शेन वॉर्न – जादूई फिरकीचा बादशाह
सत्तरच्या दशकातील रोड मार्श यांच्या निधनाचा धक्का पचवत नाही तोच क्रिकेटविश्वाला दुसरा धक्का बसला. तो म्हणजे 90 च्या दशकातील फिरकीचा जादूगार शेन वॉर्न याच्या निधनाचा. आपल्या फिरकीने भल्या भल्या फलंदाजांना कोंडीत पकडणारा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्न याचे 4 मार्च 2022 रोजी थायलंडमधील समुई येथे निधन झाले. वयाच्या 52 व्या वर्षी शेन वॉर्न याने आपल्या बंगल्यात अखेरचा श्वास घेतला. ही बातमी धडकली तेव्हा कोणाचाही विश्वासच बसला नाही. मात्र, ते एक कटू सत्य होतं.
[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=Q45BfqWmS_A” column_width=”4″]आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वकालीन महान खेळाडूंच्या यादीत शेन वॉर्न याचंही एक नाव कायम स्मरणात राहील. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1992 मध्ये पाऊल ठेवलं. त्याचा लेग स्पिन अफलातूनच. खेळपट्टी कशीही असो, शेन वॉर्न जर समोर असेल तर फलंदाजाचं काही खरं नाही. असा दरारा फार कमी खेळाडूंमध्ये पाहायला मिळतो. शेन वॉर्न त्यापैकीच एक. कारकिर्दीत त्याने 145 कसोटी सामने खेळले आणि तब्बल 708 विकेट घेतल्या. त्याची वनडे कारकीर्दही तेवढीच समृद्ध. कारकिर्दीत 194 वनडे सामने खेळताना त्यानेे 293 विकेट घेतल्या. आयपीएलचे पहिले सत्रही शेन वॉर्न यानेच गाजवलं असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे आयपीएलच्या 2008 च्या मोसमात त्याने राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व केलं आणि विजेतेपदही संघाला मिळवून दिलं.
फिरकी गोलंदाज श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन (800 विकेट) याच्यानंतर सर्वाधिक विकेट घेणारा वॉर्न जगातला दुसरा फिरकी गोलंदाज होता. क्रिकेटविश्वातील या दोन फिरकी गोलंदाजांच्या सन्मानार्थ क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका क्रिकेटने 2007 मध्ये या दोन्ही देशांदरम्यान कसोटी मालिका सुरू केली. या मालिकेचे नाव आहे वॉर्न मुरलीधरन ट्रॉफी.
भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये शेन वॉर्न कायम लक्षात राहील. विशेषतः सचिन तेंडुलकर विरुद्ध वॉर्न हे द्वंद्व क्रिकेटप्रेमी डोळ्यांत प्राण आणून पाहायचे. भारताविरुद्ध तो पहिला सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला. त्याच्या 1992 ते 2007 दरम्यानच्या क्रिकेट कारकिर्दीतील अतुल्य कामगिरीची नोंद विज्डेन मासिकानेही घेतली. विज्डेन मासिकाने शतकातील पाच क्रिकेटपटूंपैकी शेन वॉर्न याचा समावेश केला. त्याला 2013 मध्ये आयसीसी हॉल ऑफ फेममध्येही समाविष्ट करण्यात आले.
ऑस्ट्रेलियाने 1999 विश्वकरंडक जिंकला. या संघात वॉर्न होता. याच वॉर्नने अॅशेस क्रिकेटमध्ये सर्वाधिक 195 विकेट घेतल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर शेन वॉर्न आयपीएलच्या राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार झाला. नंतर याच संघाचा प्रशिक्षकही झाला. शेन वॉर्न याची कारकीर्द मैदानात आणि मैदानाबाहेरही या ना त्या कारणाने चर्चेत राहिली. तो उत्तम गोलंदाज, प्रशिक्षक होताच, शिवाय उत्तम समालोचकही होता.
