All SportsFootballsports news

मारियो झगालो- दि वोल्फ

मारियो झगालो- दि वोल्फ

मारियो झगालो… अर्थात दि वोल्फ यांनी 5 जानेवारी 2024 रोजी जगाचा निरोप घेतला. ब्राझीलने फुटबॉलच्या सुवर्णपिढीतला एक शिलेदार गमावला. नव्या पिढीला झगालो फारसे कळणार नाही. त्यासाठी झगालो जाणून घ्यायलाच हवा…

पृथ्वीतलावर असा एकही देश नाही, ज्याचं ब्राझीलसारखं फुटबॉलशी घट्ट नातं आहे. हा देश 1930 पासून प्रत्येक विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत भाग घेणारा एकमेव देश आहे. पाच वेळा विश्वविजेता ठरलेलाही हा एकमेव देश आहे. प्रत्येक देशाला एक संस्कृती असते. ब्राझीलची स्वतंत्र फुटबॉल संस्कृती आहे. फुटबॉलपटूंच्या अनेक पिढ्या पाहिल्या. पेले, गॅरिंचा, टोस्टाओ, जेरजिन्हो, झिको, सॉक्रेट्स आणि अगदी अलीकडचे रोमारियो, रोनाल्डो, रोनाल्डिन्होपर्यंत…

या यादीत एक नाव गायब आहे. तुलनेने मोठा फुटबॉलपटू नसेलही. कदाचित जागतिक कीर्तीचाही नसेल. तरीही तो महान खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवतो. ते नाव म्हणजे मारियो जॉर्ज लोबो झगालो तथा मारियो झगालो (Mário Zagallo).

झगालो ‘दि वोल्फ’ या टोपणनावाने ओळखले जायचे. त्यांचं आडनाव ‘लोबो’ (Lobo). पोर्तुगीज भाषेत लोबो म्हणजे लांडगा (वोल्फ). झगालो मैदानातले वामपंथी खेळाडू. फुटबॉलच्या भाषेत ‘लेफ्ट विंगर’. जसे मैदानाच्या मध्य क्षेत्रात खेळतात ते मिडफिल्डर, तसे जे मैदानाच्या डाव्या बाजूला खेळतात ते ‘लेफ्ट विंगर’. 1951 ते 1965 या आपल्या कारकिर्दीत ते फ्लेमेंगो आणि बोटाफोगो या दोन क्लबकडून खेळले. पहिला (1958, स्वीडन) आणि दुसरा (1962, चिली) वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ब्राझील संघातील ते महत्त्वाचे खेळाडू होते.

झगालो यांनी दोन वर्ल्ड कप जिंकले असले तरी एक प्रशिक्षक म्हणून ते फुटबॉलविश्वातील दंतकथा बनले. विशेषतः मुख्य प्रशिक्षक असताना 1970 मध्ये ब्राझीलने विश्वविजेतेपद जिंकले होते. अनेक प्रशिक्षक त्यांना अजूनही सर्वांत महान प्रशिक्षक मानतात.

झालं काय, मेक्सिकोतील विश्व कप स्पर्धेसाठी ब्राझीलचा संघ पात्र ठरला. त्या वेळी संघाचा प्रशिक्षक होता जोआओ साल्दान्हा (João Saldanha). साल्दान्हा एक पत्रकार होतेच, शिवाय प्रशिक्षकही होते. त्या वेळी ब्राझीलवर लष्करी राजवट होती. त्यांच्यातला पत्रकार त्यांना स्वस्थ बसू देत नसेल कदाचित, पण त्यांनी ब्राझीलच्या लष्करी राजवटीवर सडकून टीका केली होती. त्यांचे पेलेंशीही तणावपूर्ण संबंध होते. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले. त्या वेळी साल्दान्हो यांच्याच मार्गदर्शनाखाली ब्राझीलचा संघ वर्ल्ड कपची तयारी करीत होता. मात्र, लष्करी राजवटीशी पंगा घेतल्याने त्यांची ब्राझील संघाच्या प्रशिक्षकपदावरून उचलबांगडी झाली आणि त्या जागी मारियो झगालो यांची वर्णी लागली. त्या वेळी झगालो अवघ्या 38 वर्षांचे होते.

