सुशांतने असा साकारला धोनी…
‘एम. एस. धोनी ः दि अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट शंभर कोटीच्या क्लबमध्ये जाऊन पोहोचला तो सुशांतसिंह राजपूतच्या sushant singh rajput | उत्तम अभिनयानेच. मात्र, त्यामागे जी मेहनत सुशांतने घेतली, त्यावरून तो किती अभ्यासू कलाकार आहे, याचा प्रत्यय येतो. महेंद्रसिंह धोनीचा जीवलग मित्र व त्याच्या जीवनावर बेतलेल्या या चित्रपटाचा सहनिर्माता अरुण पांडे यांनी सुशांतच्या काही आठवणी शेअर केल्या, ज्या विस्मरणात जाणे शक्य नाहीत…
एक दिग्गज क्रिकेटपटू पडद्यावर साकारणे प्रचंड आव्हानात्मक होते. नाही म्हंटलं, तरी सुशांत अन्य अभिनेत्यांसारखा चित्रपटसृष्टीत फारसा मुरलेला नव्हता. त्यामुळे धोनीची भूमिका साकारण्याचा त्याच्यावर दबाव होता. मात्र, या अभिनेत्याने अशी काही भूमिका साकारली, जिला तोड नाही. सुशांतने धोनी साकारण्यासाठी माजी यष्टिरक्षक किरण मोरेसोबत नऊ महिन्यांचं प्रशिक्षण घेतलं, एवढंच नाही, तर धोनीचा ट्रेडमार्क ठरलेला हेलिकॉप्टर शिकण्यासाठीही जीवतोड मेहनत घेतली. पडद्यावर त्याची ही मेहनत स्पष्टपणे दिसत होती..
सुरुवातीला सुशांतलाच वाटत नव्हतं, की आपण धोनीला मोठ्या पडद्यावर हुबेहूब वठवू शकू किंवा नाही. ज्या वेळी 2016 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर तणावाच्या खुणा स्पष्टपणे जाणवत होत्या.
माहीच्या चाहत्यांचा दबाव
तो पांडे यांना सारखा म्हणायचा, मी चांगलंच करण्याचा प्रयत्न करीन, नाही तर माहीचे लाखो चाहते मला माफ करणार नाही. एके दिवशी हेलिकॉप्टर शॉटचा सराव करताना त्याच्या मांसपेशी ताणल्याने त्याला वेदना झाल्या. सगळ्यांना वाटलं, की तो महिनाभर विश्रांती घेईल. पण तसे काही झाले नाही. तो म्हणाला, ‘माझ्यामुळे कोणताही उशीर व्हायला नको’ आणि आठवडाभरात त्या शॉटचा सराव करून तो चित्रीकरणासाठी परतलाही. या दरम्यान त्याने धोनीला किती तरी प्रश्न विचारले. दोघेही बिहारचेच. त्यामुळे दोघांमध्ये संवाद उत्तम होता.
एकदा धोनी, पांडेसह सुशांत धोनीच्या दिल्लीतील एअर इंडिया कॉलनीतील घरी गेले होते. धोनी त्याला आपण कुठे बसायचो, कुठे जेवण करायचो याची माहिती देत होता. सुशांत केवळ ऐकत नव्हता, तर तोही तशीच नक्कल करायचा. घरात अशीही एक जागा होती, जेथे तो जमिनीवर लोळायचा, तर सुशांतही तसाच लोळण्याचा प्रयत्न करायचा. सुशांत धोनीच्या भूमिकेत समरस झाला होता, की धोनीसारख्या व्यक्तीची भूमिका वठवणे हे स्वतःचं भाग्य समजायचा.
सुशांतच्या हेलिकॉप्टर शॉटने धोनीही चकित झाला…
एक उत्तम यष्टिरक्षक आणि तितकाच उत्तुंग फलंदाज असलेल्या महेंद्रसिंह धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटने क्रिकेटप्रेमींना अक्षरशः वेड लावलं. मात्र, जेव्हा सुशांतने हा शॉट उत्तम पद्धतीने साकारला, तेव्हा धोनीही चकित झाला होत. ‘एम. एस. धोनी : दि अनटोल्ड स्टोरी’मध्ये सुशांतने धोनी उत्तम वठवला होता. यात भलेही इरफान खानच्या ‘पान सिंह तोमर’सारखी चित्रपटाला साजेशी जादू नसेल, पण ज्या ताकदीने सुशांतने ही भूमिका वठवली, तिचे तोंडभरून कौतुक झाले.
चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी धोनीने एका मुलाखतीत सांगितले होते, की सुशांतने sushant singh rajput | अगदी हुबेहूब माझ्या शैलीत हेलिकॉप्टर शॉट खेळला आहे. हे सांगताना धोनी गमतीने म्हणाला, आता तो आरामात रणजी सामना खेळू शकतो. धोनीला त्याचा हेलिकॉप्टर शॉट इतका आवडला, की तो म्हणाला, ‘‘तो अगदी माझ्यासारखाच हेलिकॉप्टर शॉट खेळला. शूटिंगच्या वेळी सराव करताना तर तो अनेकदा हा शॉट माझ्यापेक्षा उत्तम खेळत होता.’’