सकाळी मार्श यांना श्रद्धांजली आणि…
70 च्या दशकातील महान यष्टिरक्षक रोड मार्श यांचे 4 मार्च 2022 रोजी सकाळी निधन झाले. वॉर्न यांनी सकाळी त्यांना ट्विटरवर श्रद्धांजली वाहिली. त्यांनी म्हंटले, ‘‘ रोड मार्श यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दुःखी झालो. ते आमच्या अनेक युवा क्रिकेटपटूंचे प्रेरणास्रोत होते. त्यांनी क्रिकेटला विशेषतऋ ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड क्रिकेटला बरंच काही दिलं. रेस्ट इन पीस दोस्त.’’ त्याच्या काही तासांतच सायंकाळी वॉर्न यांनीही जगाचा निरोप घेतला.
शेन वॉर्नची कसोटी कारकीर्द
145 | 798 | 8-71 |
कसोटी सामने | एकूण विकेट | सर्वोत्तम कामगिरी |
वनडे कारकीर्द
194 | 293 | 5-33 |
वन-डे सामने | एकूण विकेट | सर्वोत्तम कामगिरी |
प्रथमश्रेणी कारकीर्द
301 | 1,319 | 8-71 |
प्रथम श्रेणी सामने | एकूण विकेट | सर्वोत्तम कामगिरी |
शेन वॉर्नचा प्रवास
शेन वॉर्नचा जन्म 13 सप्टेंबर 1969 रोजी व्हिक्टोरियात झाला. शाळेत असतानाच वॉर्नला क्रीडा शिष्यवृत्ती मिळाली होती. विविध क्लबकडून खेळत असताना क्रिकेटचे सामने नसले की तो फुटबॉलही खेळत होता. सेंट किल्दा फुटबॉल क्लबकडून तो अंडर-19 गटात फुटबॉल खेळला आहे. वयाच्या 22व्या वर्षी त्याने व्हिक्टोरिया संघाकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ऑस्ट्रेलिया ‘ब’ संघाकडून त्याने 1991 मध्ये झिम्बाब्वे दौरा केला. या कामगिरीच्या जोरावर त्याची ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघात वर्णी लागली. 1992 मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. त्या वेळी पहिल्या दोन कसोटींत पीटर टेलर यांना फारशी चमक दाखवता आली नाही, तेव्हा तिसऱ्या लढतीत वॉर्नला अॅलन बॉर्डर यांच्या नेतृत्वाखाली कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. कसोटी पर्दापणापूर्वी तो केवळ सात प्रथम श्रेणी सामने खेळला होता. अर्थात, भारताविरुद्ध त्याचे कसोटी पदार्पण काही साजेसे झाले नाही. भारताविरुद्ध दोन कसोटींत केवळ एकच विकेट घेता आल्याने मालिकेतील पाचव्या कसोटीतून त्याला वगळण्यात आले होते. 1992 मध्ये त्याच्या कामगिरीत चढ-उतार बघायला मिळाले. मात्र, 1993 च्या इंग्लंडविरुद्धच्या अॅशेस मालिकेत त्याने सहा कसोटींत 34 विकेट घेऊन आपला ठसा उमटविला. यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. एक-एक मैलाचा दगड पार करून तो नवनवीन विक्रम रचत गेला. कारकिर्दीत त्याला श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनशी नेहमीच स्पर्धा करावी लागली. 2003 मध्ये वर्ल्ड कपपूर्वीच डोपिंगमध्ये दोषी आढळल्याने त्याला एका वर्षाच्या बंदीला सामोरे जावे लागले होते. 2006 मध्ये त्याने निवृत्तीची घोषणा केली आणि जानेवारी 2007मध्ये इंग्लंडविरुद्ध निरोपाचा सामना खेळून त्याने कसोटीला गुडबाय केले.
