Coronavirus : 124 वर्षांत प्रथमच ऑलिम्पिक स्थगित
Your Content Goes Here
Coronavirus : 124 वर्षांत प्रथमच ऑलिम्पिक स्थगित
ऑलिम्पिक म्हणजे सर्वोत्तम खेळाडूंची परीक्षा. क्रीडाकुंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑलिम्पिकला हजारो वर्षांचा प्राचीन इतिहास आहे. प्राचीन युनानमधून सुरू झालेल्या या क्रीडाकुंभाने आधुनिक युगातही प्रतिष्ठा जपली आहे.
जगभरातील खेळाडू या एका स्पर्धेसाठी आपलं सर्वस्व पणाला लावत असतात. यंदाच्या ऑलिम्पिकचे यजमान होते जपान. ज्या देशाने अणुबॉम्बपासून भूकंपापर्यंत अनेक संकटे झेलली, त्या जपानला करोना विषाणूच्या कचाट्यातही टोकियो ऑलिम्पिक यशस्वी करायची होती.
मात्र, या वेळचं संकट फक्त जपानपुरतं मर्यादित नव्हतं तर संपूर्ण विश्वच या संकटाने हतबल झालं आहे. हे संकट म्हणजे करोना विषाणूचा संसर्ग, ज्याला कोविड 19 ची महामारी म्हणून ओळखलं जातं हे नव्याने सांगण्याची गरज नाही.
प्रत्येकाला ते आता माहिती झालं आहे. याच महामारीच्या कचाट्यात टोकियो ऑलिम्पिक सापडली. जपानला अखेर ही स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलावी लागली. आता ही स्पर्धा 2021 मध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
१२४ वर्षांच्या ऑलिम्पिकच्या इतिहासात प्रथमच ही स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. यापूर्वी ही स्पर्धा तीन वेळा रद्द करण्यात आली होती. त्याला कारणे वेगळी होती.
त्यावर आपण ऊहापोह करणारच आहोत, पण आधी या क्रीडाकुंभाच्या भविष्यातील आयोजनावर लक्ष केंद्रित करू. ही स्पर्धा एक वर्षासाठी स्थगित तर झाली, पण ती पुढेही होईल का, या प्रश्नावर लक्ष वेधणे अतिशय महत्त्वाचे आहे.
Coronavirus | Tokyo Olympics | करोना विषाणूचा संसर्ग अर्थात कोविड १९ ही जागतिक महामारी म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केली आहे.
सार्स, मर्ससारखे अनेक आजार या जगाने पाहिले आहेत. त्यावर कोणतंही औषध शोधता आलेलं नाही. अशात करोनाने या जगावर हल्ला केला आहे.
मात्र, या विषाणूचा संसर्ग इतका भयानक आहे, की त्याची कल्पना कोणीच केलेली नव्हती. या आजारावरही अद्याप कोणतंही औषध अस्तित्वात नाही.
त्यामुळे टोकियो ऑलिम्पिक एक वर्ष पुढे ढकलली तरी संकट टळलेलं नाही, हे टप्प्याटप्प्याने समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे.
खरंच ही महामारी आटोक्यात येईल का?
ऑलिम्पिकचा विचार करताना आधी या प्रश्नाचा विचार करावा लागणार आहे. तूर्तास तरी प्रश्नाचं उत्तर कोणीही ठामपणे देऊ शकणार नाही हे भयावह वास्तव आहे.
त्याचं सोपं उदाहरण म्हणजे पाकिस्तान. भारताचा कट्टर शत्रू असलेला हा देश अजूनही या महामारीचं गांभीर्य समजून घेऊ शकलेला नाही. ही महामारी रोखायची असेल तर खबरदारी हाच एकमेव उपाय आहे हे सर्वच जगाने मान्य केलं आहे.
पाकिस्तानही त्याला अपवाद नाही. मात्र, पाकिस्तानात अद्याप कोणतीही खबरदारी घेतली जात नाही, हे त्या देशाचे दस्तूरखुद्द पंतप्रधान इम्रान खान यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते.
इम्रान खान म्हणाले, की जर संपूर्ण देश लॉकडाउन केला तर लोकांमध्ये गोंधळाची परिस्थिती उद्भवेल. त्यामुळे आम्ही लॉकडाउन करणार नाही. या विधानावर आता काय बोलावे?