त्यानंतर जे झालं त्याला इतिहास साक्षीदार आहे. कारण ब्राझीलने तीन वेळा वर्ल्ड कप उंचावला. फायनलमध्ये दोन वेळच्या विश्वविजेत्या इटलीला पराभूत केले. तत्पूर्वी ब्राझीलने आपल्या खेळाने फुटबॉलविश्वाची मने जिंकली. ब्राझीलचा खेळ पाहून विश्व थक्क झालं होतं.

पश्चिम जर्मनीत 1974 मध्ये फिफा वर्ल्ड कप स्पर्धा होती. झगालो यांनी 1974 मध्ये ब्राझील संघाची कमान सांभाळली खरी. पण कर्णधार जोहान क्रूफ याच्या नेतृत्वाखालील नेंदरलँडने त्यांना अंतिम फेरी गाठू दिली नाही. त्या वेळी नेदरलँडचे मॅनेजर रिनस मिशेल्स होते. झगालो नंतर 1994 अमेरिकेतील वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पुन्हा ब्राझील संघाकडे परतले, ते कार्लोस अल्बर्टो परेरा यांचे सहाय्यक म्हणून. या जोडीने धमाल केली. ब्राझीलने चौथा वर्ल्ड कप जिंकला.

ब्राझीलची पुढची मोहीम फ्रान्स होती. 1998 मध्ये फ्रान्सला फिफा वर्ल्ड कपचं यजमानपद मिळालं. या वेळी झगालो यांच्याकडे ब्राझीलच्या संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा आली. झगालो पुन्हा एकदा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये दिसले. ब्राझीलला फ्रान्सविरुद्ध जिंकण्याची संधी होती. मात्र, एक अघटित घडलं. हे अघटित ब्राझीलचा स्ट्रायकर रोनाल्डो लुइस नाझारियो डी लिमा अर्थात रोनाल्डो याच्याबाबतीत घडलं. अंतिम सामना सुरू होण्याच्या काही तास आधीची 12 जुलै 1998 रोजी सकाळची ही घटना आहे.

फ्रान्समधील सेंट-डेनिस येथील हॉटेलमध्ये ब्राझीलचा संघ उतरलेला होता. त्या वेळी रॉबर्टो कार्लोस हा रोनाल्डोचा रूममेट होता. रोनाल्डो कार्लोसला म्हणाला, की मी जरा वेळ विश्रांती घेतो असे म्हणत रूमकडे निघाला. मात्र, अचानक त्याला फिट येऊ लागले. रॉबर्टो कार्लोस घाबरला आणि ओरडतच धावत धावत त्याच्याजवळ गेला. ब्राझीलच्या पथकातील डॉक्टरांसह इतर अनेक जण खोलीबाहेर आले. वैद्यकीय पथकाने मारियो झगालो यांना सांगितलं, की रोनाल्डोला 11 जणांच्या टीममध्ये खेळवू नका. रोनाल्डोच नाही, तर संघाला हा मोठा धक्का होता. मात्र, रोनाल्डोने आग्रहाने सांगितलं, की मला आता बरं वाटतंय. मी खेळतो. झगालोंचा नाइलाज होता. त्यांनी त्याला संघात खेळविण्याचा निर्णय घेतला. संघातला स्टार खेळाडू असला तरी रोनाल्डो अजिबात तंदुरुस्त नव्हता. तरीही सामन्याची सुरुवात रोनाल्डोपासून सुरू केली. अखेरीस फ्रान्सने हा सामना 3-0 असा जिंकला.

या घटनेला चार वर्षे उलटली. झगालो यांनी वयाची सत्तरी गाठली. मात्र, तरीही ते फुटबॉलमध्ये सक्रिय राहिले. 2002 च्या फिफा वर्ल्ड कपमध्ये झगालोंची ही सक्रियता कायम राहिली. कारण ब्राझीलच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांचे विशेष सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

विक्रमी पाच वेळा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघासोबतची त्यांची भागीदारी ५० वर्षांच्या फुटबॉल इतिहासाला एका धाग्यात गुंफणारी होती.

मारियो झगालो यांचे जीवन

मारियो जॉर्ज लोबो झगालो यांचा जन्म 9 ऑगस्ट 1931 चा. ब्राझीलचे फॉरवर्डवर खेळणारे व्यावसायिक फुटबॉलपटू, तसेच समन्वयक आणि व्यवस्थापक अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या.