शेन वॉर्नची कारकीर्द
प्रकार | सामने | विकेट | सर्वोत्तम | इकॉ. |
कसोटी | 145 | 798 | 8-71 | 2.65 |
वन-डे | 194 | 293 | 5-33 | 4.25 |
प्रथम श्रेणी | 301 | 1,319 | 8-71 | 2.76 |
शेन वॉर्नचे विक्रम
3 वॉर्नने कसोटीत सतरा वेळा सामनावीर पुरस्कार मिळवला आहे. कसोटीत सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.
1 वॉर्नने कसोटीत 3154 धावाही केल्या आहेत. कसोटी कारकिर्दीत शतकाशिवाय सर्वाधिक धावा करणारा तो पहिला फलंदाज आहे.
5 कसोटी कारकिर्दीत वॉर्न 34 वेळा शून्यावर बाद झाला आहे. कसोटीत सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो पाचव्या क्रमांकावर आहे.
96 वॉर्नने एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक 96 विकेट मिळविण्याचा विक्रम रचला आहे.
10 वॉर्नने कारकिर्दीत कसोटीत दोन्ही डावांत मिळून दहा विकेट घेण्याची कामगिरी दहा वेळा केली आहे. अशी कामगिरी करणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.
40,705 कसोटीत सर्वाधिक चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत वॉर्न तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 40 हजार 705 चेंडू टाकले होते.
36 कसोटीत यष्टिचीतद्वारे सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत वॉर्न 36 विकेटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
1,001 शेन वॉर्नच्या आंतरराष्ट्रीय विकेट. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक हजारांहून अधिक विकेट घेणारा तो मुथय्या मुरलीधरननंतरचा (1347) दुसरा गोलंदाज ठरला.
708 शेन वॉर्नच्या कसोटीतील विकेट. कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा तो मुथय्या मुरलीधरननंतर (800) दुसरा गोलंदाज आहे. कसोटीत 600 आणि 700 विकेटचा टप्पा गाठणारा तो पहिलाच गोलंदाज आहे.
37 वॉर्नने कसोटीत डावात पाच विकेट घेण्याची कामगिरी 37 वेळा केली आहे. या यादीतही तो मुथय्या मुरलीधरननंतर (67) दुसऱ्या क्रमांकावर आहे.
21 कसोटीत स्वत:च्या गोलंदाजीवर प्रतिस्पर्धी फलंदाजांना झेलबाद करण्याची कामगिरी वॉर्नने 21वेळा केली आहे. या विक्रमाच्या यादीत तो डॅनिएल व्हिटोरीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
1,761 कसोटी वॉर्नने 1761 षटके निर्धाव टाकली आहेत. या विक्रमात तो मुरलीधरननंतर (1794) दुसऱ्या क्रमांकावर आहे.
195 वॉर्नने अॅशेसमध्ये सर्वाधिक 195 विकेट घेतल्या आहेत. त्या खालोखाल ग्लेन मॅकग्राचा (157) क्रमांक लागतो. कसोटीत एका संघाविरुद्ध सर्वाधिक 195 विकेट घेणारा तो पहिलाच गोलंदाज आहे.
138 कसोटीत चौथ्या डावात वॉर्नने 138 विकेट घेतल्या आहेत. या विक्रमात त्याने मुरलीधरनलाही (106) मागे टाकले आहे.
102 वॉर्नने 102 वेळा प्रतिस्पर्धी फलंदाजांना शून्यावर बाद केले आहे. या कामगिरीत त्याने मुरलीधरनसह बरोबरी केली आहे.
291 वॉर्नने वन-डेत 291 विकेट घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून वन-डेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो मॅकग्रा (380), ब्रेट लीनंतर (280) तिसऱ्या क्रमांकावर आहे.
