न्यूझीलंडचा ‘मुंबईकर’ एजाज पटेल याने भारताविरुद्ध रचला नवा विक्रम
मूळचा मुंबईकर असलेला न्यूझीलंडचा डावखुरा फिरकी गोलंदाज एजाज पटेल याने भारताविरुद्ध 4 डिसेंबर 2021 रोजी नवा विक्रम रचला आहे. मुंबई येथे भारत-न्यूझीलंडदरम्यान कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात न्यूझीलंडच्या एजाज पटेल याने एका डावात भारताचे दहा फलंदाज बाद करण्याचा विक्रम रचला आहे. ही कामगिरी करणारा एजाज पटेल हा इंग्लंडचा जिम लेकर, अनिल कुंबळे यांच्यानंतरचा तिसरा गोलंदाज बनला आहे. मुंबईत भारत विरुद्ध न्यूझीलंदरम्यान 4 डिसेंबर 2021 रोजी दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात एजाज पटेल याने भारताचे दहा फलंदाज बाद करण्याचा विक्रम रचला आहे. अशी कामगिरी करणारा एजाज पटेल क्रिकेटच्या 144 वर्षांच्या इतिहासातला तिसरा गोलंदाज ठरला आहे.
एजाज पटेल न्यूझीलंड निवासी असला तरी त्याचा जन्म मुंबईतला. त्याच्या आईवडील 1996 मध्ये न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाले. मूळ भारतीय असला तरी एजाज न्यूझीलंडचा नागरिक आहे. त्याने भारताच्या पहिल्या डावात 47.5 षटकांत 119 धावा देत दहा विकेट घेतल्या. तो आता इंग्लंडचे जिम लेकर आणि भारताचे अनिल कुंबळे यांच्या पंगतीत जाऊन बसला आहे.
जिम लेकर याने 1956 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मँचेस्टर येथे दहा विकेट घेतल्या होत्या. त्याने 51.2 षटकांत 53 धावांच्या बदल्यात दहा विकेट घेण्याची विक्रमी कामगिरी केली होती. त्यानंतर तब्बल 43 वर्षांनी अनिल कुंबले याने ही कामगिरी केली. त्यांनी पाकिस्तानविरुद्ध दिल्ली येथे फेब्रुवारी 1999 मध्ये 26.3 षटकांत 74 धावांच्या बदल्यात दहा विकेट घेतल्या होत्या.
एजाज पटेल 4 डिसेंबर 2021 रोजी कारकिर्दीतला 11 वा कसोटी सामना खेळत आहे. तत्पूर्वी, त्याने पहिल्या डावात पाचपेक्षा अधिक विकेट घेण्याची कामगिरी दोनदा केली आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात त्याने मोहम्मद सिराज याला बाद करीत दहावी विकेट सेलिब्रेट केली. गंमत म्हणजे, मोहम्मद सिराज याचा झेल मूळ भारतीय असलेल्या रचिन रवींद्र याने घेतला. एजाज पटेल याचा विक्रम भारतीय टीमने उभे राहून साजरा केला. पंचांनी तो चेंडू एजाज पटेलकडे सुपूर्द केला.
एजाज पटेल याने आपल्या जन्मस्थानी केलेला विक्रम अनोखा म्हणावा लागेल. जन्मस्थानी भारताविरुद्ध खेळणारा एजाज पटेल डग्लस जॉर्डिन याच्यानंतर दुसरा क्रिकेटपटू आहे.
यापूर्वीचे एका डावात दहा विकेटचा विक्रम
1956 मध्ये इंग्लंडचा जिम लेकर याच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध मँचेस्टर येथे दहा विकेट
किती षटकांत 10 विकेट? : 51.2 षटकांत 53 धावांच्या बदल्यात.
फेब्रुवारी 1999 मध्ये अनिल कुंबळे याची पाकिस्तानविरुद्ध दिल्ली येथे कामगिरी
किती षटकांत 10 विकेट? : 26.3 षटकांत 74 धावांच्या बदल्यात.
4 डिसेंबर 2021 रोजी न्यूझीलंडच्या एजाज पटेल याचा भारताविरुद्ध पहिल्या डावात दहा विकेट
किती षटकांत 10 विकेट? : 47.5 षटकांत 119 धावांच्या बदल्यात.