्षीय पहिलवानाच्या खून प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. पहिलवान सुशील कुमार (वय 37) आणि त्याचा सहकारी अजय याला दिल्लीतील मुंडका भागातून अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितले, की तूर्तास या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. उत्तर-पश्चिम जिल्हा पोलिसांनी गुन्हे शाखेकडे हे प्ररकण सोपवले आहे.
उत्तर रेल्वेतून सुशीलचे होणार निलंबन
पहिलवान सुशील कुमार खून प्रकरणात अडकल्यानंतर त्याच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. दिल्ली पोलिसांनी सुशील कुमारला अटक Sushil Kumar arrested | केल्यानंतर आता त्याला उत्तर रेल्वेनेही त्याच्याविरुद्ध पाऊल उचलले आहे. त्याला नोकरीतून निलंबित करण्यात येणार आहे. ऑलिम्पिक पदकप्राप्त सुशील कुमार उत्तर रेल्वेत वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक आहे. शालेय स्तरावर क्रीडा विकासासाठी त्याला 2015 पासून छत्रसाल स्टेडियमच्या विशेष कार्याधिकारी (ओएसडी) पदावर नियुक्त करण्यात आले होते. ही त्याची प्रतिनियुक्तीवर बदली होती. उत्तर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की 2020 मध्ये सुशील कुमारच्या प्रतिनियुक्तीचा कालावधी वाढवला होता. त्याने 2021 मध्येही सेवा विस्तारासाठी अर्ज केला होता. मात्र, दिल्ली सरकारने त्याचा फेटाळत तो अर्ज मूळ उत्तर रेल्वेत रवाना केला. छत्रसाल स्टेडियममध्ये 23 वर्षीय पहिलवानाच्या खून प्रकरणी सुशीलला दिल्लीतील मुंडका भागातून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तो तीन आठवड्यांपासून फरार होता. उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी दीपक कुमार यांनी सांगितले, ‘‘या प्रकरणी रेल्वे बोर्डाला दिल्ली सरकारकडून रविवारी अहवाल मिळाला. सुशील कुमारविरुद्ध गुन्हा दाखल असल्याने त्याला निलंबित करण्यात येणार आहे.’’ त्याच्या निलंबनाचे अधिकृत आदेश लवकरच प्राप्त होणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. जर कोणी सरकारी सरकारी अधिकारी गंभीर गुन्ह्यात आरोपी असेल, तर त्याच्यावर खटला चालेपर्यंत निलंबित केले जाते, हा सरकारी नियम आहे.
One Comment