हा आजार तिसऱ्या टप्प्यात इतक्या वेगाने पसरतो, की त्याची गणती करणे अवघड होते हे इटलीवरूनच आपण पाहत आहोत. भारतात पाचशे रुग्णसंख्या असताना पाकिस्तानातील रुग्णसंख्या जवळपास त्याच्या दुप्पट होती.
म्हणजे 900 च्या आसपास रुग्ण होते. म्हणजेच पाकिस्तानमध्ये ही महामारी तिसऱ्या टप्प्यात पोहोचली आहे. अशा स्थितीत लॉकडाउनसारखे कटू निर्णय अत्यंत महत्त्वाचे आहे.
मात्र, त्या देशाने ते स्पष्टपणे नाकारले. इटलीसारखा आरोग्यसेवेत पुढारलेल्या देशाला हा आवाक्याबाहेर गेलेला आजार हाताळताना नाकीनऊ येत आहेत, तेथे पाकिस्तानसारख्या देशाची स्थिती काय होईल, याचा विचारच अंगावर काटा आणणारा आहे.
तीच स्थिती इराण आणि बेफिकीर किम जोंगच्या उत्तर कोरियाची. या दोन्ही देशांमध्ये करोनाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. उत्तर कोरियाचे भोग त्याचा शेजारी देश दक्षिण कोरियालाही भोगावे लागणार नाही हे कशावरून?
ज्या चीनकडून हा संसर्ग जगात फैलावला, त्या चीनमध्येच २४ मार्चपर्यंत साडेतीन हजारपेक्षा अधिक करोनाबाधित रुग्ण आहेत. इटली, स्पेन, अमेरिका, ब्रिटन या पुढारलेल्या देशांनाही या आजाराने हतबल केले असून, एकूण रुग्णसंख्या चार लाखांवर गेली आहे.
मृत्यूचे आकडेही लाखावर गेले आहेत. हे आकडे अजूनही थांबलेले नाहीत. इराण आणि दक्षिण कोरियासारख्या देशांचं तर कंबरडे मोडले आहे.
अशा परिस्थितीत प्रश्न हा नाही, की ऑलिम्पिक एक वर्षानंतरही खरंच होईल का? प्रश्न हा आहे, की एक वर्षानंतरही हा संसर्ग आटोक्यात येईल का? या प्रश्नाचं उत्तर कुणाकडेही नाही.
या महामारीला आटोक्यात आणण्यासाठी कदाचित पुढारलेले देश यशस्वी होतीलही. मात्र, पाकिस्तान, उत्तर कोरियासारख्या देशांमुळे ही महामारी कशी आटोक्यात येईल, याची चिंता अधिक महत्त्वाची आहे.
आज ज्या चीनने ही महामारी आटोक्यात आणली आहे, त्या देशात साडेतीन हजारांवर करोनाचे रुग्ण आहेत हे नाकारून कसे चालेल? ही साडेतीन हजार रुग्णसंख्या एक प्रकारे चालतेफिरते रासायनिक बॉम्बच आहेत.
जेथे हजाराच्या पटीत रुग्णसंख्या वाढत होती, तेथे आता एकदोन रुग्ण आढळत आहेत. म्हणजे पूर्णतः ही महामारी आटोक्यात आलेली नाही. Coronavirus | Tokyo Olympics |
आता 2021 च्या ऑलिम्पिकवर बोलूया…
कोविड 19 महामारीची तीव्रता एव्हाना लक्षात आलीच असेल. आता समजा, ही महामारी आटोक्यात आली. मग खेळाडू ऑलिम्पिकच्या तयारीला लागतील.
ऑलिम्पिकची तयारी म्हणजे असे नाही, की देशाने संघ निवडला आणि पाठवला ऑलिम्पिकला. ऑलिम्पिक पात्रतेचे काही निकष आहेत. आता धावण्याचेच उदाहरण घेऊया.
पुरुष गटात ८०० मीटर शर्यतीसाठी ऑलिम्पिकला पात्र ठरायचे असेल तर किमान १ मिनिट ४५ सेकंदाची (१ः४५ः२०) वेळ नोंदवणे आवश्यक आहे. ती नोंदवली तरच तुम्ही ऑलिम्पिकला पात्र ठराल.