झगालो यांच्या नावावर चार फिफा वर्ल्ड कप विजेतेपदांचा विक्रम आहे. एवढंच नाही, तर सहा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये सहभाग घेण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे. 1958 आणि 1962 मध्ये एक खेळाडू म्हणून, तर 1970 मध्ये मॅनेजर म्हणून फिफा वर्ल्ड कप जिंकणारी ती विश्वातील पहिलीच व्यक्ती ठरली. ब्राझील संघाचे सहाय्यक व्यवस्थापक असतानाही त्यांनी 1994 फिफा विश्वचषक जिंकला. झगालो (Zagallo) 1974 मध्ये (चौथ्या स्थानावर) आणि 1998 मध्ये (उपविजेते) ब्राझीलचे प्रशिक्षक होते आणि 2006 मध्ये तांत्रिक सहाय्यक होते. झगालो एकमेव अशी व्यक्ती आहे, ज्यांनी खेळाडू आणि संघ व्यवस्थापक या दोन्ही पदांवर दोन वेळा वर्ल्ड कप जिंकला आहे. अशी कामगिरी जर्मनीचे फ्रांझ बेकनबाउर (Franz Beckenbauer) आणि फ्रान्सचे डिडिअर डेशॅम्प्स (Didier Deschamps) यांनीही केली आहे. मात्र, त्यांना एकदाच या दोन्ही पदांवर वर्ल्ड कप जिंकण्याची किमया साधता आलेली आहे.

झगालो यांचा जन्म अटालिया येथे 9 ऑगस्ट 1931 रोजी झाला. तारुण्यात त्यांनी सैन्यदलात काम केलं. त्यांची पोस्टिंग माराकाना स्टेडियमवर होती. पन्नासच्या दशकातील ही घटना आहे. त्या वेळी उरुग्वे विरुद्ध ब्राझील यांच्यात वर्ल्ड कपची फायनल होती. ब्राझीलला हरवून उरुग्वेने हा सामना जिंकला होता.

पायलटचं स्वप्न, पण झाले फुटबॉलपटू

फुटबॉलवेड्या ब्राझीलमध्ये झगालो यांचं स्वप्न होतं पायलट होण्याचं. मात्र, त्यांची दृष्टी तीक्ष्ण नव्हती म्हणून त्यांना पायलट होता आलं नाही. त्यामुळे त्यांनी अकौंटन्सीचा अभ्यास सुरू केला आणि फावल्या वेळेत ते फुटबॉल अमेरिकेकडून खेळू लागले. 1948 चं साल होतं ते. अमेरिका या देशाकडून नव्हे, तर ब्राझीलमधला हा एक फुटबॉल क्लब आहे. रिओ दि जानिरो येथील अमेरिका क्लब अमेरिका जेआर या नावाने ओळखला जातो.

झगालो जुन्या आठवणींबद्दल एका मुलाखतीत म्हणाले होते, की माझ्या वडिलांना आशा होती, की अकौंटंट व्हावं आणि घरच्या व्यवसायाला हातभार लावावा.

मात्र, असं काही घडलं नाही. झगालो फुटबॉलमध्येच रमले. ते दुसरे काही करूच शकले नाही. अमेरिका संघातून त्यांच्यातला फुटबॉलपटू जागा झाला आणि नंतर ते खेळतच राहिले.

अमेरिका संघातून नंतर ते फ्लेमेंगो (Flamengo) संघात दाखल झाले. लाल-काळ्या संघाचं (लाल आणि काळे उभे पट्टे असलेली संघाची जर्सी) प्रतिनिधित्व करताना ते कॅम्पीओनाटो कारियोका करंडक स्पर्धेत खेळले. क्लब स्तरावरील ही प्रतिष्ठेची स्पर्धा. फ्लेमेंगोकडून खेळताना संघाने हा करंडक सलग तीन वर्षे (1953, 1954, 1955) जिंकला. 1955 मध्ये संघाने रिओ-साओ पावलो (Rio-Sao Paulo) इंटरसिटी कपही जिंकला. त्या वेळी राष्ट्रीय स्पर्धा होत नव्हत्या. फ्लेमेंगो त्या वेळी शहरातल्या क्लबबरोबरच पेरू, इर्जेंटिने आणि इस्रायल या देशांमध्ये मैत्रीपूर्ण सामनेही खेळत होता. या संघाकडून झगालो यांनी 217 सामने खेळताना 30 गोल केले.

