माका ट्रॉफी म्हणजे काय?
दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे वितरण राष्ट्रीय क्रीडादिनी 29 ऑगस्ट रोजी होते. या पुरस्कारांत खेलरत्न, अर्जुन पुरस्कारांसह इतर पुरस्कार दिले जातात. यात माका ट्रॉफीही (MAKA Trophy) दिली जाते. ही माका ट्रॉफी म्हणजे काय, ती कोणाला दिली जाते, हे अनेकांना माहिती नाही. तर जाणून घेऊया या माका ट्रॉफीविषयी…
हेमंत पाटील, नाशिक
केंद्र सरकारच्या वतीने दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त क्रीडा क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांनी गौरविण्यात येते. दिल्ली येथील राष्ट्रपतिभवनाच्या सभागृहात राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा होतो.
सर्वोच्च राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार (1991 पासून), अर्जुन पुरस्कार (1961 पासून), प्रशिक्षकांसाठी असलेला द्रोणाचार्य पुरस्कार (1985 पासून), ध्यानचंद पुरस्कार (2002 पासून), तेन्झिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार, राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार व मौलाना अब्दुल कलाम आझाद ट्रॉफी (MAKA Trophy) आदी पुरस्कार वितरित केले जातात.
करोना महामारीमुळे यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे national sports award | वितरण आभासी पद्धतीने (Virtual) झाले. दरवर्षी या पुरस्कारांची सकारात्मक- नकारात्मक चर्चा इलेक्ट्रॉनिक व प्रिंट माध्यमांत होत असते. हे वर्षही त्याला अपवाद ठरले नाहीत.
ऑलिम्पिक पदकविजेती पहिलवान साक्षी मलिक हिने अर्जुन पुरस्कारांबद्दल नाराजी व्यक्त केली. काही वर्षांपूर्वी राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराविषयी मीडियात चर्चा रंगली होती. मुख्यत्वे खेलरत्न व अर्जुन पुरस्कारांच्या निवडीवरच जास्त चर्चा होते, असा आजपर्यंतचा अनुभव आहे.
या सर्व क्रीडा पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण माध्यमांमध्ये सर्वांत कमी चर्चा होत असते ती माका ट्रॉफी (MAKA Trophy) पुरस्काराची. अनेकांना तर या पुरस्काराविषयी फारशी माहितीच नाही. फक्त एका ओळीचा उल्लेख वाचायला मिळतो. तेही फक्त विद्यापीठाचे नाव.
माका ट्रॉफी (MAKA Trophy) म्हणजे काय?
खरं तर इतर वैयक्तिक पुरस्कारांइतकंच महत्त्व या पुरस्काराला आहे. माका ट्रॉफी (MAKA Trophy) म्हणजे मौलाना अब्दुल कलाम आझाद पुरस्कार Maulana Abul Kalam Azad Trophy |
संपूर्ण भारतातील विद्यापीठ स्तरावरील विद्यार्थ्यांच्या क्रीडाप्रावीण्याचे संख्यात्मक मूल्यमापन करणारा हा महत्त्वाचा पुरस्कार आहे. मात्र या पुरस्काराला जेवढे महत्त्व मिळायला हवे तेवढे ते मिळत नाही.
एकंदरीतच आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच सकारात्मक नाही आणि याची कारणमीमांसा करणेदेखील क्रीडाविश्लेषकांना महत्त्वाचे वाटत नाही.
ऑलिम्पिकसारख्या उच्च किंवा सर्वोच्च दर्जा असलेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये पदकतालिकेत कायम आघाडीवर असणाऱ्या अमेरिका, चीन, जर्मनी, कोरिया, इंग्लंड, फ्रान्स, रशिया यांसारख्या देशांतील काहीअंशी खेळाडू हे महाविद्यालयीन व विद्यापीठीय स्पर्धा खेळणाऱ्या वयोगटांतील असतात.
दुर्दैवाने आपल्या देशात विद्यापीठीय क्रीडा स्पर्धांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही हे खेदाने मान्य करावे लागेल. खरं तर विद्यापीठ स्पर्धेचा वयोगट हा 18 ते 25 वर्षांदरम्यानचा उत्साही, शक्ती, चैतन्य, धाडस, आत्मविश्वास या व्यक्तिमत्त्वाच्या पैलूंनी परिपूर्ण असलेला हा वयोगट.
या वयोगटाकडे चांगले लक्ष देऊन क्रीडागुणवत्ता सर्वोच्च स्थानी नेऊन ठेवण्याची कामगिरी करण्यात आपला भारत काही प्रमाणात मागे पडत आहे.
