सुशील कुमार आणि योगेश्वरच्या पदकांनी मला प्रेरणा मिळाली

ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती पहिलवान (Wrestler) साक्षी मलिकने (Sakshi Malik) आपला कुस्ती प्रवास उलगडला. ती म्हणाली, की सुशील कुमार आणि योगेश्वर दत्त यांनी 2016 मधील रियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर मलाही जिंकण्याची प्रेरणा मिळाली. साक्षीने रियो ऑलिम्पिकच्या कुस्ती स्पर्धेत 58 किलोग्रॅमच्या रेपाशेजमध्ये कांस्यपदक जिंकले होते. तिने किर्गिझस्तानच्या ऐसुलू ताइनबेकोवाचा 8-5 असा पराभव केला होता. 0-5 अशा पिछाडीनंतर तिने यशस्वी पुनरागमन करीत ऐसुलूवर 8-5 असा विजय मिळवला होता.
मला ऑलिम्पिकचे फारसे महत्त्व माहीत नव्हते. मात्र, दोन वेळा ऑलिम्पिक पदक मिळविणारा सुशील कुमार आणि लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणारा योगेश्वर दत्त यांच्यामुळे मला ऑलिम्पिकचं महत्त्व कळलं, असं साक्षी म्हणाली.
हेही वाचा… खेलरत्नप्राप्त साक्षीचा अर्जुन पुरस्कारावर दावा…
‘‘मी बालपणापासून कुस्ती खेळत आहे. मात्र, मला ऑलिम्पिक, राष्ट्रकुल स्पर्धा, आशियाई स्पर्धांविषयी फारशी माहिती नव्हती,’’ असं साक्षी म्हणते. कुस्ती सत्रावरील ई-स्कूलमध्ये साक्षीने सांगितले, ‘‘कुस्तीमध्ये आल्यानंतर आणि ज्युनिअर गटात पदके मिळविल्यानंतर माझी या स्पर्धांविषयी उत्सुकता चाळवली. नंतर सुशील कुमार आणि योगेश्वर दत्त यांनी ऑलिम्पिकसह मोठ्या स्पर्धांमध्ये पदके जिंकण्याचा धडाका सुरू केल्याने मलाही या स्पर्धा जिंकण्याची प्रेरणा मिळाली.’’ विजय मिळविल्यानंतरच्या भावना शब्दातीत आहेत, हे सांगताना ती म्हणाली, ‘‘जेव्हा मी कांस्यपदकाच्या स्पर्धेत आले तेव्हा ही संधी मला गमवायची नव्हती. माझे प्रशिक्षक (कुलदीप मलिक) म्हणत होते, की तू तुझ्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा उत्तम आहे. मात्र, ती आव्हानात्मक लढत होती. विजयानंतर मी काय अनुभवत होते, हे मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. मला समजत नव्हतं, की मी हसायचं, स्मित करायचं की रडायचं?’’ साक्षी म्हणाली, ‘‘माझ्या प्रशिक्षकांनी सांगितले, की या पदकानंतर तुझं आयुष्य बदलणार आहे; पण या आठवणी कायम तुझ्या सोबत करतील.’’
4 Comments