हेही वाचा… The Untold Story
सुशांत एकदा म्हणाला होता, की जेव्हा मी क्रिकेट खेळत होतो, तेव्हा कोणीही विचार केला नव्हता, की बिहार-झारखंडचा एखादा मुलगा भारतीय संघात खेळेल.
सुशांत म्हणाला होता, “मी पहिल्यांदा माहीला २००४ मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळताना पाहिलं होतं. त्या वेळी त्याचे केस लांब होते. करिअरच्या सुरुवातीलाच त्याचा आत्मविश्वास कमालीचा होता. एक सामन्यात त्याने 148 धावांची शतकी खेळी रचली होती. या सामन्यानंतर मी त्याचा चाहता झालो. मला पहिल्यांदा धोनीला भेटण्याची संधीही 2006-07 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यादरम्यानच मिळाली होती. त्या वेळी मी त्याच्यासोबत एक फोटोही काढला होता.’’ धोनीच नाही, तर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागचाही सुशांत निस्सीम चाहता होता.
सुशांत म्हणाला होता, की ‘‘मी तेंडुलकर आणि सेहवागचा चाहता असलो तरी धोनी मला नेहमीच जवळचा वाटला. कारण एका छोट्याशा शहरातून त्याने तरुणांमध्ये स्वप्न साकारण्याची उमेद जागवली होती.’’
सुशांतच्या आत्महत्येने किरण मोरेंना धक्का
धोनीची भूमिका साकारण्यासाठी सुशांतने भारतीय संघाचा माजी यष्टिरक्षक किरण मोरे यांच्याकडून प्रशिक्षण घेतले होते. त्यामुळे त्यांच्यात उत्तम मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले होते. मात्र, अचानक सुशांतच्या आत्महत्येचे वृत्त धडकल्यानंतर किरण मोरेंना धक्काच बसला. त्यांनी ट्विट केले, ‘‘या घटनेने मला धक्का बसला आहे. धोनीच्या भूमिकेसाठी त्याने माझ्याकडे यष्टिरक्षणाचे प्रशिक्षण घेतले होते. मला माहीत नाही, की त्याला ओळखणारे या धक्क्यातून कसे सावरतील? तू लवकर गेलास, मित्रा’’
किरण मोरे सुशांतची मेहनत पाहून कमालीचे प्रभावित झाले होते. किरण मोरेही म्हणाले होते, सुशांत sushant singh rajput | हेलिकॉप्टर शॉट खेळण्यात धोनीइतकाच वाकबगार आहे. ते म्हणाले, “मला वाटतं, धोनीनंतर जर कोणी उत्तम प्रकारे हेलिकॉप्टर शॉट खेळू शकत असेल तर तो सुशांतच आहे. सुशांतसमोर कोणत्याही क्रिकेटपटूला उभं करा. मला खात्री आहे, की सुशांतपेक्षा उत्तम हेलिकॉप्टर शॉट कोणीही खेळू शकणार नाही. कोणत्याही अभिनेत्याला मुरब्बी क्रिकेटपटूचे कौशल्य आत्मसात करणे अतिशय कठीण आहे. मात्र सुशांतच्या मेहनत आणि निष्ठेसमोर या कठीण अडचणीही खुज्या ठरल्या. यष्टिरक्षण शिकणं ही खूप वेगळी बाब आहे. अनेकदा त्याच्या हातांना, दंडाला आणि मांडीला चेंडू लागला. तरीही तो खेळण्यासाठी सज्ज असायचा. एक शानदार प्रवास अपूर्ण राहिला.”
आपल्या चित्रपट प्रवासात सुशांतचं क्रिकेटशी नातंही तसं जुनंच आहे. मोठ्या पडद्यावरील त्याची सुरुवातही क्रिकेटपटूच्या भूमिकेतूनच झाली होती. चेतन भगत यांच्या ‘थ्री मिस्टेक ऑफ माय लाइफ’ या पुस्तकावर आधारित एक चित्रपट आला होता. ‘काई पो चे’ हे त्या चित्रपटाचं नाव. त्यात सुशांतने क्रिकेटपटू आणि प्रशिक्षकाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्याने जे पात्र साकारलं होतं, त्याचं नाव होतं इशान. अभिषेक कपूर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अली नावाचं एक पात्र होतं, ज्याला सुशांत प्रशिक्षकाच्या भूमिकेत मार्गदर्शन करीत होता. हे अली नावाचं पात्र साकारलं होतं दिग्विजय देशमुखने. दिग्विजयला तर विश्वासच बसत नाही, की ज्याने आपल्या प्रशिक्षकाची भूमिका साकारली ते आता या जगातच नाहीत! दिग्विजयचा कंठ दाटून आला होता. दिग्विजय आता व्यावसायिक क्रिकेटपटू झाला आहे. तो आता मुंबई इंडियन्स संघात आहे. तो म्हणाला, ‘‘सुशांतभाई सर्वांत चांगला माणूस होता. ‘काई पो चे’मध्ये ते माझे प्रशिक्षक होते. तुमचा विश्वास बसणार नाही, पण ते खरोखर उत्तम क्रिकेटपटूही होते.’’