जलतरणात ऑलिम्पिक स्पर्धेत 22 सुवर्णपदके पटाकवणाऱ्या अमेरिकेच्या मायकेल फेल्प्सला 100 मीटर बटरफ्लाय शर्यतीत पराभूत करणारा सिंगापूरचा 21 वर्षीय जोसेफ स्कूलिंग हा जलतरणपटू विद्यापीठीय स्पर्धेच्या वयोगटातलाच.
2008 मध्ये तरण तलावावर मायकेल फेल्प्सचा ऑटोग्राफ घेणारा लहानगा, निरागस जोसेफ 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये त्याच मायकेल फेल्प्सला पराभूत करतो हे युवाशक्तीचे मूर्तिमंत उदाहरण आपल्या नजरेसमोर आहे.
ऑलिम्पिक स्पर्धा प्रक्षेपणात संपूर्ण जगातील जलतरणप्रेमींनी रिओ ऑलिम्पिकचा हा रोमांचक क्षण अनुभवला आहे. योग्य वयात प्रामाणिक प्रयत्न, मेहनत केली तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही हेच या उदाहरणावरून आपल्या लक्षात येते.
कशी आहे माका ट्रॉफी (MAKA Trophy) ?
भारताचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या नावाने दिली जाणारी, अतिशय सुरेख रचना केलेली आकर्षक ट्रॉफी आहे.
मध्यभागी अशोकस्तंभ व बाजूला क्रिकेट, हॉकी, फुटबॉल खेळणाऱ्या खेळाडूंच्या लहान प्रतिकृती व चौरंगी पाया अशी या ट्रॉफीची रचना आहे.
संपूर्ण भारतातील विद्यापीठांच्या विविध खेळांच्या क्रीडा स्पर्धांमधून सर्वांत जास्त प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यापीठाला ही फिरती माका ट्रॉफी (MAKA Trophy) दिली जाते.
1956-57 पासून नित्यनियमाने माका ट्रॉफी देण्याची परंपरा सुरू आहे.
माका ट्रॉफीसाठी (MAKA Trophy) असे होते मूल्यांकन
माका ट्रॉफीचे (MAKA Trophy) मूल्यांकन गुणांकांनी केले जाते. जागतिक क्रीडा स्पर्धा, ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा, जागतिक आंतरविद्यापीठ स्पर्धा, कॉमनवेल्थ स्पर्धा, खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा व अखिल भारतीय व विभागीय आंतरविद्यापीठ स्पर्धांतील खेळाडूंचे प्रावीण्य या गुणांकात ग्राह्य धरले जाते.
ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण, रौप्य, कांस्यपदक मिळविणाऱ्या खेळाडूला, किंबहुना त्याच्या विद्यापीठाला अनुक्रमे 600, 400, 200 गुण दिले जातात.
कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत सुवर्ण, रौप्य, कांस्यपदक पटकावल्यास अनुक्रमे 300, 200, 100 याप्रमाणे गुण दिले जातात. तसेच अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धा व नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेतील सुवर्णपदकास 60, रौप्यपदकास 40 व कांस्यपदकास 20 गुण दिले जातात.
सांघिक खेळाच्या प्रावीण्याबाबत गुणांकन पद्धतीत खेळाडूसंख्येमुळे काही सांख्यिकीय बदल केलेले आहेत. गुणांकन करताना जे क्रीडा प्रकार ऑलिम्पिक, आशियाई व कॉमनवेल्थ स्पर्धेत खेळले जातात त्यांचाच विचार केला जातो.
बुद्धिबळ, खो-खो व क्रिकेट हे खेळ मात्र अपवाद आहेत. या खेळांच्याही प्रावीण्याचा समावेश करण्यात आलेला आहे. एकूण गुणांकनात ज्या विद्यापीठाचे गुण सर्वाधिक असतात, त्या विद्यापीठाला राष्ट्रपतींच्या हस्ते माका ट्रॉफीने (MAKA Trophy) गौरविण्यात येते. ट्रॉफी व 15 लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे..
विजेत्या विद्यापीठाचे कुलगुरू व क्रीडा संचालक यांच्या दृष्टीने हा क्षण म्हणजे एक आनंदाचा ठेवाच असतो. पुरस्काराची रक्कम हीदेखील क्रीडा बाबींसाठीच वापरावी असा दंडक केंद्रीय क्रीडा खात्याने घालून दिलेला आहे.