बोटाफोगो (Botafogo)

फ्लेमेंगो चांगला खेळत होता. मात्र, काय झालं कोण जाणे, 1958 मध्ये हा संघ आर्थिक तणावात सापडला. झगालोचं फ्लेमेंगोशी घट्ट नातं झालं होतं. मात्र, आर्थिक डबघाईमुळे इच्छा नसतानाही झगालोला संघ सोडावा लागला.

नंतर ते बोटाफोगो (Botafogo) संघात दाखल झाले. आता झगालो यांना रिओ दि जानिरो सोडून बोटाफोगो शहरात यावं लागणार होतं. रिओ दि जानिरोत त्यांची पत्नी शिक्षिका होती. मात्र, झगालो यांच्या फुटबॉलसाठी त्यांना नोकरी सोडावी लागली आणि 32 किलोमीटरवरील बोटाफागो शहरात हे कुटुंब स्थलांतरित झालं.

बोटाफागो संघात गॅरिंचा (Garrincha), डीडी (Didi) आणि निल्टन सँटोस (Nílton Santos) असे दिग्गज खेळाडू होते. त्यांच्यासोबत झगालो हा संघाचा महत्त्वाचा खेळाडू झाला. बोटाफोगो संघाने 1961 आणि 1962 मध्ये कॅम्पियोनाटो कॅरिओका, तसेच 1961 मध्ये रिओ-साओ पाउलो चॅम्पियन्स कप आणि 1962, 1964 मध्ये रिओ-साओ पाउलो इंटर-सिटी स्पर्धा जिंकली.

अशी घडली आंतरराष्ट्रीय कारकीर्द

एके दिवशी झगालो यांना ब्राझीलच्या राष्ट्रीय संघाकडून बोलावणं आलं. त्या वेळी 1958 मध्ये वर्ल्ड कप होणार होता. या स्पर्धेसाठी झगालो यांची पेपे याच्या जागी संघात वर्णी लागली होती. पेपे हा त्या वेळचा ब्राझीलचा सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून ओळखला जायचा. स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच पेपे जखमी झाला. ही जागा झगालो यांनी भरून काढली. स्पर्धेतील सर्वच सामने खेळले. स्वीडनविरुद्धच्या अंतिम सामन्यात एक गोलही नोंदवला. चार वर्षांनी ब्राझीलकडून झगालो पुन्हा वर्ल्ड कप खेळले. या स्पर्धेत एकूण सहा सामन्यात एक गोल केला, तर एक गोल करण्यात त्यांनी मदत केली. कारकिर्दीत ते 33 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. यात त्यांनी 5 गोल केले. कालांतराने खेळाडू म्हणून त्यांची कारकीर्द संपुष्टात आल्यानंतरही ते ब्राझील संघात प्रशिक्षक, व्यवस्थापक या नात्याने वावरत राहिले.

वय आणि आरोग्य दोन्ही झगालोंच्या हातात नव्हते. संघातला वावरही तसा कमीच झाला होता. वयोमानानुसार शारीरिक व्याधींनी डोके वर काढले. जुलै 2022 मध्ये त्यांना श्वसनाचा संसर्ग झाला. ऑगस्ट 2023 मध्ये मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे त्यांना 2 दिवस रुग्णालयात काढावे लागले. या व्याधींशी ते झुंजत होते. अखेरीस 5 जानेवारी 2024 रोजी ही झुंज थांबली आणि वयाच्या 92 व्या वर्षी रिओ दि जानिरोच्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ब्राझीलच्या फुटबॉलमधलं एक सुवर्णपान गळून गेलं होतं.

#दिवोल्फ #tehwolf #मारियोझगालो #दि_वोल्फ #Lobo #लेफ्टविंगर #फुटबॉल #वर्ल्ड कप #फिफावर्ल्डकपस्पर्धा #ब्राझीलचास्ट्रायकर #फिफावर्ल्डकप #मारियोझगालोजीवन #बोटाफोगो #Botafogo #JoãoSaldanha #MárioZagallo

कसे बनले महान फुटबॉलपटू पेले?

Visit Us

 

[jnews_block_8 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”63″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!