सुशांतभाईंनी मला एकदा विचारलं होतं, की मोठा झाल्यानंतर काय होशील?
मी म्हणालो, ‘‘क्रिकेटपटू. मी जेव्हा क्रिकेटमध्ये काही तरी करून दाखवेन तेव्हाच तुम्हाला भेटेन.
आयपीएलच्या लिलावात अभिषेकला मुंबई इंडियन्सने संघात घेतले. आता तो मुंबईतच आहे. त्याने विचार केला होता, की जाऊन भेटावं सुशांतभाईंना. पण आता ते शक्य नाही.
क्रीडाविश्व स्तब्ध
‘‘सुशांत, तू तर म्हणाला होतास, की आपण सोबत टेनिस खेळू. तू किती हरहुन्नरी आणि मनमौजी होतास! जिथे जायचा तिथे हास्य फुलवायचास. आम्हाला माहीत नव्हतं, की तू इतका अस्वस्थ असशील! संपूर्ण विश्वाला तुझी उणीव भासत राहील. हे लिहितानाही माझे हात थरथरत आहेत. माझ्या मित्रा, तुझ्या आत्म्याला शांती लाभो.’’
– सानिया मिर्झा, भारतीय टेनिसपटू
‘‘मानसिक स्वास्थ्य खूपच गंभीर मुद्दा आहे आणि याकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज आहे. संवेदनशील, मृदू, दयाळू व्हावं आणि जे अडचणींचा सामना करीत आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचणे आता महत्त्वाचे आहे.’’
– व्हीव्हीएस लक्ष्मण, माजी क्रिकेटपटू
‘‘आयुष्य अतिशय नाजूक आहे. आपल्याला माहीत नाही, की कोण कशा प्रकारे, कोणत्या प्रसंगातून जात आहे. दयाळू राहा. ओम शांती सुशांतसिंह राजपूत.’’
– वीरेंद्र सेहवाग, माजी सलामी फलंदाज
‘‘खूप लवकर गेलास. स्तब्ध झाले. अशा तरुण प्रतिभावान अभिनेत्याचं जाणं अत्यंत दुःखद आहे. ‘ऑन स्क्रीन’ धोनी, तुझी उणीव भासत राहील.’’
– साईना नेहवाल, भारतीय बॅडमिंटनपटू
‘‘चिंतित आहे. किती उत्तम अभिनेता! खूप लवकर गेलास. आपण जाणू शकत नाही, की त्याच्या मनात काय चाललं आहे?’’
– वेदा कृष्णमूर्ती, भारतीय महिला क्रिकेटपटू
‘‘विश्वास नाही ठेवू शकत. किती तरुण आणि यशस्वी व्यक्ती!! आपण खरंच अनभिज्ञ असतो, की एखाद्या व्यक्तीच्या मनात नेमकं काय चाललं आहे. बाहेरून मात्र वेगळाच दिसतो.’’
– युवराजसिंग, माजी क्रिकेटपटू
‘‘सुशांतसिंह राजपूतचं वृत्त ऐकून प्रचंड धक्का बसला. तो अतिशय हरहुन्नरी होता. चर्चा करण्यासाठी तो शानदार व्यक्ती होता, त्याची निष्ठा अद्भुत होती. अशा प्रकारे त्याने जायला नको होतं.’’
– राज्यवर्धनसिंह राठोड, माजी क्रीडामंत्री
‘‘सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येबाबत ऐकल्याने धक्काच बसला. हे स्वीकारणं खूपच कठीण आहे. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो…त्यांच्या मित्रपरिवाराला या धक्क्यातून सावरण्याचं बळ देवो.’’
– विराट कोहली, कर्णधार, भारतीय क्रिकेट संघ
‘‘सुशांतसिंह राजपूतच्या जाण्याने दुःख झालं आहे. तरुण आणि प्रतिभावान अभिनेता. त्यांच्या मित्रपरिवाराला माझ्या सहवेदना.’’
– सचिन तेंडुलकर
‘‘सुशांतसिंह राजपूत यांच्या अचानक जाण्याने मी स्तब्धच झालो.’’
– रवी शास्त्री, प्रशिक्षक, भारतीय क्रिकेट संघ
‘‘कृपया कुणी तरी सांगावे, ही ‘फेक’ न्यूज आहे. सुशांत राजपूत गेला यावर विश्वासच बसत नाही.’’
– हरभजनसिंग, माजी फिरकी गोलंदाज
One Comment