2019 ची माका ट्रॉफी (MAKA Trophy) चंडीगडच्या पंजाब विद्यापीठाने मिळविली आहे. या विद्यापीठाने सलग दुसऱ्या वर्षी या विद्यापीठावर मोहोर उमटवली.
पुरस्कार मिळविण्यात महाराष्ट्र मागेच
माका ट्रॉफीचा (MAKA Trophy) इतिहास पाहिला तर प्रामुख्याने उत्तर भारतातील गुरू नानकदेव विद्यापीठ, पंजाब विद्यापीठ, कुरुक्षेत्र विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ यांचेच वर्चस्व राहिले आहे. त्यातही अमृतसरच्या गुरू नानकदेव विद्यापीठाने ही ट्रॉफी तब्बल 23 वेळा जिंकली आहे.
माका ट्रॉफीच्या इतिहासात महाराष्ट्रातील फक्त मुंबई विद्यापीठाला ही ट्रॉफी मिळवण्याचा मान दोनदा मिळाला आहे- 1956-57 व 1985-86 य दोनच वर्षांत मुंबई विद्यापीठाला या ट्रॉफीवर नाव कोरता आले. आता त्याला तब्बल 35 वर्षे उलटली आहेत. त्यानंतर महाराष्ट्रातील एकाही विद्यापीठाला ही ट्रॉफी जिंकता आलेली नाही.
महाराष्ट्र मागे का?
मग महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये गुणवान खेळाडू नाही का, असा प्रश्न आपसूकच येतो. नक्कीच गुणवान खेळाडू महाराष्ट्रात आहेत. मात्र, फक्त गुणवान खेळाडू असून चालणार नाही, तर अगदी विद्यापीठ प्रशासनाच्या पातळीवरदेखील या विषयाची सकारात्मक चर्चा होणे गरजेचे आहे.
राज्याचे कुलपती, कुलगुरू, विद्यापीठांचे क्रीडा संचालक, महाविद्यालयांचे प्राचार्य, महाविद्यालयातील कार्यरत क्रीडा संचालक या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची जोड असल्याशिवाय महाराष्ट्राला ही ट्रॉफी मिळणे अशक्यच.
महाराष्ट्राच्या कुलगुरूंनाही राष्ट्रपतींच्या हस्ते माका ट्रॉफी (MAKA Trophy) स्वीकारण्याच्या क्षणाचा आनंद घेण्याची संधी मिळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
एका सुवर्णपदकाने हुकली पुणे विद्यापीठाची ट्रॉफी
गेल्या शैक्षणिक वर्षत भुवनेश्वर, ओडिशामध्ये झालेल्या पहिल्या खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाने पदकतालिकेत दुसरे स्थान मिळवून सर्वसाधारण उपविजेतेपद मिळविले. ही महाराष्ट्राच्या दृष्टीने निश्चितच कौतुकास्पद बाब मानावी लागेल.
पहिल्या स्पर्धेच्या विजेतेपदाची ट्रॉफी फक्त एका सुवर्णपदकाने हुकल्याची खंत पुणे विद्यापीठाच्या प्रत्येक क्रीडा संचालकाच्या मनात कायम राहील. अर्थात, हे यश संपादन करणेही तितकेसे सोपे नव्हते. त्याचे श्रेय पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन कटमाळकर, क्रीडा संचालक डॉ. दीपक माने यांना निश्चितच द्यावे लागेल.
43 क्रीडा प्रकारांत प्रावीण्य मिळविण्याचे आव्हान
एक गोष्ट मात्र लक्षात घ्यावी लागेल. या पहिल्या खेलो इंडिया स्पर्धेत फक्त 17 क्रीडा प्रकारांचा समावेश होता आणि माका ट्रॉफी विजेतेपदाच्या स्पर्धेत एकूण 43 क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.
या 43 क्रीडा प्रकारांमध्ये वर्चस्व मिळविण्याचे शिवधनुष्य पेलण्याची क्षमता महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये आहे काय? निश्चितच आहे. मात्र, हे सकारात्मक उत्तर देताना महाराष्ट्रातील विद्यापीठांनी हे आव्हान स्वीकारायला हवे.