वॉर्नची कसोटी कामगिरी
विरुद्ध | कसोटी | विकेट |
बांगलादेश | 2 | 11 |
इंग्लंड | 36 | 195 |
वर्ल्ड इलेव्हन | 1 | 6 |
भारत | 14 | 43 |
न्यूझीलंड | 20 | 103 |
पाकिस्तान | 15 | 90 |
द. आफ्रिका | 24 | 130 |
श्रीलंका | 13 | 59 |
विंडीज | 19 | 65 |
झिम्बाब्वे | 1 | 6 |
कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज
खेळाडू | सामने | विकेट | सर्वोत्तम | इकॉ. |
मुरलीधरन (श्रीलंका) | 133 | 800 | 9-51 | 2.47 |
शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) | 145 | 708 | 8-71 | 2.65 |
अँडरसन (इंग्लंड) | 169 | 640 | 7-42 | 2.80 |
स्तब्ध… वॉर्नी मित्रा तुझी पोकळी कायम जाणवेल. क्षण मैदानातील असो वा मैदानाच्या बाहेरचा, तुझी सोबत कायमच भावली. मैदानावर तू माझा कडवा प्रतिस्पर्धी होतास, पण मैदानाबाहेरील तुझे हास्यविनोद कायम लक्षात राहतील. तुझ्या मनात भारताविषयी कायमच आदर होता. अन् भारतीयांनीही तुला हृदयात स्थान दिले. खूप लवकर सोडून गेलास रे…
– सचिन तेंडुलकर, माजी कसोटीपटू, भारत |
मी खरोखरच आज निशब्द झालो आहे. खूप दुःखद दिवस… क्रिकेट या खेळाने आज आपला चॅम्पियन गमावला आहे. शेन वॉर्न आपल्याला सोडून गेला आहे, मला विश्वासच बसत नाही…
– रोहित शर्मा, भारताचा कर्णधार |
जीवन हे किती किती अस्थीर आणि अप्रत्याशीत आहे नै… एक असा महान खेळाडू ज्याला मी मैदानाबाहेरही ओळखत होतो, तो आपल्या सगळ्यांना सोडून गेला आहे, यावर विश्वासच बसत नाही. क्रिकेटच्या चेंडूला खऱ्या अर्थाने वळण देणारा महान खेळाडू… सर्वकालीन महान खेळाडू…
– विराट कोहली, कसोटीपटू, भारत |
जागतिक क्रिकेटसाठी आज सर्वात दुःखद दिन आहे. आधी या खेळाने रॉडनी मार्श आणि आता शेन वॉर्नला गमावले. वॉर्न तू खूप लवकर गेलास. तुझी पोकळी जाणवेल.
– युवराज सिंग, माजी अष्टपैलू, भारत |
शेन वॉर्न म्हणजे क्रिकेटच्या उपजत गुणवत्तेला, दिमाखाची जोड. या माणसाने गोलंदाजीला जणू जादूचेच रूप दिले होते.
– गौतम गंभीर, माजी कसोटीपटू, भारत |
फिरकी गोलंदाजीला खऱ्या अर्थाने ‘कूल’ बनविणारा जागतिक क्रिकेटमधील महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्न आपल्याला कायमचा सोडून गेला. होय, आयुष्य थोडं नाजूकच आहे, पण शेन वॉर्न गेला आहे, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.
– वीरेंदर सेहवाग, माजी कसोटीपटू, भारत |
आज क्रिकेटने लेग स्पिन गोलंदाजीचे विद्यापीठच गमावले आहे. माझ्या अगदी कारकिर्दीच्या सुरुवातीपासून शेन वॉर्न यांच्या गोलंदाजीचा मी फॅन होतो. त्यांच्या गोलंदाजीचा सामना करणे म्हणजे खास गोष्ट वाटे.
– शाहिद आफ्रिदी, माजी कसोटीपटू, पाकिस्तान |
वॉर्न 708 कसोटी विकेट
115 विकेट | 345 विकेट | 73 विकेट | 139 विकेट | 36 विकेट |
त्रिफळाबाद | झेलबाद | यष्टिमागे झेल | पायचीत | यष्टिचीत |
मानसिक खच्चीकरणासाठी क्रिकेट विश्वातील स्लेजिंग!
[jnews_block_27 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”65″ sort_by=”random”]