असे प्रत्येक क्रीडा प्रकारात वेगवेगळे निकष आहेत. म्हणजेच काय, तर जगभरात या पात्रता स्पर्धा घ्याव्या लागतील. त्या आयोजित करण्यासाठी मनुष्यबळ लागेल.
यातून सोशल डिस्टन्स कसं राखणार? भारतात जर स्पर्धा असेल तर त्यासाठी किमान 15-20 देशांचे खेळाडू तरी ही स्पर्धा खेळण्यासाठी येतीलच. मग ही महामारी रोखण्यासाठी जी ताकद आणि संयम भारतासारख्या देशांनी बाळगला त्याचे काय?
अशा पात्र ठरलेल्या एकूण खेळाडूंची आणि देशांची संख्या विचारात घेतली तर त्यांना ऑलिम्पिकसाठी जपानमध्ये यावे लागणारच आहे. विमानसेवा तोपर्यंत सर्वांसाठी खुल्या होतील.
मग अशा ठिकाणी करोनाग्रस्त रुग्णाचा शिरकाव झाला तर काय होईल? ज्या देशांमध्ये करोना आटोक्यात आला नाही, त्यांना प्रवेश नाकारणार का किंवा कसे, याचा विचारही आयोजकांना करावा लागणार आहे.
अर्थात, जागतिक आरोग्य संघटनेच्याही काही सूचना असतीलच. Coronavirus | Tokyo Olympics |
ऑलिम्पिकविषयी हे वाचले आहे का?
- यापूर्वी बर्लिन ऑलिम्पिक 1916, टोकियो ऑलिम्पिक 1940, लंडन ऑलिम्पिक 1944 या तीन स्पर्धा महायुद्धामुळे रद्द करण्यात आल्या होत्या.
- आयओसीने टोकियो ऑलिम्पम्साठी 40 हजार 470 कोटी रुपयांचा महसूल गोळा केला आहे. ही स्पर्धा स्थगित झाल्याने ही सगळी रक्कम परत करावी लागणार आहे.
- १९४० नंतर तब्बल ८० वर्षांनी टोकियो ऑलिम्पिकवर पुन्हा संकट ओढवले आहे, तर ऑलिम्पिकच्या १२४ वर्षांच्या इतिहासात तीन वेळा ही स्पर्धा रद्द झाली आहे, तर यंदा २०२० मध्ये ती स्थगित झाली आहे.
बर्लिन ऑलिम्पिक
टोकियो ऑलिम्पिक
जपानला तब्बल ८० वर्षांपूर्वी ऑलिम्पिकचे यजमानपद मिळाले होते. त्या वेळी या यजमानपदासाठी बार्सिलोना, रोम आणि हेलसिंकीसारखी शहरं स्पर्धेत होती.
त्यांना मागे टाकून जपानने यजमानपदावर कब्जा केला. मात्र, चीनसोबत युद्ध सुरू असल्याने जपानला या यजमानपदावर पाणी सोडावे लागले. त्यानंतर या स्पर्धेचे यजमानपद हेलसिंकीला मिळाले.
मात्र, हेलसिंकीसाठीही हा आनंद औटघटकेचा ठरला. १९३९ मध्ये दुसरे महायुद्ध छेडले गेल्यामुळे ही स्पर्धा रद्द करावी लागली.
लंडन ऑलिम्पिक
१९४० मध्ये टोकियो ऑलिम्पिक रद्द झाल्यानंतर आयओसीच्या बैठकीत लंडन शहराला ऑलिम्पिकचे यजमानपद बहाल करण्यात आले. इंग्लंडसाठी ही आनंदाची बाब होती.
मात्र, लंडनसाठी हे यजमानपद मृगजळ ठरलं. यजमानपद मिळाल्याच्या अवघ्या तीन महिन्यांनंतर ब्रिटनने जर्मनीविरुद्ध युद्धाचे निशाण फडकावले.
त्यामुळे स्पर्धा होऊ शकली नाही. त्यानंतर इटलीमध्ये ऑलिम्पिकचे यजमानपद मिळाले होते. मात्र, तेही नंतर रद्द करण्यात आले.
2 Comments