कारण आजमितीला संपूर्ण 43 क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग घेणारे महाराष्ट्रातील एकही विद्यापीठ सध्या तरी नाही. याची कारणेही अनेक असू शकतील. जसे विद्यापीठांची आर्थिक क्षमता, विविध क्रीडा प्रकारांच्या अद्ययावत सुविधा, विद्यापीठाच्या क्रीडा विभागातील उपलब्ध मनुष्यबळ, विविध खेळांचे तज्ज्ञ प्रशिक्षक, मार्गदर्शक, खेळाडूंना मिळणाऱ्या आर्थिक व इतर सुविधा इत्यादी…
मात्र, या अडथळ्यांवर मात करता येऊ शकेल. फक्त मजबूत सांघिक प्रयत्नांची आवश्यकता व त्या प्रयत्नात सातत्य ठेवणे आवश्यक आहे. या सर्वांना प्रशासनाची भक्कम साथ व दूरदर्शीपणा असणे हेदेखील अत्यंत महत्त्वाचे असेल. हे साध्य करणे अवघड असले तरी अशक्य नाही.
माका ट्रॉफीचा विचार करताना उत्तरेकडील विद्यापीठांच्या क्रीडासंस्कृतीचाही अभ्यास करणे महत्त्वाचे ठरेल. एकंदरीतच नैसर्गिक शारीरिक संपदेने उत्कृष्ट असलेले विद्यार्थी खेळाडू या विद्यापीठांना उपलब्ध होतात.
तसेच त्या विद्यापीठांतर्फे खेळाडूंना विद्यापीठाच्या वतीने मिळणाऱ्या सुविधा, रोख रकमेच बक्षिसे, स्पर्धेपूर्वी होणारी दीर्घकालीन सराव शिबिरे, या शिबिरांमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शकांद्वारे होणारे मार्गदर्शन, विविध खेळांच्या राष्ट्रीय पातळीवरील काम करणाऱ्या संघटना यांच्याद्वारे मिळणारे मार्गदर्शन या बाबींचाही विचार करावा लागेल.
या सर्वांचा परिणाम प्रत्येक खेळाडूवर कळत नकळतपणे होत असतो. त्यामुळे खेळाडूंमधील चुरस, सराव सातत्याचे महत्त्व यांची जडणघडण होण्याची प्रक्रिया अखंडपणे सुरू असते.
एकंदरीतच युवक क्रीडासंस्कृतीत उत्तरेकडील विद्यापीठे महाराष्ट्रातील विद्यापीठापेक्षा कांकणभर सरसच ठरतात. आपले महाराष्ट्र शालेय क्रीडा स्पर्धेत देशपातळीवर कायम पहिल्या, दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले आहे. ही राज्याच्या क्रीडा क्षेत्राच्या दृष्टीने सुखावह बाब आहे.
मात्र, पुढे ही शालेय क्रीडागुणवत्ता कोमेजली जाते. पालकांचा मुलाच्या शैक्षणिक करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचा दृष्टिकोन हादेखील महाविद्यालयीन किंवा विद्यापीठ स्तरावर निश्चितच परिणाम करणारा घटक ठरतो.
ही शालेय क्रीडागुणवत्ता महाराष्ट्रातील जवळपास 20 विद्यापीठांमध्ये विभागली जाते याचादेखील विचार करणे अपेक्षित ठरते.
वर्षभर आपल्या क्रीडा प्रकारांचा सराव, तसेच विद्यापीठ क्रीडा स्पर्धांबरोबरच इतरही खुल्या गटाच्या स्पर्धांवर या खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे बारकाईने लक्ष असते व तेथेही प्रावीण्य मिळविणे हाच त्यांचा उद्देश असतो.
आपल्यापेक्षा उच्च दर्जाच्या खेळाडूशी स्पर्धा करताना कळत नकळत व्यावसायिक खेळाडूंचे क्रीडाकौशल्य त्यांच्या अंगी रुजायला सुरुवात होते. त्याचा फायदा उत्तरेकडील खेळाडूंना आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी होत असतो.
एकूणच माका ट्रॉफी स्वीकारण्याच्या राष्ट्रपती भवनाच्या निमंत्रणाची महाराष्ट्रातील कुलगुरूंना किती वर्षे वाट पाहावी लागेल हे ठामपणे कोणीच सांगू शकणार नाही. मात्र, लवकरच तो दिवस उजाडेल अशी आशा बाळगायला हरकत नाही…
(लेखक नाशिकच्या मराठा विद्याप्रसारक संस्थेचे क्री़डाप्रमुख आहेत)
Hi I am Neil and I will join this channel Can I join? I am a taekwondo player And I get the basics of yoga and the basics of taekwondo
Mratji longvej videvo
Please find attached my resume for a few 9th
Garva the best price of the very first
The five years ago and the other day
Nice
Thank yu so much 🙂